Friday, February 19, 2010

भारतभेट....2010


यावर्षीच्या भारतभेटीत काय काय करायचे याची एक यादी बनवली होती. सगळ्या नाहीत तरी काही काही गोष्टी केल्या. बऱ्याच वर्षानंतर पुष्करिणी भेळ खाली. रुपये २० फक्त. द्रोणात देतात. पूर्वी बहुतेक स्टीलच्या ताटल्या होत्या. खाताना चित्त यांची आठवण झाली. त्यांनी एका भेळेच्या चर्चेत पुष्करिणीचे वर्णन केले होते. अचूक होते ते वर्णन. कुरकुरीत भेळ व चिंचगुळेचे पाणी जास्त घालत नसल्याने भेळेचा लगदा होत नाही. पुष्करिणी भेळेचे मालक अनंत मेहेंदळे अजूनही दुकानात बसून भेळ बनवतात व त्यांचा मदतनीसही तोच आहे. त्याचे काम लाल कांदा चिरण्याचे. अनंत मेहेंदळे हे माझ्या बाबांचे मित्र आहेत. भेळ खायला गेले की आवर्जून चौकशी करतात. या भेळेचे वैशिष्ट्य असे की याची चव खूप काळ जिभेवर रेंगाळत राहते.

मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा.... या गाण्याची व नटरंग या चित्रपटाची जाहिरात ऑनलाईन झी मराठीवर पाहिली होती आणि तेव्हाच ठरवले की पुण्यात टॉकीजवर जाऊन नटरंग पाहायचा. हे ठसकेबाज गाणे मला खूप आवडते. एकदा ऐकले की दिवसभर तेच डोक्यात राहते. चित्रपटाची सुरवात याच गाण्याने होते त्यामुळे मला सुरवात अजिबात चुकवायची नव्हती. पुण्यात कुठेही जायला रिक्षा हवीच. नेमका रस्ता काही कारणाने अडला होता. रिक्षावाल्याने मागे वळवून वेळेवर प्रभातवर पोहोचते केले. मला चित्रपट टॉकीजवर जाऊन पाहायला खूप आवडतो. बरेच वर्षानंतर टॉकीजवर चित्रपट पाहायची इच्छा पूर्ण झाली. पूर्वी अलका, विजय, श्रीनाथ, भानुविलास, मिनर्व्हा, नीलायम, अलंकार या टॉकीजमध्ये बरेच मॅटीनी शोज पाहिले आहेत. या भारतभेटीमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे डीजीकॅम मोडला. बरेच बरेच फोटोज जे मनात ठरवले होते ते काढायचे राहून गेले याचे खूपच वाईट वाटत आहे. तुळशीबाग, ग्रीनबेकरी, मंडई, चितळे स्वीटमार्ट, विश्रामबाग वाडा, लकडीपूल, हनुमान टेकडी असे अनेक फोटोज काढायचे राहून गेले.

तसे ग्रीन बेकरीतले छोटे कुरकुरीत समोसे, त्यासमोरील रसवंतिगृहात रस, तुळशीबाग व मंडईत मिळणारी फळे व भाज्या या सर्व गोष्टींसाठी दोन तीन वेळा फेरफटके झाले. एकदा तर पंजाबी सूट शिवायचा होता. स्वीट होम समोर एक चाँदनी नावाचा टेलर आहे तो चांगले कपडे शिवतो. तो म्हणाला तुम्ही दुसरीकडे खरेदी वगैरे करून या. तासाभरात ड्रेस शिवून तयार ठेवतो. मला तर खूपच मजा वाटली या गोष्टीची.

पहिल्याप्रथमच थेट उड्डाण प्रवास केला नेवार्क विमानतळ ते मुंबई विमानतळ. विमानात जब वी मेट पाहिला. तसा चित्रपट खूप जुना झालाय. माझ्या भाचीने सांगितले होते की मावशी हा चित्रपट तू जरूर पाहा तुला आवडेल म्हणून पाहिला. आमच्या विमानाने जमीन सोडून हवेमध्ये उड्डाण केले आणि अगदी त्याच वेळेस चित्रपटाची सुरवात झाली ती म्हणजे करीना भराभर एकापाठोपाठ एक वस्तू चालत्या आगगाडीमधल्या माणसाला देत आहे व नंतर ती धापा टाकत आगगाडीत प्रवेश करते. हे असे टायमिंग जुळलेले मला खूप आवडले. करीनाचा चित्रपट पहिल्यांदाच बघत होते. मला हा चित्रपट खूप वेगळा वाटला आणि आवडलाही.

मुंबई विमानतळावर जेव्हा विमान जमिनीवर टेकते तेव्हा मला नेहमीच खूप छान वाटते. पुण्याच्या घरी गेलो तेव्हा जावेने गरमगरम मटार पोहे केले. त्यात तिखट मिरच्या व कडिपत्ता होता. आले व गवती चहा घालून दोन तीन वेळा चहा प्यायला. पोह्याची मिरगुंडही तळली होती. थोडावेळ झोप काढून आईकडे हजर. आईकडे आरामच आराम. आईकडे पोळीभाजी करण्यासाठी बाई लावली आहे. तिचे नाव मनिषा. तिला आईने सर्व भाज्या शिकवल्या आहेत. अगदी त्याचप्रमाणे ती सर्व भाज्या करते. अतिशय टापटीप आहे ही मनिषा. चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांच्याकडे ही मनिषा काही दिवस पोळीभाजीचे काम करत होती. पोळीभाजीशिवाय घरी शिवणकामही करते.

आईकडे सकाळी आल्याचा चहा मीच करायचे कारण की गॅसवर चहा करणे मी इथे अमेरिकेत मिस करते. ७ ला चहा घेऊन बाबा रोज शाखेत जातात. मी व आई चहा घेऊन परत झोपायचो. झोपायचो म्हणजे परत एक छोटी डुलकी. मुख्य झोपेनंतरची ही छोटी डुलकी मला खूप आवडते. ४५ मिनिटांची ही झोप. यामध्ये आईचा मऊभात व्हायचा. आईकडे मऊभात करायची २-३ भांडी आहेत. दोघांसाठी, तिघांसाठी व ५-६ जणांसाठी अशी ठरलेली भांडी. बाबा शाखेतून आले की आम्ही तिघे मेतकूट तूप भात व सोबत लिंबू लोणचे जेली खायचो. सिंगगड रोडवर सरिता वैभव मध्ये आईबाबा राहतात. सरितावैभव शेजारी सरितानगरी आहे. तिथल्या एका झाडाखाली शाखा भरते. मी एकदा बाबांबरोबर शाखेत गेले होते. शाखा होईपर्यंत एक फेरफटका मारला. सरितानगरीच्या आवारात प्राजक्ताचा सडा होता. कण्हेरीचे झाड होते. फुलांचा रंग वेगळाच गडद लाल होता. शिवाय बोगनवेलीचा रंगही छान दिसत होता. अजून काही फुलझाडे होती. मागे नदीचे पात्र आहे. त्यावर अनेक पक्षी होते. या सर्वांचे फोटोज घ्यायचे असे मनात योजले होते. बरेच पक्षीही बागडत होते.

ही बाबांची शाखा मला खूप आवडली. सर्वजण खूप मौजमजा करतात. शाखा सुटली की काहीवेळा सगळेजण बाहेरच्या टपरीवर भजी खायला जातात. सर्वजण एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. संध्याकाळी पण काहीजणांचा कट्टा भरतो. त्यात बाबा म्हणाले की सर्व प्रकारचे विषय चर्चिले जातात. आईचा पण एक ग्रुप आहे. संध्याकाळच्या सर्वजणी सरितावैभव आवारात फेरफटके मारतात. झी मराठीच्या मालिका सुरू व्हायच्या आत आपापल्या घरी परततात. फोनवरून आईबाबांचे दिनक्रम ऐकले होते. प्रत्यक्षात बघितल्यावर छान वाटले.

आईकडे जसा आराम केला तसाच आराम छायाताईंकडेही केला. दोन दिवस राहायलाच होतो त्यांच्याकडे. एका रविवारी पूर्ण दिवस सौ व श्री सर्वसाक्षी, श्री मिलिंद फणसे, छायाताई व आम्ही दोघे गप्पा टप्पा केल्या. या निवांतपणात बरेच विषय आले. त्यात ओघाने मनोगतींचा विषयही आला. छायाताईंनी पुरणाची पोळी, गुळाची पोळी, भाज्या, कोशिंबिरी, चटणी, फळफळावळ, मेवामिठाई सर्व काही खूप छान केले होते. मध्यंतरात आल्याचा चहाही झाला. छायाताईंच्या घरासमोरच समुद्र आहे. मी सारखे खिडकीतून समुद्राला पाहत होते. त्यांनी त्यांच्या कारमधून खूप फिरवले. वरळी सी फेस वर भरपूर चाललो व वरळी सी लिंकला पण एक चक्कर मारून आलो. डीजीकॅम असता तर एक छोटे शूटिंग केले असते. पुढच्या वेळी तर हे माझ्या यादीत पहिले असेल इतकी सी लिंक छान आहे.

पुण्यात न्यानल मंगल कार्यालयात एका बोरन्हाणाला गेले होते. पंगतीतले जेवणही असेच खूप वर्षानंतर जेवले. अतिशय सुग्रास जेवण होते. बिनगर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून प्रवास केला. त्यात उभे राहून वारे घेतले. जलद लोकलनेही प्रवास केला. जलद लोकलमध्ये रुळावरून लोकल जाताना एक रिदम तयार होतो तो ऐकतानाही छान वाटत होते. एके दिवशी उलट दिशेला डोंबिवली - ठाणे उलटा प्रवास बिनगर्दीचा केला. संध्याकाळी ठाण्याची गर्दी अचाट होती. लोकलमधून खाली उतरून वर पूल ओलांडायला जी काही गर्दी होती ना त्यात जरा थोडे कोणी ढकलले असते तर एकमेकांच्या अंगावर पडून चेंगराचेंगरीत जीवच गेला असता. जिन्यावरून चढताना श्वास रोखूनच हळूहळू चढत होतो. एकूणच गर्दी आता सहन होत नाही. बोरन्हाणाला पण १०० -१५० माणसे होती पण त्यांच्या बोलण्याचा आवाज काही सहन झाला नाही. मनात म्हणत होते काय हा कलकलाट! एकूणच परदेशात कसे सारे काही शांत शांत! हरिश्चंद्राची फॅक्टरी अलका टॉकीजला पाहिला. तिथे पंखे होते पण खूपच गरम होत होते. तिथेही जीव थोडासा घुसमटला. पुण्यातल्या तळ्यातील गणपतीचे दर्शनही ठरवले होते. बरेच वेळा ठरवले पण होऊ शकले नाही. शेवटी आज जायचेच काहीही झाले तरी आणि कितीही उशीर झाला तरीही असे ठरवल्यावर दर्शन झाले. मनापासून दर्शन घेतले. दर्शनासाठी या गणपतीसमोर उभे राहिले की हात जोडून व डोळे मिटून बराच वेळ उभे राहिले तरी दर्शन झाल्याचे समाधान होत नाही असा माझा अनुभव आहे. खूप शांत वाटते या देवळात.

डोंबिवलीत स्वामी समर्थ मंदिर व मयूरेश्वर मंदिर पाहण्याचा योग आला. मंदीरे खूपच छान आहेत. मयूरेश्वर मंदिरात गणपतीची आर्ट गॅलरी खूपच सुंदर आहे. जाताना चालत गेलो. आमचे मित्रवर्य श्री नेर्लेकर होते. ते म्हणाले की आपण अर्धा तास चालणार. जाताना थोडी खादाडी करु. त्यांनी वडापाव, लिंबू सरबत, पाणीपुरी खायला घातले. मला खरे तर बर्फाचा गोळा खायची पण इच्छा झाली होती. हे सर्व पोटाचा विचार न करता खाल्ले. डोंबिवलीत वीर सावरकर मार्गावर एक उद्यान झाले आहे तेही खूप छान आहे. डोंबिवलीत अजून एक गोष्ट पाहिली ती म्हणजे रामचंद्र टॉकीज पाडून तिथे २० मजली इमारतीचे काम चालू आहे. डोंबिवलीतली ती म्हणे सर्वात उंच इमारत. पुण्यामध्ये आदितीला भेटलो. खरे तर वैशालीत बसणार होतो. वैशालीला तर अजिबातच ओळखले नाही. खरे तर मला वैशालीतच बसायचे होते पण तिथे मधल्या वारीही खूप गर्दी. रूपालीत पण जागा नाही. शेवटी वाडेश्वर मध्ये गेलो. तिथले अप्पे, पेसारट्टू, व चिक्कू मिल्क शेक आवडले. पण मला ते उपहारगृह खूप काही आवडले नाही.

काही गोष्टी केल्या काही राहिल्या. महिनाभरात सर्वच्या सर्व ठरवलेले काही होत नाहीच. परत थेट उड्डाणाने अमेरिकेत रवाना झालो. आल्यावर गोष्टी काही केल्या सुधरत नाहीत. वेळीअवेळी जेवणे व झोपणे, यामध्ये गाडी रुळावर यायला किमान एक आठवडा जातोच. "चला कामाला लागा आता..... बस झाला आराम" असे मनाला बजावत उठावेच लागते.