Saturday, February 21, 2015

इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी - पवई (2)

आय आय टी , पवईला राहत असताना शिवणाचा क्लास लावला होता. हा क्लास मैलोंमैल लांब होता. चालत जाऊन येऊन २ - 3 मैल. क्लासवरून आल्यावर  भूक लागायची. दुपारी १ ला आमची जेवणे झाली की थोडावेळ विश्रांती घेऊन मग मी व माझी मैत्रिण क्लासला जायला निघायचो. जाताना उत्साह असायचा पण येताना खूप दमायला व्हायचे. मला खरे तर ब्लाऊज आणि पंजाबी ड्रेस शिवायला शिकायचे होते. पण त्या क्लासच्या बाई म्हणाल्या की आधी सुरवातीला तुम्हाला सराव होण्यासाठी बारीक बारीक कपडे शिवा मग मी तुम्हाला नक्की ब्लाउज व पंजाबी ड्रेस शिकवेन.





 
सुरवातीला अनेक लहान बाळाचे लंगोट, झबली, टोपडी शिवली. ती माझ्या भाचीला मी बाळंतविड्यात दिली.  घाटकोपरला जाऊन छोटे छोटे फॉक घेतले. मला अजूनही त्याचे रंग आठवत आहे. लाल, पिवळा, निळा, गुलाबी इ. माझा बाळंतविडा खूप छान झाला. शिवाय तिला पायातल्या तोरड्या पण घेतल्या होत्या. जेव्हा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी नवीन हॉस्टेल बांधले ते खूपच छान होते. तिथे माझ्या बहिणीचे म्हणजेच रंजनाचे डोहाळेजेवण केले. भैरवीकडून अन्नपूर्णा पुस्तक आणले व त्यातून  रेसिपी शोधून स्वयंपाक केला होता. गाजर घालून भात केला. टोमॅटो सूप व बटाट्याचे पराठे बनवले. कोबीची भजी केली व गोड म्हणून शेवयाची खीर बनवली. नेमका गॅस संपल्याने सर्व स्वयंपाक स्टोव्ह वर करायला लागला. रंजना म्हणाली की तू आधी सर्व स्वयंपाक उरकून घे. मग मी बसल्या बसल्या पराठे करते. तिचे पराठे होईपर्यंत मी पानाची तयारी केली. रांगोळी काढून मग आम्ही चोघे जेवायला बसलो. रंजनाला द्यायला म्हणून एक साडी आणली होती. ही साडी आम्ही दोघांनी घाटकोपर मधल्या एका दुकानातून आधीच खरेदी करून ठेवली होती. तिचा रंग निळा व थोडा मोरपंखी रंगाकडे झुकणारा होता. त्यावर मॅचिंग ब्लाऊज पीसही आणले होते. रंजना व सुरेश काही कामानिमित्ताने मुंबईला आले होते म्हणून मला तिचे डोहाळेजेवण करता आले म्हणून मला खूप आनंद झाला होता.   विनायकचे भाऊ व भावजय  त्यांच्या लग्नानंतर आमच्या जुन्या हॉस्टेल म्हणजेच एच ११ ला आली होती. वसुधाला मी साडी घेतली होती. त्याचा रंग लाल होता आणि दीराला शर्टपीस.






 एच ११ ला आम्ही आमचे लग्न झाल्यावर लगेचच महिन्याने रहायला आलो होतो. सगळीकडे हिरवेगार होते. पावसाळ्यात खूप अंधारून यायचे. सकाळी उठून अशा अंधारलेल्या वातावरणात दिवा लावायला लागायचा. एकीकडे चहाचे आधण गॅसवर ठेवायचे व खिडकीतून पावसाला बघत रहायचे. आले घालून केलेला चहा मग आम्ही दोघे प्यायचो. रात्री झोपताना ट्रॉंझिस्टर वर छायागीत, बेलाके फूल ऐकूनच झोपायचो. त्यावेळेला घाटकोपरला जाऊन पाणी पुरी व भेळ पुरी खाणे होत असे. मेथीची भजी करताना खूप आनंद व्हायचा. तुलसी ब्लॉक्स मध्ये एक मोठा बेड होता आणि टेबल खुर्ची होती. या  टेबल खूर्चीचा लिहिण्यासाठी व जेवताना त्याचा डायनिंग टेबल म्हणून उपयोग व्हायचा. शिवाय मोठ्या बेड शेजारची जागा होती तिथे एक गादी व त्यावर बेडशीट व मागे उशा अशा ठेवल्या होत्या भिंतीला टेकून. यावर दुपारचे बसणे होत असे.





बऱ्याच आठवणी आहेत. जश्या आठवतील तश्या लिहीनच.  तूर्तास इतकेच. आयायटी होस्टेल लाईफ वर जितके लिहीन तितके कमीच !

Sunday, February 08, 2015

८ फेब्रुवारी २०१५





आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला आदल्या दिवशीची पण थोडी भर घालायला लागेल. नेहमीचे वीकेंडचे कार्यक्रम थोडे उलटे सुलटे झाले व त्यामुळे आजचा दिवस जरा वेगळा आणि चांगला गेला. आज सकाळी सूर्योदय पहायचा योग आला. सूर्योदय पाहणे म्हणजे देवळात जाऊन आल्यासारखेच वाटते. सूर्य आधी लाल, नंतर पिवळा व नंतर पांढरा होत जाताना छान तर वाटतेच, शिवाय त्याची किरणे जेव्हा आजुबाजूला फाकतात तीही अतीव छान दिसतात. मुख्य म्हणजे समुद्रावर जाऊन सूर्योदय बघण्याची मजा काही औरच असते. एक तर तिथे कोणताही अडथळा नसतो. अथांग समुद्रातून सूर्य जेव्हा वर येतो तेव्हा तो खास आपल्याला भेटण्यासाठीच आलेला आहे असेच वाटत रहाते.



शुक्रवारी रात्री मुडाखी , भाजी व कोशिंबीर खाल्ल्याने झोप लागली नाही. नेहमीचाच अनुभव आहे आमचा. आम्ही भात खाणे सोडले आहे. मला तर मुळातच भात तितकासा आवडत नाही. पोळी भाजी आम्हाला दोघांनाही प्रिय आहे. शुक्रवारी झोप नाही म्हणून  शनिवार खूप कंटाळवाणा गेला. खरे तर आम्ही शनिवारी बाहेर  जेवायला जातो. पण झोप नसल्याने अशक्तपणा आला आणि भूकही खूप लागली होती. मी घरीच करते काहीतरी पटकन म्हणून फ्रीज उघडला तर शुक्रवारची भाजी, कोशिंबीर होती. कणिक बाहेर काढली. आणि अगदी होॅटेलमध्ये कसे आर्डर केल्यानंतर १० मिनिटात खायला तुमच्या टेबलावर येते ना, अगदी तसेच झाले. कणिक खरे तर गार होती. पण ती पटकन ५ ते १० सेकंद मायक्रोवेव्हला ठेवली. भाजी गरम केली. पोळ्या लाटल्या आणि १० मिनिटांच्या आतच जेवायला बसलो. मग झोप लागली. उठल्यावर चहा घेतला आणि वि म्हणाला आज हवा चांगली आहे तर बाहेर फिरायला जाऊ. मला खरे तर जाववत नव्हते. पण फिरून आल्यावर जरा तरतरी आली.





शनिवारी रात्री सिमला मिरचीची भाजी केली. दुपारच्या पोळ्या होत्याच त्यामुळे बरे झाले. पण परत शनिवारी रात्री झोपेच खोबरे. झोपेचे खोबर होण्याचे कारण हवा. इथली हवा इतकी काही बदलते ना की रात्री प्रचंड थंडीने जर हीटर लावला तर सकाळी उठल्यावर बदाबदा पाऊस पडत असतो. तर संध्याकाळी हिवाळ्याच्या दिवसातही गरम हवेची लाट येते. झोपेच तितके खोबरे झाले नव्हते. झाले होते इतकेच की पहाटे ४ लाच जाग आली आणि मग झोप लागता लागेना. गरम हवा होती. सूर्योदय बघण्याचे आज ठरवले नव्हते. वि पण लवकर जागा झाला होता. दोघांनी समुद्रावर सूर्योदय बघायला जाण्याचे ठरवले.  असा योग क्वचितच जुळून येतो. हिवाळ्यात सूर्योदय उशीराने होतो पण प्रचंड थंडी असल्याने बाहेर पडवत नाही. शिवाय ढग व पाऊस असला तरीही उपयोग नाही. आणि उन्हाळ्यात लवकर सूर्योदय होतो पण तेव्हा भल्या पहाटे उठून जायचाही कंटाळा येतो.





तर असा हा आमचा सूर्योदयाचा योग जुळून आला. चहा घेऊन निघालो. आज आकाश खूपच निरभ्र होते. एकही ढग नव्हता. समुद्रावर मोजकीच हौशी माणसे कॅमेरा हातात धरून सूर्याला कॅमेरात बंदिस्त करायला हजर होती. आज विशेष म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात क्षितीजावर लालसर रंग उमटतो तो आज नव्हता. पिवळसर रंग होता. सूर्य सुद्धा आज लाल लाल गोळा होऊन बाहेर आला नाही. सुरवातीला होता थोडा लालसर पण लगेच तो पिवळा झाला. तरी सुद्धा सूर्योदय बघण्याचा आनंद नेहमीच छान असतो. समुद्राच्या खालून तो वर येताना अति क्लासिक दिसतो. नेहमीप्रमाणेच फोटो घेतले. आल्यावर तिखटामिठाचा शिरा खायला केला व नंतर चहा हवाच. नंतर दुपारी बाहेर जेवायला मेक्सिकन उपहारगृह. आज भाताचा वेगळा मेनू छानच होता. त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या सांगायच्या. भातामध्ये भाज्या व सॉस व चीझ घालून देतात. खूप आवडला मेनु. आत पुढच्या वेळी फोटो घेईन. नंतर घरी येऊन व्हक्युमिंग, ग्रोसरी इ. इ. कामे केली. पण आज सुद्धा थोडे डोळे तसे पेंगतच आहेत अजूनही. पण काहीही म्हणा, आजचा सूर्योदय मात्र खूप आनंद देवून गेला.




ली रिंगरला फोटोज पाठवले.  बघू वेदर शॉटमध्ये वेदर चॅनलला  मी पाठवलेला फोटो दाखवतात का ते. पण शक्यतोवर सूर्योदयाच्या फोटोला प्राधान्य देतात.

Monday, February 02, 2015

एक होती "ऊ" तिला झाली " टू"

आई लहानपणी आम्हा दोघी बहिणींच्या उवा बघायची ना तेव्हा बरे वाटायचे. आईची बोटे केसातून फिरायची आणि झोप आल्यासारखे वाटायचे. तिच्या उवा बघून झाल्या तरीही आम्ही "आई, इथे बघं ग"  असे म्हणायचो.  केसामध्ये हुळहुळायचे आणि वाटायचे केसात मध्ये उ फिरते की काय. बरे, हाताने उवा लिखा मारून आईचे समाधान व्हायचे नाही. मग आई आमच्या केसांमध्ये फणी फिरवायची  या फणीचे कंगोरे इतके टोचायचे ना ! एक तर आधी खूप लांबीचे केस. त्याची निगा राखायची म्हणजे सोपे काम नाही. रोजच्या रोज तेल आणि कंगव्याने आणि फणीने केस विंचरून झाले की केसांची पूर्ण झाडलोट झाल्यासारखी वाटायची. शिवाय आठवड्यातून दोन वेळेला डोक्यावरून अंघोळ असायची. ओले केस पंच्यामध्ये गुंडाळून ठेवायचे. काही तासा नंतर पंचानेच ते खसाखसा चोळायचे. नंतर पूर्ण केस उलटे करून ते फटाफटा पंच्यानेच आपटायचे.  असे सर्व सोपस्कार करून झाले की मग थोड्यावेळाकरता केस मोकळे सोडायचे. केस पूर्णपणे वाळले की मग आईच्या पुढयात बसायचे वेणी घालून घेण्यासाठी.




वेण्या म्हणजे दोन वेण्या. त्याकरता आधी केसांमध्ये  मधोमध भांग पाडून दोन भाग करून आधी केसात झालेल्या जटा काढायला लागत. मग आई विचारायची कुठे भांग पाडू? मध्ये की कडेला. मला डाव्या कडेला भांग पाडलेला आवडायचा. आणि माझ्या बहिणीला मधोमध भांग आवडत असे.  तरीही शाळेत गेल्यावर मिसळीच्या उवा डोक्यात यायच्याच. उवांबरोबर लिखा आल्याच. या लिखा म्हणजे उवांची अंडी असत. याच लिखा मारल्या की मग उवाच येणार नाहीत म्हणून त्या शोधून शोधून मारायच्या. ऊ मारण्याची पण एक पद्धत आहे. केसामध्ये ऊ दिसली की ती आधी चिमटीत धरायची. नंतर तिला डाव्या अंगठ्याच्या नखावर ठेवायचे आणि उजव्या अंगठ्याच्या नखाने मारायचे. तश्याच लिखाही मारायच्या. ऊ मारली की 'टक' असा आवाज यायचा. लिखांच्या बाबतीतही असेच. पण काही वेळा लिखेमध्ये जीव नसायचा. लिखा या केसांमध्ये चिकटून असायच्या. फणीने सारले की मग त्यात एखादी तरी ऊ यायची.  काही ऊवा खूप टेण्या असायच्या तर  काही ऊवा तर खूप बारीक असायच्या. फणीचे कंगोरे असायचे त्यात लपून बसायच्या. मग त्या फणीचा कंगोरा बोटाने बाजूला करून छोटी ऊ चिमटीत पकडायची आणि फणीच्या सपाट भागावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने तिला मारायचे. ही छोटी ऊ खूप चिवट असे. पणकन चिमटीत येत नसे. काही उवा तर इतक्या बारीक असायच्या जसे की अगदी छोटा कण.



डोक्यामध्ये उवा फिरताना हुळहुळायचे की मग लगेच केसामध्ये बोट फिरवले की ऊ हाताला लागायची. मग तशीच तिला चिमटीत पकडायची. काही वेळा चिमुट उघडून पाहावे तर ऊ च नसायची. आमच्याकडे पाहुण्यारावळ्या मुली आल्या की आम्ही पण आईप्रमाणेच त्यांची डोकी आमच्या पुढ्यात घेऊन बसायचो आणि उवा लिखा मारायचो. खूप गम्मत वाटायची आम्हाला. आणि उवा सापडल्या नाहीत तर नाराज व्हायचो. एकदा आमच्या शेजारी कुणीतरी नवीन रहायला आले आणि त्यांना ३ मुली होत्या. त्यांची ओळख पाळख झाल्यावर त्या आमच्या अंगणात खेळायला यायच्या. आम्ही दोघी बहिणी लगेच त्यांच्या डोक्यातल्या उवा काढण्यासाठी तयार असायचो. कारण की ऊवांना नखावर ठेवून नखाने मारायला मजा वाटायची. ऊ नखावर ठेवली की काही वेळा ती निसटून खाली पडायची. छोटी ऊ आणि ज्या लिखामध्ये जीव आहे त्यांना मारले की "टक" असा आवाज यायचा. की मग आम्हाला बरे वाटायचे.  





वर्गात एका बाकावर दोघीजणी  डोक्याला डोके लावून बसल्या की  जायच्याच एकमेकींच्या डोक्यात  मग या ऊवा !  वर्गात ज्या मुलीच्या डोक्यात खूप उवा झाल्या आहेत तिला मागच्या बाकावर एकटीलाच बसवायचे.    या ऊवा आमच्या घरात थोड्या काळाकरताच आल्या होत्या. साधारण तो काळ ५ वी ते ७वी च्या दरम्यान असावा. असे हे "ऊ" प्रकरण आमच्या लहानपणी खूप फेमस होते. .फेसबुकावरच्या एका पोस्टवरून मन भूतकाळात शिरले आणि लेख लिहिला गेला.