Monday, November 12, 2007

स्वगत (मनोगत दिवाळी अंक)

हं..... चला झाला एकदाचा लेख पूर्ण. आता वाचून बघते....... सुपूर्त करण्याअअधी वाचून पहा वर एक टिचकी मारते. आता परत एकदा नीट वाचू. काहीकाही वेळेला उगाचच फालतू शुद्धलेखनाच्या चुका असतात. सुपूर्त करण्याआधी शुद्धीचिकीत्सक वापरावा का?..... नको. एवढे काही कठीण शब्द नाहीत लेखामध्ये. साधाच तर लेख आहे. सुपूर्त करू कारण रात्रीचे ११ वाजत आले. "सुपूर्त करा" वर टिचकी मारते.................


अरे देवा!! हे काय झाले आता? लेखच गायब? पान ताजेतवाने करूनही काही उपयोग होत नाही. आता परत सगळा लेख टंकणे आले. आत्ताच टंकूया. कधी नव्हे ते मूड लागलाय. अजून एक तास भर. तशी आपल्याला काही पडल्या पडल्या झोप लागत नाहीच. परत पुनश्य हरी ओम टक टक टक.....टक.... टकटकटकटक.......टकटक........

चला झाला बाई एकदाचा सूपूर्त

परत एकदा दैनंदिन लेखनावर टिचकी मारून परत एकदा नव्याने वाचकांच्या नजरेतून स्वतःचाच लेख वाचते आणि संगणक बंद करते. लाईट ऑफ करून पलंगावर आडवी होते. एक तासाने......... या कुशीवरून त्या कुशीवर... त्या कुशीवरून या कुशीवर..... हे काय चाललयं आपले. झोप का नाही येत?

कशी येईल? तुझे सर्व लक्ष प्रतिसाद किती आले असतील याकडे आहे. त्यापेक्षा परत एकदा संगणक सुरू कर.

नको. सुरू करून एकही प्रतिसाद नसेल तर मूड जाईल. त्यापेक्षा उद्या सकाळी काय ते बघू.

आता प्रतिसादांचा विचार बंद कर आणि झोप.

हो हो. एकदम बंद.

१ तासाने परत लाईट ऑन. संगणक टर्न ऑन. हे काय? माझा लेख कुठे गेला परत! १,२,३,४ एकदम ४थ्या पानावर!

जाणारच ना. कविता बघ केवढ्या आल्यात. त्यामुळे सरकत सरकत पुढे गेला. हे कवी लोक म्हणजे ना #o आजच बरा मुहूर्त सापडला त्यांना कविता लिहायला. चला झोपा परत.

तरी मी तुला सांगत होते की कधीही रात्री लेख लिहून नाही सुपूर्त करायचा. त्यापेक्षा अमेरिकन इएसटी (१०-११)टाईम झोन सर्वात चांगला. यावेळेस अमेरिकावाले, इंग्लंडवाले, जर्मनीवाले, आणि भारतवाले हे जास्तीत जास्त संख्येने मनोगतावर हजर असतात.

हे तुझं आपलं काहीतरीच. जणूकाही ते वाटच बघत असतात, की रोहिणीचा लेख येतोय कधी आणि तो वाचतोय कधी.


बाईसाहेबांचे या प्रतिसाद प्रकरणात झोपेचे पूर्णपणे खोबरे झालेले असते.

दुसऱ्या दिवशी सकाळी. खर तर त्याच दिवशी काही तासांच्या अवधीनंतर................


सकाळी १० वाजता डोळे उघडतात बाईसाहेबांचे. बापरे!! १० वाजले! संगणक सुरू करून चहा मायक्रोवेव्ह मध्ये बनवते.

डोळे विस्फारून " वाव! ८ प्रतिसाद! लगेच स्वत:भोवती ४-५ गिरक्या.

अगं हो हो. इतके काही हुरळायला नको.

पण तुला माहीत आहे की मला आनंद झाला की माझी गिरक्यांची ऍक्शन कशी आपोआप होते ते.

अगदी लहान मुलांच्या वरताण आहेस.

मग आनंद हा असाच व्यक्त करायचा असतो.

ह..... चला आता स्वयंपाकाला लागा.

तो तर काय कायमचाच आहे.

इकडचे तिकडचे आवरून परत एक टिचकी मारते दैनंदिन लेखावर. अजून एकही नाही

पान ताजेतवाने कर ना.

तरीही नाही.

ओके.

तोपर्यंत ऑर्कुटवर बघू या काय काय चाललयं ते. ऑर्कुटवर खरडवहीत आलेल्या १०-१२ निरोपांना उत्तरे लिहिते. ऑर्कुटवरील समुदायांवरून नजर टाकून परत एकदा मनोगतावर टिचकी.

अगं किती टिचक्या मारशील. एकेका टिचकीला एकेक प्रतिसाद येणार आहेत का?

काय करू मग मी? मला टिचक्या मारायची सवयच लागली आहे या मनोगतामुळे.

हं चला ८च प्रतिसाद. आता नाही येणार.

मग भाजी चिरून फोडणीस टाकणे, इकडे तिकडे फिरणे ,म्हणजे गॅलरीत एक फेरफटका. नंतर मशीनमध्ये कपडे भिजवणे, नंतर संगणकाच्या खोलीत मनावर ताबा ठेवून संगणकाजवळ न जाताच डोकावणे. पटकन काहीतरी आठवल्यासारखे स्वयंपाकघरात. हुश्य! बरे झाले लवकर पोहोचलो, नाहीतर भाजी करपली असती.

टॉक.... कुणीतरी आलयं वाटते याहूवर. हाय!!

परत एकदा मनोगताचे पान ताजेतवाने. अरे वा!! दोन प्रतिसाद आले वाटते!!

बघुतरी काय लिहिले आहे.

परत एकदा आनंदाने स्वतःभोवती गिरकी.

जेवण झाल्यावर परत एकदा मनोगतावर चक्कर. अजून चार पाच तरी प्रतिसाद अपेक्षित आहेत.

पण माझ्या आधीच्या लेखाला २५ प्रतिसाद कसे काय आले होते. तो लेख एवढा काही खास नव्हता.

शेवटी आपला अंदाज आणि वाचकांची अपेक्षा यात फरक असतोच की!!

हं ते आहे म्हणा.

४ दिवसानंतर ......अजून ४-५ प्रतिसाद. कोणाकोणाचे प्रतिसाद आले बरे?

एक नवमनोगतीचा दिसतोय. आणि बाकीचे नेहमीचेच कलाकार.

हं.... आता खऱ्या अर्थाने प्रतिसादांचा कोटा पूर्ण झाला.रोहिणी गोरे

Wednesday, August 08, 2007

माझी आई (3rd online competition on H4 marathi mulinche mandal)

मी अमेरिकेत राहून आईला मिस करते म्हणजे मी गप्पांना मिस करते. आई ही माझी सर्वात पहिली मैत्रिण. तिच्याजवळ मी मनातले सर्व काही बोलते. काही काही वेळा तर मी मनातल्या मनात आईशी गप्पा मारते. माझ्या फोनची आतुरतेने वाट पहाणारा तिचा चेहरा मला दिसतो आणि दर आठवड्याच्या बुधवारी आईशी फोनवर बोलणार म्हणजेच भेटणार या आनंदात मी असते.

मी माझ्या आईच्या हातचे खाणे मिस करते असे आता मी म्हणणार नाही कारण तेवढी लहान मी नाही. याउलट आपण भारतात गेल्यावर आपण तिला आपल्या हातचे काय काय खायला घालू अशी यादी मी बनवत असते. माझी आई कशी आहे याबद्दल सांगायचे झाले तर पहिले म्हणजे ती सतत हसतमुख आहे, अन्नपूर्णा आहे. शिवाय एक उत्तम नियोजक व व्यवस्थापक आहे. म्हणजे अगदी लहानात लहान कार्यक्रम असला ना (उदा. हळदी कुंकू) तरी तो खूप साग्रसंगीत करते. तिने मनात ठरवल्यापेक्षाही तो कार्यक्रम काकणभर जास्त चांगला होतो.

आम्ही दोघी बहिणी जेव्हा वयात आलो तेव्हा तिने आम्हाला सांगितले की तुम्ही आता लहान नाही. तुम्ही मोठ्या होत आहात. या वयातच तुमचे व्यक्तिमत्त्व घडणार आहे, तेव्हा त्याकडे लक्ष द्या. एकदा हे वय निघून गेले की ते परत येणार नाही, आणि नंतर विचार करून त्याचा काहीही उपयोग नाही.

माझ्या आईचा अजून एक गुण म्हणजे ती खूप हौशी आहे. नागपंचमीचा सण आला की तुळशीबागेत जाऊन आम्हाला कानातले गळ्यातले आणणार. आणि नागपंचमीच्या आदल्या रात्री आमच्या हातावर मेंदी लावणार. प्रत्येक सण उत्साहाने व आनंदाने साजरे करणार. आमच्या दोघी बहिणींच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या आवडीचे पदार्थ करणार. ती उत्तम पंजाबी सूट शिवते, त्यामुळे आम्ही कॉलेजमधे असताना सर्व प्रकारच्या फॅशनचे पंजाबी सूट घातले आहेत. नुसते आमच्या दोघींचेच हौशीने करणार नाही तर तिच्या सर्व भाचवंडांचे, त्यांच्या नातवंडाचे करणार. माझी एक मावसबहीण आहे ती आमच्या घरी आली की नेहमी म्हणते की आता माझ्या मुलांचा " लाड एरिया" सुरू झाला.

अमेरिकेवरून फोन करताना आता सवयीने तिलाही माहित झाले आहे की ठराविक मिनीटांचे कॉलिंग कार्ड असते आणि मिनिटं संपली की आपोआप फोन कट होतो, तरीसुद्धा मी तिला सांगते "हं आई, कार्ड संपत आले बरं का, आपोआप फोन कट होईल" तेव्हा ती म्हणते " हो हो अच्छा बाय बाय करून ठेवू या. किती पटकन वेळ जातो ना!"

लग्नाअधी मी नोकरी करायचे तेव्हा डबा पण साग्रसंगीत. एका पोळीमधे तूपसाखर, एका पोळीमध्ये लोणचे/चटणी, भाजी आणि एका बाटलीत ताक. हे ताक मी खूपच मिस करत आहे. पुढील भारतभेटीमध्ये भरपूर ताक पिऊन घेणार आहे.

आता आई खूप थकली आहे, पण उत्साह किती!! मी आईला नेहमी म्हणते की तुझा निम्मा उत्साह पण आमच्या दोघींच्यात नाही. तिने केलेले संस्कार आम्हां दोघी बहिणींना शेवटपर्यंत उपयोगी पडतील यात वाद नाही. तिची अजून एक शिकवण म्हणजे ती म्हणते तुम्ही बाकी काहीही सहन करा पण अन्याय सहन करू नका. यशाने हुरळून जाऊ नका व दु:खात खचू नका. अशा या प्रेमस्वरूप व वात्सल्यसिंधु आईला माझा साष्टांग दंडवत.

आज ती ७३ वर्षाची आहे. तिच्या पुढील आयुष्यात तिला उत्तम आरोग्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करून मी माझे लिखाण थांबवते.

आईवर लता मंगेशकर यांनी एक खूप सुंदर गाणे गायले आहे ते खाली दिलेल्या दुव्यावर जरूर ऐका. गाणे असे आहे "प्रेमसवरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी"

http://www.musicindiaonline.com/music/marathi/s/artist.653/रोहिणी गोरे

Wednesday, August 01, 2007

मैत्री (2nd online competition on H4 marathi mulinche mandal)

२५ जुलै रोजी रात्री झोपायच्या आधी ऑर्कुटवर अदितीने एच ४ वर स्पर्धेचा विषय घोषित केलेला धागा वाचला आणि मन भूतकाळात गेले. मैत्रिणींच्या आठवणींनी मन तरंगायला लागले आणि मैत्रीबद्दल काय लिहावे याबद्दल डोक्यात विचारांची गर्दी उसळली आणि त्यातच मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर कामे करता करता मैत्रिबद्दलच्या लिखाणाचा एक आराखडा तयार झाला आणि तोच मी तुमच्यापुढे सादर करत आहे. माझ्या मते मैत्री म्हणजे गप्पा मरताना मिळालेला निखळ आनंद, एकमेकांना वाटणारा आधार, मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्याचे एक स्थान, काही गोष्टी एकत्र करताना घालवलेला वेळ. मात्र यासाठी एकमेकांचे विचारप्रवाह जुळायला हवेत.

आपला जन्म म्हणजे एक मैत्रिचा प्रवास आहे असे मला वाटते. या मैत्रिच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला विविध प्रकारचे मित्रमंडळ भेटत रहाते ते अगदी जीवनाच्या अंतापर्यंत. अशा या प्रवासात जीवाला जीव देणारी मैत्रिण काही कारणाने एकदम पाठ फिरवते तेव्हा अतोनात वाईट वाटते किंवा एखादी लहानपणची मैत्रिण लग्नानंतर एकदम आपल्या समोर येऊन उभी रहाते आणि विचारते, "अगं तू इथे कशी काय?" तेव्हा वाटते आपण स्वप्न तर बघत नाही ना!! तर मंडळी आपल्या या मित्रमैत्रिणींमध्ये काही मित्रमैत्रिणींच्या आठवणी मनात कायम घर करून रहातात आणि त्या नुसत्या आठवल्या ना, तरी सुद्धा छान वाटते.

आता ही शैलाच पहा ना!! गोल चेहऱ्याची व पांढऱ्या शुभ्र दातांची, दोन वेण्या रिबीनीने शेवटपर्यंत नेऊन परत वर्पर्यंत बांधणारी. तिचे कुंकू नेहमी कपाळाच्या मध्यावर व काळ्या रंगाचे व दुपट्टा उपरण्यासारखा घेत असे. ही हसतमुख चेहऱ्याची शैला अजुनही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे. सर्व प्रकारची कलाकुसर अवगत असलेल्या भैरवीला तर मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला कधी रिकामी बसलेली पाहिली नाही. आशा व सुषमा या दोघीजणी इतक्या काही प्रेमळ आहेत ना की अजूनही मी त्यांच्याकडे चार दिवस मोकळेपणाने राहू शकते.

अमेरिकेत पाऊल टाकल्यावर भेटलेली माधवी. तास न तास दूरध्वनीवर मारलेल्या गप्पा, आम्ही दोघींनी मिळून निसर्गाची काढलेली छायाचित्रे, एकमेकींच्या घरी जाऊन वेगवेगळे पदार्थ बनवून ते रेडिओ ऐकता ऐकता खाणे, हे मी कसे काय विसरू शकेन? याहू निरोपकावर भेटलेली इंग्लंडमधली श्रावणी तर खूपच लाघवी. मी सकाळी उठून संगणक सुरू करताच यायची आणि म्हणायची "सुप्रभात रोहिणी, चहा झाला का?" आणि मग मी पण लगेच "चहाच घेत आहे. तुझे झाले का जेवण? आज काय बेत होता?" आणि मग गप्पा मारता मारता अधुनमधून इतर कामे असा माझा दिवस सुरू व्हायचा.

मित्रत्त्वाच्या नात्याबद्दल लिहिता लिहिता मी स्पर्धेतल्या शब्दांची मर्यादा ओलांडली तर नाही ना?!! मोजक्या मित्रांच्या गोड आठवणी सांगायच्या राहूनच गेल्या की!!

रोहिणी गोरे

Friday, July 20, 2007

एच ४ मराठी मुलींचे मंडळ (online competition on orkut) H4 marathi mandalएच ४ मराठी मंडळाची वार्ता मला माझ्या प्रेमळ मैत्रिणीकडून मिळाली.तिचे नाव गौरी. त्याअधी मला ऑर्कुट माहित होते पण तेथे नक्की काय काय चालते ते माहित नव्हते. म्हणलं बघू या तर काय आहे हे एच ४ मंडळ? एच ४ ची सदस्य झाले आणि ऑर्कुटच्या प्रेमातच पडले. बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या आणि वाटले ऑर्कुटबद्दल आधीच का नाही स्वारस्य दाखवले. आणि मग म्हणतात ना की व्यसन लागले की ते कधीच सुटत नाही अगदी तसेच सारखीच येण्याची नोंद होऊ लागली. कोण कोण आलयं, कोणी काय काय लिहिले आहे. काही वेळा "हे काय? काहीच कसे नाही." खूपच शांतता आहे. शांतता असली म्हणून काय झाले आपण करू कुठला तरी धागा सुरू. गाण्याचे धागे सुरू करायला मला फार आवडतात, त्याला कोठेही मरण नाही. आणि असे लक्षात आले की बऱ्याच मुलींना आपल्यासारखेच स्वारस्य आहे तर? मनातल्या मनात खुष झाले.

आणि असे बरेच धागे मिळाले वाचायला की त्याचा बराच उपयोग झाला. रेसीपी हा असाच एक धागा की ज्याला कुठेही मरण नाही. बाकीही रेघेवर काय काय बघता येईल त्याचाही खूपच फायदा झाला. एच ४ चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दिप्तीने सुरू केलेली लाइव्ह अंताक्षरी. पूर्वी गुणगुणत असलेली गाणी मधला बराच काळ उलटून गेल्यावरही परत जिवंत झाली. याचे पूर्ण श्रेय दिप्तीला जाते.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एच ४ वर काय काय चालू आहे ते बधितले जाते, आणि काहीच नसले की परत हताश व्हायला होते. कोणत्याही संकेत स्थळावर किंवा ऑनलाईन मंडळात सतत काही ना काही घडायलाच हवे असा अगदी अट्टाहास असतो. म्हणजे अगदी कसे दोन दोन मिनिटाला काही ना काही नवीन वाचायला हवे असते, हा मनुष्य स्वभाव आहे. आणि ते नाही घडले की आपण आपल्यावरच रागावतो.

मनोगत संकेतस्थळ काही कारणाने काही काळ बंद होते म्हणून आता काहीतरी दुसरे शोधायला हवे बुवा असा विचार रेंगाळत होता. आणि एच ४ ची ओळख झाली. वाटले होते मनोगतासारखेच आपण इथेही रमू का? आणि लगेच रमलेही. थोडे दिवस आधी पहिली वाट सोडून दुसरी वाट पकडल्यावर कंटाळा येतो पण नंतर रुळायला होते.

ही ऑनलाईन स्पर्धा आवडली आणि काय लिहायचे यावर नुसता विचार चालू होता. पण माझी प्रिय मैत्रिण रोमा हिने मला खरडवहीत निरोप लिहिला आणि विचाराला चालना मिळाली. जे काही मनात आले ते पटापटा उतरविले आणि सुपूर्त करत आहे. एच ४ वर जे काही खरडले ते आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा करते.

कदाचित कोणी म्हणतील किती शुद्ध मराठित लिहिले आहे!! पण काय करू मनोगतावर शुद्ध मराठी बोलण्याची आणि लिहिण्याची सवय झाली आहे. आणि आपण सर्व मराठमोळ्या मुलीच ना!!

एच ४ ची चालिका प्राची चित्रे/मोहिले हिची मी खूप आभारी आहे. घरबसल्या काहीतरी उद्योग मिळाला, उत्साह वाढला.

रोहिणी गोरे

Friday, April 27, 2007

कॅट बस
आम्ही जेव्हा क्लेम्सन शहरात आलो तेव्हा तिथे आम्हाला भेटली एक बस, ती म्हणजे कॅट बस. कॅट म्हणजे clemson area transit. शेंदरी व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेल्या कॅट बसवर मात्र वाघाचे पंजे उमटवलेले होते. दर पंधरा मिनिटांनी ही कॅट धावत असे आणि महत्त्वाचे म्हणजे चकटफू!!

विद्यापीठ, घरांची प्रत्येक कॉलनी व दोन तीन किराणामालाची दुकाने येथे प्रत्येक ठिकाणी ही बस जात असे. क्लेम्सन हे डोंगराळ अशा उंच सखल भागात वसलेले छोटे शहर. सगळीकडे हिरवीगार घनदाट झाडी. अशा हिरव्यागार पार्श्वभूमीवर ही शेंदरी व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेली कॅट खूपच उठून दिसे. काही चिनी व अमेरिकन विद्यार्थी सोडल्यास ही बस भारतीय विद्यार्थ्यांनी सतत भरलेली असे. बसमध्ये प्रवास करताना असे वाटे की आपण मुंबईमधल्या बेस्टमधून तर प्रवास करत नाही ना!!

प्रत्येक कॉलनी, विद्यापीठ, किराणामालाची दुकाने याशिवाय पोस्ट ऑफिस, बँक, लॉन्ड्री येथेही एकेक थांबा होता. कॅट बसचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बसथांब्याव्यतिरिक्त एक विनंती थांबाही असे. क्लेम्सन शहरात लेमान्स कॉलनी खूपच मोठी होती आणि या लेमान्समध्ये सर्व भारतीय विद्यार्थी रहात होते, म्हणून या विभागाला mumbai area म्हणत असत. कॅटच्या सर्व अमेरिकन वाहनचालकांना पण mumbai area म्हणून माहित होता.


घराच्या खिडकीतून जात येता डोकावले की कॅट अगदी सहज दिसत असे. अगदी जरी दिसली नाही तरी तिच्या आवाजावरून कळत असे. बसथांब्यावर बस आली की पटापट उड्या मारत सर्व भारतीय विद्यार्थी येत तोपर्यंत थांब्यावर अगदी शुकशुकाट असे. काही वेळेला तर हे भारतीय विद्यार्थी त्या अमेरिकन वाहनचालकाला भजी पकोडे खिलवत असत.


शुक्रवार व शनिवार रात्री ८ ते ११ ही बससेवा खास आठवड्याचे किराणामाल, दूध, भाजी आणण्याकरता होती, तेव्हा खूप मजा येत असे. काही ठराविक विद्यार्थी, विद्यार्थ्यांमधे लग्न झालेली जोडपी, आमच्या सारखी post doc करणारी जोडपी असत. मग अगदी सकाळपासून काय काय आणायचे याची एक यादी बनवून ठेवायचो आम्ही सर्व बायका. त्यादिवशी आम्ही बायका भारतीय पेहराव करायचो. ती जणू काही आमची छोटी पिकनिकच असे. रात्रीची बस म्हणून बसमध्ये मंद प्रकाश व बारीक आवाजात इंग्लिश ट्यून. एकीकडे आमच्या गप्पा.


सगळ्या कॉलनीतून प्रत्येकाला घेत घेत ती बस विद्यापीठात जाऊन नंतर ती दुकानात जायची, कारण विद्यापीठात कोणाचे संध्याकाळ व रात्रीचे वर्ग असतील तर त्यांनाही तेथुनच ग्रोसरी आणायला सोयीचे पडे. बायलो मध्ये ती बस आम्हाला सोडायची व परत न्यायला यायची अर्ध्या तासाने. त्या अर्ध्या तासात पटापट सर्व खरेदी करायची, म्हणजे आमच्या सर्वांची अगदी धावपळतच खरेदी व्हायची. ग्रोसरीचे सर्व सामान उतरवून कार्ट जागेवर लावेपर्यंत ती बस यायची सुद्धा. प्रत्येकाकडे भरपूर सामान. दूध व ज्युसचे कॅन, तांदुळाची पोती, तेलाचे कॅन, भाज्या, आयस्क्रीमच्या बादल्या, पेप्सी, इ.इ. त्या संपूर्ण बसमध्ये आम्ही जेमतेम बारा पंधरा जण, पण संपूर्ण बस आमच्या कॅरी बॅग्जने भरून जायची. अशा रितीने कॅट बसच्या मदतीने आमचा ग्रोसरी डे पार पडायचा!!


कॅटबसचे वाहनचालक इतके काही ओळखीचे झाले होते की रस्त्यावरून फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि बस जात असेल तर बसमधून आम्हांला हात दाखवून हाय!! करायचे. आणि हो विसरलेच की! या बसमधून विद्यार्थी आठवड्याची लॉन्ड्री करण्याकरता कपड्यांनी भरलेल्या लॉन्ड्री बास्केट पण घेऊन यायचे.


मी कॅटला खूपच मिस करत आहे, कारण मला स्वतःला कार प्रवासापेक्षा बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करायला खूपच आवडते!!


रोहिणी

Thursday, April 19, 2007

एक सुखद आठवण
अमेरिकेत एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर लगेचच सर्वांच्या ओळखी होतातच असे नाही, त्याला थोडा वेळ जायला लागतो. आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात सुनिता, येमुल व त्यांचा मुलगा प्रथमेश यांच्याकडे आम्ही पहिले काही दिवस राहिलो होतो. नंतर जागा मिळाल्यावर स्वत:च्या जागेत रहायला गेलो. माझी व सुनिताची मैत्री लगेच झाली, कारण आम्ही दोघीही पुण्याच्याच. क्लेमसन हे शहर खूपच सुंदर आहे. उंच सखल भागात विभागले आहे. नंतर आमच्या दोघींचे घर एकमेकींपासून खूपच लांब. तिचे घर उंच डोंगरावर तर माझे घर दुसऱ्या एका भागात कमी उंचीच्या डोंगरावर. दोघींचे नवरे सकाळी कामाला गेले की एकदम संध्याकाळी उशीराने येत. ती तिच्या घरी एकटी व मी माझ्या घरी एकटी पूर्ण दिवस खूपच कंटाळून जायचो.

अमेरिकेत पटकन कोणी बोलायला माणसे मिळणे तसे थोडे कठीणच असते. आम्हाला तर पहिल्यांदाच मराठी कुटुंब भेटलेले त्यामुळे जास्त आपुलकी. आमच्या आधी काही दिवस ते त्या शहरात थोडे स्थिरस्थावर झाले होते. इतर ओळखी व त्या शहराची माहिती होईपर्यंत आम्हीच एकमेकांना आधार. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस का होईना मला तिच्या घरी जाता यायचे. त्यामुळे आमच्या दोघींचा तो एक दिवस खूपच मस्त जायचा. बाकीचे दिवस आम्ही दिवसातून दोनदा फोनवरून एकेक तास बोलायचो. जीवनात काही वेळा काही काही गोष्टी कायमच्या आठवणीत रहातात त्यापैकी एक आठवण.


रस्ता ओलांडून गेल्यावर काकू समोरच्या डोंगरावर एक नजर टाकते आणि चालायला सुरवात करते. डोक्यावरचे ऊन खूपच रणरणते.

"चला पहिला चढ गेला!! आता दुसरा"

"आई गं! हा दुसरा चढ तर किती अवघड आहे! पण हा चढून गेला की निम्याच्यावर अंतर आपण पार पाडू आणि मग शेवटचा चढ गेला की सुनिताचे घर दिसेलच. रस्त्यावर शुकशुकाट. मध्येच एखादे वाहन, किंवा असेच कोणीतरी चालत असलेले. निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी तोंडाने "चुक चुक" आवाज करत फांदिवर झोका घेत बसलेले.

टोपी घातलेली काकू मधुनच वर दिसणाऱ्या तळपत्या उन्हाकडे पहात, घाम पूसत, धापा टाकत टाकत चढ चढत असते. "हे हे! दिसले बाई एकदा सुनिताचे घर! अरेच्या पण आज खिडकीत कोणीच कसे काय दिसत नाही?" असे म्हणत परत खाली मान घालून हळू हळू चालते आणि थोड्यावेळाने मान वर करून पहाताच तिला सुनिता व प्रथमेश खिडकीत दिसतात.

हसतमुखाने सुनिता व प्रथमेश तिचे स्वागत करतात.

"कोण आले रे प्रथमेश? तुझी काकू आली कारे? अग काकू तू किती लालबुंद झाली आहेस? बस बस. पाणी पाहिजे का तुला? " सुनीता म्हणते.

" हो हो. चांगले ७-८ ग्लास भरून थंडगार पाणी दे, आणि टेबलपंख्याची मानही जरा माझ्याकडे वळव" काकू.

सुनिताच्या घरामध्ये गणपतीसमोर उदबत्ती लावलेली असते तिचा सुगंध खोलीभर दरवळत असतो आणि "सुखकर्ता दुखहर्ता वार्ताविघ्नाची" ही लता मंगेशकरची आरती सुरू असते.

"सुनिता मला तुझ्या घरी आले ना की अगदी पुण्यात आल्यासारखे वाटते बघ" काकू.

"अगं मग ये ना तू रोजच. मी व प्रथमेश पण खूप कंटाळून जातो" सुनिता.

"आले असते गं अगदी रोजच्यारोज! पण येताना हा मोठा सिंहगड आहे ना!! त्याचे काय?" "आज कोणता भात केला आहेस गं खूप मस्त वास येतोय." काकू.

"आज ना मी आमचा तेलगू स्पेशल वांगेभात केलाय" सुनिता.

मग सुनिता व काकूच्या गप्पा सुरु होतात आणि अधुन मधुन प्रथमेशशी खेळणे. प्रथमेश हा सुनिताचा दीड वर्षाचा मुलगा. खूप गोड व खेळकर. काकूवर त्याचे विशेष प्रेम. अता काकू सुनिता व प्रथमेश यांची अंगतपंगत सुरू होते. गप्पा मारत मारत तिखट भात, तिखट भाजी व नंतर मनपसंद आयस्क्रीम!

जेवणानंतर प्रथमेशची दुपारच्या झोपण्याची तयारी. " चला आता झोपायचे ना काकू तुला? तुला जायचे आहे ना परत! तू नाही झोपलीस तर काकांना नाव सांगीन हं तुझे. चल प्रथमेश तू झोपणार का काकू व आईच्या मध्ये? " सुनिता

प्रथमेश कुठचा झोपायला!! मग सुनिता खोलीत पडदे लावून अंधार करते. मग दोघीजणी दामटून दामटून झोपवतात प्रथमेशला. ती झोप म्हणजे काय छोटीशी डुलकीच. त्या १० मिनिटांच्या डुलकीमध्ये असे वाटायचे की असेच झोपून रहावे.

आता काकूची निघण्याची वेळ. तोंडावर गार पाण्याचा हबका मारून सुनिताने केलेला चहा पीत व एकीकडे घड्याळाकडे नजर टाकत काकू निघण्याच्या तयारीला लागते. जेवढे येताना रणरणते ऊन तेव्हढेच आता खुप अंधारून आलेले असते आणि मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. हा पाऊस पण अगदी पुण्यासारखाच आला काय न गेला काय! लगेच इकडे प्रथमेशचे रडणे सूरू. कारण त्याला काकूबरोबर बाहेर जायचे असते. रडून रडून गोंधळ नुसता!!

"अरे प्रथमेश मी येणार आहे उद्या परत. रडू नकोस." काकू.

"अरे प्रथमेश उद्या येणार आहे काकू परत. ती घरी नाही गेली तर काकांना जेवायला कोण देईल बरे?"

चल. रडू नकोस. काकूची बस जाईल बर का निघून. तिला टाटा कर बरं. टाटा काकू. टाटा. " सुनिता.

त्या दोघांचा निरोप घेऊन, प्रथमेशचे अनेक पापे व गालगुच्चे घेऊन सतराशे साठ वेळा मागे वळून काकू त्या दोघांना टाटा करते ते दिसेनासे होईपर्यंत. आणि मग मात्र काकूला झपाझप पाउले उचलायला लागतात; बससाठी!!

कधी कधी रिमझिम पाऊस सुरू असेल तर मात्र पाऊसात भिजत, रमतगमत, हिरव्यागार निसर्गाचा आनंद लूटत व गुणगुणत "सुहाना सफर और ये मौसम हँसी"


रोहिणी

Tuesday, January 30, 2007

चुपके चुपके चल री पुरवैय्या

चुपके चुपके चल री पुरवैय्या
बासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे
दैय्यागोपीके संग कन्हैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या


एक प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ परिमल त्रिपाठी एका निसर्गरम्य ठिकाणी वनस्पतीशास्त्राचे संशोधन करायला आलेला असतो. सकाळी न्याहरीच्या वेळी चहा घेऊन येताना तिथल्या गेस्ट हाऊसचा चौकीदार परिमलला विचारतो ," आप घासफुस के डाक्टर है क्या?"

"घासपुसके नही काका कमसे कम फूल पत्ती तो कहो " परिमल.

त्या चौकीदाराला त्याच्या आजारी नातवाला बघण्यासाठी तातडीने जावे लागते तोपर्यंत त्याचा रोल निभावण्याची जबाबदारी खुद्द परिमल आपल्या हाती घेतो. त्याच वेळेस कॉलेजमधल्या काही तरूणी सहलीसाठी तिथे येतात. त्या सर्व डॉ परिमलच्या फॅन असतात, विशेष करून सुलेखा तर त्यांना भेटायला खूपच अधीर झालेली असते. त्या मैत्रिणींपैकी एक जण ओरडून सांगते " सुलेखा डॉ परिमल त्रिपाठी येथे आलेले आहेत!!"

"काय? डॉ परिमल त्रिपाठी!!!" सुलेखा डोळे विस्फारून त्यांच्या खोलीवर लिहिलेली पाटी वाचते. तेवढ्यात चौकीदार उर्फ परिमल त्या मुलींची चौकशी करायला येतो. सुलेखाला संशय येतो. काही वेळाने सर्व मैत्रिणींची नजर चुकवून सुलेखा चौकीदाराकडे येते.

"प्रोफेसर त्रिपाठी सचमूच बुढे है क्या?" सुलेखा.

"हां बूढे है, लेकिन बहूत बूढे नही, लेकीन उनका मुँह थोडा टेढा है. बेचारे को लखवा है ना!! लेकीन प्रोफेसरके बूढे होनेसे आप क्यु निराश हो रही है" परिमल

"नही नही मै तो इसलिए कह रही हुँ की सूना है इतनी कम उम्रमे बॉटनी की तरक्की किसीने भी नही की" सुलेखा

"अरे प्रोफेसर की जवानी भी तो पचास सालकी उम्रमे आती है जब बाल झडने लगते है, दात गिरने लगते है, अकलकी जवानी है न शकल की तो नही ना!! परिमल

दुसऱ्या दिवशी त्या मुलींची निघण्याची वेळ होते आणि त्याच वेळेस खरा चौकीदार येतो आणि परिमलचे नाटक उघडकीला येते. नंतर काही दिवसात परिमल सुलेखाचे लग्न होते. सुलेखाला तिच्या जिज्ज्याजींबद्दल खूप अभिमान असतो. सतत त्यांची तारीफ, जिजाजी ये है!!, जिजाजी वो है!! त्यांची सततची तारीफ परिमलला पहावत नाही आणि तो मनाचा निश्चयच करतो की आपल्या बायकोच्या डोक्यातून तिच्या जिजाजींचे भूत उतरवायचेच.

एके दिवशी तिच्या जिजाजींचा निरोप येतो की त्यांना शुद्ध हिंदी बोलणारा driver पाहिजे. हे ऐकताच परिमल सुलेखासमोर एक प्रस्ताव मांडतो की मी driver बनून पुढे जातो, मग तू सात आठ दिवसांनी ये. तुझ्या जिजाजींना मी अजिबात ओळखू येणार नाही. तिलाही तो प्रस्ताव पटतो पण ती म्हणते "हमारी नयी नयी शादी हुई है. driver बनके जाओगे तो हम मिल भी नही सकेंगे!! मै रहुँगी उपर और तूम रहोगे नीचेवाले गॅरेजमे.

"हम छुपछुपके मिलेंगे, इस तरह छुपछुपके मिलनेमेही बीवीका प्यार बढता है.
डॉ परिमल त्रिपाठी प्यारे मोहन बनून जिजाजींकडे येतो व शुद्ध हिंदी बोलून बोलून त्याला चिडीला आणतो.

परिमल, जिजाजी यांचे संवाद:

"हम भीतर आ सकते है साहेब?" परिमल

"हां हां आओ आओ" जिजाजी

"प्रणाम साहेब मै श्री प्यारे मोहन इलाहाबादी आपका नया वाहनचालक" परिमल
"रास्तेमे कोई कष्ट तो नही हुआ, खाना वाना खाया?" जिजाजी

"भोजन तो हमने लवपथग्रामि स्थलपरही किया है" परिमल

"लवपथग्रामि?" जिजाजी

"हम लवपथग्रामि अग्निपथसेही आए है ना!!" परिमल

" ओ याने की ट्रेन!!" जिजाजी

"हिंदी बोलते समय हम अंग्रेजी शब्दोंका प्रयोग उचित नही समझते " परिमल

" व्हॉट नॉनसेन्स" जिजाजी

"नॉनसेन्स नही, क्या बकवास है. हिंदी बोलते समय अंग्रेजी शब्दोंका प्रयोग अच्छा नही लगता" परिमल

"अंग्रेजी जानते हो?" जिजाजी

"हमे तो ये भाषा बिल्कुलही पसंद नही साहेब, बहुतही अवैग्यानिक भाषा है. सी यु टी कट है तो पी यु टी पुट हो जाता है, डी ओ डु है तो टी ओ टु है, जब डी ओ डु , टी ओ टू तो जी ओ गू क्यु नही होता है साहेब? परिमल

"हा हा ठीक है. नीचे हमारा driver है उसे मिलो

जिजाजींचा जुना वाहनचालक याच्याशी प्यारे मोहन ओळख करून घेतो, गाडी चालवून बघतो.

जिजाजी, प्यारे मोहन, दिदी , जेम्स यांचे संवाद

"इसके डिफरन्शिअलमे लफडा है साहेब" जेम्स

"साहेब आग्या हो तो ब्रेक का निरीक्षण परीक्षण कर लुँ " प्यारे मोहन

"अरे बापरे एक लफडा कहता है, तो एक निरिक्षण परीक्षण कहता है, लगताही नही की एक ही गाडी की बात हो रही है" दिदी

"तुम्हारी तो भाषा ही नष्ट हो गयी है बंबईमे रहकर" जिजाजी (चिडलेला)

"नष्ट नही साहेब भ्रष्ट कहो, भाषा भ्रष्ट हो रही है" प्यारे मोहन

गाडीचे इंजिन तपासून म्हणतो " अब कोई कष्ट नही साहेब. तेलछन्नी जिसे आप ऑईल फिल्टर कहते है जिसका पेच ढिला हो गया था, वो कस दिया है, ध्वनी बंद. मै जरा हस्तप्रक्षालन करके आता हुँ" परिमल
आठ दिवसानंतर सुलेखाची चिठ्ठी येते " की मी येत आहे" सुलेखा आपली बायको येणार व आपल्याला भेटणार हे कळल्यावर प्यारे मोहन खूप खुष होतो आणि स्टेशनवर तिला न्यायला दिदी व प्यारे मोहन जातात. तिला पाहिल्यावर तिची जातीने चोकशी करतो. घरी आल्यावर

प्यारे मोहन, दिदी, सुलेखा, जिजाजींचे संवाद:


"घासफुसके डॉक्टर नही आए?" प्यारे मोहन

" वो पटना गये है आठ दिनके बाद आएंगे" सुलेखा

"सुलेखाजी हमारी पत्नी कैसी है? वो हमे स्मरण करती है?" प्यारे मोहन

"मरण?" दिदी

"मरण नही, स्मरण जिसे हिंदुस्थानीमे याद कहते है" प्यारे मोहन

"वो आपको बहूत याद करती है" सुलेखा

"ए प्यारे मोहन तुने तो कहाँ था की तुम अकेले हो, ये अचानक तेरी बिवी कहाँसे आ गयी?" जिजाजी
"क्या करते साहेब, हम यहा बंबईमे, वो वहा इलाहाबादमे. ये सोचकर मनको शांत कर लेते थे की हम विवाहीत है ही नही. परंतु आज सुलेखाजी आ गयी है तो अचानक मनमे ये विवाहीत होनेकी भावना जागृत हो उठी, कोई हमारी पत्नी की देशसे आया है." प्यारेमोहन

"साहेब वो हमारा थायसिस का क्या हुँआ?" प्यारेमोहन

"थायसिस!! किसका थायसिस?" सुलेखा

"अरे थायसिस नही, साथमे न्युमोनिया भी है. ए प्यारे मोहन अभी अभी सुलेखा आयी है, इस शुभसमय पर ऐसे अशुभ शब्द बोलना ठीक है क्या?" जिजाजी

"यथार्थ साहेब, ऐसे शुभ अवसर पर अशुभ शब्दोंका उच्चार निश्चीत अनुचित है." प्यारे मोहन

इथे खऱ्या अर्थाने चित्रपट संपतो. सुलेखा व प्यारे मोहन मुद्दामून दिदी व जिजाजींना संशय येईल असे वागतात, व एके दिवशी चिठ्ठी लिहून पळून जातात. नंतर आठ दिवसांनी लिटरेचरचा प्रोफेसर कुमार (परिमलचा मित्र) डॉ त्रिपाठी बनून जातो पण उतरतो प्रशांतकडे (परिमलच्या मित्र) खोटं खोटं रागावतो सुलेखा प्यारे मोहन बरोबर गेली, ती आल्याशिवाय येणार नाही.

तिकडे प्रशांतची मेहुणी वसुधाही परिमल त्रिपाठींची फॅन असते. ती कुमारला सतत तिला बॉटनी शिकवण्यासाठी विनवत असते आणि कुमारला बॉटनीतले ओ की ठो येत नसते. असे करता करता कुमारचे नाटकही उघडकीला येते, मग परत एक प्लॅन रचून कुमार व वसुधाचे लग्न लावतात आणि शेवटी सगळ्यांनाच सर्व परिस्थितीचा उलगडा होतो. मंदीरामध्ये कुमार व वसुधाच्या लग्नाच्या वेळी सुलेखा जिजाजींना विचारते," क्यु जिजाजी आप तो सुंकके आदमी पहचान लेते थे ना?

हां बेटा इस समय जुकाम जरा लंबा हो गया था. यकीन मानिये जुकाममे नाक बंद होती है मगर मेरी तो अकलही बंद हो गयी थी. इस उम्रमे तो बेइज्जती होनी थी वो तो हो चुकी, मगर आप जनता जनार्दन है बाहर जाके ये मत कहना की मै उल्लू बन गया!! नमस्ते.


पात्र परिचय:
१) जिजाजी - ओमप्रकाश २) सुलेखा - शर्मिला टागोर ३) दिदी - उषाकिरण ४) कुमार - अमिताभ बच्चन(लिटरेचरचा प्रोफेसर) ५) वसुधा - जया भादुरी ६) प्रशांत - असरनी ७) डॉ. परिमल त्रिपाठी - धर्मेंद्र ८) प्यारे मोहन - धर्मेंद्र ९) खोटा परिमल - अमिताभ १०)पहिला वाहन चालक जेम्स - केष्टो मुखर्जी

Monday, January 15, 2007

बालगोष्टी (१)

कोल्हा-गेंडा-हत्ती

एका रानात एक कोल्हा रहात होता. त्याच रानात एक मोठे तळे होते. रानात झाडे भरपूर होती. कोल्हा रानात मोकळेपणाने फिरत असे. आपणच रानाचे राजे आहोत असे त्याला वाटे. रानातुन फिरत जात असता एकदा गेंड्याने त्याला एक टप्पल मारली.," ए गेंड्या उगीच मला मारु नको हं, माझ्या अंगात किती ताकद आहे हे मी तुला एकदा दाखवीन." गेंडा म्हणाला, " अरे जा रे बेट्या, तुझी शेपुट धरुन तुला काट्यात फेकुन देईन" असे म्हणुन गेंडा खोखो हसला. शेपुट हलवीत कोल्हा पुढे गेल्यावर हत्तीने त्याला एक टप्पल मारली, "ए हत्ती मारु नकोस हं. माझ्या अंगात किती ताकद आहे हे तुला एकदा दाखविन." तर हत्ती म्हणाला, " अरे चिमुरड्या, तुझा कान धरुन देईन तुला भिरकावून. तळ्यात पडशील. चल जा फुट" बरं बरं म्हणुन कोल्हा निघुन गेला.


जांभळीच्या झाडाखाली बसुन कोल्ह्याने विचार केला, तेंव्हा त्याला एक युक्ती सुचली. त्याच दिवशी तो गावात गेला, त्याने एक मोठी जाड दोरी आणली, एका पिशवित भाजक्या शेंगा, खारे दाणे आणले व ती पिशवी व दोरी जांभळीवर एका फांदीला लटकुन ठेवली.


दुसऱ्या दिवशी मोठ्या रुबाबात, गोंडेदार शेपुट हलवित बरोबर मोठी दोरी घेवुन कोल्हा गेंड्याकडे आला व म्हणाला, " गेंड्या ह्या दोरीचे टोक पकडून येथे उभा रहा. मी दुसऱ्या बाजुस जाऊन शिटी मारीन, तेंव्हा तु ही दोरी ओढायला लाग. अरे तुला ओढून तळ्यातच पाडतो." गेंड्याने दोरी शिंगाला बांधली व म्हणाला, 'अरे लेका जा, माहिती आहे तुझी ताकद.". दोरीचे दुसरे टोक धरुन कोल्हा तळ्याच्या दुसऱ्या टोकाला गेला. दुसरे टोक त्याने हत्तीच्या सोंडेत बांधले व म्हणाला , पकड हे टोक. मी तळ्याच्या पलीकडे जातो. मी शिटी वाजवीन मग तु ओढायला लाग. दोरीची दोन्ही टोके दोघांचेकडे देउन कोल्हा जांभळीवरील एका उंच फांदीच्या शेंड्यावर जाउन बसला. तेथुन त्याला हत्ती व गेंडा सहज दिसत होते. खारे दाणे खात त्याने जोराने शिटी मारली, तशी हत्ती व गेंडा दोर ओढू लागले.


गेंड्याने तळ्याच्या काठावर पाय रोवून असा जोराने हिसका दिला की हत्ती कोलमडला व धप्पकन तळ्यात पडला. हत्ती चिडला, त्याने पण तळ्यातुन बाहेर येउन दोन पाय तळ्याच्या काठावर रोवून हिसका दिला, तसे गेंडा धप्पकन तळ्यात पडला. कोल्हा झाडावरुन गम्मत पहात होता, त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अधुनमधुन तो खारे व भाजके शेंगदाणे खात होता, मधुनच एखादे पिकले जांभुळ खात होता.


आता दोघेही चिडले व जोर लावून दोर ओढू लागले, त्यांच्या पुढे दोरी ती काय टिकणार?, करकर आवाज करीन दोरी तुटली व दोघेही आपटले. हत्ती पडला चिखलात त गेंडा पडला काट्यांत. कोल्हा जांभळीवरुन खाली उतरला व थेट हत्तीकडे गेला, म्हणाला "काय सोंड्या कळली ना माझी ताकद" हत्तीने सोंड हलवून म्हणले आता मी तुला टप्पल मारणार नाही. शेपुट हलवीत कोल्हा गेंड्याकडे गेला व म्हणाला, " काय रे गेंड्या जिरली ना तुझी" गेंडा कुठला बोलतोय, तो पडला होता काट्यांत. कोल्ह्याने गेंड्याच्या अंगातील कांटे काढले. कसाबसा उठत गेंडा कोल्ह्याला म्हणाला "आता मी तुला नाही टप्पल मारणार"
आणि त्यादिवसापासुन कोल्हा शेपटी हलवत रानांत फिरतो, त्याच्या वाटेला आता कोणी जात नाही.

ह्या बालगोष्टी माझ्या वडिलांनी आम्हांला लहानपणी सांगितल्या आहेत व त्यांच्या शब्दात लिहुनही ठेवल्या आहेत, त्या मी मनोगतवर लहान मुलांकरता देत आहे.


रोहिणी

बालगोष्ट (२)

वाघ व त्याची शिकार

एका नदीच्या काठी एक गाव होते. तेथून वर सारे जंगलच जंगल. जंगल डोंगराला लागून होते, व त्यापलीकडे एक गाव. एकदा एका गृहस्थाला डोंगरापलीकडील गावी राहणाऱ्या त्याच्या लेकीकडे जायचे होते. जाताना त्याने खाण्याचा डबा घेतला आणि कोट, पागोटे घालून तो लेकीकडे जाण्यास निघाला. जाताना रस्ता चुकला. चुकीच्या रस्त्याने जाताना त्याला भरपूर झाडे लागली. रस्ता काही केल्या सापडेना. चालून चालून दमला बिचारा. तेव्हढ्यात त्याला एक पाण्याने तुडुंब भरलेली विहीर दिसली. त्याने विहिरीतून पाणी आणले, डबा खाल्ला व झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी आडवा झाला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.


त्याच जंगलात एका करवंदीच्या जाळीत एक वाघ झोपला होता. त्याला माणसाचा वास आला. तो उठला आणि त्या घोरणाऱ्या माणसाजवळ आला, मनात म्हणाला 'चला आज चांगली शिकार मिळाली'. 'चांगला माझ्या तावडीत सापडला आहे. उठला की खाऊ त्याला'. . थोड्यावेळाने तो गृहस्थ उठला, त्याने पागोटे बांधले. सहज उजवीकडे पाहिले तर वाघ. आता काय करणार? उठून पळत सुटला. तोच वाघाने त्याच्या अंगावर झेप घेतली. त्यांची कुस्ती सुरू झाली. एकदा वाघ वर तो खाली. एकदा तो वर वाघ खाली. असे करता करता त्याच्या कोटातील तपकिरीची डबी बाहेर पडून तपकीर हवेत उधळली.


तपकीर त्या वाघाच्या नाकात गेली. वाघाला एकसारख्या सटासट शिंका येऊ लागल्या. तो गृहस्थ मध्येच थांबून वाघाला म्हणाला,' अरे मला खातोस ना?'. वाघ म्हणाला, ' अरे थांब रे जरा. मला शिंका येत आहेत'. वाघ सटासट शिंकतोय असे पाहून तो गृहस्थ तेथून पळाला. भरभर चालून डोंगर ओलांडून तो लेकीकडे गेलासुद्धा. वाघाच्या नाकातोंडातून पाणी येत होते. तो शिंकण्याने बेजार झाला होता. इकडे तिकडे पाहतो तो काय? तो गृहस्थ निघून गेला होता. वाघ मनात म्हणाला,' जाऊ दे. उद्या बघू' आणि हळूहळू जाऊन जाळीत झोपला.


हाच वाघ पुढील पानावर...

चकवा

इनामदार खोत. त्यांची कोकणात मोठी वाडी आहे. वाडीच्या मधोमध त्यांचे घर. घर साधे, उतरत्या छपराचे. पुढे अंगण, परसदारी दोन विहीरी. पाणी मुबलक. नारळ, सुपारी, फणस यांचे भरपूर उत्पन्न. वाडीस लागूनच भातशेती. बापू खोतांचा परिवार मोठा. दोन मुलगे, लेकी, जावई, नातवंडे. थोरला मुलगा हाताशी आल्याने कोणतीच काळजी नाही. बापू बोलण्यात अगदी मिठ्ठास. गप्पा, विनोद यात त्यांना भारी रस. पाऊलवाट वाडीमधून गेलेली. तिसऱ्या वाडीपलीकडे अण्णा मास्तरांचे छोटे घर. मास्तरांचा स्वभाव पण बोलका. बापू व अण्णांचे संबंध घरोब्याचे. रोज सायंकाळी खोत मास्तरांकडे जात. गेल्यावर चहापाणी होत असे. इकडच्या तिकडच्या खेतीवाडीच्या गप्पा होत. त्यातून गोष्टी विनोद रंगत. साधारण साडेनऊ-दहाच्या सुमारास खोत घरी परत येत असत. गप्पा मारता मारता फारच उशीर झाला तर बापूंचा मास्तरांकडेच मुक्काम होई. सकाळी उठल्यावर काकू हिरवी मिरची लावून दही पोहे करीत, त्यावर चहा पिऊन बापू निघत.


एकदा बापूंना घरून निघायलाच रात्र झाली. चांदणे होते. वाट तशी पायाखालचीच. बापू निघाले. चालता चालता तीन-चार बिड्या संपल्या. खरतर वीसएक मिनिटांत बापू मास्तरांचे घर गाठत असत. पण आज तास, दीड तास झाला तरी वाट संपेना. पुन्हा तीच झाडे, तीच पाऊलवाट. बापूंना घाम फुटला तरी मास्तरांचे घर येईना. मागे वळावे तर घर दिसेना. बापू थकले. एका माडाच्या बुंध्यापाशी टेकून बसले. शांतपणे विचार केला, एक बिडी ओढली. थकल्यामुळे त्यांना झोप लागली.


पहाटेचे गार वारे सुटले तशी त्यांना जाग आली. तांबडे फुटले होते. पाहतात तर आपल्याच वाडीच्या माडाजवळ आहोत हे त्यांच्या ध्यानात आले. सावकाश बापू घरी आले. कुणाशी काही बोलले नाहीत. बापू मास्तरांच्या घरीच राहिले असे घरच्यांना वाटले. स्नानाचे पाणी तापले होते. बापूंनी अंघोळ केली. त्यांची देवपूजा झाली. नेहमीप्रमाणे दहा वाजता जेवणे झाली, आणि बापू बाहेर पडवीत येऊन बसले. सुपारी कातरून विडा खाल्ला. पाहुणे आले होते, त्यांच्याशी बापू बोलत होते तोच हातात छत्री घेऊन येताना मास्तर दिसले.


मास्तर पडवीत आले, चपला काढल्या, कोट खुंटीवर ठेवला, आणि हासत हासत ते बापूंजवळ येउन बसले. माजघरातून दुधाचे पेले आले. रिकामा पेला लोडाजवळ ठेवून मास्तर म्हणाले, " बापू, बाकी काही म्हणा, काल रात्री तुम्ही खूपच कमाल केलीत. मागच्या आठवणी, विनोद यात पहाट केव्हा झाली हे कळलेच नाही. अहो विड्यांची तीन बंडले आपण संपविलीत आणि तुम्ही गेल्यावर ही म्हणाली ,'' अहो, गप्पा मारायच्या त्याला काही सुमार? पहाटेपर्यंत? हे ऐकत, मास्तरांच्या बोलण्याला दाद देत बापू एकीकडे कपाळावरील घाम पुसत होते.


आदल्या दिवशी चकवा मास्तरांच्या घरी गेला होता. मास्तरांशी गप्पा मारून, बिड्या ओढून, पहाटेस निघून गेला. चकवा ही काय अजब चीज आहे हे बापूंना आज कळाले होते.


लहानपणी वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्याच शब्दात. चकवा हे कोकणातील भूत असते.

रोहिणी

सराफ

ग्वाल्हेरमधल्या एका नामांकित सराफाला एकदा चांदीत तोटा आला. ठरल्याप्रमाणे गिऱ्हाईकाला त्याला चांदीचा माल देता येणार नव्हता, त्यामुळे त्याची पत जाण्याची वेळ आली होती. चार दिवसात तेव्हढी चांदी मिळवणे व त्याच्या वस्तू करून देणे जमणार नव्हते. सराफास काही सुचेना. त्याच्या दुकानातील नोकराच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने धीर करून मालकास सांगितले "तुम्हाला काळजी लागली आहे हे मला दिसत आहे. मी एक सांगू का? माझ्या माहितीत एक गृहस्थ आहे. तो तुम्हाला पाहिजे असलेली चांदी देईल. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. मालक म्हणाला "असा कोण गृहस्थ आहे की जो मला हवी असलेली चांदी पाहिजे त्या वजनात देऊ शकेल? चल मला दाखव. मी तुझ्याबरोबर येतो.


ठरल्याप्रमाणे नोकराबरोबर तो निघाला. जवळच्या गावच्या वेशीजवळ एक लहान झोपडे होते. तिथे ते गेले. झोपडीभोवती काटेरी कुंपण होते. ते दोघे आत गेले. समोरच एक गृहस्थ डोक्याला फडके गुंडाळून एका कांबळ्यावर बसला होता. नोकराने व सराफाने त्याला हात जोडून वंदन केले. नंतर ते दोघे खाली बसले. त्या गृहस्थाकडे पाहून सराफास शंका वाटू लागली की हा काय मला चांदी देणार? नोकराने सराफाची अडचण त्यास समजावून सांगितली. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, " मी सांगतो तसे करणार असाल तर मी आपल्याला हवी असलेली चांदी उद्या देतो " सराफाने होकारार्थी मान हालवली.
तो म्हणाला, " आज रात्री तुम्ही कांबळ्यावर झोपा. कुलदैवतेचे स्मरण करा. सकाळी कांबळ्याखाली तुम्हाला हवी असलेली चांदी तुकड्यांच्या स्वरूपात मिळेल. सराफ म्हणाला " चालेल. मी दर महिन्याला एक किलो चांदी परत करीन" "चालेल. जा आता तुम्ही. थांबू नका." गृहस्थ म्हणाला.


त्या गृहस्थाने सांगितल्याप्रमाणे सराफाने केले. दुसऱ्या दिवशी त्याला कांबळ्याखाली साडेचार किलो वजनाचे तुकडे दिसले. त्यातून त्याने आलेली ऑर्डर पूर्ण केली. एका महिन्यानंतर तो एक किलो चांदी घेऊन त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या गृहस्थाच्या झोपडीत शिरणार तोच तो गृहस्थ आतून म्हणाला "तिथेच थांब. आंत येऊ नकोस. मागील दारी एक विहीर आहे. त्यात ती चांदी टाक. मला पोहोचेल." सराफ चांदी घेऊन मागील दारी गेला. विहीर शेवाळ्याने भरली होती. तो एक मिनिट उभा राहिला. मनाचा हिय्या करून त्याने ती चांदी विहिरीत टाकली व निघून गेला. चार महिने त्याने एक किलो प्रमाणे चांदी विहिरीत टाकली. आता फक्त अर्धा किलो पुढील महिन्यासाठी उरली. तो मनाशी म्हणाला," अर्धा किलोच राहिली आहे. नाही दिली तर काय होणार आहे? म्हणून तो पुढील महिन्यात गेलाच नाही.


पण पुढच्या महिन्यात एक दिवस उठून पाहतो तर काय त्याच्या शोकेसमधली एक चांदीचा तांब्या व एक ताम्हण याची राख झाली होती. तो तसाच त्या गृहस्थाकडे गेला. सराफ त्या झोपडीत शिरणार तर आतून आवाज आला. " आत येऊ नकोस. मी तुझा तांब्या व ताम्हण कालच नेले आहे." हे ऐकून सराफ थक्क झाला.


टीपः ही गोष्ट खूप पूर्वी एका आजोबांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितले की ही एक सत्य घटना आहे. त्या गृहस्थाने सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्यामुळे त्याला असे करता आले. कुणाला माहीत आहे का की सिद्धी म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते. त्याचा उपयोग कसा केला जातो. वगैरे.

बालगोष्ट (३)

ढोंगी बगळा

उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला.


सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले. काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले.

दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले.हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली. खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे."


अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.

कूकी

अहो, ही पाककृती नाही. कूकी म्हणजे कुलुपांचे किस्से.

अगदी पूर्वी दरवाजाला आधी कडी व त्याला कुलुप लावत असत. नंतर दरवाज्यालाच लॅच असलेली दारे निघाली. या दरवाज्यांना बाहेरुन कडी लावुन कुलुप नाही लावले तरी चालते, फक्त दार ओढुन घ्यायचे, पण त्याची चावी मात्र आठवणीने आपल्याकडे असायला हवी नाहीतर पंचाईत.

असेच पंचाईत झालेले एक-दोन किस्से सांगते. iitb ला आम्ही रहात होतो. शेजारीच माझी स्वरदा मैत्रीण रहायची. त्या दिवशी रविवार होता. सकाळी चहा, बाकीचे आवरणे झाल्यावर स्वरदा काय करते, जरा जाउन गप्पा मारु, म्हणुन तिच्या दारावर टकटक केले. ती हातात कुंचा घेउनच अवतारात बाहेर आली,म्हणाली जरा साफसफाई करत आहे. माझ्याशी गप्पा मारतच दरवाज्याजवळ उभी होती. तिच्या घरातील २-४ झुरळे तिने कुंच्याने बाहेर काढली. बाहेरच ती झुरळे इकडेतिकडे फिरत होती. गप्पा मारताना तिचे अगदी बारीक लक्ष होते त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना तिला परत आत येऊ द्यायचे नव्हते. त्यातले एक हुशार झुरळ तिच्याकडे येत असताना तिला दिसले. तिने त्याला डोळ्यानेच दटावले. ते परत मागे फिरले. ते परत आल्यावर शुक-शुक करत त्याला घालवून देत होती. एकीकडे आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. आता तर ते सुसाट धावत सुटले तिच्या घरात यायला. तिने चपळाईने त्याला ए-ए-ए- थांब करत जोरात दार लावुन घेतले. झुरळच ते, ते थोडेच बाहेर थांबणार आहे. ते दरवाज्याच्या फटीतून चपळाईने आत गेले, आणि ती बाहेर राहिली. चावी घरातच राहिली होती. तिचा नवरा लेंग्यावरच चक्कर मारायला बाहेर गेला होता. तो परत आला, तर हा गोंधळ झालेला. दुसरी चावी त्यांनी तिच्या बहिणीकडे ठेवली होती सांताक्रुझला. मग विनायकची पँट घालुन तो दुसरी चावी आणायला गेला.....


iitb ladies hostel ला लग्न करून आलेल्या phd विद्यार्थ्यांकरता रहायला जागा दिली होती. चाळीसारख्या एकाशेजारी एक अशा खोल्या होत्या. त्यातल्या २-२- खोल्या ४-५ जोडप्यांना दिल्या होत्या. त्यातील एक खोली झोपायची आणि एक स्वयंपाकाची केली होती. त्यावेळेला पॅडलॉकची कुलुपे होती. कडी लावल्यावर कुलुप कडीमधे घालुन दाबायचे. 'टक' असा आवाज येतो, म्हणजे कुलुप लागले. कुलुप उघडायलाच फक्त चावी लागते. त्या दिवशी मी व वि बाहेरुन खूप खाउन आलो होतो. भेळपुरी,पाणीपुरी, रगडापॅटीस , त्यामुळे जेवणाची भुक नव्हती. कॉफी पिउन झोपलो. रात्री १२ वाजता खूप भुक लागली, म्हणून स्वयंपाक खोलीचे दार उघडायला गेलो तर लक्षात आले की त्या कुलुपाची चावी त्या खोलीच्या आतच राहिली आहे. नंतर रखवालदाराकडून 'हॅकसॉ' आणुन कुलुप कापले. नंतर कूकर लावुन आमटी भात खाल्ला.
असे चाव्यांचे बरेच किस्से आहेत. सगळे सांगत नाही, नाहीतर म्हणाल काय बोअर मारत आहे ही.


रोहिणी

नाडीवर्क पडदा

साहित्यः पडद्यासाठी गडद रंगीत कापड, पांढऱ्या रंगाची पसरट नाडी, दाभण, पसरट नाडी सुईच्या टोकातून आत जाईल अशी सुई, भरतकाम करताना कापड ताठ रहाण्यासाठी वापरतो तशी लाकडी रिंग.

या पडद्यासाठी पूर्ण गडद व रंगीत रंगाचे कापड निवडणे. असा रंग निवडायचे कारण पांढऱ्या रंगाची नाडी गडद रंगावर उठून दिसते. गडद रंग उदा. हिरवा, निळा शाई रंग, तपकिरी, मरुन(लाल+काळा). मी मरुन रंग निवडला होता.


संपूर्ण पडदाभर छोट्या पाकळ्या-पाकळ्यांचे डिझाइन छापणे. (उदा. जाईच्या फुलांच्या पाकळ्या) पाकळीच्या दोन्ही बाजुने दाभणाने भोके पाडणे. पाकळीच्या एका टोकाकडून वर नाडी घालून दुसऱ्या टोकाकडून ती खाली घालावी. अशा प्रकारे सर्व पाकळ्या नाडीने भराव्यात. डिझाइनमधल्या सर्व पाकळ्यांना जोडणाऱ्या रेषा साखळी पध्दतीने रेशीम दोऱ्याने भराव्यात. नाडीवर्क करताना लाकडी रिंगचा वापर करणे आवश्यक आहे.


सर्व पाकळ्यांच्या चारही बाजुने पाकळीच्या आतच अगदी छोटी पांढऱ्या दोऱ्याने एकेक टीप घालावी, म्हणजे पडदा धुतला तरी पाकळ्या ताठ रहातात. साखळी पध्दतीने भरणाऱ्या रेषांचा रेशीम दोरा पडद्याच्या रंगाच्या विरुध्द घ्यावा, म्हणजे चांगले दिसते. पडद्याचा रंग आणि रेशीम दोऱ्याचा रंग यांची रंगसंगती जुळली पाहिजे. (मरुन रंगाला गडद नारिंगी रंग) पडद्याचा रंग गडद रंगीत असलाच पाहिजे असे नाही. काही पडदे मी फिक्या रंगाचे पण पाहिले आहेत, त्यावर पण पांढरी नाडीवर्क चांगले दिसते. उदा. करडा, अबोली.


विवाहोत्सुक मुलींनी रुखवतात ठेवण्यासाठी हा पडदा करायला हरकत नाही.


रोहिणी