Sunday, October 18, 2015

१८ ऑक्टोबर २०१५


मागच्या आठवड्यात डाऊन टाऊन ला गेलो तर रंगांची बहार होती. फॉल रंगाची पिवळी झालेली पाने फूटपाथच्या दोन्ही बाजूने होती. मांडव घातलेला जणू असे दिसत होते. काल आणि आज हवा स्वच्छ आणि सुंदर होती त्यामुळे दोन्ही दिवस छान गेले. नाहीतर मागच्या तीनही वीकेंडला गचाळ आणि ढगाळ हवा आणि पाऊसही ! सूर्यप्रकाश असतो तेव्हा खरेच खूप छान वाटते आणि
सूर्यप्रकाशामध्ये जबरदस्त थंडी असली तरीही चालते. काल २६ इंटरस्टेला असलेल्या एका लोकल पिझ्झा गृहात गेलो. चविष्ट पिझ्झा आणि सलाडही छानच होते. आज ग्रीनवीलला गेलो. कणीक संपायला आली होती आणि इंडीयन भाज्याही घेता येतील म्हणून गेलो. तिथे गेल्यावर एका भारतीय उपहारगृहात जेवलो. साधारण ४ वर्षाने या उपहारगृहात गेलो होतो. जेवण छानच होते. शिवाय गोसरी, भाज्याही ताज्या मिळाल्या. 
ग्रीनवीलला आलोच आहोत तर तिथली एक पार्क बघण्याचे ठरवले. पार्क खूपच आवडून गेली. तिथे नदीही वाहते आणि ती धबधबा बनून वाहते. शिवाय आजूबाजूला चालायलाही बरीच जागा आहे. हिरवळ आहे. सर्व बाजूने धबधबा पाहिला. चालणे झाले. फोटो सेशनही झाले. अर्थात ते व्हायलाच हवे ना !


 ही पार्क लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण जोडपी, अश्या सर्वांकरता छान आहे. मागच्या वीकेंडला छान रंग दिसले म्हणून काल संध्याकाळी डाऊन टाऊनला फिरायला गेलो तर रंग उतरले होते. एक झाड मात्र नारिंगी रंगाच्या पानाने भरून गेले होते. त्याचा फोटो काढला.  शिवाय ही जी पार्क बघितली तिचे नाव आहे फॉल पार्क. तिथल्या धबधब्याचे काही विडिओ शूटींग घेतले. ही पार्क खूप आवडून गेली. एकूण वीकेंड खूपच छान गेला आहे त्यामुळे उत्साह आला आहे.

Sunday, October 04, 2015

४ ऑक्टोबर २०१५

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला लागेल. काल सकाळपासून वादळाचे वारे आणि पाऊस साऊथ आणि नॉर्थ कॅरोलायना मध्ये येणार होते त्याच्या वार्ता वेदर चॅनलला ऐकत होतो. तसे तर गेला आठवडाभर ढगाळी वातावरण आहेच आणि अधुनमधून पाऊसही आहेच.  शनिवारी ते सोमवार संध्याकाळपर्यंत वारे आणि वारेमाप पाऊसही पडणार याच्या बातम्या तर येत होत्याच. शिवाय पॉवर जाण्याची शक्यता आहे असेही सांगत होते. शनिवार सकाळपासूनच पावसाची रिप रिप चालूच होती. दार उघडून पाहिले तर हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. शनिवार रविवारची कामे तर असतातच पण थोडी पुढेमागे झाली तरी चालतात पण या वीकेंडला मात्र कामे करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. त्यात शिवाय पॉवर गेली तर? म्हणून दोन्ही वेळेचा स्वयंपाक करणे हे आपसूकच आले. पोळी, भाजी, भात आमटी केला. पॉवर होती म्हणून बरे झाले. घरात बसून बसून उबायला झाले होते. बाहेर जाऊन  घरा जवळच असलेल्या पिझ्झा गृहात जावे का असा विचार करत होतो. पण त्या आधी गोसरी उरकावी म्हणजे बाहेर पडावे म्हणून पावसातही बाहेर पडलो. ग्रोसरीचे काम झाले. बाहेर जेवायला न जाता रात्रीच्या जेवणाला भाजणीची थालिपीठे केली आणि व्हॅक्युमिंग केले. ढो ढो साठलेली भांडीही घासली. खूप वैतागायला झाले होते.

 दिवसभर पाऊस पडल्याने आणि वेदर वरच्या बातम्या पाहून पाहून उद्या म्हणजे रविवारी काय परिस्थिती आहे हे बघत होतो. रविवारी पावसाचा आणि वाऱ्याचाही जास्त दणका होता. रविवारी सकाळी उठलो तर कळाले की वाऱ्याने दिशा बदलली आहे. त्यामुळे जरा हायसे वाटले. आज दिवसभर ढगाळी वातावरण होते पण पाउस अजिबात नव्हता. काल कामेच कामे झाल्यामुळे आज बाहेर जेवायला पडायचेच आणि नंतरही बाहेर पडायचे असे ठरवले. आजचा पिझ्झा मात्र खूप समाधान देवून गेला. पूर्वी आम्ही इंटर स्टेट हायवे २६ वर लोकल पिझ्झा खाल्ला होता. तोच आज खायचे ठरवले. ३ महिन्यांपूर्वी आम्ही ज्या शहरात आता राहत आहोत तिथे आलो होतो आणि जागा आम्हाला या शहरात मिळाली आणि ती सुद्धा आयत्या वेळी. कंपनीच्या जवळ जागा मिळाली तर नाहीच पण जागा पाहण्याकरता गेलो आणि आम्ही ती आता रेंटने दुसऱ्यांना देवू केली आहे त्यामुळे झालेला मनस्ताप आणि नंतर या शहरात मिळालेली जागा पाहून जेव्हा परतीच्या वाटेवर निघालो तिथे आधी पेट्रोल भरू या आणि नंतर जेवणासाठी एक्झीट घेऊ या असे ठरवले आणि अचानक आम्हाला छान पिझ्झा मिळून गेला होता.
 फ्लॅट रॉकचा पिझ्झा तर छान होताच. शिवाय तिथले सॅलडही उत्तम होते. उकडलेली भेंडी. उकडलेले बीट, काकडी , टोमॅटो व कांद्याचे काप, ब्रेड क्रंब, दाक्षे सर्व काही छान होते. त्यामुळे आजची दुपार छान गेली. आल्यानंतर थोडे आडवे झालो. उठल्यावर नेहमीप्रमाणेच चहा घेतला. पाय मोकळे करण्याकरता बाहेर पडलो ते २ तासांनी घरी आलो. आमच्या अपार्टमेंटच्या लागूनच एक फूटपाथ आहे तो इंगल्स दुकानापर्यंत जातो. तिथे जाऊन येऊन माझ्या चालीने दीड तास लागतो. चालताना इतके काही छान वाटत होते. कैदेतून सुटल्यासारखे वाटत होते. गार सुखद हवा चेहऱ्याला आनंद देत होती. पाय चालून खूप मोकळे झाले. बाहेरच्या मोकळ्या हवेतला श्वासोच्छवास उत्साह वाढवत होता. वाऱ्याने आणि पावसाने दिशा बदलली म्हणून, नाहीतर आजही घरीच बसून आणि पॉवर जाईल म्हणून दोन वेळेचा स्वयंपाकही करावा लागला असता.
 शिवाय बाहेर न जाता घरी बसून बसून उबसल्यासारखे झाले असते. बाकी ठिकाणी मात्र हाहाःकार माजला आहे. ग्रीनविल, शार्लट , wilmington, Charleston आणि कोलंबियात अजूनही पाऊस चालू आहेत आणि ठिकठिकाणी पूर आले आहेत. घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. रस्त्यावरच्या साठलेल्या पाण्यात गाड्या तरंगत आहे. तर घराघरामध्ये पाणी आले आहे. नद्यांना भरपूर पूर आले आहेत.  Hurricane Joaquin , Category 4 हे जबरदस्त वादळ कुठेही अजून थडकले नाहीये. ते आता समुद्रात गेले तरी सुद्धा इतका पाऊस काय , वारा काय, न पूर काय. हे वादळ आले असते आणि थडकले असते तर प्रचंड हानी झाली असती. पावसाचा जबरदस्त फटका मात्र काही शहरांना बसला आहे.