Friday, July 26, 2013

आज इथं तर उद्या तिथं ! ...(७)

अपार्टमेंट फाईंडरमध्ये क्लेम्सनमधल्या सर्व अपार्टमेंटची यादी होती. एकेक करून अपार्टमेंटची यादी वाचत होते पण उपयोग काहीही नव्हता. सर्व अपार्टमेंट २ ते ३ नाहीतर ४ बेडरूमची होती. वाचता वाचता मला त्यात एक बेडरूमचे अपार्टमेंट सापडले. तसे तर २ बेडरूमचे अपार्टमेंट पण पाहून घ्यायचा विचार होताच.फोन करून अपॉईंटमेंट घेतली व जागा बघायला गेले. एक बेडरूम अपार्टमेंटने साफ निराशा केली. खोल्या खूपच अंधाऱ्या होत्या म्हणजे दिवसाही दिवे लावूनच वावरायला लागणार याचा अंदाज येत होता. दोन बेडरूमची अपार्टमेंट अजिबातच चांगली नव्हती. खूप जुनाट वाटत होती. त्यात १ ते २ अपार्टमेंट रिकामी होती पण तीही खूप मागच्या बाजूला होती. विद्यापीठातून घरी येताना विनायक बहुतेक करून चालत यायचा. चालत येताना त्याला एक लग्न झालेला विद्दार्थी भेटला. त्याचे नाव होते कृष्णकुमार. त्याची ओळख झाली व तो म्हणाला मी एम एस करतोय व माझे लग्न झालेले आहे. आम्ही दोघे स्टूडिओ अपार्टमेंटमध्ये राहतो. कॉलेज ऍव्हेन्यू वर हे अपार्टमेंट आहे. तशी अजूनही दोन ठिकाणी आहेत पण ती खूप लांब आहेत. हे तसे जवळ आहे आणि बस नसेल तर विद्यापीठात चालत जायला त्यातल्या त्यात जवळ आहे. विनायकने त्याचा फोन नं घेतला व त्याला सांगितले की आम्ही सध्या ज्या जागेत राहतो ती फक्त तीन महिन्यांकरताच आहे. दुसरीकडे जागा शोधत आहे त्यामुळे आम्ही पण स्टुडिओ अपार्टमेंट पाहून घेतो. बरं एक सांगा तुमची जागा पहायला आले तर चालेल का? तो "अवश्य या" म्हणाला.


विनायकने घरी आल्यावर मला त्या अपार्टमेंटबद्दल सांगितले. मी विचारले स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे? तर विनायक म्हणाला की एकच खोली असते. त्यातच बाथरूम वगैरे पण सर्व असते. एक खोली म्हणल्यावर माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. विनायक मला म्हणाला आपल्याकडे जागेबद्दलचे असे किती पर्याय आहेत? तर अगदी थोडे. जागा बघून तर येऊ, मग ठरवू कोणते अपार्टमेंट फिक्स करायचे ते.  मी कृष्णकुमारच्या बायकोला फोन लावला व विचारले की तुमची जागा पहायला आले तर चालेल का? ती लगेचच 'हो' म्हणाली. तिच्या घरी गेले. ते अपार्टमेंट म्हणजे एक मोठी चौकोनी खोली होती. गप्पा मारता मारता एकीकडे नजर जागेमध्ये फिरत होती. उमा म्हणाली की दोघांकरता हे अपार्टमेंट तसे चांगले आहे. मलाही ते बरे वाटले. एका भिंतीत सामान ठेवायला बरीच जागा होती.


आमच्याकडे जास्तीचे पर्याय नव्हतेच मुळी! त्यामुळे स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये जायचे निश्चित केले. नेमकी त्याच वेळेला आमच्या नशिबाने त्या अपार्टमेंट कॉप्लेक्समध्ये एकच जागा शिल्लक होती. ती बुक केली आणि एका संध्याकाळी आमची वरात स्टुडिओ अपार्टमेंटकडे जायला निघाली. क्लेम्सनमध्ये आल्यापासून पहिले मोटेलमध्ये एक रात्र काढली, नंतर सुनिताकडे आठवडाभर, नंतर क्लेम्सन प्लेसमध्ये तीन महिने आणि आता ही एक खोली. क्लेम्सनमध्ये पाय टाकल्यापासून आमची व आमच्याबरोबर आमच्या सामानाचीही बरीच नाचानाच झाली होती. यावेळीही सामानाची विशेष बांधाबांध करायची नव्हती. पॅके केलेले सामान , त्यातले रोजचे वापरातले कपडे आणि स्वयंपाकाची भांडीच काय ती बाहेर काढली होती. तरी पण आठवणीने सर्व बरोबर घेऊन, आवरा आवर करून निघालो. यावेळी विनायकच्या लॅबमधला एक अमेरिकन आम्हाला सोडायला आला. त्याच्याकडे एक टेंपो होता. त्यात आमचे सामान ठेवले व तो आणि विनायक निघाले आणि मी चालत निघाले. चालत जाण्याच्या अंतरावरच हे घर होते. एका खोलीमध्ये राहण्याची ही पहिलीच वेळ ! संध्याकाळचा सुमार, आणि सामानाची गिचमिड ! बसायला एक रोलींग खूर्ची होती तिथे !खोली जरी एकच असली तरी मला छान वाटत होते, स्थिरावल्यासारखे ! या जागेत मला एक अत्यंत आवडले होते ते म्हणजे मुख्य दाराला लागून असलेले जाळीचे दार ! या आधीच्या  क्लेम्सन प्लेस अपार्टमेंटमध्ये ३ महीने राहून इतके काही कंटाळवाणे झाले होते की अगदी कारागृहातून सुटका झाल्यासारखे वाटत होते !  या घराच्या बाहेर पडल्या पडल्या लगेचच बस थांबा होता. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ होती. बसेल ये जा करत असल्याने त्याचाही आवाज यायचा. या घराच्या आजुबाजूला भरपूर हिरवीगार व उंच झाडे होती. माणसात आल्यासारखे वाटत होते ! या आधीच्या जागेत म्हणजेच क्लेम्सन प्लेस ही जागा छान आणि मोठी असली तरी हे अपार्टमेंट मुख्य रस्त्याच्या खूपच आत आत होते. त्यामुळे एकतर शांतता होतीच. शिवाय उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बरेचसे विद्दार्थी जागा सोडून त्यांच्या गावी रहायला गेले होते त्यामुळेही एकूणच वर्दळ कमी होती. इथले रस्त तर अगदी निर्मनुष्य होते. विनायक सकाळी आठला जायचा ते रात्री लॅबमधून ८ ला परतायचा. तोपर्यंत मी एकटीच इतक्या मोठ्या जागेत भूतासारखी वावरणारी ! त्या तीन महिन्यात मी भरपूर टीव्ही बघून घेतला. तिथे असलेली इंग्रजी मासिकेही वाचली. शिवाय असंबद्ध सुचेल तसे डायरीत लिहित सुटले होते ! ते तीन महीने ! या लेखात त्याचे वर्णन आहे.


साधारण तीन वर्षांनी क्लेम्सन सोडायची वेळ आली आणि आम्ही विल्मिंग्टनची एक्झीट घेतली त्याचे वर्णन पूढील लेखात ! क्लेम्सनमध्ये एकाच खोलीत राहण्याचा अनुभव घेतला.  क्लेम्सन सोडताना खूपच वाईट वाटत होते, त्याला कारणच तसे होते. क्लेम्सनमधले दिवस खूप छान गेले होते. मित्रमंडळ जमा झाले, त्यांच्याकडे जाणे येणे, गप्पा टप्पा होत होत्या. एका खोलीत बऱ्याच जेवणावळीही झाल्या. विनायकचे ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधले संशोधनाचे बरेच पेपर्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. मी तीन ते चार नोकऱ्या केल्या. मला फक्त "शनिवार" हा एकच दिवस रिकामा असायचा. नोकरी करायच्या आधी मी क्लेम्सनमध्ये बसने खूप खूप हिंडले ! कॉलेज ऍव्हेन्यूवरून रोजच्या रोज चालणे होत होते. याच एका खोलीत आमचा टिल्लू टिव्ही खूप शोभून दिसायचा. डेस्कटॉपची खरेदी झाली होती. पांढरी शुभ्र टोयोटा याच घरात असताना आली. चर्च, डे-केअर व इतरत्र नोकरी असल्याने लहान मुलांच्यातच वावरत होते. त्यांचे हासरे चेहरे सतत डोळ्यासमोर असायचे. मोटेलमध्ये काम करण्याचा अनुभव आला. इथले काही मोटेलवाले त्यांना कुठे बाहेर जायचे असेल तर विद्दार्थ्यांना बसायला सांगत. जास्त करून ज्या विद्दार्थ्यांचे लग्न झाले आहे असे तिथे विंडोवर बसायचे. दोघे मिळून हे काम पहायचे. त्यातल्या काही जणांसाठी त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही जाल का? त्यामुळे तोही एक अनुभव मिळाला. असे एक ना अनेक गोष्टी क्लेम्सनमध्ये असताना घडल्या. या सर्वांचे अनुभव मी लिहिलेले आहेत.क्लेम्सनमध्ये असताना माझ्या अंगाअंगातून उत्साह सळसळत होता ! रम्य ते क्लेम्सनचे दिवस ! आत्तापर्यंतच्या आयुष्यातील लग्नानंतरची दोन ठिकाणांमधली वास्तव्ये खूप आनंद देवून गेली. पहिले म्हणजे आयायटी पवई, आणि दुसरे म्हणजे क्लेम्सन ! निसर्गरम्य जंगलात राहण्याचे पुरेपूर समाधान आम्हाला क्लेम्सनमध्ये मिळाले होते ! आम्हाला दोघांनाही निसर्ग खूप आवडतो.


क्रमश : ...

Monday, July 22, 2013

Art Photography
Wednesday, July 17, 2013

पत्तेकुटूयाका!


पत्ते खेळायचे का? ,,, हो पण काय खेळायचे?,,, हेच नेहमीचे पाच तीन दोन,, खूप वेळा खेळून झाले आहे, त्यापेक्षा नाटेकाटे खेळूया का? तिघात नाटेकाटे,, काय वेड लागलाय का,, त्याला कशी दहा बारा माणसे हवीत म्हणजे खेळ कसा रंगात येतो. खरे आहे चल मग पाच तीन दोनच खेळू. भिडू वाढले की मग बाकीचे खेळ खेळू,,


तू पीस रे, माझ्यावर पाच,, म्हणजे माझ्यावर दोन का? होरे, दळण दळल्यासारखे वेढे घेतले तर तुझ्यावरच दोन येतील. पण दळणासारखेच का? हो तसा नियमच आहे ना? बरे बरे,, नीट पीस रे, नाहीतर देशील कुठलीतरी फालतू पाने, पत्ते हातात घेतल्यावर जेव्हा नुसते स्मितहास्य होते तेव्हा नक्कीच चांगले पत्ते आलेले असतात, पण चेहऱ्यावर तसे दाखवायचे नसते. चेहरा निर्विकार ठेवायचा, म्हणजे पाच हात काय सहजच होतील,, त्यातून बाकीच्यांचे पण ओढूच इतकी छान पाने आली आहेत. पाच तीन दोन मध्ये खानदानी पाने आली की ती पाहूनच जिंकण्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत असतो.  जेव्हा दुसऱ्याचे हात ओढले जातात तेव्हा  कसे आनंदाचे कारंजे फूटत असतात. पण तरीही आपले हात कोणी दुसऱ्याने ओढले की ते नेहमी उधारीवर ठेवून आपले स्मितहास्य कायम ठेवायचे. म्हणजे कसे की तुला हात देईन माझे झाले की असे आश्वासन द्यायचे आणि कायम उधारीत रहायचे.


काय रे काय चालू आहे,,,, नेहमीचेच भिडू आहात काय पाच तीन दोन वाले, चला पत्ते पिसा आम्ही आलोय आता,,. ओह म्हणजे आपण चक्क सात जण झालो की,;; हो पण यातल्या या दोघी तर लिंबू टिंबूच आहेत,, सच्चेपणाने खेळणाऱ्या, काय खेळायचे बोला, बदाम सात खेळायचा? पण दोन कॅट हवेत तरच मजा येते, ए नको खूपच वेळ लागतो, बरे, चला खेळूया बदाम सात ! बदाम सातला पाने हातात आली की दुसऱ्याची पाने अडकवणारा मुरलेला खेळाडू असतो.  हातात खानदानी पाने आली म्हणजे की कानी कुंडले मोती हार तर आणि तरच त्याच्याकडे सत्ती असेल तर ती पटकन निघते नाहीतर हुकम्याच्या एक्यासारखी शेवटपर्यंत राखली जाते.


सत्या पटापट लागल्या की समजावे हातात खानदानी पाने असल्याशिवाय सत्ती लावायला इतके मोठे मन कुणाकणे असते?  नाहीतर सत्या पटपट लावायला वेड बिड लागलयं काय? ज्यांच्याकडे नुसती शबनम अडकवलेली पाने येतात असे भिडू छक्की अडकवण्यातही धन्यता मानतात,,,.  अरे छक्या कसल्या आडवताय रे !,,,, एकही पास न देता भिडू जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्या हातात असे काही तरी खास लागलेले असते की पुढचे पान कोणते लावायचे ते त्याने खेळी खेळल्यावर लगेचच ठरलेले असते. नशिब जोरदार असते एकेकाचे. पण काही जण खानदानी पाने  आली तरी डगमगत नाहीत, शांत असतात, मोका आला रे आला की अशी पाने सरासर लावून मोकळी होतात, अर्थात काहीवेळा मात्र त्यांच्यावर पस्तावण्याखेरीज काहीही हाताला लागत नाही.आयला पत्ते कुटायचा काय योग आहे रे आज !!, कधी नव्हे ती मंडळी उगवलीत बघ,,, अगं तू किती दिवसांनी गं कुठे आहेस? ,,अगं मला वेळ मिळत  नव्हता गं, आत्ता मात्र जाम मजा येणारे,,,, ही टाळकी कधी आली?,,, आज सकाळपासूनच आहेत, सुट्या लागल्या ना, मग दुसरा उद्योग काय यांना पत्ते कुटण्याशिवाय,,. चला आता सगळ्यांनी जेवायला, आणि मग सगळेच बसू खेळायला. होहो आता आपण नाटेकाटेच खेळायचे हं, म्हणजे काय रे? अग म्हणजे नॉट ऍट होम !,,, ओह मस्तच की आम्हाला आवडतो हा खेळ, खूपच धम्म्मल येते ना?


मंडळी झाली आता गर्क खेळण्यामध्ये, पाच ते आठ तासांची निश्चिंती. या खेळात अधेमध्ये गप्पाही ठोकता येतात, काहींना तर जागे करावे लागते, खेळा आता,,, अरे होका, मला वाटले संपला खेळ. ,,पत्ते पिसा रे कोणीतरी. पाने वाटली की,,, खेळ रे,,. होहो खेळतो, कोणते बरे मागावे पान?,, ए तू मला ना,, इसपिकची पणजी देतोस का?,,, कांदे बटाटे पाहिजेत का? तूच मला किलवरची राणी दे. ,,घेघे, मला नकोच होती नाहीतरी. आणि काय पायजेल आपल्याला. बदाम एक्का पण देवून टाक बरे. घेघे, अजून काय? आता काही मागितलेस तर कांदेबटाटे मिळतील बरं का? मागितलेली पाने नसली की कांदे बटाटे तय्यार !,,, झाल्या का जोड्या ? हो झाल्या बहुतेक कारण की हातात एकाच्याही पान दिसत नाहीये. जोड्या लपलेल्या असतात आणि त्या मागितल्या की कळते कुठे असतात ते ! उशीत, शर्टाच्या खिशात, सतरंजी खाली, मांडीखाली,,,. काही जण असे वावरत असतात की सुटलो बुवा एकदाचे पण खरे सुटलेले नसतात. एक जोडी असते त्यांच्याकडे आणि ती जोडी पटकन जमलेली असते,,,. काहीजण उगाचच गंभीर, काय रे सुटलास का?,, असे विचारले तर नुसत्याच माना डोलावतील. खरे तर त्यांच्याकडे एकही जोडी नसते आणि चुकून कोणीतरी मागितली तर नाटेकाटे देवून बाकीच्यांच्या जमवलेल्या जोड्या लंपास करायला मोकळे  असतात. बारीक नजर ठेवून असताते हे,, कोणी कुणाकडे काय काय मागितले आहे. त्याबाबतीत स्मरणशक्ती जोरात असते यांची.


असाच परत एकदा पत्ते खेळण्याचा योग जुळून येतो तेव्हा चॅलेंज खेळण्याचा मूड लागून जातो. खेळताना काही जण अट्टल खोटारडे बोलणारे असतात,, नाहीतरी चॅलेज हा खेळ खरच एखादा चॅलेज उचलण्यासारखा आहे.  लोक मनाला येईल त्याप्रमाणे और एक, और दो, और पांच करत ३०, ४० राण्या जमवतात, त्यातली नेमकी सर्वात शेवटची खरी असते आणि उचलेंज म्हणायला म्हणायला एकच गाठ पडते आणि सर्व खोट्या राण्या पदरात येऊन पडतात. पण या पदरात आलेल्या राण्या एकेक करत परत  छक्या पंज्या बनून दुसरीकडे जातात. त्यात काही घाबरट लोक नेहमी पास देतात, तसे तर उंचलेंज म्हणायला आणि पाने खोटी निघायलाही एक गाठ पडते तेव्हा खोटारडे पाने उचलून खेळायला सज्ज असतातच. काही जण खोटे खेळा नाहीतर खरे त्यांचे काम ज्याला त्याला चॅलेंज देण्याचेच असते. हे लोक म्हणजे निव्वळ डोकेदुखी. खेळण्यातली मजाच घालवून टाकतात. और एक, और एक चा रिदमच तोडतात जणू !


३०४ मध्ये तर काही जणांना काळे बिल्ले जमा करण्याचाच छंद असतो. हातात पाने आली रे आली की ३०४ बोलून मोकळे होतात. नशीब जोरावर असेल तर चार पानात त्यांचे ३०४ होऊन जातात. हा खेळ मला जाम आवडतो. छब्बूत एक पानी छब्बू देण्यातच खरी मजा असते. इसपिकचा एक्का इकडून तिकडे नुसता फिरत असतो. छब्बू मध्येही पि एच डी करणारे लोक आहेत. म्हणजेच गाढव बनणारे. आम्ही अशा गाढवांना डिग्र्या बहाल करतो. छब्बू देताना बाकीचे एक्के सोडून इसपिकचा एक्का सोडवण्याची घाई झालेली असते.वख्खई आठवते का? त्यावेळची मजा काही औरच होती. लॅडीज हा प्रकार एके काळी खूपच प्रसिद्ध होता. पत्यांमध्ये सात-आठ, भिकार सावकार, लॅडीज, तीनशे चार, छब्बू, जपानी छब्बू, मेंढी कोट, चॅलेज, बदाम सात, पाच तीन दोन, नॉट ऍट होम, रम्मी, असे हे सर्व बैठे खेळ किती जणांना एकत्र घेऊन यायचे. किती छान वेळ जायचा. आणि खरच पत्ते हे अगदी कुटायचेच असतात, त्यातच खरी मजा असते, रात्रंदिवस कुटणे, गप्पा टप्पा करणे, अधेमध्ये चहा घेणे, सणावारी एकत्र पत्ते कुटताना तर जाम मजा येते ना? पण आता कोण खेळते पत्ते? पुढच्या भारतभेटीत मुद्दामहून पत्यांचा खेळ रंगवायचाच. येस्स्स, जमवायचेच, गेले ते दिन गेले नाही,, परत आणायचे अशा दिवसांना, मनात आणले तर जमणे कठीण नाही.Thursday, July 04, 2013

Art Photography


आकाशातले काही फोटो छान मिळून गेले. त्या दिवशी आकाशात बरेच ढग जमा झाले होते. त्याच्या अनेक छटा पाहिल्या मिळाल्या. शिवाय संध्याकाळचा चंद्र खूप छान मिळून गेला. निळा गुलाबी रंगांच्या ढगामध्ये चंद्र उठून दिसत होता. कऱ्हेरी चा गुलाबी रंग तर काय वर्णावा ! शिवाय गवातामध्ये खूप म्हणजे खूपच छोट्या कळ्या उगवल्या होत्या. त्याचा पण फोटो घेता आला.