Wednesday, February 16, 2011

भारतभेट २०११..... (१)

यावर्षीच्या भारतभेटीमध्ये असे काही ठरवले नव्हते काय करायचे ते, जसे की मागच्या वर्षीच्या भारतभेटीत पुष्करिणी भेळ खायचीच किंवा नटरंग पाहायचाच असे ठरवले होते. तीन आठवड्याच्या सुट्टीत जास्ती असे काहीच करता येत नाही. आईकडे सत्यनारायणाची पूजा व चुलत नणंदेकडे वास्तुशांत हे दोन कार्यक्रम ठरले होते. अमेरिकेत कोणतेही मंगल कार्य होत नाही आणि आम्ही राहतो त्या शहरापासून महाराष्ट्र मंडळ तर खूप दूर आहे त्यामुळे सणवारानिमित्त वरचेवर जाणे पण होत नाही. घरातल्या घरात का होईना सत्यनारायण व वास्तुशांत बघायला मिळणार याचाच खूप आनंद होता. शिवाय आमच्या डोंबिवली मधील घराची पुर्नबांधणी करायची असे मनात होते.




मागच्या वर्षीचे थेट उड्डाण नेवार्क ते मुंबई आवडले होते पण परतून येताना न्यूयॉर्कमध्ये पडणाऱ्या बर्फामुळे उड्डाणाला उशीर वगैरे आणि एकूणच खूप गोंधळ गर्दी वाटली त्यामुळे यावर्षी लुफ्तांझा उड्डाणाने जाण्याचे ठरवले. या उड्डाणाने दहा वर्षापूर्वी आमची पहिली अमेरिका यात्रा घडवली होती. अनुभव चांगला होता. या उड्डाणाचा पहिला थांबा जर्मनीत होता. कोणत्याही प्रकारची अडचण न येता प्रवास सुखकर झाला. डोंबिवलीच्या घराच्या पुर्नबांधणीची ठरवाठरवी करून नेहमीच्या पुण्याला जाणाऱ्या खाजगी बसतर्फे पुणे प्रवास करायचा ठरवले. बुकींगसाठी गेले तर या सर्व खाजगी बससेवा बंद झाल्या आहेत असे कळले. एका अर्थी बरेच झाले. ह्या बसेस पुण्यातल्या पुण्यातच तासभर फिरतात. श्री भिडे यांनी नुकतीच एक खाजगी कारसेवा सुरू केल्याचे कळले. प्रत्येकी रुपये ३०० डोंबिवली ते पुणे. पुण्यावरून डोंबिवलीत येताना घरपोच सेवा आहे. पुण्यावरून ही खाजगी कार स्वारगेट वरून सुटते. अतिशय सुंदर कारसेवा आहे. सहा जण एकावेळेला बसतील इतपत मोठी कार आहे. डोंबिवलीला कधी बसलो व पुण्यात कधी उतरलो हे कळलेच नाही. वातानुकूलित कारसेवा शिवाय एकीकडे जुनी हिंदी आवडीची गाणी. सर्वात शेवटी आम्ही दोघेच उरलो. त्यादिवशी स्वतः भिडे, त्यांची बायको व त्यांचा लहान मुलगाही होता. पुढे त्यांना जेजुरीला जायचे होते. कोथरूडला थांबून त्यांनी गरम गरम बटाटेवडे आणले. आम्हालाही खायला दिले. वडा इतका काही चविष्ट होता की अजूनही त्याची चव आठवते.




चुलत नणंदेकडे वास्तुशांत होती म्हणून या कार्यक्रमाला शोभेल अशी साडी नेसायची हौस करून घेतली. साडी नेसायची सवय पूर्णपणे तुटली आहे. साडी नेसून २-३ तास वावरणे इथपर्यंत ठीक आहे पण सबंध दिवस साडी म्हणजे कुणीतरी जबरदस्तीने बांधून ठेवल्यासारखे वाटते. वास्तुशांतीला ज्ञान प्रबोधिनीच्या एक बाई पूजा सांगायला आल्या होत्या. त्यांनी आमच्या सर्वांकडून पूजा वदवून घेतली. छान वाटले. पूजेकरता सतरंजीवर मांडी घालून बसलो होतो. २-३ तास सलग मांडी घालून बसणे हे पण आता जमत नाही. मला खरे तर जमिनीवर मांडी घालून बसायला आवडते पण सवय इतकी काही तुटली आहे की पूजा संपल्यावर उठताना पायाला चांगलीच रग लागल्याचे जाणवले.





आईकडे ठरवलेला सत्यनारायण खूप छान झाला. पूजेची तयारी, रांगोळी, फुले, केळीची पाने, प्रसादाचे ताट हे सर्व पाहून खूप छान वाटत होते. मला आईकडे ७-८ पाककृती मिळाल्या की ज्या मी अजून केलेल्या नाहीत व अर्थातच लिहिल्याही नाहीत. त्या पाककृती अनुक्रमे प्रसादाचा शिरा, पंचामृत, डाळिंब्या, कारळाची चटणी, आंबेहळदीचे लोणचे, तिळाची वडी, डिंकमेथी लाडू, सुपारी वगैरे. आईबाबांच्या घराच्या बाल्कनीत कुंड्या लावलेल्या आहेत. त्यातील फुलझाडे मी नेहमीच आवर्जून पाहते व त्याचे फोटो काढते. गुलाब, शेवंती, अळू, दूर्वा यांचे फोटो काढले. का कोण जाणे पण यावेळी मला आईबाबांच्या घरातल्या सर्व जुन्या वस्तूंचे फोटो काढावेसे वाटले की ज्या आम्ही दोघी बहिणी लहानपणापासून पाहत आलो आहोत. एकेक करत फोटो काढत होते. आजीआजोबांच्या फोटोचा फोटो, कपाट, (वर्ष १९७०) टोल्यांचे घड्याळ, सूप. एक वेगळाच फोटो मला पाहायला मिळाला. आई व तिचे तीन भाऊ यांचा. ८ भाऊ व एक बहीण यापैकी या फोटोत माझी आई व तिचे ३ भाऊ आहेत. माझा सर्वात मोठा मामा जो ९५ वर्षांचा होऊन गेला त्या आधी त्याने तो माझ्या आईला दिला व म्हणाला की हा फोटो जपून ठेव. अलिबागला एका जत्रेत १९४० साली हा फोटो काढला आहे.





अजूनही बरेच फोटो ठरवले होते ते काढायचे राहून गेले आणि जे ठरवले होते ते पटकन काढणे शक्य नव्हते. उदा. पूर्वी आमच्या घरी रॅली कंपनीचा टेबलपंखा होता त्याचा रंग फिकट जांभळा होता तो रंग मी माझ्या आवडीचा घेतला होता. पूर्वी या रॅली पंख्यामध्ये माझ्या आठवणीत अजून एक नारिंगी रंगही होता. तोही खूप छान दिसायचा. हा पंखा एका कपड्यामध्ये गुंडाळून कपाटाच्या वर ठेवला आहे. चतुर्श्रुंगी जत्रेमध्ये एक चिनीमातीचे उभट भांडे घेतले होते त्यात अजूनही आई इतके वर्षे झाली मीठ ठेवते. त्यावर एक घड्याळाचे चित्र आहे तोही फोटो ठरवला होता तोही घ्यायचा राहून गेला. शिवाय साजुक तूप ठेवण्याकरता चांदीचा टोप की जो आईला तिच्या आईने दिवाळसणात घेतला होता रुपये २७ फक्त., चहा साखरेचे स्टीलचे गोल आकाराचे बुटके चमचे, आरामखुर्ची असे फोटो काढायचे राहून गेले. आमच्या घरी एक ट्रंक आहे. आम्ही त्याला पेटाराच म्हणायचो. त्या ट्रंकेला हिरवा रंग आहे. ही ट्रंक मी व माझ्या बहिणीच्या लग्नाला कार्यालयात आणली होती. त्यात खूप काही मावले होते. बाकी दगडी रगडा, पाटा वरवंटा, सिंगर कंपनीचे मशीन, दळायचे जाते, शिवाय एक छोटा स्टीलचा डबा आहे त्याचाही फोटो काढायचा राहून गेला. या स्टीलच्या डब्यात मी शाळेत असताना पोळीचा लाडू नेत असे. त्यावर माझे नाव कोरलेले आहे. वर्ष कोरलेले आहे १९७०




१९७० साली पत्र्याचे कपाट करवून घेतले होते ते अजूनही आहे! एकदम दणकट. त्याचा फोटो घेतला. या कपाटात आम्ही तिघी म्हणजे आम्ही दोघी बहिणी व आई बांगड्या ठेवायचो. एका खूप छोट्या कप्यात कानातले गळ्यातले ठेवायचो. एका कप्यात आलेली पत्रे ठेवायचो. हे सर्व कपाटाच्या डाव्या दरवाज्यावरच आहे. शिवाय त्या दरवाज्यालाच वर ४-५ खुंट्या होत्या त्यावर पर्सेस ठेवायचो. या कपाटाला मधोमध एक लॉकर आहे त्यात महत्त्वाची कागदपत्रे व या लॉकरमध्ये डाव्या बाजूला अजून एक छोटा लॉकर आहे त्यात बाकीचे सोन्या चांदीचे दागिने ठेवायचो. या खूप आतल्या लॉकरमध्ये नेमके काय काय ठेवले ते दिसायचे नाही. मग हातानेच चाचपडत एकेक गोष्टी बाहेर काढायचो. या आतल्या लॉकरमध्ये अजून एक छोटा जुन्या पद्धतीचा लॉकर होता त्याचे नाव एटी टू लॉकर. त्याचाही फोटो घेतला. या लॉकरच्या डाव्या बाजूला ८ व उजव्या बाजूला २ असे आकडे आले की हा लॉकर उघडतो.




थालीपिठाची भाजणी भाजायची होती तर सर्व डाळी, धने, गहू, तांदूळ वगैरे निवडायला बसले. अगदी एखादाच खडा निघाला असेल. मी मोठ्या चाळणीने चाळले त्यातच निवडले आणि आईला म्हणाले एवढी सगळी मेहनत उगाचच फुकट झाली. या सर्वामध्ये एक दोनच खडे निघाले असतील. चाळून घेणे ठीक आहे पण पाखडायचे कशाला? तर म्हणाली तुला नाही समजणार. मग तिने सर्व धान्ये पाखडली. लगेच एक विडिओ घेतला. पूर्वी हीच सुपे वापरून मी व माझी बहीण मंगळागौरीला "नाच गं घुमा कशी मी नाचू" खेळलो होतो. आता या गोष्टीचे खूप हसू येते. नेहमीप्रमाणे तुळशीबाग चक्कर झालीच. यावेळेला कावरे आयस्कीम खावे का असा विचार होता. आई म्हणाली की कावरेपेक्षा लक्ष्मी रोडवरचे 'गणू शिंदे' आयस्क्रीम जास्त प्रसिद्ध आहे. पूर्वी तर कधी मी काही खाल्ल्याचे आठवत नाही. तिथे हल्ली पाणीपुरीही छान मिळते. नुसत्या गप्पाच झाल्या जाणे झाले नाही. शनिपारच्या कॉर्नरचा रस प्यायला. ग्रीन बेकरीचे छोटे समोसे घेऊन झाले. थोडीफार खरेदी झाली. मंडई, शनिपार, लक्ष्मी रोड, असे सर्व ठिकाणी फिरले की खूपच छान वाटते. लॉ कालेजला 'कृष्णा' हॉटेल आहे तिथे जेवण्याचा योग आला. जेवणाची चव चांगली वाटली. २६ जानेवारीला 'नाना-नानी' उद्यानाचे उद्घाटन झाले. सरिता नगरी व सरिता वैभव फाटकातून बाहेर पडले की उजव्या हाताला थोडे चालत जायचे की हे उद्यान लागते. तिथे त्यादिवशी पाणीपुरी व भेळपुरी मोफत ठेवली होती. हे उद्यान मला आवडले. मधोमध हिरवळ, आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे, चालायला वेगळी जागा. मध्ये बसायला बाकडी.





आईकडचे सलग १५ दिवस खूप चांगल्या आठवणीत गेले. पुण्यावरून डोंबिवलीला येताना सूर्यास्त खूपच छान दिसत होता. डोंबिवलीत मनोगती श्री व सौ गोळे यांना भेटलो. सौ गोळे यांनी गोडाचा शिरा व ढोकळा खूप छान केला होता. आमचे आय. आय. टी. मधले मित्रवर्य श्री व सौ किर्लोस्कर यांना भेटायला खारघरला गेलो. बसचा प्रवासही छान वाटला. बऱ्याच वर्षानंतर भेटल्याने खूप गप्पागोष्टी झाल्या. खूप बरे वाटले. डोंबिवलीच्या घराचे नवे रूप बरेचसे पाहायला मिळाले. त्याचे फोटो पुढच्या भेटीत.




भारत अमेरिका परतीच्या प्रवासात जर्मनीला ५ तासाचा अवधी होता. सूर्योदय पाहायला मिळाला. काही विमाने जवळून पाहायला मिळाली. परतीचा प्रवासही छान झाला. सर्व काही वेळेवर पार पडत गेले! आल्यावर काही दिवस खूपच त्रासदायक जातात. जेवायच्या झोपायच्या उलट्या सुलट्या वेळा आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर होत आहेत म्हणून भारतातील आठवणींमधून बाहेर पडण्याकरता लिहायला बसले तेव्हा कुठे आता खरे रूटीन लागल्यासारखे वाटत आहे.

......continued.... (2)photos