Saturday, October 21, 2017

मी अनुभवलेली अमेरिका ...(८)

मुंबईत राहत असताना मी किराणामालाची यादी फोनवरून सांगायचे की २ तासात घरपोच सामान यायचे. तसेच वर्षभराचे तिखट, हळद आणि गोडा मसालाही घरी करण्याची सवय होती. दाणे भाजून त्याचे कूट करण्याची सवय होती. शिवाय  ताजा नारळ खरवडून तो वापरायचीही सवय होती. इथे अगदी याच्या विरूद्ध आहे. किराणामाल म्हणजे तेल, साखर, चहा, डाळी आणि पिठे सर्वच्या सर्व आपण दुकानात जाऊन आणायला लागते. त्याकरता एक दुकान पुरत नाही. ३ ते ४ अमेरिकन स्टोअर्स फिरायला लागतात. डाळी, मसाले, पोहे, रवा आणि इतर याकरता भारतीय दुकानात जावे लागते आणि हे भारतीय दुकान प्रत्येक शहरात जवळ कधीच उपलब्ध नसते. अगदी क्वचित ठिकाणी असते जिथे भारतीयांची लोकसंख्या बरीच आहे ति शहरे. आम्हाला आतापर्यंत जवळच असलेले भारतीय दुकान नशिबी नव्हते. अगदी आता ज्या शहरात राहतो तिथपासून सुद्धा ते १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे. नेहमी लागणारा किराणामाल घाऊक प्रमाणात काही दुकानातून मिळतो जसे की तेल, साखर, दाणे, इ. इ. आणि बाकीचे किरकोळ काही आणायचे झाल्यास इतर काही ग्रोसरी स्टोअर्स असतात तिथे जावे लागते.



आता गोडा मसाला की जो मी वर्षाचा घरी करायचे त्याला पर्याय म्हणून मी काळा मसाला वापरू लागले. दाणे भाजून त्याचे कूट करण्यापेक्षा इथे भाजलेले दाणे मिळतात अर्थात ते खारट असतात. त्याचे कूट बनवायला लागले. घाऊक दुकानातून टुथपेस्ट, कपडे धुण्याकरता लागणारे डिटर्जंट, भांडी घासायला लागणारे लिक्विड, तसेच साबण, पेपर टॉवेल, टिश्यू पेपर इ. इ. घाऊक दुकानात मिळतात आणि ते स्वस्तही असतात. भाज्यांकरताही इथे ३ ते ४ दुकाने हिंडून भाज्या खरेदी करतो. उदा.  हॅरिस्टीटर दुकानात शेपू चांगला मिळायचा.  तसेच चिरलेला  लाल भोपळाही मिळायचा. लोएस फूडच्या दुकानात पिण्याचे पाणी चांगले मिळायचे. इथले फ्रोजन फूड मी कधीच वापरले नाही. मला आवडत नाही. फक्त मटार आणि काही बीन्स आणते.


मुंबईत असताना माझा फ्रीज रिकामाच असायचा. उगीच नावाला २-४ भाज्या असायच्या. दुध खराब होऊ नये म्हणून आणि साय, लोणी असेच असायचे. इथे मिळणारे मीठविरहीत बटर वापरून मी तूप कढवायला लागले.  स्वयंपाक करून जेवलो की उरलेले अन्न मी दुसऱ्या पातेलीत काढून ठेवते. ही सवय मात्र अजून बदललेली नाही. त्यामुळे खरे तर भांडी खूप पडतात. पाणी पिण्याचे ग्लासही मी घासते. भांडी घासायला कमी पडावीत म्हणून काही मैत्रिणी जशीच्या तशी पातेली फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे फ्रीजमध्ये कूकर - कढया - पॅन्स असतात. आम्ही सकाळी वर्षानुवर्षे दुधेच पितो त्यामुळे सकाळची न्याहरी बनवायची सवय नव्हती. अर्थात इथे दुधामध्ये प्रोटीन पावडरी टाकून दुधे पितो. याचा फायदा खूपच झाला. शाकाहारी असल्याने खाण्यापिण्याच्या सवयी अजिबातच बदललेया नाहीत. म्हणजे सगळे अन्न ताजे करून खायचे आणि त्यातूनही पोळी, भाजी, भात, आमटी, पोहे, उपमे, बनवून खाण्याचे बदललेले नाही. इथली सर्व प्रकारच्या उपहारगृहात गेलो आणि चव चाखली. इटालियन, मेक्सिकन, चायनीज, पण तितकी चव  आवडली नाही.  आणि भारतीय
उपहारगृहात सुद्धा मसालेदार चव कधीच नसते. त्यामुळे आवडणारे सर्व चमचमीत पदार्थ घरी
करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. बटाटेवडे, सामोसे, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे, इडली सांबार, मसाला डोसा, भेळ, रगडा पॅटीस हे सर्व पदार्थ इथे घरी केले तरच खायला मिळतात
अन्यथा नाही. इथे मिळणाऱ्या भाज्या आणि फळे मोठमोठाली असल्याने चवीला अजिबातच चांगली नाहीत.



 शिवाय भारतीय भाज्याही सहज उपलब्ध नसल्याने त्याही खायला मिळाल्या नाहीत. जसे चमचमीत पदार्थही सहज उपलब्ध होत नाही जसे की वडा पाव तसेच गोड पदार्थही सहज उबलब्ध नसतात जसे की आयती पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, सुरळीच्या वड्या, अळूच्या वड्या इ. इ. फक्त आणिफक्त जिथे भारतीय वस्ती आहे तिथल्या शहरातच भारतीय काही लोकांची दुकाने आणि उपहारगृहे असतात. अमेरिका देश हा भारतापेक्षा
तिप्प्ट मोठा असल्याने आणि काही ठिकाणी भारतीय खूप कमी असल्याने कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नाहीत

4 comments:

मन कस्तुरी रे.. said...

दुधे? :-)

rohinivinayak said...

:) dudh pito

मन कस्तुरी रे.. said...

ताई
प्लीज अमेरिकेत मिळणारी तर्‍हेतर्‍हेची धान्यं यावरही लिहा. उदा - किनवा, काळे तांदूळ, पिंक तांदूळ, कुसकुस इ इ .
व फळे - माहित नसलेली

rohinivinayak said...

हो नक्की लिहीन. आम्ही दोघांनी भात खाणे पूर्णपणे सोडून दिल्याने इथे मिळणाऱ्या तांदुळाचे प्रकार मी कधी करून पाहिले नाहीत. फक्त सुरवातीला मी लाँग ग्रेन राईस ईडली करता वापरायचे. हा तांदुळ साधारण इडलीसाठी मिळणाऱ्या उकडा तांदुळासारखा असतो. किवी नावाचे फळ इथे मिळते ते आवडते. पेअर्स आवडते. इथे सफरचंद पण वेगवेगळ्या प्रकारची मिळतात. रास्पबेरीहे फळ पण चवीला थोडे तुरट व आंबट असते. इथे मिळणारी ब्लुबेरी तर मला खूपच आवडते. बाकीच्या इथे मिळणाऱ्या भाज्याही थोड्या करून पाहिल्या आहेत. इथे मिळणारे, स्क्वॅश याची भजी साधारण घोसाळ्या सारखी लागतात. ब्रुसेल स्प्राऊट ची पण किसून भजी केली आहेत. आरूगुलाची भाजी कांदा लसूण घालून खूप छान लागते. केलची भाजी करून पहायची आहेत. इथे सॅम्स क्लब मध्ये प्रचंड मोठे कलिंगड स्वस्त दरात उन्हाळ्यात मिळते ते आम्ही
आणायचो आणि मी कापून त्याच्या फोडी करून डब्यांत भरून ठेवायचे व रोज थोडे थोडे खायचो. इथे कलिंगड खूप प्रमाणात खाल्ली आहेत आम्ही !

Thank you so much for your comment ! tu majha blog vachtes he pahun khupach chhan vatate ga !! utsah yeto. :)