Tuesday, September 29, 2015

3117 Enterprise Drive, Apt No C7


सी सेव्हन अपार्टमेंटमध्ये मला बरेच काही सूचत गेले आणि ते मी करत गेले. जे काही केले ते कायम आठवणीत राहिले आणि जे आठवणीत राहिले ते ब्लॉगवर साठवत राहिले. रोजनिशी लिहिण्याची कल्पनाही अशीच सूचली. म्हणजे ज्या दिवशी काही वेगळे घडले तर दिनांक टाकून लिहायचे. एके दिवशी मी भारतावरून आणलेली डायरी चाळत होते. त्यामध्ये सुरवातीला मी दिनांक टाकून एक दोन वाक्ये लिहिली होती. त्यावरून मला रोजनिशीची कल्पना सूचली.


याच जागेत आमच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यादिवशी सकाळपासून झिमझिम पाऊस पडत होता. सकाळी पाऊस पडायला सुरवात झाली ते अगदी रात्रीपर्यंत पडत होता. त्या दिवशीच्या जेवणात  मी आमच्या दोघांच्या आवडीचा बेत केला होता. शेवयाची खीर, पुरी, बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी. दुपारच्या आणि रात्रीचे जेवण हेच होते.  गरम गरम टम्म पुऱ्या विनायकला वाढल्या. आमच्या दोघांच्या ३ ते ४ फोटोंचे कोलाज केले आणि ते फेबुवर टाकले. स्टेटस मेसेज लिहिला की आजचा दिवस काय होता आणि कसा गेला. तिथे मला खूप शुभेच्छा आल्या. असा आमचा २५ सावा लग्नाचा वाढदिवस आगळावेगळा साजरा झाला आणि म्हणूनच तो जास्ती लक्षात राहिला आहे!


 इथे फॉल सीझनमध्ये पानगळती होते. सर्वत्र रंगीबेरंगी पानांचा सडा पडलेला  असतो. फॉल सीझनमधल्या एके दिवशी मी बाल्कनीत उभी होते तर खालच्या अंगणात बराच सडा पडला होता. लगेच खाली गेले, पाने गोळा केली आणि वर आले. ती पाने मी एका बशीत मांडली. नंतर त्याच पानांचे दसऱ्याला एक तोरण बनवले. सुई दोरा घरात होताच. सुईत दोरा ओवला आणि एकाड एक वेगवेगळ्या रंगाची पाने ओवली. तयार झालेले तोरण मी दारावर बांधले. त्या तोरणाकडे खूप कौतुकाने बघत होते मी !


याच जागेत मला एक कथा लिहायला सुचली. आपोआप सूचत गेली आणि ती भराभर मी वहीत लिहीत गेले. कथा लिहायला मूद्दामहून कधीच बसले नाही. काही वेळा इतके काही सूचत जायचे की ते पटकन वहीत उतरवून काढायचे. हे जे सूचले ते एक आश्चर्यच म्हणावे लागेल. कथा संपूर्ण पणे डोक्यात आहे. अर्धी ब्लॉगवर लिहून झाली आहे. अर्धी बाकी आहे. बघू आता कधी सुचतय ते. जेव्हा सूचेल तेव्हा ती कथा पूर्ण होईल. याच घरात काही सेंकदाकरता भूकंप झाला होता. कधी नव्हे ते एक वादळ याच घरात येऊन गेले. अगदी सुरवातीच्या काळात एक दिवस खूप पाऊस पडला आणि एक छोटे बेडूक पिल्लू घरात आले होते. त्या पिल्लावर पण जे काही सुचले ते लिहून काढले होते. ब्लॉगवर आहे. या घरात रेसिपीज खूप करून झाल्या. पूर्वी कधीही न केलेल्या रेसिपीज या घरात केल्या गेल्या. अनेक प्रकारच्या वड्या तर केल्याच. शिवाय बाहेरच्या बाल्कनीत उन्हाळ्यात काही वाळवणाचे प्रकारही केले.जेव्हा मी ली रिंगरला वेदर शॉट साठी फोटो पाठवत असे, ते तो वेदर चॅनलला दाखवणार आहे का, यासाठी मी रोज उठल्यावर मेल चेक करायचे. पण काही वेळा उठायला उशीर झाला तर विनायक मला उठवायचा आणि सांगायचा "रोहिणी लवकर ऊठ, तु पाठवलेला फोटो दाखवत आहेत. असे म्हणल्यावर मी ताडकन उठायचे. आम्ही तिथून निघण्याच्या काही दिवस आधी फेबू स्टाईल फोटो दाखवत होते.

 म्हणजे जेव्हा मी ली रिंगरच्या फेबू पेजवर तो फोटो पाठवला तर माझी फेबुची प्रोफाईल व नकाशा दाखवायचे की हा फोटो कुठे काढला आहे.  नदीवरचा एक शेवटचा सूर्यास्ताचा फोटो पाठवला होता.
तो त्याने फेबू स्टाईल दाखवला. त्याने मला खूपच आनंद झाला होता.

 दर रविवारी नदीवर चालायला जाणे आणि सूर्यास्त बघणे आणि त्याचा फोटो काढून तो ली रिंगरला पाठवणे हा कार्यक्रमच ठरून गेला होता.

 क्रमश : ....

Wednesday, September 23, 2015

3117 Enterprise Drive, Apt No C 7सी सेव्हन मधली एक बेडरूम की जी नंतर माझीच होऊन गेली होती. याचे कारण पहिल्यांदा तिथे डेस्कटॉप होता. नंतर लॅपटॉप आला. आधी इंटरनेट कनेक्शन खूप स्लो होते, नंतर ते फास्ट झाले. मास्टर बेडरून मधून मध्यरात्री मी हळूच उठून दुसऱ्या बेडरून मध्ये यायचे. डोक्यात सतत काही ना काही घोळत असायचे आणि जे काही सुचेल ते लगच्यालगेच वहीत उतरवण्यासाठी मी दुसऱ्या
बेडरूम मध्ये येत असे. 

वहीत लिहिण्यासाठी म्हणून यायचे खरी, पण ते लिहून झाल्यावर साहजिकच मला डेस्कटॉप उघडून मनोगतावर काय काय लेखन  आले आहे ते बघण्याचा मोह व्हायचा व याहू मेसेंजर आपोआप उघडल्यामुळे तिथे असलेल्या काहीजणींशी बोलणेही व्हायचे. असे करता करता ती बेडरूम माझीच होऊन गेली ! पहाटे जेव्हा मला आपोआप जाग यायची तेव्हा पक्षांची चिवचिव ऐकू यायची. बेडरूमला लागूनच एक झाड होते. तिथे पक्षी असायचे. हे पक्षी पहाटे पहाटे खूप छान गप्पा मारायचे. एकाने किलबिल  केली की लगेचच दुसरा पक्षी त्याच्या आवाजात त्याला साथ द्यायचा. मधूनच तिसऱ्या पक्षाची त्याच्या आवाजातली साथ. वेगवेगळे आवाज एकमेकांना साथ देत आहेत हे ऐकून खूप छान वाटायचे.   हा काळ साधारण पहाटे ५ ते ६ च्या सुमाराचा असायचा. एकदा का उजाडायला सुरवात झाली की पक्षांची किलबिल अचानकपणे बंद व्हायची.  एकदा जेव्हा मला अशीच पहाटे जाग आली तेव्हा या पक्षांच्या गप्पा मी डिजिकॅम मधून टेप केल्या होत्या. काहीवेळेला जेव्हा पहाटे जाग यायची तेव्हा मी खिडकीतून डोकावले की फटफटलेले दिसायचे. आकाशातही सुंदर रंग जमा झालेले असायचे. दार उघडून बघायचे तर उजवीकडे क्षितिजावर लालसर छटा उमटलेली असायची. . लगेचच कॅमेरा घेऊन खाली जायचे. हवेत एक प्रकारचा छान थंडावा असायचा.
क्षितीजावर उमटलेली लालसर छटा छेदून सूर्याचा लाल गोळा हळुहळू सरकत वर यायचा. काही क्षणातच लाल चुटुक गोळ्याचे पिवळ्या रंगात रूपाअंतर व्हायचे आणि नंतर पांढरा शुभ्र सूर्य दिसायला लागायचा. डोळे दिपून जायचे. एकदा तर लाल चुटूक सूर्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातील रंग आणि ढगांचेही वेगळे रंग होते. आकाशात कुणीतरी पेंटींग केलयं असेच वाटत होते. सूर्योदयाची अशीच काही वेगवेगळी रूपे मी कॅमेरात साठवलेली आहेत. शिवाय ती ली रिंगरलाही पाठवलेली आहेत.

 विल्मिंग्टन मध्ये कोणताही ऋतू तीव्र नव्हता. १० वर्षात मोजून ३ वेळाच हिमवर्षाव झालेला आहे. २००९ साली हिमवृष्टी झाली ती म्हणजे कापसा सारखा स्नो पडून सर्वत्र पांढर झाले खरे, पण काही क्षणातच ढ्गात लपलेला सूर्य वर आला आणि बर्फाचे पाणी पाणी झाले. २०११ साली चा स्नो मात्र छानच पडला. जिन्यातही बर्फाचा ढीग साठला होता. त्यावरून चालत खाली उतरणे म्हणजे एक दिव्यच होते. पण तरीही कठड्याचा आधार घेत घेत खाली उतरले. पूर्ण अपार्टमेंटच्या आवारात सावकाश चालत एक चक्कर मारली. तळ्याच्या आजुबाजूला साठलेला बर्फ आणि मधोमध पाणी खूप छान दिसत होती.  बदकांचे पाय चालताना घसरत होते. अनेक फोटो घेतले. नंतर स्नो मॅन, स्नो डॉल आणि स्नो गर्ल बनवली. या बनवलेल्या कलाकृतींचेही फोटो घेतले. २०११ सालची हिमवृष्टी खूप आनंद देवून गेली. २०१४ साली मात्र जो बर्फ पडला तो खुप क्रिस्पी होता. त्यावरून चालणे खूप अवघड होऊन बसले होते. या बर्फाचेही रूप छानच दिसत होते. जिन्यावर साठलेल्या बर्फाची एक स्नो वुमन बनवली.  
 अगदी सुरवातीला जेव्हा या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा प्रत्यक्षातले मित्रमैत्रिणी कोणीही नव्हते आणि अशी परिस्थिती १० वर्षे झाली तरी तशीच राहिली. ऑनलाईन मित्रमंडळी जमा होण्या आधी सुरवातीला डेस्कटॉपवर म्युझिक इंडिया ऑनलाईन वर गाणी ऐकायचो. शिवाय मनोगतावर लिहिलेल्या कविता, लेख, चर्चा वाचायचो. जेव्हा मनोगतावर पाककृती विभाग सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या लेखनाला सुरवात झाली. पण एकूणच या सर्वांच्या आधी मी टिव्ही बघत होते. डीश नेटवर्क घेतले होते. तिथे सोनी, झी सिनेमा आणि सहारा वन अशी ३ चॅनल्स घेतली होती. तिथल्या काही मालिका मला अजूनही आठवत आहेत. त्या अनुक्रमे "एक लडकी अंजानी सी" " हरे काँच की चुडियाँ"  "वो रहनेवाली महलोंकी" "साँस बिना ससुराल"  "वैदेही" खूप छान होत्या या मालिका. मला खूपच आवडल्या होत्या. घरही मी खूप टिपटॉप ठेवायचे.  शिवाय झी सिनेमावर सिनेमे पाहण्यातही छान वेळ जायचा. त्यावेळेला कॉलिंग कार्ड होते. १० डॉलरला २० मिनिटे मिळायची.  या कार्डावरून भारतात फोन व्हायचे. नंतर ही कार्ड स्वस्त झाली. vonage  आल्यापासून मात्र अगणित इंडिया कॉल्स सुरू झाले. अमर्याद बोलणे सुरू झाले. अमेरिकेत झालेल्य मैत्रिणींशीही अमर्याद बोलणे सुरू झाले ते आजतागायत !!
 रात्री जेवल्यावर फिरायला जायची सवय की जी भारतापासून होती. ती इथे २००१ ला आल्यानंतरही ४ ते ५ वर्षे टिकली. नंतर मात्र विनायकचे ऑफीसमधले काम वाढल्यावर आमच्या दोघांचे मिळून फिरणे बंद झाले. इतरत्र शनिवार रविवार होत असे. पण रोजच्या रोज चालणे हे बंद झाले. मी संध्याकाळचे चालणे सुरू केले. अपार्टमेंटच्या आवाराबाहेर जो रस्ता होता तो डाव्या बाजूला विनायकच्या ऑफीसकडे जाणारा होता आणि उजवा रस्ता काही वेळाने बंद होऊन परत त्या रस्त्याला दोन वेगवेगळे रस्त फुटत होते. मी त्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांना ज्या स्टॉप साईन्स आहेत की ज्या काही  ठराविक अंतर पार पाडून गेल्यावर असतात त्या सर्व ऍड करत खूप चालायचे. 
सर्व मिळून माझे तासाच्या वर चालणे व्हायचे.विनायक रविवारी सकाळी २ मैल चालून यायचा. त्याने एक रस्ता शोधून काढला होता की जो 
पूर्ण वेटोळा होईपर्यंतचा   रस्ता होता.

 क्रमश : .....
Monday, September 21, 2015

१९ सप्टेंबर २०१५
शनिवारी जेव्हा वि म्हणतो मला आज ऑफीसला जायचे आहे तेव्हा मला खूप आनंद होतो ! कारण की मी पण त्याच्याबरोबर ऑफीसला जाते. आज नेहमीप्रमाणे सकाळी साफसफाईची कामे उरकल्यावर निघालो. मेक्सिकन उपहारगृहात जेवण केले आणि थेट ऑफीस गाठले. जायचा यायचा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे. वि ची कंपनी डोंगराच्या पायथ्याशी आहे तर सध्या आमचे घर डोंगराच्या वर आहे. ३ ते ४ छोटी गावं ओलांडून जावे लागते. जाताना उंच उंच डोंगर व डोंगरावरच्या माथ्यावरची घनदाट झाडे दिसतात की जी आभाळाला भिडलेली आहेत. परत येताना चढ लागतो आणि डोंगर खाली खाली जात आहे असे दिसते. आज आफीसमध्ये मी थोडी युट्युबवर गाणी ऐकली. नंतर मिटींग रूम मध्ये जाऊन थोडे अभ्यासाचे वाचले. नंतर चहा केला. व्हाईट बोर्डवर काहीतरी जसे येईल तसे स्केच पेनने उमटवले. वि चा फोटो काढला. नंतर थोडा वेळ ऑफीसच्या समोर असलेल्या सफरचंदाच्या झाडाखाली सावलीत बसले. वि चे काम साधारण ३ ते ४ तास होते. ते झाल्यावर निघताना चॉकलटे खाल्ली. घरी आल्यावर परत एकदा चहा घेतला. रात्रीच्या जेवणासाठी भाजणीची थालिपीठे खाल्ली. एकूण आजचा दिवस छान गेला !

3117 Enterprise Drive, Apt No. C 7अपार्टमेंट नंबर सी सेव्हन हे पाहताच क्षणी मला खूप आवडून गेले. एक मात्र तोटा होता की अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते, पण तरीही बाकीच्या खोल्या व त्यांची रचना आम्हाला दोघांनाही आवडली. हॉल व दोन बेडरूम यांना सीलींग फॅन होते आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. डोक्यावर फॅन फिरल्याशिवाय आम्हाला दोघांनाही झोप लागत नाही. थंडीमध्ये हीटर लावलेला असला तरीही डोक्यावरती फिरता पंखा हवाच हवा ! हॉलच्या दोन्ही बाजूने बाल्कन्या होत्या. हॉलच्या एका बाजूला मुख्य दार व दुसरी बाजू सरकत्या दाराची होती. ही दोन्ही दार उघडी ठेवली की हवा खेळती रहायची. खेळत्या हवेचा झुळूका जेव्हा अंगावरून जायच्या ना, तेव्हा खूप छान वाटायचे. या दोन दारांच्या मध्ये आम्ही सोफ्याच्या स्टाईलची आरामदायी खुर्ची ठेवली होती. त्या खुर्चीवर बसले की खेळती हवा अंगावर यायची. या खुर्चीवर मी मांडी घालून जेवायला बसायचे. याच खूर्चीत बसून मी फोनवरून बोलायचे. याच खुर्चीत बसून विनायक पोथी वाचायचा.


ही खूर्ची खास रेसिपींच्या फोटोसाठीही होती. त्यावर मॅट ठेवून त्यावर डीश ठेवायचे. त्यात तयार केलेला पदार्थ असायचा.  शिवाय सणावारी विविध पदार्थांनी तयार केलेली ताटेही या फोटोत असायची. ही खूर्ची आमच्या कायम लक्षात राहील इतकी छान होती.  जेव्हा या अपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा सर्व खोल्या रिकाम्या होत्या. आमच्याकडे भारतावरून आणलेल्या ४ बॅगा, एक डेस्कटॉप व एक टिल्लू टीव्ही होता. ज्या दिवशी या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा काहीही करावेसे वाटत नव्हते. मन पूर्णपणे क्लेम्सनमध्येच अडकलेले होते.  संपूर्ण एक दिवस आम्ही आमच्या फर्निचर खरेदीसाठी घालवला. एका बेडरूम मध्ये एका टेबलावर आमचा डेस्कटॉप विराजमान झाला.  त्याच्या बाजूला एक कॉटही बसली. तिथेच फोन व इंटरनेट कनेक्शनही आले ! ही खोली पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जायचे व परत त्याच बेडरूम मध्ये येऊन बसायचे. १० वर्षात आमच्या दोघांचे सर्व बोलणे याच खोलीत झाले आहे. एक तर फोनवरून बोलायला तिथल्या कॉटवर बसून बोलायचो. सर्वात मुख्य म्हणजे डेस्कटॉपवरून अनेक मित्रमैत्रिणींशी बोललेलो आहोत.  त्यावेळेला याहू मेसेंजर होते. मनोगत ही साईटही नवीनच होती. मनोगतावरून अनेक मराठी मित्रमैत्रिणी जमा झाले होते.  याहू मेसेंजरच्या मित्रमंडळींच्या यादीत ७० ते ८० जण जमा झाले होते. मी संध्याकाळी जे काही खायला करायचे ते मनोगतावर पाककृती विभागात टंकत होते. नंतर एकेक करत मागच्या आठवणी व अनुभव लिहीत गेले. आत्तापर्यंतचे सर्व आयुष्यच लिहून काढले म्हणा ना ! माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच अपार्टमेंट मध्ये झाला. डिजिटल कॅमेरातून रेसिपींचे आणि इतर अनेक निसर्गाचे फोटो काढायचा मुहूर्त याच अपार्टमेंटमधून झाला. नंतर आर्कुटवरच्या मैत्रीणीही याहूमध्ये ऍड झाल्या.
 सकाळी उठल्यावर डेस्कटॉप ऑन केल्या केल्या याहू मेसेंजरही आपोआप उघडायचा. लगेचच खिंडक्यातून निरोप यायचे. "काय गं रोहिणी, उठलीस का? " " काका कसे आहात? "  "ए रोहिणी आज अंताक्षरी आहे ते माहीत आहे ना तुला? " "आज दुपारी कॉंफर्न्स करू या का? तुला वेळ झाला की मेसेज टाक"   काही ऑफ लाईन मेसेजही असायचे.  आम्ही डेस्कटॉप ठेवलेल्या बेडरूम मध्ये बसून इतके काही बोलले आहोत की आम्ही साधे बाहेर फिरायलाही कधी बाहेर पडलो नाही. आम्हाला एकटेपणा कधीच आला नाही!  याच खोलीत मला झोप येत नसेल तर मेसेंजर ऑन करून जो कोणी असेल तिच्याशी मी बोलत बसायचे.काही वेळा जे काही लिहायचे जे मनात घोळत असेल तर मध्यरात्री उठून मी वहीत लिहिलेले आहे. माझ्या आठवणीतली दिवाळी हा लेख तर मी मध्यरात्रीत उठून मनोगतावर टंकला आहे.
आमचे घर वरच्या मजल्यावर होते. दोन घरांना मिळून एक मोठी बाल्कनी होती व त्याच्या मधोमध जिना होता. दुपारचा चहा मी काहीवेळा जिन्यात बसून प्यायला आहे. बाल्कनीच्या कठड्यावर येऊन काही पक्षी बसायचे. मुसळधार पाऊस झाला की अपार्टमेंटच्या आवारात असलेले तळे तुडुंब भरायचे. ते बघायचा मोह मी कधी टाळलेला नाही. बाल्कनीत उभे राहिले की उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा तर डाव्या बाजूला सूर्यास्त! हॉलच्या दुसऱ्या बाजूला जी बाल्कनी होती त्याला लागूनच एक झाड होते. या झाडाचे फोटो मी प्रत्येक ऋतूमध्ये घेतलेले आहेत.  आकाशातील बदलते रंग या झाडाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसायचे त्यामुळे फोटोही छान यायचा. एका वर्षी ऐक दिवाळीच्या पहाटे आकाशात खूप छान रंग जमा झाले होते. लगेचच दिवाळीची आठवण म्हणून त्या झाडाचा फोटी घेतला. या अपार्टमेंटच्या आवारातील काही झाडांचे फोटो कायम लक्षात राहतील असे आहेत. स्प्रिंगमधले गुलाबी रंगाने डवरलेले झाड, फॉलमधले नारिंगी रंगाने डवरलेले झाड तर एक झाड बर्फाने आच्छादलेले होते. त्याच्या पर्णहीन फांद्या बर्फाच्या वजनाने झुकल्या होत्या.


 क्रमश : .....

Sunday, September 06, 2015

६ सप्टेंबर २०१५

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला पाहिजे. शनिवारी apple festival ला गेलो होतो . मजा आली. Hendersonville downtown ला मजा मजा होती. गर्दी पहायला मिळाली. नवरा बायको, आजी आजोबा, नातवंडे, तरूण मुले मुली, सर्व प्रकारची माणसे होती.. मुले तर खुप खुशीत होती. आम्ही apple pie, apple juice, ice-cream, popcorn घेतले. एका स्टेजवर गाणी गात होते. रस्त्यावर काही मुले नाचत होती. रस्त्याने जाता जाता सर्वजण चरत होती. झोपाळे, पाळणे होते. face painting होते.
आम्ही उद्याही या जत्रेला जाणार आहोत आणि थोडी खादाडी करणार आहोत. झोपाळा, पाळणे यातही बसणार आहोत. face painting करून घेण्याची इच्छा जागृत झाली आहे.  भाजलेले कणीसही खाणार आहोत. रस्त्याने जाताजाता बरेच स्टॉल लावलेले आहेत. ते बघत बघत, मध्येच काही ठिकाणी बसत बसत, चरत चरत संध्याकाळचा वेळ छान गेला. सर्वत्र ५ डॉलर्स चे पार्किंग लावलेले आहे. आणि हो उद्या फुगे पण घेणार आहे मी ! ही सर्व मजा लहान मुलांनीच करावी असे कुठे कोणी लिहून ठेवले आहे का? कोणत्याही वयात मजा करावी, नाही का? असे सर्व मी फेबुवर लिहिले खरे पण परत आज गेलो नाही. एक तर आज खूप उन होते. काल कसे अगदी मनासारखी ढगाळ हवा होती. संध्याकाळचे चालणेही झाले. जत्राही बघून झाली.आज संध्याकाळी उन्हे उतरल्यावर निघालो ते सावकाशीने  Inglesच्या दुकानात गेलो. तिथे थोडे खाल्ले, कॉफी प्यायली व परत सावकाशीने घरी परतलो.
माझ्या चालीने जाऊन येऊन ८० मिनिटे लागली.

 ingles च्या दुकानासमोर apple country बुसचा बस स्टॉप आहे तो आहे की नाही एकदा खात्री करून घेतला. आता मी एका आठवड्यात एकदा तरी या बसने जाणार आहे. एकदा एका आठवड्यात ingles पर्यंत चालत जाऊन परत यायचे व एका आठवड्यात बसने जायचे असे ठरवले आहे. आजचा दिवस अजून वेगळा गेला म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी एक वेगळा पिझ्झा खाल्ला. त्यावर टॉपिंग म्हणजे चक्क वांगे आणि लसूणही होते. भाजलेला कांदा व सिमला मिरचीही होती. तिथे खूप गर्दी होती आणि हे उपहारगृह आत आणि बाहेरच्या गॅलरीत पण डायनिग होते.


 आम्हाला बाहेर जागा मिळाली ते बरे झाले. सुखद गार वारे होते तिथे! आणि आजुबाजूला थोडी फुलझाडे पण लावली होती. रात्रीला मुडाखी केली. त्यात मी लसूण, दाणे, सिमला मिरची, कांदा, मोहरी जिरे हिंग आणि अगदी थोडी हळद, तिखट व धनेजिरे पूड घातली. थोडीशी साखर.  अशी सौम्य खिचडी आम्हाला दोघांनाही आवडते त्यावर साजूक तूप हवेच. तळलेला पापड आणि कोशिंबीर असेल तर सोनेपे सुहागा.


 बसने जायचे म्हणजे आधी ४० मिनिटे चालत जायचे. नंतर बसने साधारण तासभर लागेल असे वाटते. कारण की बसने मी शेवटच्या ingles दुकानाच्या बस स्टापलाच उतरणार आहे. हे दुकान दुसऱ्या छोट्या शहरात आहे. एकूण येण्याजाण्यात आणि बसच्या प्रवासात माझे ३ ते ४ तास तरी जातील. इथे कोणाला घाई आहे. बाहेर पडणे हा उद्देश आहे.

Wednesday, September 02, 2015

Factory 2 U

चलो चलो चलो चलो Factory 2 U ! टेक्साज राज्यातले कपड्यांचे हे एकमेव दुकान इतरत्र कोठेही पाहिले नाही. हे दुकान बंद होण्याच्या मार्गावर होते म्हणून क्लोजिंग सेलची जाहिरात पाहिली.मी व माधवी मिळून तिथे जायला लागलो. रोज दुपारी दुपारची जेवणे झाल्यावर निघायचो ते संध्याकाळी परतायचो. ह्या दुकानात आम्ही अगदी इथपर्यंत गेलो की आता उरलेले सर्व कपडे फूकट घेऊन जा इतके सांगायचेच बाकी होते ! त्यात लहान मुलांचे कपडेही होते. माधवीला तिच्या भाचीकरता बरेच कपडे पाठवायचे होते. मी पण एक टी शर्ट घेतला होता. ६० सेंटस मध्ये ! आकाशी रंगाकडे झुकणारा, जरा वेगळाच रंग होता. काही दिवस घातला. 

आता असे वाटते की आठवण म्हणून तो टी शर्ट ठेवायला पाहिजे होता. क्लोजिंग सेलमध्ये रोज
थोडे थोडे सेंट कमी करत लेबले बदलली जायची.  सर्व खरेदी केल्यावर "अभी एक लास्ट ट्राय! " म्हणून आम्ही दुकानात गेलो तर ते बंद! बहुधा सर्व वस्तुंची विक्री झाली असावी. माधवीला त्या दुकानामधला एक छोटा फ्रॉक आवडला होता, पण त्याची किंमत जास्त होती. किंमत कमी होईल म्हणून आशेने तिथे ग्लो तर दुकान बंद!


 
 तिला खूप हळहळ वाटली. जवळपास १०० डॉलर्सची खरेदी तिने केली होती. एके दिवशी तिने मला घरी बोलावले व आत्तापर्यंतची खरेदी आपण परत पाहू असे सांगितले. ती दूपार छान गेली. लहान मुलांच्या छोट्या छोट्या कपड्यांचे कौतुक केले. मोजे, टोपडे, झबली आणि इतर काही एकेक करून हातात घेऊन "ये देख, कितना अच्छा है ना! " असे करत दुपार घालवली. माधवी व माझी खूप गट्टी जमली होती.
 
 
 फोनवरून अगणित गप्पा, म्हणजे लँडलाईन वरून हं ! लोकल कॉल्स फूकट होते ! प्रत्यक्षात भेटून कुठे कुठे जायचे हे ठरवणे व जाणे. त्यात जॉब हंटिंगचा भाग मुख्यत्वेकरून होता. त्याचे वेगळे अनुभव मी लिहीणारच आहे

 
 आम्ही दोघींनीही जे २ डिपेंडंट व्हिसावर वर्क परमिट काढले. त्याचा उपयोग माधवीला डेंटन शहरात झाला. आमचा डेंटनमधला कालावधी १ वर्षाचा होता. नंतर आम्ही क्लेम्सन शहरात आलो.
 
 तिथे माझ्या वर्क परमिटची मुदत वाढवून घेतली.  क्लेम्सन मध्ये मात्र वर्क परमिटचा उपयोग झाला. मला ३ नोकऱ्या लागल्या.
 मला फक्त शनिवार वार मोकळा असायचा. छानच गेले तिथले दिवस!