Monday, November 23, 2009

टंकलेखन (२)

टंकलेखनामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन करताना काय काय करावे लागते ते पाहू. कळफलकावर जसे ए टु झेड अक्षरे असतात. त्याप्रमाणे इतर अनेक प्रकारची चिन्हे असतात जसे की स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक चिन्हे व इतरही दुसऱ्या काही कीज जसे की स्पेसबार, टॅब लावण्याची की, टॅब मोकळे करण्याची की कॅपलॉक वगैरे. टंकलेखन मशीनच्या वरील भागात अक्षरे प्रत्यक्ष कागदावर उमटवले जाणारे छोटे छाप अर्धवर्तुळाकार दिसणाऱ्या चापाच्या टोकाला बसवलेले असतात. त्यावर सर्व इंग्रजी अक्षरे कोरलेली असतात. टंकलेखन मशीनवर असणाऱ्या विविध कीज (बटणांवर) दाब देऊन ही अक्षरे रोलर वर जाऊन रिबीनीवर आदळतात आणि कोऱ्या कागदावर अक्षरे उमटतात. टेपरेकॉर्डरमध्ये ज्या कॅसेट असतात त्याप्रमाणे रिबीनीचे रीळ जोडण्याकरता टंकलेखनाच्या मशीनवर डाव्या व उजव्या बाजूला दोन स्तंभ असतात. त्या स्तंभावर पत्र्याच्या दोन चकत्या असतात तिथे रिबीन लावून घ्यायची. ही रिबीन त्या चकत्यांमध्ये रिळाप्रमाणे गुंडाळली जाते. रोलरच्या उजवीकडे एक स्टीलचा छोटा नॉब असतो तो पुढे ओढला की रोलरमधून कागद घालण्याकरता थोडी मोकळी जागा होते, त्यातून कागद घालायचा. कागदाचे वरचे टोक त्यात घातले की पुढे आणलेला नॉब मागे करायचा व रोलरच्या साहाय्याने फिरवून कागद गुंडाळून मशीनच्या वर येतो म्हणजेच तो रिबीनीच्या व रोलरच्या मध्ये येतो. तिथे एक स्टीलची बारीक पट्टी असते ती त्या कागदावर आणायची. परत रोलरच्या उजव्या बाजूला असलेला नॉब पुढे आणायचा. आता कागदाचा पुढे आलेला भाग व कागदाचा शेवटचा भाग एकावर एक हाताने जुळवून घ्यायचा आणि परत तो नॉब मागे करायचा. आता तुमचा कागद टंकलेखन मशीनवर सरळ व घट्ट बसला आहे असे समजावे.हा कागद लावताना रोलरला लागूनच कॅरेज असते व त्यावर एक मोजपट्टी असते तिथे शून्यावर किंवा मोजपट्टी नसेल तर एक छोटी रेष रंगवलेली असते तिथे कागदाची डावी कड येईल असा कागद लावायचा. कॅरेजच्या डावीकडे एक हँडल असते ते ओळ पुढे जाण्यासाठी वापरतात. दोन ओळींमध्ये किती अंतर हवे यासाठी पण एक स्पेस मार्जिन असते, ते सेट केले की त्याप्रमाणे पुढच्या ओळीवर जाता येते. याला कॅरेज रिटर्न म्हणतात. स्पेसबार वापरून कागद पुढे जातो. ही स्पेसबारची पट्टी कळफलकावर खाली असते. रोलरला लावलेला कागद डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी किंवा लावलेले टॅब योजलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहचतात की नाही किंवा लावलेले टॅब सर्व मोकळे झाले आहेत का हे पाहण्यासाठी स्पेसबार सारखीच एक पट्टी कळफलकाच्या वर असते. कॅरेजवर मार्जिन लावण्यासाठी दोन बाजूला दोन छोटे नॉब असतात. कागदावर मार्जिन सेट करण्यासाठी कागदाच्या डाव्या बाजूच्या सुरवातीपासून १० मोकळ्या जागा मोजायच्या आणि कॅरेजवरचा डावा नॉब त्या सेट केलेल्या मार्जिनावर आणायचा. असेच उजव्या बाजूने पण मार्जिन सेट करायचे. आता या सेट केलेल्या मार्जिनामध्येच तुम्ही जे टंकणार आहात ते टंकले जाईल. कळफलकाच्या साहाय्याने टंकीत करताना दोन शब्दांमध्ये किती मोकळी जागा सोडायची किंवा वाक्यानंतर किती मोकळी जागा सोडायची यासाठी स्पेसबारचा वापर केला जातो. साधारण दोन शब्दांमध्ये एक मोकळी जागा व एका वाक्यानंतर दोन मोकळ्या जागा सोडण्याची पद्धत आहे. हा स्पेसबार दाबताना उजव्या हाताचा अंगठा वापरला जातो. स्पेसबारप्रमाणे एक मोकळी जागा मागे न्यायची असल्यास बॅकस्पेस या बटणाचा वापर केला जातो. त्याकरता डाव्या हाताचा अंगठा वापरतात. कागदावरच्या डावीकडून उजवीकडे सर्व मोकळ्या जागा मोजायच्या असतील तर स्पेसबार वर दाब देण्याकरता मधले बोट वापरले जाते.टंकलेखनाच्या मशीनवर तुम्ही कागद लावलेला आहे. मार्जिन सेट झालेले आहे. आता सुरवात करा तुमच्या टंकलेखनाला! टंकताना कळफलकाच्या साहाय्याने एकेक अक्षरे कागदावर उमटवली जातात. मजकूर टंकित करताना "कागदाची उजवी बाजू आता संपत आली आहे. दुसऱ्या ओळीवर जा" असा संदेश देणारी "टिंग" अशी एक बेल वाजते. कारण आपण टंकित करताना कागदाकडे किंवा कळफलकाकडे पाहात नाही आहोत. तुमची नजर टेबलावर असलेल्या कागदाकडे आहे की ज्यावर लिहिलेले तुम्ही टंकत करत आहात. आता ही "टिंग" बेल वाजली की कागदाकडे पाहायचे किती जागा शिल्लक आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन टंकून मग दुसऱ्या ओळीवर जायचे. आता ही "टिंग" बेल वाजल्यावर टंकता टंकता पुढे येणारा शब्द तिथे बसेल का? किंवा अर्धा बसवून पुढील शब्द खाली घेऊ का? किंवा ती जागा तशीच रिकामी सोडू? हे सर्व तुमचे तुम्हाला ठरवावे लागते. शेवटी टंकीत केलेले पत्र सुबक दिसायला हवे ना!कॅरेजवर अजून एक पट्टी असते ती उभी करून ठेवायची. त्यावर तुमचा रिकामा कागद असेल. जसजसे तुम्ही टंकाल तसतसा हा रिकामा कागद खाली सरकेल. याचा उपयोग अशा करता होतो की आता कागद संपत आलेला आहे. मजकूर अजूनही शिल्लक असेल तर तो आता दुसऱ्या पानावर घ्यायला हवा. आता हा कागद टंकलेखन मशीनवरून काढा आणि पाहा कागदावरचा मजकूर कसा दिसतो ते!


तक्ते कसे बनवायचे व अजून काही गोष्टी पुढच्या भागात पाहू.

..... क्रमशः

Sunday, November 22, 2009

टंकलेखन (१)

ए, एस, डी, एफ, जी, एफ (स्पेसबार) सेमीकोलन, एल, के, जे, एच, जे या अक्षरांनी सुरवात होते टंकलेखनाच्या धड्यांची. ही अक्षरे म्हणजे कळफलकाचा गाभा म्हणले तरी चालेल. सर्वात मुख्य म्हणजे कळफलकाकडे न पाहता या अक्षरांचा सराव करावा लागतो. डाव्या हाताची चार बोटे ए, एस, डी, एफ करता व उजव्या हाताची चार बोटे एल, के, जे, एच करता. डाव्या हाताची चार व उजव्या हाताची चार बोटे वापरून म्हणजे कळफलकावरील बटणांवर जोर देऊन टंकले ही अक्षरे कोऱ्या कागदावर उमटतात. एका कागदावर ही अक्षरे मोठ्या अक्षरात टंकीत केलेली असतात तो कागद घ्यायचा तो टंकलेखन मशीनच्या डाव्या बाजूला आपल्या नजरेला सहज दिसेल असा ठेवायचा व सराव करायचा. पानेच्या पाने टंकीत करायची. प्रत्येक बोटाला जे अक्षर ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे टंकायचे की मग ती अक्षरे आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात. टंकलेखनाचा संबंध बरीच वर्षे आला नाही तरीही तुमच्या पुढ्यात टंकलेखन मशीन आले की आपोआप कळफलकाकडे न बघता ही अक्षरे आपण टंकीत करू शकतो. याच पद्धतीने हा लेख मी संघणकाच्या कळफलकाकडे न बघता डावीकडे असलेल्या माझ्या वहीत लिहून ठेवलेल्या लेखाकडे बघून टंकत आहे.


दुसरा धडा म्हणजे ए, एस, डी, एफ च्या वरची अक्षरे आहेत त्यांचा. या अक्षरांचाही असाच पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा. तिसरा धडा म्हणजे तीन, चार, सहा अक्षरी शब्द की ज्या शब्दांची अक्षरे कळफलकाच्या वरच्या व खालच्या ओळीत असतील असे सर्व शब्द, किंवा ज्या शब्दांची अक्षरे फक्त डाव्या बोटांमध्ये येतील किंवा फक्त उजव्या बोटांमध्ये येतील असे शब्द. असे बरेच शब्द टंकीत करून करून पूर्ण कळफलक आपल्या डोक्यात बसतो. अक्षरे, शब्द, वाक्ये, परिच्छेद टंकीत करायचे. या सर्वांचा पानेच्या पाने टंकीत करून सराव करायचा.


एकूणच टंकलेखनाचा हा सराव म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्ये व परिच्छेद टंकीत करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे कळफलकाकडे बघायचे नाही, जसे की सायकल शिकताना सायकलकडे न बघता समोर रस्त्याकडे बघायचे व सायकल चालवायची अगदी तसेच हे तंत्र आहे की जे आत्मसात केल्यावर आयुष्यात कधीही विसरत नाही. टंकलेखन ही एक कला आहे. सराव करताना चुका होतात, कळफलकाकडे पाहिले जाते. सराव झाला की मग टंकलेखन वेग. या टंकलेखन वेगाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दणादणा वेगाने टंकत आहात आणि त्यात जर असंख्य चुका निघाल्या तर त्या टंकलेखन वेगाला काहीही अर्थ नाही. वेग कमी असला तरी चालेल पण जे टंकीत केले आहे ते बिनचूक असायला हवे.


जेव्हा टंकलेखन वेगाची परीक्षा घेतली जाते तेव्हा अमुक शब्द अमुक एका वेळात टंकीत केले गेले पाहिजेत. जेवढे शब्द टंकीत होतील ते सर्व मोजतात एक दोन असे करत त्यात स्पेस बार व दोन शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये रिकामी सोडलेली जागाही मोजली जाते. त्याचे एक गणित आहे. हे सर्व पूर्ण पान टंकीत कसे करायचे याबद्दल झाले. टंकलेखनामध्ये तुम्हाला तक्ते पण टंकीत करायचे असतात की ज्यामध्ये उभे आडवे रकाने आहेत. लाख कोटी असे आकडेही आहेत. तसेच त्यात मजकूरही टंकीत करायचा आहे. तक्त्याला शीर्षक आहे, तेही कागदाच्या मधोमध यायला हवे. या सर्वांचा तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो. कागदावर तो तक्ता उभा बसेल की आडवा, किंवा कसा चांगला दिसेल याचा अंदाज घ्यायला लागतो. प्रत्येकाचे मोजमाप घ्यावे लागते. तक्ता जर खूप मोठा असेल तर तो नेहमीच्या कागदावर न बसवता फूलस्केप कागदावर बसवावा लागतो. कागदाच्या वरून किती जागा सोडायची, शीर्षक लाल अक्षरात हवे की नको हे विचारात घ्यावे लागते. रकाने असतील तर टॅब लावावे लागतात. हे सर्व अचूक, खाडाखोड न करता, देखणे दिसेल याकडेही लक्ष द्यावे लागते. तक्ते बनवण्याचा पण बराच सराव करायला लागतो.


संपूर्ण कळफलक शिकायला सहा महिने लागतात. त्यानंतर क्लासला जायचे ते वेग कमावण्यासाठी. एकेक दोन दोन तास वेगवेगळी इंग्रजी मासिके घेऊन त्यातला मजकूर टंकीत करून सराव करायचा. नंतर वाचून त्यातल्या चुका काढायच्या.

टंकलेखनाचा भरपूर सराव, त्याचा वेग, त्यातील अचूकपणा हे सर्व आत्मसात झाले आणि तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागतात की तुम्हाला एकच पत्र नाही तर बरीच पत्रे, तक्ते व इतरही बरेच काही टंकीत करावे लागते. यात बिनचूक व देखण्या पत्राची विशेष दखल घेतली जाते. पूर्वी कंपनीमध्ये एखादे पत्र टंकीत करायचे झाल्यास त्याच्या दोन प्रती काढल्या जायच्या. एक म्हणजे मुख्य पत्र की जे दुसऱ्या कंपनीत पाठवायचे असते आणि त्या पत्राची कार्बन प्रत की जी कचेरीत ठेवली जाते. किंवा त्याच्या अजूनही काही प्रती कार्बन पेपर लावून काढल्या जायच्या की जी पत्रे कंपनीतच कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा दुसऱ्या कंपनीतल्या एखाद्या महत्त्वाच्या माणसाला पाठवण्यासाठी. ही कचेरीतली पत्रे दोन चार प्रकाराने टंकीत केली जायची. पहिले म्हणजे लिहून दिलेली पत्रे, त्यात अक्षर बरे असेल तर ठीक नाहीतर ते लावता लावता खूप किचकट वाटायचे. दुसरे म्हणजे डिक्टेशन देऊन, किंवा काही वेळेला थेट तोंडी सांगतील त्याप्रमाणे लगेचच तो मजकूर टंकीत करायचा, किंवा ठराविक साचेबद्ध पत्रे टंकीत केली जायची.

दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष टंकलेखन कसे होते ते पाहू.

..... क्रमशः

Friday, November 20, 2009

एका तळ्यात होती बदके पिले बरीच, होते सुरेख तान्हे पिल्लू तयात एक!

आमच्या समोरचे तळे पाहिले की मला म्हणावेसे वाटते की एका तळ्यात होती बदके पिले बरीच, होते सुरेख तान्हे पिल्लू तयात एक!

एक अतिशय सुंदर तान्हे पिल्लू की ज्याचा विसर पडणे शक्य नाही! सर्व बदकांमध्ये वेगळे! तळ्यात सर्व बदके काळ्या व करड्या रंगाची. त्यांचे पंख पण वेगवेगळे. कुणाची निळी शेड तर कुणाची करडी. कुणाची पांढरी तर कुणाची गडद काळीच! पण हे तान्हे तसे नाही. पांढरे शुभ्र! गोंडस! त्याचे डोळे काळेभोर जणू काही काळे मणी बसवले आहेत की काय असे वाटावे!

नवीन जागी रहायला आलो तेव्हा एकदा दार उघडून पाहिले तर अनेक छोटी मोठी बदके चालत चालत येताना दिसली. खूप गंमत वाटली. काही जण त्यांना ब्रेडचे छोटे तुकडे त्यांच्या दिशेने खाण्यासाठी फेकत होते. त्यात हे लक्ष वेधून घेणारे पांढरेशुभ्र बदकपिल्लू होते. खाली उतरले व त्यांच्या घोळक्यात गेले. मी त्यांना पकडेन की काय असे समजून ती बदके दूर व्हायला लागली पण हे छोटे बदकपिल्लू मात्र निरागसपणे माझ्याकडे बघत होते! मनात म्हणले याला भीती कशी काय नाही वाटत?!

आमच्या अपार्टमेंटच्या समोरच हे तळे आहे. त्यात अनेक छोटी मोठी बदके, त्यांची छोटी छोटी पिल्ले आहेत. त्यांना पाहण्याकरता माझी अधूनमधून चक्कर असतेच. संध्याकाळी ही सर्व बदके आळीपाळीने बाहेर चक्कर मारायला येतात. ते पांढरे बदकपिल्लू दिसले की मला खूप आनंद व्हायचा. त्याच्याकडे बघत बसावेसे वाटायचे. सर्व बदकांमध्ये ते खूपच उठून दिसायचे. तळ्यावर जाऊन तळ्यावरच्या लाटा पाहणे, पाण्यात पडलेले आकाशाचे वेगवेगळे प्रतिबिंब पाहणे, व ही बदके काय करतात, कुठे जातात याचे निरिक्षण करणे हा आता मला छंदच लागला आहे. काही बदके गवतातील किडे मुंग्या खाण्यासाठी येतात तर काही गवतात येऊन आपले पंख चोचीने साफ करतात. काही जण दुसऱ्या तळ्यावर जाताना चक्क चालत चालत रस्ता ओलांडून जातात. दिवस असेच भराभर जात होते. काही दिवसांनी मला त्या बदकांचा थोडा विसर पडला......

...... आणि एक दिवस! एक दिवस अचानक माझ्या लक्षात आले की अरेच्या! पांढरे बदकपिल्लू कसे काय दिसत नाही! कुठे गेले हे? जेव्हा जेव्हा म्हणून तळ्यावर जायचे तेव्हा शोधायचे त्याला. पण नाहीच! अरेरेरे! काय हे, आपण का नाही त्याला आपल्या कॅमेरामधून साठवून ठेवले?? कोणता मुहूर्त बाकी ठेवला होता आपण!!

आज माझ्याकडे त्या तळ्यातील सर्व छोटी मोठी बदके आहेत, पण ते सुरेख पांढरेशुभ्र पिल्लू नाही. बरेच वेळा विचार येतो की आजूबाजूच्या सर्व तळ्यांवर पाहून यावे कुठे दिसते का ते. पण तो फक्त विचारच राहतो. एक मात्र नक्की की माझ्या मनात त्याला मी पूर्णपणे साठवून ठेवले आहे. जेव्हा त्याची आठवण होते तेव्हा त्याला मी पाहते. मनाला खूपच हुरहुर लावून गेले हे गोंडस पिल्लू!!!

Wednesday, November 11, 2009

केट व मॅगी

एक दिवस मला माझ्या मैत्रिणीचा दूरध्वनी आला व तिने मला विचारले " तू माझ्याकरता पर्यायी बेबीसीटरचे काम करशील का चार दिवसांकरता?" माझा होकार कळताच तिला खूप आनंद झाला व तिने माझे अनेक आभार मानले.एलिझाबेथ नावाच्या एका अमेरिकन बाईच्या घरी माझी मैत्रीण तिच्या ६ महिन्यांच्या जुळ्या मुलींना सांभाळायला रोज सकाळी ७ ते ६ पर्यंत जाते. एलिझाबेथला मार्गारेट उर्फ मॅगी व कॅथेलीन उर्फ केट नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. सातव्या महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या मुली वजनाने खूपच कमी आहेत व त्यात मॅगीला थोडा प्रॉब्लेम आहे. तिचे डोके नेहमीच्या आकारापेक्षा थोडे मोठे आहे, त्यामुळे एलिझाबेथ त्या मुलींना पाळणाघरात ठेवू शकत नाही.एलिझाबेथ मलाही चांगली ओळखते कारण ज्या पाळणाघरात पर्यायी बेबीसीटर म्हणून मी काही दिवस काम केले तिथे तिचा मोठा मुलगा पण आहे. मी दोघींनाही दूरध्वनी करून सांगितले की मला इतक्या लहान मुलांची व त्यातूनही जुळ्या मुलांची देखभाल करायची सवय नाही, पण शिकवलेत तर हे काम मी निश्चितच करू शकेन. त्या जुळ्या मुलींची दिवसभरात कशी देखभाल करायची याचे मी दीड दिवस प्रशिक्षण घेतले, अर्धा दिवस एलिझाबेथ बरोबर व एक संपूर्ण दिवस माझ्या मैत्रिणीबरोबर.एलिझाबेथने मला पावडरचे दूध कसे तयार करायचे, दुधाच्या बाटल्या स्वच्छ धुऊन मायक्रोवेव्हमधून कशा कोरड्या करायच्या, बाटलीत दूध भरून ते फ्रीजमध्ये कशा पद्धतीने ठेवायचे, म्हणजे दुधांच्या बाटल्यांवर स्टीकर चिकटवून त्यावर नावे लिहायची. शिवाय केटला दुधातून तांदुळाची पावडर घालून दूध पाजायचे हे लक्षात ठेवणे. पावडरचे दूध तयार करताना अजिबात गुठळी होवून द्यायची नाही वगैरे.


मैत्रिणीबरोबर एक संपूर्ण दिवस प्रशिक्षण घेतले त्यात तिने मला सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे;


१. दर ३ तासाने बाटलीतील दूध पाजणे व ते कशा पद्धतीने पाजणेः सोफ्यावर बसून मांडीवर उभी उशी ठेवायची , त्यावर मुलीला उताणे झोपवायचे , एका हाताने तिचे दोन्ही हात धरून बाटलीतील दूध पाजणे. दुसरे महत्वाचे म्हणजे दूध पिताना त्यांना ठसका लागत नाही ना तेही पाहायचे.

२. दर तीन तासाने डायपर बदलणे.

३. औषध कसे ड्रॉपरने तोंडात घालायचे.

४. फोन नंबरची यादी कुठे आहे ते सांगितले, त्यामध्ये एलिझाबेथचा व तिच्या नवऱ्याचा सेलफोन नंबर, त्या दोघांच्या कार्यालयातील फोन नंबर, एलिझाबेथच्या शेजारणीचा फोन नंबर असे सगळे फोन होते.

५. त्या मुलींना ताप आला तर तो थर्मामीटरने कसा पाहायचा.

६. सकाळी ११ वाजता एलिझाबेथच्या कार्यालयात दूरध्वनी करून सांगायचे की " सर्व काही व्यवस्थित चालले आहे, काळजी नसावी." ती फोनवर भेटली नाही तर आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवणे.

७. त्या मुलींना झोपवायचे कसे ते सांगितले. त्या मुलींच्या खोलीत दोन पाळणे आहेत त्यात त्यांना पालथे ठेवून झोपवायचे. नंतर दार अर्धवट लावून घ्यायचे.

८. अर्धापाउण तास सतत कोणी रडले आणि सर्व उपाय करूनही रडणे थांबले नाही तर फोनच्या यादीतून फोन लावून लगेचच कळवणे. फोनवर कोणीही उपलब्ध झाले नाही तर ९११ ला फोन करुन पोलिसांची मदत घेणे.

९. जाताना एलिझाबेथ संपूर्ण घर बंद करुन जाईल. बाहेरुन कोणीही आले तरी दार उघडू नकोस असे सांगितले.

१०.त्या मुलींशी सतत बोलत राहा.

११.फ्रीजमध्ये कायम त्या दोघींच्या मिळून ८ दुधाच्या बाटल्या तयार ठेवणे.

प्रत्यक्ष अनुभव

दीड दिवसाचे प्रशिक्षण घेतल्याने प्रत्यक्ष सांभाळायला मला काहीही जड गेले नाही. मुली पण खूप गोड व छान होत्या. पहिल्यांदा मला पाहिल्यावर आज ही कोण आपल्याला नवी बाई आली सांभाळायला? अशा प्रकारचे अविर्भाव चेहऱ्यावर होते, पण ते २ सेकंदच टिकले. त्यांच्याकडे हासून बोलल्यावर त्याही हसल्या व रमल्याही.


एक दिवस त्यांच्याशी इंग्रजीतून बोलले, मग विचार केला त्यांना काय कळतय इंग्रजी का मराठी? नंतर मनसोक्त मराठीतूनच बोलले त्या मुलींशी. "उठलात का तुम्ही?", " तुम्हांला भूक लागली का?", "एक मिनिट हं आलेच मी" अशा प्रकारे.


एके दिवशी भुकेच्या वेळी केट पेंगली होती, मग तिला तसेच झोपू दिले, मॅगीला आधी दूध दिले तरीही ती उठेना. मग विचार केला आता जर हिला तसेच झोपू दिले तर पुढचे सगळे वेळापत्रक बिघडेल, तशीच तिला जबरदस्तीने उठवले, दूध दिले, मग झाली ताजीतवानी आणि लागली खेळायला. मॅगी लहान आहे, ती दूध प्यायल्यावर लगेच झोपायची. केट चपळ आहे व दूध प्यायल्यावर ती खूप खेळायची. मग ती व मी टॉम व जेरी पाहायचो.


त्या चार दिवसात खूप लळा लागला होता मला त्या गोड मुलींचा. आलिशान बंगल्यामधील केट मॅगी यांच्या सहवासातील ते चार दिवस मी कधीही विसरणार नाही.

Tuesday, November 10, 2009

पानगळीचे रंग (३)


आज फिरायला छान वाटत होते म्हणजे माझा आवडता पाऊस झिमझिमत होता. आजुबाजूला दाट झाडींमध्ये असलेले पानगळीचे रंग काही हिरव्यागार झाडांमध्ये उठून दिसत होते. खूप छान वाटले आज फिरणे.

Monday, November 09, 2009

Art Photography (3)


Friday, November 06, 2009

रांगोळीऑर्कुटवर माझ्या मैत्रिणीच्या अल्बममध्ये ही रांगोळी पाहिली. ही प्रत्यक्षातली रांगोळी आहे. मला ही खूप आवडली म्हणून कागदावर रेखाटली. अर्थात प्रत्यक्ष जमिनीवर रांगोळी काढून त्यात रंग भरण्याची मजा व आनंद जास्त आहे यात वाद नाही.

कुंडीतली पानेफुले याची रांगोळी लाकडी खुर्चीवर काढली आहे.

Sunday, November 01, 2009

Art Photography
समुद्रकिनारा