Saturday, April 30, 2022

बाजारहाट ...(5)

 

"बाजारहाट" या मालिकेत मी ४ भाग लिहिले आहेत. आधीच्या ३ भागात डोंबिवली, विलेपार्ले मधला बाजारहाट लिहिला आहे. शिवाय आईकडे रहात असताना मंडईत आम्ही तिघी भाजी आणायला कसे जायचो ते लिहिले आहे. चवथ्या भागात मी अमेरिकेत  किराणामाल  आणि भाजी घ्यायला कसे जायचो  ते लिहिले आहे. ........ आता पुढे आणि शेवटचा भाग

जसे की जेव्हा आम्ही डेंटन - टेक्साजला आलो तेव्हा तिथे सॅक ऍंड सेव्ह नावाचे अमेरिकन स्टोअर होते. तिथे भाज्यांचा नेहमी खडखटाड असायचा. जेव्हा क्लेम्सन - साऊथ कॅरोलायनाला आलो तेव्हा तिथे बाय-लो नावाचे स्टोअर होते. आम्ही सॅम्स क्लबची मेंबरशिप घेतली. तिथे घाऊक माल मिळतो. त्यात मी टुथपेस्ट, डिटर्जंट, अंगाला लावायचा साबण, फरशी पुसण्याची ओली फडकी आणि असे बरेच काही घ्यायला सुरवात केली. तिथे मी पालक घेत असे. पालकाची निवडलेली पाने मिळायची. ही बॉक्स इतकी मोठी होती की त्यामध्ये मी पालकाची वेगवेगळ्या प्रकारची ३ वेळा भाजी करत असे. तिथे आम्ही सुरवातीला स्लिम फास्ट नावाची प्रोटीन पावडर घेतली. तो डबा साधारण १ किलोचा होता. ही पावडर आम्ही सकाळच्या न्याहरीला दुधातून घेऊ लागलो.

ही पावडर खूप उपयुक्त आहे. शाकाहारी जेवणामध्ये प्रोटीन कमी असते. ही एकदा सकाळी घेतली की दुपारच्या जेवणापर्यंत भूक निभावते. तसे सकाळी नाश्ता खाण्याची सवय भारतापासूनच नाही. दुधामध्ये बोर्नव्हिटा, कॉर्नफ्लेक्स घालून खात होतो. अर्थात इथेही खातोच. इथे तर खूप व्हरायटी मिळतात. सुरवातीला कार नसल्याने आम्ही बसने बाय-लो नावाच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये जायचो. या स्टोअरच्या समोर विन्डिक्सी होते पण तिथे कधीच केव्हाही गर्दी नसायचीच. बाय - लो चे फ्लायर्स पोस्टाने येत असत. त्यात बाय वन गेट वन च्या जाहीराती असायच्या. आम्हाला दोघांना वाल मार्ट खूप आवडते. तिथली भाजी कधीही खराब होत नाही असा अनुभव आहे. कार आल्यावर आम्ही ऍन्डरसनच्या वाल मार्ट मध्ये भारी आणायला लागलो. क्लेम्सनच्या जवळच्या छोट्या शहरातून पण भाजी आणायचो. एक स्टोअर नवीन उघडले होते. तिथे आम्ही रात्री १० ला किराणामाल  भाजी, दूध असे सर्व आणायला लागलो. कारने आमच्या सोबत दोन विद्दार्थीनी येत होत्या. जेव्हा विल्मिंग्टनला आलो तेव्हा तिथे काही स्टोअर्स माहिती झाली. हे शहर बऱ्यापैकी मोठे आहे. तिथे लोएस फूड मध्ये आम्ही पिण्याचे पाणी आणायचो. वालमार्ट शिवाय हॅरिस्टिटर नावाचे स्टोअर आम्हाला आवडले. तिथे चिरलेला भोपळा मिळायचा. त्याचे मी भरीत करायचे. आम्हाला दोघांना भोपळ्याचे भरीत खूप आवडते. सुरवातीला आम्ही अमेरिकेतल्या स्टोअर्स मधून  आयस्क्रीम व बटाटा चिप्स बरेच खायचो. इथे इतक्या व्हरायटी मिळतात त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळे आणायचो. नंतर हे सर्व बंद करून टाकले. इंडियन स्टोअर जवळ नसल्याने हेच आम्ही पटकन काहीतरी तोंडात टाकायला म्हणून आणायचो. जेव्हा हेंडरसनविलला आलो तेव्हा इंडियन स्टोअर बऱ्यापैकी जवळ आले म्हणजे १ तासाच्या कार ड्राईव्ह वर ! महिन्यातून एकदा जाऊ लाग्लो आणि इतक्या वर्षात ( म्हणजे २००१ ते २०१५) कधीही पहायलाही न मिळालेले सर्व काही इंडियन पदार्थ आणायला लागलो. जसे की खारी, पार्लेजी, चिवडे, फरसाण, राजगिरा लाडू इ. इ. तसे तर विल्मिंग्टनला असताना सुरवातीला महिन्यातून एकदा जायचो. पण नंतर कंटाळा यायला लागला. जायचो म्हणजे आधी भारतीय उपाहारगृहात जेवण, नंतर इंडियन ग्रोसरी करून परत घरी. जाऊन येऊन आणि तिथे खरेदी करण्यात आमचे ६ ते ७ तास जायचे इतके लांब होते. सर्व काही असावे म्हणून इतके सामान आणायचो की घरातच एक दुकान झाले होते. १५ वर्षात इडली - डोसे आणि भेळ वगैरे घरी केले तरच खाता यायचे कारण की भारतीय उपाहारगृह नाहीत. त्यामुळे अनेक पदार्थ मी घरी करत होते. दर १५ दिवसांनी वेगवेगळी व्हरायटी करायचे जसे की इडली सांबार, डोसे, उत्तपे, रगडा पॅटीस, शेव बटाटा पुरी, छोले भटूरे, मिसळ. डाळ तांदुळ भिजत घालून मिक्सर ग्राइंडर वर वाटायचे.

लसणाच्या चटणी साठी गोटा खोबरे, फ्रोजन खवलेले ओले खोबरे मिळायचे नाही इंडियन स्टोअर मध्ये म्हणून खवलेले सुके खोबरे आणायचो. सॅम्स मधून भाजलेले दाणे आणायचो कूट करायला. अजूनही आणते. कारण की इंडियन स्टोअर मध्ये दाणे आणणे व्हायचे नाही सुरवातीला जवळ नसल्याने. त्यामुळे दाणे भाजून कूट करता यायचे नाही. शेपू आणायचो.भारतात असताना पालेभाज्या खूप खात होतो. मी तर रोज एक पालेभाजी करायचे. मुळा, चाकवत, अंबाडी, शेपू, मेथी, अळू. इंडियन स्टोअर मधून मग अळू आणले. त्याच्या अळूवड्या केल्या. काय काय पदार्थ करायचे त्याप्रमाणे सर्व आणत होते. रेसिपी पण लिहिली जात होती. पदार्थ खाल्ले जात होते. दुधी हलवा करायला दुधी, खवा, खिरीसाठी शेवया असे एक ना अनेक आणून काय काय करायचे. म्हणूनच माझा फूड ब्लॉग "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" जन्माला आला.
समाप्त