Tuesday, April 26, 2011

डेंटनचे दिवस ...(१)

क्लेम्सन शहराचे मी खूप कौतुक केले. तिथले दिवस, तिथल्या आठवणी व अनुभव, निसर्गरम्य परिसर. क्लेम्सनमध्ये साधारण तीन ते चार वर्षे राहत असल्यामुळे तिथल्या वेगवेगळ्या आठवणी व अनुभवांचे फोटो व त्यांचे लेखन असे सर्व काही झाले. डेंटन शहराचे दिवसही असेच छान होते! डेंटन शहरातील काळ अवघा एक वर्षाचा होता म्हणून शीर्षक दिले आहे "डेंटनचे दिवस! "दहा वर्षांपूर्वी अमेरिकेची ओळख डेंटन शहरात झाली. अमेरिकेचे पहिले दर्शन जे डेंटन शहरात झाले ते खूप सुखद होते. जेव्हा आम्ही आमच्या अपार्टमेंट मध्ये रहायला गेलो तेव्हा आमच्या घराच्या खाली राहत असलेली प्रविणा वर आली व तिने आमची ओळख करून घेतली. सत्या आमच्या शेजारी राहत होती. तिने तर आम्ही रहायला गेल्यावर "आज तू घरी काहीही बनवू नकोस. तुम्ही आमच्या घरी जेवायला या" असे आमंत्रण दिले. डेंटन शहरात जे मित्रमैत्रिणी मिळाले ते सर्व अमेरिकेत नवीनच होते.डेंटन शरामध्ये ओळख झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये जाणेयेणे होते, गप्पा टप्पा होत होत्या. कार असल्या तरी सर्व जण विद्यापीठात चालत जायचो. आठवड्याची ग्रोसरी करण्याकरता आम्ही सर्व मिळून एकत्र चालत जायचो. शुक्रवार हा आमच्या सर्वांचा "ग्रोसरी वार" होता. आमच्या शेजारच्या घरात राहणारी सत्या व तिची फॅमिली महिन्याभरानंतर दुसऱ्या शहरात गेली. तिला आम्ही दोघींनी वेगवेगळे जेवायला बोलावले. शिवाय एक एकत्र जेवणही केले. तेव्हा फक्त आम्ही तिघी होतो. मी, सत्या व प्रविणा. जाताना तिला बायबाय केले. ग्रुप फोटो घेतले. आमच्या शेजारी एक बांगलादेशी जोडपे राहत होते. नवरा पिएचडी करत होता व ती मॉलमध्ये कामाला जायची ते रात्री ९ ला यायची.ती एकदा तिच्या गावी महिनाभर गेली होती. जाताना तिने आम्हाला तिचा टु इन वन दिला व म्हणाली आम्ही येई तोवर हा तुझ्याचकडे राहू दे. रेडिओवर २४ तास हिंदी गाणी लागतात. डॅलसवरून रेडिओवर २४ तास हिंदी गाणी लागायची. नंतर आम्ही पण एक टु इन वन घेतला. माझी अगदी पहिल्यापासूनची सवय आहे. मला टु इन वन खूप आवडतो. घरातले काम करत असताना एकीकडे रेडिओ मला सतत लागतो. डॅलसवरून रेडिओवर लागणारी ती २४ तास जुनी हिंदी गाणी म्हणजे माझ्याकरता तर "मेजवानी" होती!विनायक विद्यापीठात post- doctorate करण्याकरता आला होता त्यामुळे लॅबमध्ये दिवस रात्र काम! तसे तर डेंटन मधली आमची छोटी post-doc community खूप छान होती. एकोपा होता. आम्हाला कधिही "आपण एकटे आहोत" असे जाणवले नाही. डेंटनमध्ये आलो तेव्हा वसंत ऋतू संपत आलेला होता. खूप स्वच्छ सुंदर हवा! मला अजुनही आठवत आहे. फॉलमधले सैरावैरा वाहत असलेले बोचरे वारे, लखलखणाऱ्या व कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस! व थंडीचा कडाका! त्यात भर म्हणजे मनमिळाऊ मित्रमैत्रिणी, सारे कसे छान छान. कोणताही पहिला आलेला अनुभव आपण कधीच विसरत नाही! बरोबर ना!

Monday, April 25, 2011

Lake Jones NC
Thursday, April 21, 2011

२१ एप्रिल २०११

आज ठरवले होते की घर आवरायचे. सकाळी नेहमीप्रमाणेच उठल्यावर फेसबुकवर चक्कर आणि एकीकडे चहा. आधी स्वयंपाक करून घेऊ मग आईला फोन व जेवल्यावर थोडी डुलकी काढून थोडे घर आवरू असे ठरवले होते पण झाले नाही. नंतर नंतर म्हणता गोष्टी होत नसतात.दुपारच्या डुलकीनंतर चहा घेता घेता साम मराठीवर सुगरण या कार्यक्रमात एक रेसिपी पाहिली ती म्हणजे मेथीची खिचडी. एकदा करून पाहणार आहे. बघू कधी ते. संध्याकाळी पक्षांना व बदकांना ब्रेड घातला. सीगल पक्षी वर उडत असतानाच ब्रेडचा कॅच चोचीने झेलून ब्रेड खातात. सर्वच तसे नाही वागत काहीकाहीच. त्यांना तसे खाण्यातच मजा वाटते. असा एक फोटो मी पूर्वी घेतलेला आहे.आमच्या घराच्या गॅलरीतून सूर्यास्ताचे फोटोज घेत असते. काही मनासारखे येतात तर काही नाही. आज आला मनासारखा. दिप्तीच्या ब्लॉगवरची एक पोस्ट वाचली धुके नावाची. ती वाचून खूप छान वाटले आणि ब्लॉगमध्ये काही बदल केले. वाचकांना ते लगेच ओळखू येतीलच. आज माझ्या हातून काहीही झाले नाही. डोक्यात मात्र बरेच काही घोळत राहिले.

Art Photography


Wednesday, April 20, 2011

२० एप्रिल २०११
आज अचानक मला सकाळी सकाळी पूर्वीच्या टु इन वन व कॅसेटची आठवण आली. काही महिन्यांपूर्वी मी अशीच एकदा पूर्वीची एक कॅसेट लावून ऐकत होते. ही सोनीची कॅसेट मी बाबांकडून घेतली होती जेव्हा आमच्याकडे आमचा नवीन व पहिलावहिला टु इन वन आला होता तेव्हा. त्यावर मी रेडिओवरून बरीच आवडीची गाणी टेप केली होती.आज अशीच tape लावून बसले होते. त्यात कॅसेटची एक बाजू ऐकायची राहिली होती म्हणून कॅसेट उलटी करून ऐकायला सुरवात केली तर एकदम मजाच वाटली. त्यात सुरवातीला मी व बाबांनी गाणी गायली होती. नवीन टेप असल्याने आम्हाला दोघांना भारी उत्साह. लगेच गाणी टेप केली होती. बाबा जेव्हा गात होते तेव्हा आम्ही दोघी मी व आई स्वयंपाकघरात काम करता करता जोरजोरात बोलतही होतो. बाबांनी शरदाचे चांदणे मधुबनी हे गाणे गायले होते व मी चांदणे शिंपित जाशी. लगेच युट्युबवर ही जुनी आठवण रेकॉर्ड केली. जेवण केल्यावर दुपारी त्या कॅसेटमधली उरलेली रेकॉर्ड केलेली गाणी ऐकली. खूप चांगली आणि स्पष्ट टेप झाली आहेत. खूप मजा वाटली.नंतर कॅसेटचा फोटो काढला. आजचा दिवस सोनी कॅसेटचा होता. खूप वेगळा दिवस गेला आज. आज इथे एकदम खूपच गरम होत होते. आज कांदा चिरताना अशीच एक कलाकुसर बनवली गेली.


Saturday, April 16, 2011

खिलते है गुल यहाँ खिलके बिखरनेको...

मी लायब्ररीत जाते तिथे आजुबाजूला अनेक फुलझाडे आहेत. परवा तर तिथे गुलाबाच्या झाडांना बरीच फुले उमलली होती. काही फुले पूर्ण उमललेली तर काही अर्धवट उमललेली, काही छोट्या कळ्या. बरेच मनासारखे फोटो काढता आले त्यामुळे खूप छान वाटले.

Friday, April 15, 2011

दिनांक १५ एप्रिल २०११

आजकाल उन्हाळा असल्याने पहाटे पहाटे जाग येते. कधी ५ ला तर कधी ६,७ ला. खिडकीतून बाहेर डोकावले तर अरुणोदय होत असतो. तसे मी पूर्वीचे काही अरुणोदयाचे फोटो घेतलेले आहेत. इथे समुद्रातून सूर्य वर येताना फोटोज घ्यायचे आहेत पण केव्हा मुहूर्त लागणार आहे कोण जाणे.चैत्रगौरीपूजन व त्याबरोबर त्याचा नैवेद्य डाळ व पन्हे असे करायचे आज ठरवले होते. त्याप्रमाणे आदल्या रात्री हरबरा डाळ पण भिजत घातली होती पण काही केल्या आज मूड लागत नव्हता. आधी बाहेर तळ्यावर चक्कर मारून आले. तसे हल्ली माझी सकाळीच चक्कर असते. तिथे बाजूला एक गुलाबाचे झुडूप आहे त्यावरच्या गुलाबकळ्यांचे त्याचे फोटो घेतले. ४-५ पाकळ्या घेतल्या व काही शोभेची छोटो फुले घेतली. आल्यावर अंघोळ करून डाळ पन्हे करण्याच्या तयारीला लागले. पूजेची तयारी केली. तरी सुद्धा आज काही खास मूड नव्हता. पूजा केली व डाळ पन्हे याचा नैवेद्य दाखवला. मनासारखे सर्व झाले.आज मनात दिवसभर पूर्वी आईकडे होणारे चैत्रगौरीचे हळदी कुंकू रेंगाळत राहिले. दुपारी बरेच फोटोज अपलोड करून डिलीट केले. संध्याकाळी पूर्वीच्या १-२ डायऱ्या चाळत बसले होते. त्यातून २-३ लेख होतील असे वाटते इतके लिहिले आहे. आज खरे तर रोजनिशी लिहिणार नव्हते. १२ वाजून गेले होते पण झोपण्यापूर्वी पटकन काहीतरी लिहू म्हणून लिहिले. आज का कोण जाणे अजिबात मूड चांगला नव्हता पण तरीही मनासारखी गौरीपूजा झाल्याचे समाधान आहे.