Tuesday, April 29, 2008

मॉप्स

अधिक माहिती इथे पहा. MOPS means Mothers Oriented Preschoolers.

मॉप्स दर महिन्याच्या दुसऱ्या गुरवारी भरतात. त्याकरता एक चर्चमध्ये जागा घेतली जाते. त्याची जाहिरात डेकेअरच्या दरवाज्याजवळ आधी लावली जाते. इथे मला काम करण्याची संधी मिळाली त्याचा एक छोटा अनुभव मी इथे देत आहे.

तर या मॉप्समध्ये आया त्यांच्या मुलांना घेऊन येतात व त्या मिटींगमध्ये सहभागी होतात. त्या दोन तासांच्या मिटींगकरता त्यांच्या मुलांना सांभाळण्याची सोय केली जाते. हे मॉप्स म्हणजे एक प्रकारची जत्राच असते; आणि त्याकरता जी संचालिका असते तिला सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बेबीसीटर्स मिळवणे. या बेबीसीटर्स कॉलेज तरूणींपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत असतात.

मुलांच्या प्रत्येक वयोगटाप्रमाणे प्रत्येक खोल्यातून मुले असतात. एकामध्ये १०-१२ मुले. त्यांच्यावर लक्ष ठेवायला २ बेबीसीटर्स व त्या दोन बेबीसीटर्सना मदतीसाठी एक बाई की जी त्या वर्गाची पूर्णपणे जबाबदारी घेणारी. तर या मॉप्सची वेळ असते सकाळी ९ ते ११. भल्या मोठ्या बास्केटमध्ये बरीच खेळणी असतात. त्यातील आपल्याला हवी ती खेळणी त्या वर्गाकरता घेऊन जायची. वर्गामधे लहान मुलांच्या dvd असतात. त्या एकीकडे चालू करायच्या. शिवाय टेबल खुर्ची. बेबीसीटर्सना कॉफी केक, चॉकलेट ठेवलेले असतात. दरवाज्याच्या आतील बाजूस त्या मुलांकरता एक कार्यक्रम लिहिलेला असतो. ९ ते ९.३० dvd बघणे, ९.३० ते १० मुलांना मैदानावर खेळायला घेऊन जाणे. १० ते १०.३० मुलांची न्याहरी, १०.३० ते ११ त्यांच्याकडून हस्तकला करवून घ्यायची. त्या मुलांकरता न्याहरीसाठी टेबलवर ऍपल ज्युस, गोल्डफिश, चिमुकल्या कागदी डीश व चिमुकले कागदी ग्लास असतात.

९ ला मॉप्स सुरू असला तरी सर्व बेबीसीटर्सना ८.३० ला यायला सांगितले जाते. मग ज्या वर्गावर जी मुले येतील त्यांच्या शर्टाच्या मागच्या बाजूस एका स्टीकरवर त्याचे नाव लिहून तो चिकटवायचा. त्याचे चिमुकले दप्तर घ्यायचे व ते टेबलावर ठेवायचे. त्या चिमुकल्या दप्तरावर पण स्टीकर चिकटवून त्यावर त्याचे नाव लिहायचे. हे सर्व त्या वर्गावरची प्रमुख बाई असते ती करते. आणि त्या वर्गाचे नंतर दार लावले जाते, म्हणजे मग घाला काय गोंधळ घालायचा तो.

तर अशा या मॉप्सला आम्ही तिघी जायचो. मी, रेणुका व प्राची. महिन्याचा पहिला गुरवार गेला की मॉप्सची संचालिका आम्हाला दूरध्वनी करायची, तुम्ही येत्या गुरवारी मोकळ्या आहात का? मॉप्सला याल का? मी मनातल्या मनात " हो हो. तु कधीही बोलाव आम्हाला. आम्ही इथे रिकामटेकड्याच बसल्या आहोत." आम्ही तिला "हो, येऊ ना! अगदी नक्की येउ मॉप्सला आम्हाला पण खूप आवडते" असे सांगितल्यावर मग तिही बरेच वेळा आमचे आभार मानायची. मग आमच्या तिघींचे एकमेकींना दूरध्वनी , " काय गं तुला आले का गं मॉप्सचे बोलावणे?" यात मुलांशी मनसोक्त खेळणे व एकीकडे आमच्या गप्पा.

वर्ग सुरू झाला की एक विडिओ कॅसेट लावायची. मग ज्या मुलांना खरोखर कॅसेट पाहण्यात स्वारस्य आहे ती आमच्या मांडीवर येऊन बसायची. काही उभे राहून पहायचे तर काहींना बसायला खुर्ची लागायची. अधुनमधून मग त्या मुख्य बाईची वर्गावर चक्कर "सर्व काही व्यवस्थित चालले आहे ना!!" मग अर्ध्या तासाने मैदानावर घेऊन जायचे. त्यातील काहींना जायचे नसायचे, तर काही इतके उत्साही की आमच्यापुढेही जायला तयार. कितीही कडाक्याची थंडी असली तरीही मुलांना खाली मैदानावर घेऊन जायचे. त्या १०-१२ मुलांना (वय वर्षे २-३) खाली न्यायचे म्हणजे आमची कसरत. सगळ्यांना साखळी पद्धतीने हातात हात धरायला सांगायचे. मग एक सर्वात पुढे व एक सर्वात मागे. आमची वरात वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्याकडे मैदानावर जायला. त्यातून मग ती साखळी तुटायची. खाली उतरताना काही जण रूसून जिन्यातच बसायचे, कारण त्यांना जायचेच नसायचे. असा तो अर्ध्या तासाचा कार्यक्रम पार पाडायचा.

नंतर न्याहरी. न्याहरी मध्ये मुलांना खुर्चीवर बसवायचे. चिमुकल्या डीशमध्ये गोल्ड फिश व ग्लासमध्ये ऍपल ज्युस ठरलेले. एका वेळी २-३ च गोल्ड फिश, ते संपले की परत २-३ , जसे आपण चिमण्यांना दाणे टाकतो ना! अगदी तसेच. मग ते गोल्ड फिश खाता खाता अर्धा तुटून खाली पडला की ही मुले लगेच खुर्चीच्या खाली उतरून तो चिमुकला तुकडा वेचून खाणार. खाली पडलेले अजिबात खायचे नाही असे बजाऊन सांगत असताना सुद्धा ती मुले तेच करणार आणि मग त्यांना ओरडले की निर्विकार चेहरा करून बघणार. ही सर्व खाण्याची आवरा आवरी संपली की मग हस्तकला. यात चित्रे रंगवणे, वेगवेगळ्या आकाराचे स्टीकर्स चिकटवायला देणे. यात काही मुलांना खूप स्वारस्य असते, अगदी आपणहून मागून घेऊन स्टीकर्स चिकटवणार. मग आपण त्यांचे कौतुक केले की एकदम खुश! बाकीच्या मुलांची हस्तकला आपणच करायची आणि कौतुक करायचे वा! किती छान केले आहे.

असा हा दोन तासांचा वेळ खूप छान जायचा. मुलेही खुश आम्हीही खुश! त्या मुलांचे पालक न्यायला आले की मुले अगदी आनंदात त्यांनी केलेली हस्तकला दाखवायचे. सरतेशेवटी निघताना खेळायला घेतलेली सर्व खेळणी त्या भल्या मोठ्या बाक्सेटमध्ये ठेवायची. तिथे आमच्याकरता ठेवलेले चॉकलेट, कूकीज , कॉफी घेऊन आम्ही पण निघण्याच्या तयारीत, दोन तासांचे कॅश पैसे घेऊन शॉपिंगला.