Saturday, December 28, 2019

२८ डिसेंबर २०१९

 २०१९ सालातले आजचे पहिले रोजनिशीतले पान. यावर्षी रोजनिशी लिहायला वेळ झाला नाही. नोकरीवर भरपूर काम वाढले होते. त्यामुळे नोकरीवर जाणे, दोन वेळेचा स्वयंपाक करणे इतकेच होत होते. बऱ्याच वेळेला नोकरी सोडून द्यावी की काय असे विचार मनात येत होते.  मी ज्या उत्पादन विभागात आहे तिथले काम तर वाढलेच होते पण हॉटबार आणि सब बार ला पण कोणी टिकत नव्हते त्यामुळे तेही काम आमच्या वाट्याला येत होते. विनायकच्या नोकरीनिमित्ताने न्युजर्सीमध्ये आलो आणि सेटल होण्यासाठी बरीच कामे करावी लागतात
ती अजूनही करत आहोत.   


इथे साऊथ इंडियन उपहारगृहे खूप आहेत आणि आम्हाला हे जेवण खूप आवडते त्यामुळे आज बाहेर गेलो होतो जेवायला आणि चक्क तिथे आम्हाला अप्पम खायला मिळाले. उपहारगृह उघडण्या आधीच बरीच गर्दी जमा झालेली दिसत होती. न्युजर्सीतल्या सर्व शहरांमध्ये इतकी काही लोकसंख्या आहे की ग्रोसरी स्टोअर्स मधले पाणी अथवा दूध आणायचे झाल्यास अगदी सकाळी सकाळी गेले तरच ते मिळते असे अनुभावयला मिळाले. त्यामुळे सकाळी उठून आवरून वालमार्ट मध्ये गेलो. मूव्हींग मध्ये सामान बांधून आणलेली खोकी फेकली.

अजूनही बरीच फेकायची बाकी आहेत. असे वाटते सेटल झालो पण तरिही दुसऱ्या शहरी गेल्यावर सर्व सुरळीत व्हायला वेळ हा लागतोच. 

सार्वजनिक ग्रंथालयाचे सदस्यत्व घेतले. तिथे मला काही हिंदी पुस्तके दिसली. त्यातले एक हिंदी पुस्तक  घेतले.छोट्या छोट्या कथा आहेत.
 
पहली कथा तर छानच आहे. लग्न झालेली मुलगी माहेरी आलेली आहे आणि तिला घरामधला बदल झालेला
 कळतो आहे. तिच्या जुन्या आठवणी तिला आठवत आहे. तिची आई खूप थकलेली आहे. तिच्या आईला मुलीबद्दल काळजी वाटते. तिचा भाऊ आणि वहिनी त्यांच्या संसारात दंग आहेत.

तिला कुठेतरी असे वाटत आहे की घरामध्ये आता आपल्या आईचे म्हणणे चालत नाही.  २ दिवस राहून ती निघते. तिला निघताना आई, वहिनी काही ना काही देतात. निघायच्या वाटेवर तिची एक जुनी स्मृती जागी होते. असे काहीसे या कथेत आहे. मला मराठी बरोबर हिंदी वाचायलाही आवडते. संध्याकाळी दडपे पोहे खायला केले. आणि अर्थातच जेवायच्या आधी हे रोजनिशीचे पान लिहीत आहे. आजचा दिवस वेगळाच गेला. मुख्य म्हणजे थंडी अजिबात नव्हती त्यामुळे बाहेर फिरायला मस्त वाटत होते.
 

Friday, December 13, 2019

आज इथं तर उद्या तिथं .... (१४)

आपण बाळाला कसे दुपट्यात गुंडाळतो ना अगदी तसेच मुव्हर्सवाल्यांनी आमच्या सर्व लाकडी सामानाला गुंडाळले आणि वरून कॅरीबॅग सारख्या लांबीरुंदीने असणाऱ्या चिकटपट्या लपेटल्या. प्रत्येक लाकडी सामानावर जाडीने कमी असलेल्या दुलया गुंडाळून चिकटपट्याही त्यानी सर्व बाजून गुंडाळून लावल्या. त्याकरता त्यांनी प्रत्येक लाकडी सामानाच्या बाजूने अनेक प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा घालता घालता एका हातात काळ्या चिकटप्ट्यांची भलीमोठी गुंडाळी होती आणि अश्या तऱ्हेनेच ते चिकटपट्या चोहोबाजूंनी गुंडाळत होते. एक तसूभरही जागा त्यांनी गुंडाळताना सोडली नाही इतके घट्ट गुंडाळले. बरोबर ९ वाजता तीन माणसे आली आणि ट्रक मध्ये सामान भरण्यासाठीची आधीची तयारी केली. त्यात एक जण कागदपत्रांचे सोपस्कार करत होता. तर एक जण मी तयार केलेल्या बॉक्सेस वर स्टीकर चिकटवत होता. एक जण लाकडी सामानाला गुंडाळायला लागणाऱ्या चादरी, चिकटपट्या वर आणून देत होता. मी २२ बॉक्सेस जय्यत तयार करून ठेवले होते जेणेकरून सामान नेणाऱ्या माणसांचा खोळंबा व्हायला नको. काही बॉक्सेस मी जिथे नोकरी करते तिथून आणल्या होत्या
तर काही वालमार्ट मधून आणल्या होत्या. बॉक्सेस काही लहान, तर काही मध्यम आणि मोठ्या आकाराच्या होत्या.सर्वात आधी मी माझ्या आठवणींची बॉक्स बनवली. त्यात स्मृती ब्लॉग मधले आधी वहीत लिहिलेले लिखाण होते. अश्या बऱ्याच वह्या, मी कॉलेजमध्ये असताना २ सेमेस्टर केल्या होत्या त्याच्या उत्तरपत्रिका आणि गृहपाठ, साध्या कॅमेराने काढलेल्या सर्व फोटोंच्या प्रती, काही शुभेच्छापत्रे आणि बरेच काही होते. एकेक करत बॉक्सेस बनवत होते. प्रत्येक बॉक्स मी काही जड आणि काही हलक्या सामानाने भरत होते. सर्व बॉक्सेस मी नुसते भरून ठेवले होते तर काही भरून त्यावर दणकट चिकटपट्या लावून त्यावर शार्पी पेनाने बॉक्स नंबर लिहिला आणि त्यात अगदी काही महत्त्वाचे असेल तर त्यांची नावे लिहिली आणि शिवाय बॉक्स क्रमांक आणि त्यामध्ये काय आहे याची एक वेगळी यादी वहीत उतरवत होते. काही बॉक्सेसची दारे मुद्दामहूनच उघडी ठेवली होती म्हणजे नेमके अगदी त्यातलेच काही आयत्यावेळेला लागले तर परत सर्व चिकटपट्या उचकटायला नकोत. तसे तर अगदी शेवटी शेवटी झालेही. मला कूट करायला दाणे हवे होते ते नेमके एका बॉक्स मध्ये बांधले गेले होते.


सर्व बॉक्सेस तयार होण्या आधी जे सामान आमच्याबरोबर बाळगायचे होते त्याच्या बॅगा तयार करून ठेवल्या. त्यात सर्व महत्त्वाची कागदपत्रे काही कॅश, पेन, गुगल मॅप, जिपीएस, दुसऱ्या जागेत गेल्यावर घरात घालायचे ४ कपडे, टुथब्रश, टूथपेस्ट, कंगवा, गरम जाकीट, मफलर, डेबिट क्रेडीट कार्डे, चेकबुके इ. इ. औषधे, अपार्टमेंटची किल्ली की जी जाताना द्यावी लागते. किल्ली दिसेल अश्या जागी ठेवली. तरी निघताना थोडा गोंधळ झालाच. सरतेशेवटी ट्रक गेल्यावर आम्ही आमचे सामान कारमध्ये ठेवायला लागलो. नेमकी मी अपार्टमेंटची किल्ली जाकीटाच्या बाजूच्या खिशात ठेवली आणि ती कारपाशी पडली. किल्लीने दार बंद करू म्हणून जाकीट मध्ये हात घातला तर किल्लिच नाही. जिन्यातून किल्ली शोधण्यासाठी २ फेऱ्या झाल्या. रिकाम्या घरात पण घरभर नजर फिरवली. कामात काम वाढले म्हणून भयंकर चिडचिड झाली आणि थोडे घाबरायला झाले. तोंडातून शब्द निघाले आता ही किल्ली कुठे गायब झाली?


बॉक्सेस मध्ये प्रिंटर्स, उशा, दुलया, तांदुळाचे पोते की जे नुकतेच घेतले होते. चपला बुटे, स्वयंपाकाची भांडी, किराणामाल, कपडेही. जास्तीत जास्त कपडे मी इंडियातल्या बॅगांमध्ये ठासून भरले होते. इंडियावरून आणलेली एक बॅग मोडली होती. पण बाजूचे खटके जिवंत होते. सामान भरण्यासाठी मला ती दोन वेळेच्या स्थलांतरात उपयोगी पडली. यावेळेला फेकाफेकीचे काम खूपच कमी होते कारण विल्मिंग्टनवरून दुसऱ्या शहरात जाताना आम्ही बरीच फेकाफेकी केली होती.मूव्हींगच्या तयारीला एकेक दिवस थोडे थोडे करत आवरते घेतले तरी शेवटच्या २ दिवसात तर सगळे घेतले ना? म्हणून कपाटे उघडून तपासावीत तरी त्यात काही ना काही राहिलेलेच होते.. आता हे कुठे ठेवायचे ? उरलेले सर्वच कुठल्यातरी जागा असेल त्या बॉक्स मध्ये ढकलून द्यायला लागते. तरीही नुसती जागा रिकामी असून चालत नाही. ते तिथे नीट बसवायलाही लागते. जागेचा अंदाज घेऊन काही उभे तर काही आडवे ठेवायला लागते. अगदी निघायच्या दिवशी काही काही फेकूनच द्यावे लागते. कोण घेणार ते? निघायच्या आधीच्या आठवड्यात जे आणले होते ते एकेक करत संपवत होतो. पोळी भाजीचा डबा घेतला त्यात मिक्स भाजी केली. त्यात फ्लॉवर, टोमॅटो, फ्रोजन मटार, कांदा, सिमला मिरची अशी मिक्स भाजी केली तरी सुद्धा उरलेल्या भाज्या फेकल्या. काही बटाटे फेकले. ज्युस, पाणी, दुध जितके पिता येईल तितके प्यायले. शेवटी उरलेले टाकून दिले. उरलेल पाणी मात्र बरोबर घेतले. Rohini Gore क्रमश : .....


Monday, November 25, 2019

आज इथं तर उद्या तिथं ... (१३)

सरळ सरळ रस्त्याने मार्गक्रमणा होती. खूप नाही तरी वाहतूक होती त्यामुळे अजिबात कंटाळा आला नाही. महामार्ग८१ नॉर्थवर दुनियाभरचे ट्रक दिसले. नुसते दिसले नाही तर त्यांनी उच्छाद मांडला होता. दोन्ही लेनमध्ये ट्रक आणि कार्स तुरळक. डाव्या लेनमध्ये ट्रक असतानाकार कशी काय वो हाकायची भरभर ! आजूबाजूला पाहिले तर पठारेच्या पठारे लागत होती. त्यावर निसर्गाने रंग भरले होते. हिरव्या रंगांच्यानानाविध छटा रेखाटल्या होत्या. त्यावर छत्रीसारखे निळेशार आकाश पांघरलेले दिसत होते. दृश्य नयनरम्य होते. सुरवातीला महामार्ग २६ होता पण तो इतका खतरनाक असेल असे वाटले नव्हते. टेनेसी मधून गेलेला हा रस्ता वळणे घेत जात होता.


आजूबाजूला मोठाल्या कडाकपाऱ्या. जरासे घाबरायलाच झाले. जिपिएस वर रस्ता नीटच दाखवत होते. शिवाय मोठ्या नकाशावरही पाहिलेहोते. मॅपही घेतला होताच पण तरीही गॅसची एक्झीट दिसायला तयार नाही. संध्याकाळ होत आलेली. रस्ता संपायलाच तयार नाही. ८० मैल गेल्यावर महामार्ग ८१ ची एक्झीट दाखवत होते. आणि जवळ जवळ सर्व प्रवास ८१ वरच होता. नंतर शेवटचे २ महामार्ग होते. पण त्यावर थोडासाच प्रवास. शेवटी एकदाचे महामार्ग ८१ वर लागलो आणि हायसे वाटले.

हॅरिसनबर्ग नावाच्या शहरात एका रात्रीपुरते होटेल बुक केले होते. होटेलमध्ये पोहोचेपर्यंत रात्र होऊन गेली. हॉटेल रूमचा ताबा घेतला.पोळी भाजी खाल्ली आणि झोपी गेलो. प्रचंड दमायला झाले होते. गुरूवारचा ६ तासाचा प्रवास करून शुक्रवारी पण ६ तासाचा प्रवास करायचा होता. बुधवार गुरूवारी तर युद्धपातळीवर कामे केली आणि गुरूवारी सकाळी उठून सज्ज झालो. तरीही बारीक सारिक राहिलेली कामेउरकावी लागली. मुव्हींग म्हणले की शेवटपर्यंत कामे करावीच लागतात. निरानिपटी कानाकोपऱ्यातून सर्व संसार गोळा करून तो बॉक्सेस मध्येआणि इंडियातून सुरवातीला आणलेल्या ४ बॅगात पद्धतशीरपणे मांडावा लागतो. मूव्हर्स आणि पॅकर्स बोलवतोच कारण सुरवातीला घेतलेलेफर्निचर इतके काही जड आहे की ते आमच्याने उचलणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे.

मुव्हर्स वाले अगदी वेळेत आले. त्यांचीच घाई चालली होती. ते म्हणाले आम्ही आत्ता निघतो आणि मध्यरात्रीत सामान टाकतो तुमच्या नव्याघरी. आम्ही म्हणालो अरे हो, आधी जागा तर ताब्यात मिळू द्या. ती आम्हाला शुक्रवारी मिळणार आहे आणि आम्ही रात्री होटेल मध्ये थांबूनदुसऱ्या दिवशी निघून दुपारपर्यंत पोहोचणार आहोत. नंतर हासायला लागले. तिघे होते. तीनही लोक्स अरेबिक. त्यांनी केलेली घाईआमच्या पथ्यावरच पडली. कारण आम्हाला सामान शनिवारी मिळेल असे सांगितले होते. मग आम्ही शुक्रवारचे एनवाय मधले होटेलचे
बुकींग रद्द केले. केबलचे मॉडेम विनायक देवून आला. निघताना अपार्टमेंटच्या ऑफीस मध्ये शेवटचे १ महिन्याचे अधिक भाडे भरून किल्ल्या देवून, जरूरीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि कार सुरू केली. जाताना टायर मध्ये हवा भरली. कारण की थंडीमध्ये टायर मधली हवा कमी होते. पेट्रोल भरले. आणि इंगल्सचे आणि आमच्या घराचे शेवटचे दर्शन घेऊन निघालो. प्रचंड थंडी होती.
क्रमश : ... Rohini Gore

Wednesday, November 20, 2019

Moving (2)


Tuesday, November 12, 2019

Moving (1)

Sunday, September 22, 2019