Saturday, February 25, 2012

Art Photography
Smith Creek Park (2)

Friday, February 24, 2012

Smith Creek Park (1)


आमच्या शहरामध्ये एक तळे पूर्वीपासूनच आहे. त्यावर एक चालण्याचा मार्ग काढला आहे त्यामुळे तिथे जाऊन छान चालणे होते. आजुबाजूला हिरवीगार झाडे, वर निळे आकाश व मध्ये तळे असा हा परिसर खूप रमणीय आहे. तळ्याभोवतीने चालताना तळ्याकडे बघत बघत खूप छान चालणे होते.

Monday, February 20, 2012

अनामिका (७)
मॉलच्या जवळच असलेल्या एका इराण्याच्या हॉटेलमध्ये अमितसंजली भेटायचे ठरवता. हे हॉटेल एका गल्लीबोळात असते. अमित म्हणतो या हॉटेलमध्ये मी मेहुण्याबरोबर एक दोन वेळा आलो आहे. एकदम शांतता असते इथे. शनि-रविवारी गर्दी असते असे मला मेहुणा सांगत होता. चल निघू मी आता? "थांब ना थोडावेळ. एक १० मिनिटांत निघू आपण. मी मॉलकडे वळते व तू घरी जा. बाय द वे तू मुंबईत कोणाकडे राहतोस? अमित तिला सांगतो "मुंबईत बायकोच्या माहेरीच राहतो. यावर्षी ती आली नाही. माझ्या आईची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी एकटाच आलो आहे. संजली म्हणते बरं बरं उद्या १० ला नक्की भेटूया. मी मैत्रिणींना सांगते की मला नातेवाईकांकडे जायचे आहे. तू मात्र वेळेवर हजर राहा हं. इथेच भेटू आणि मग नंतर जाऊ हॉटेलमध्ये. काही वेळाने ते दोघे निघतात. मैत्रिणींबरोबर भटकून संजली व तिच्या मैत्रिणी उशीरानेच घरी येतात. लग्नघरी गप्पा टप्पा करून उद्या मी सकाळी नाही गं, मला इथे राहाणाऱ्या सासूबाईंच्या बहिणीकडे जायचे आहे. फोनवरून त्यांनी मला सांगितले की तिला भेटून ये म्हणून. जेवण उरकून संजली झोपायला जाते. झोपताना विचार करते हे असे एकदम काय झाले? म्हणजे अमित कुठे असेल काय करत असेल असे मनात येत होते, पण लग्न झाल्यापासून निवांत असा विचार करायला, कुणाशी बोलायला, कोणाकडे जायला वेळ कसा तो मिळालाच नाही आपल्याला. मध्ये इतकी वर्षे गेली आणि अचानक असा हा योगायोग! किती छान! पण बोलताना तो असे काय म्हणाला की मला तुझे लग्न झाले ते माहीत आहे पण आलो नाही, का आला नसेल हा? उद्या विचारूच आपण त्याला. उद्या साडी नेसायची की ड्रेस घालायचा या विचारात तिचे हिरवीगार व त्याला मरून रंगाचे काठ असलेली साडी नेसण्याचे ठरते. सकाळी उठल्यावर पटापट आवरून मॉलच्या गेटपाशी उभी राहते. १० वाजून १० मिनिटे होतात तरी अमितचा पत्त्ता नसतो. याला फोन करावा का? असे म्हणून ती नंबर डायल करते.


नंबर डायल करून इकडे तिकडे बघत असतानाच तिला समोरून अमित येताना दिसतो. मोरपंखी रंगाकडे झुकणारा टी शर्ट व काळी पँट त्याने घातलेली असते. उंच व सावळ्या रंगाचा अमित टी शर्ट मध्ये छान दिसत असतो. संजली मनातच किती उंच व अंगाखाद्याने मजबूत आहे हा, मस्त दिसतोय, फुलशर्टपेक्षा याला टी शर्ट जास्त खुलून दिसत आहे. अमितही संजलीकडे बघत बघत येत असतो. मनात म्हणतो कोणताही रंग घ्या हिला शोभूनच दिसतो. पारदर्शक हिरव्यागार साडीमध्ये तर ही किती गोरी आणि नाजूक दिसत आहे! "चल. उशीर झाला ना मला." "नाही रे, मी पण इतक्यातच आली आहे" दोघेजण इराण्याच्या हॉटेलमध्ये येतात. तिथला मालक म्हणतो "साहेब तुम्ही वरच्या फॅमिली रूममध्ये जाऊन बसा. तिथे एकदम निवांतपणा भेटेल आपल्याला" संजली अमित हॉटेलमध्ये येऊन बसतात व अमित दोन चहाची ऑर्डर देतो. थोड्यावेळाने चहा येतो. चहा घेता घेता बोलायला कुठून व कशी सुरवात करायची अशा विचारात असताना संजली विचारते अरे तू म्हणालास की माझे लग्न झालेले तुला माहीत आहे तर तू का आला नाहीस लग्नाला? अमित म्हणतो तू काल विचारलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे का नाही यावर मी खूप विचार केला पण सत्य परिस्थिती तुला समजायचा हवी त्यामुळे मी आता तुला सविस्तरच सांगतो. तुझ्या लग्नाची पत्रिका आमच्या घरच्या टेबलावर पाहिली आणि माझ्या मनाची अवस्था काय झाली हे तू विचारू नकोस. मी तातडीने आलेली नोकरी स्विकारली व बंगलोरला गेलो.

अंग खरं सांगू का संजली मला तुझ्याशीच लग्न करायचे होते. मला तू खूप आवडायचीस. डोळे विस्फारून संजली त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते अरे तू पण मला खूप आवडायचास पण लग्न वगैरे माझ्या डोक्यातच आले नाही आणि त्या दृष्टीने मी तुझ्याकडे कधी पाहिलेच नाही. अमित म्हणतो अंग तू खूप लहान होतीस आणि तुला आठवते का? तुळशीचे लग्न? "हो हो आठवते की. कित्ती मजा केली होती ना आपण सर्वांनी मिळून" त्यादिवशी मी तुला पहिल्याप्रथमच साडीत पाहिले. तू खूप सुंदर दिसत होतीस आणि त्यादिवशीच मी मनाशी ठरवले की लग्न करायचे ते तुझ्याशीच. पण अगं त्यावेळेला माझे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते आणि नोकरीशिवाय कसे काय मी तुला मागणी घालणार होतो? आणि दुसरे महत्त्वाचे ऐक. तुझ्या सासुबाई म्हणजे त्या आत्याबाई त्यांना मी तुझ्याशी बोलतो ते कधीही आवडायचे नाही. मला ते चांगलेच जाणवायचे. त्यांना असे वाटायचे की म्हणूनच मी त्यांच्या घरी येत आहे. असे काहीही नव्हते. अनिल माझा शाळेपासूनचा मित्र आहे. आणि तिथे तर तुमच्या सर्व भावंडांचा आणि अनिलच्या मित्रांचा अड्डा असायचा. अर्थात जास्त करून लहानपणी. नंतर काही कार्यक्रमानिमित्तानेच भेट व्हायची आपली. आणि सगळ्यात कहर म्हणजे आत्याबाई जेव्हा आजारी होत्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो तर त्यांनि चक्क मान फिरवली दुसरीकडे मला बघून. तेव्हापासून मी ठरवले की या घरात कधीही पाऊल टाकायचे नाही. मला काय स्वाभिमान आहे का नाही? माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझ्या घरी मी पेढे द्यायला आलो होतो. तुझ्या बाबा मला सारखे म्हणत एकदा येऊन जा आमच्याकडे. तर पेढे द्यायच्या निमित्ताने मी आलो होतो आठवते का? त्यानंतरही एक दोन वेळा मि तुला माझ्या मनात काय आहे ते सांगणार होतो आणि तुझेही मत जाणून घेणार होतो. मलाही आता ते आठवत नाहीये. तुला आठवते का ते बघ. आता एकूणच या सर्व गोष्टी बोलून काहीही फायदा नाहीये. जाऊ दे.


हे सर्व ऐकत असताना संजली तिच्यातच इतकी हरवून गेलेली असते की तिला हसावे की रडावे हेच कळेनासे होते. अमितही मध्येच थांबतो आणि म्हणतो अगं कुठे हरवलीस. सॉरी मी हे काय बोलून बसलो. चहा थंड झाला तुझा. अजून एक मागवतो. तितक्यात वेटर येतो. साहेब मालकांनी विचारले आहे की जेवणार का? राईसप्लेट तयार आहे. नको. जेवण नको. संजली तू बटाटेवडे खाणार का? ती मानेनेच होकार देत आणि थोड्यावेळात त्यांच्या टेबलावर गरम गरम बटाटेवडे येतात. संजली सॉरी, मी जरा जास्तीच बोललो. तू विचारलेस म्हणून मी सांगितले नाहीतर मी हे कधीही बोललो नसतो. इतक्या वर्षांनी का होईना पण मला तू भेटलीस हेच खूप आहे. संजली म्हणते "हो हो. तू सॉरी नको म्हणूस मी सिरिअस झाली नाही. मलाही खूप आनंद झाला आहे. मला आत्याचा खूपच राग येतो आहे. तब्येतीचेही तिने नाटकच केले की काय असे वाटू लागले आहे आता मला.
चल आपण विषय बदलू. तू घरीच असतेस का? सबंध दिवस काय करतेस? नोकरी केली नाहीस का कधी? असे विचारून त्या दोघांच्या दुसऱ्या गप्पा सुरू होतात. अमितही तिला अमेरिकेतील वास्तव्याबद्दल सांगतो. बंगलोरला नोकरी करून नंतर कंपनीतर्फेच तो कसा अमेरिकेला आला आणि ती नोकरी सोडून त्याने तिथे एम एस केले, हे आणि ते असे सर्व सांगतो. दुसरा चहाही संपतो. अमित म्हणतो आपण थोडे बीचवर जायचे का? खूप दूर नाहीये. टॅक्सीने जाऊ. नंतर बाहेरच जेवण करून मी तुला तुझ्या इथल्या घरी सोडतो. संजली घड्याळात बघते आणि विचार करते आणि म्हणते चालेल. लग्नघरी आता ग्रहमख व इतर कार्यक्रम चालू असतील. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. त्याच्या आधी पोहोचले म्हणजे झाले. नाहीतरी आता तू तरी मला वरचेवर कुठे भेटणार आहेस. असे म्हणून दोघेही बीचकडे जायला निघतात.

Thursday, February 16, 2012

वास्तू (२)

माझ्या आठवणीतला पहिला पलंग तीन रुंद जाड फळ्यांचा होता. काही अंतरावर दोन बाजूंना लोखंडी दोन स्टँड होते त्यावर या तीन मोठ्या रंद आणि जड फळकुट्या टाकायच्या की झाला पलंग! त्यावर तीन गाद्या. या पलंगावर आजोबा झोपत असत. आमच्या ४ गाद्या फरशीवरच एकावर एक गुंडाळून ठेवल्या जात व त्यावर बेडशीटा पांघरल्या जात. हे सर्व भिंतीच्या एका कडेला लावत असू. त्याच्या बाजूला एक सतरंजीवर एकावर एक उशा ठेवून त्यावर पण एक बेडशीट घालत असू. बेडशीत पूर्वी पलंगपोस असेही एक नाव होते. त्यानंतर आमच्या घरी दोन सनमायका लावलेले दिवाण आले. हे दिवाणही दुकानात जाऊन विकत घेतले नव्हते. आईबाबा दोघेही शिकवण्या घेत असत. त्यातल्या काही शिकवण्या घरी जाऊन शिकवत. त्यात एक बाई होत्या त्यांच्या दोन मुलांना बाबा घरी जाऊन शिकवायचे. त्यांच्याकडे एक ६ फूट मोठा दिवाण होता व एक सिटी होती. तीही अशी सनमाईका लावलेली छान होती. त्यांच्या नातू ६ फुटापेक्षाही उंच होता त्यामुळे तो दिवाण त्यांना विकायचा होता. ती सिटी पण त्यांना काढून तिथे सोफा आणायचा होता. तर बाबांना त्यांनी विचारले तुम्ही विकत घ्याल का? मग बाबांनी विचार करून त्यांना सांगितले की आम्ही घेऊ, पैसे किती द्यायचे. तर म्हणाल्या तुम्ही द्याल ते. ५०० रुपयामध्ये हे दोन्ही दिवाण आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला काय आनंद झाला होता. हे दिवाण अजूनही आमच्याकडे आहेत. खूप सोयीचे असे हे दिवाण होते. त्यांना आतून ठेवण्याकरता जागाही होती. मग मोठा दिवाण आजोबांसाठी आणि छोटी सिटी म्हणजेच दिवाणच तो! तो आईकरता दुपारी तिला थोड्यावेळासाठी पडायला. या दिवाणावर आम्ही काही वेळा दुपारी तिघी मिळून झोपायचो. अर्थात तेव्हा तो आम्हाला तिघींनाही पुरत होता.


दोन दिवाण आले तरीही आम्ही चौघे खालीच गाद्या घालून झोपायचो. आम्ही जशा मोठ्या झालो, शाळेत जायला लागलो, तशी आईने आम्हाला कामे वाटून दिली होती. एकीने गाद्या घालायच्या तर एकीने त्या सकाळी आवरून ठेवायच्या. एकीने चहा करायचा तर दुसरीने चहा झाल्यावर कपबशा विसळायच्या. एकीने जेवणाची पाने घ्यायची तर दुसरीने उष्टी खरकटी काढायची. यात आमच्या दोघींच्यात चुरस चालायची ती म्हणजे कंटाळवाणे काम दुसरीवर कसे ढकलता येईल बरे! यात काही वेळेला सकाळी उठल्यावर जर माझी बहीण आधी उठलेली असेल आणि दात घासत असेल तर मी हळूच गुपचूप सर्व पांघरूणाच्या घड्या घालून गाद्या लावून मोकळी झालेली असायचे. आईला वाटायचे ही अजून झोपलीच आहे. माझी बहीण दात घासून व चहा पिऊन बाहेर येत्ये तर गाद्या काढलेल्या तिला दिसायच्या. मग रात्री गाद्या घालण्याचे कंटाळवाणे काम तिच्यावर येऊन पडायचे. मग तीही सुट्टीच्या दिवशी दुपारचा चहा असाच गुपचूप येऊन करायची. भांड्यांचा आवाज न करता चहाचे आधण ठेवायची. एकीकडे दूध तापत ठेवायची. मी स्वयंपाकघरात गेले की ती चहा कपबशी मध्ये गाळताना दिसायची म्हणजे कपबशा विसळण्याचे कंटाळवाणे काम माझ्यावर येऊन पडायचे. यात मग आमच्या दोघींमध्ये भांडणे व्हायची. नंतर आईने कामाचा नियम बदलला. जे काम घ्याल ते पूर्ण करायचे. मग हा नियम जरा कठीण जायला लागला. आईला नियम बदलायला लावला आणि मग आमच्यात भांडणे न होता समजुतदापणाने कामाची वाटणी होऊ लागली.


एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व आत्येमामे भावंड एकत्र असायचो. आमच्या घरी सर्वांचाच अड्डा असायचा. कोणी कॅरम खेळतयं तर कुणी बुद्धीबळ तर कोणी पत्ते. यात एक वेगळा खेळ खेळायचो तो म्हणजे जगप्रवास. हा जगप्रवास आम्ही पुढच्या खोलीला ज्या पायऱ्या होत्या त्यावर बसून खेळायचो. त्या तीन पायऱ्या म्हणजे आमची जीप. सगळ्यात खालची पायरी म्हणजे पहिली सीट व त्यावरच्या दोन पायऱ्या म्हणजे मागच्या दोन सीटा! त्यात एक मामेभाऊ जीप चालवायची ऍक्शन करायचा. वळण आले की ओरडायचा वळण आले बरं का! मग आम्ही सर्व वळण आले की कसे एका बाजूला कलले जातो त्याप्रमाणे ऍक्शन करायचो. वळण संपले की परत पहिल्या स्थितीमध्ये बसायचो. प्रवास करता करता रात्र झाली की भाऊ म्हणायचा तुम्ही सर्वांनी झोपा आता. मी एकटा जीप चालवतो. या प्रवासामध्ये आम्ही मध्ये खाण्याकरता कोको व बोर्नव्हीटा आईच्या नकळत घ्यायचो. आईला कळायचे नाही बोर्नव्हीटा आणि कोको इतका लवकर का संपतो ते! बुद्धीबळामध्ये सुद्धा खेळताना आधीच ठरवायचो मारामारी की सिरियस खेळायचे ते! मारामारी असली डाव ५ मिनिटात संपायचा. एकाने एक प्यादे मारले की दुसऱ्याने लगेच उंट मारायचा. एकाने हत्ती मारला की एकाने घोडा उडवायचा. शेवटी फक्त राजा शिल्लक राहायचा. खटाखट मारामारी. खूप हासायचो. मागे शह असल्याशिवाय मारायचे नाही या नियमाने खेळलो सिरिअसली तरी धीर संपून शेवटी मारामारी ठरलेली! कॅरममध्ये सुद्धा धमाल यायची. यात बाकीच्या खेळापेक्षा गेम हा खेळ जास्त चालायचा. एक हारला की त्यावर लगेच दुसरा बसायचा. काहीवेळा तर अगदी १/१ या मार्कांप्रमाणे टफ गेम चालायची. नीट खेळता आले नाही तर म्हणायचो हात अजून तापला नाहीये. तो तापला की मग अगदी खूप अवघड सोंगटी पण कट मारून सहज छान जायची.आई आमचे सर्व ड्रेस घरीच शिवायची. वेगवेगळ्या फॅशनचे फ्रॉक, स्कर्ट, शाळेचा गणवेश, पंजाबी सूट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या शिवायची. फुग्याचा बाह्या, उडत्या बाह्या, मॅगी व स्लिवलेस आणि गळे पण गोल, चौकोनी, पंचकोनी, व्ही, बंद गळा असे बरेच प्रकार आईने छान छान शिवलेले आहेत. हे सर्व ड्रेस बेतून झाल्यावर जे कापड उरायचे ते सर्व आई गुंडाळ्या करून ठेवायची. त्याकरता एक मण्यांची बास्केट सारखी दिसणारी पर्स होती त्यात या सर्व गुंडाळ्या ठेवायची. त्यामुळे नातेवाईकात व मित्रपरिवारात कुणाकडे बारसे असेल तर आमच्याकडून घरी शिवलेला बाळंतविडा असायचा. आईने अनेक प्रकारचे छान छान बाळंतविडे शिवलेले आहेत. पूर्वी फोटोचे एवढे अप्रुप नव्हते नाहीतर कितीतरी फोटो झाले असते बाळंतविड्याचे. नंतर बघताना किती छान वाटले असते ना! बाळंतविड्याचा फोटो व त्याखाली बाळाचे नाव लिहिले असते, त्याची जन्मतारीख लिहिली असती व त्याचाही एक फोटो बाजुला लावला असता. हा एक छंद म्हणून किती छान झाला असता ना!
क्रमश:

Wednesday, February 15, 2012

अनामिका (६)
एके दिवशी संजलीची मैत्रिण तिच्या घरी तिच्या मावसबहिणीच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला येते. तिची मावसबहीण काही दिवसांकरता संजलीच्या वाड्यात राहत असते. तिच्या कॉलेजवर तिची हॉस्टेलची सोय होते तोपर्यंत ती वाड्यात असते. त्या काळात ती संजलीची छान मैत्रिण बनते. संजलीला तिच्या कॉलेजमधल्या काही मैत्रिणी अजूनही तिच्या घरी येत असतात. त्यांच्या कॉलेजमधला एक ग्रुप असतो. काही ना काही निमित्ताने त्या एकमेकींना भेटत असतात. कधी सहलीसाठी तर कधी शॉपिंगसाठी तर कधी एखादा कार्यक्रम बघण्यासाठी. आत्ता सुद्धा सर्व जणी या लग्नाला जायचे का नाही हे ठरवत असतात.मैत्रिणीची मावसबहीण मुंबईला राहत असते व लग्नही मुंबईतच असते. लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण असल्याने संजली व तिच्या मैत्रिणी या लग्नाला जायचे असे ठरवतात. सर्वजणी मिळून कधी जायचे, काय करायचे असे बेत आखत असतात. त्या एक मोठी कारच बुक करतात. लग्ननिमित्ताने त्या सर्वजणींची एक छोटी सहलच होणार असते. लग्न मुंबईत असल्याने शॉपिंग, बीचवर जाणे, थोडीफार मुंबई भटकणे असे सर्व काही करायचे अस्त त्या ठरवतात. मैत्रिणीची मावसबहीण खूप श्रीमंत असते. लग्नाकरता तिच्या वडिलांनी काही फ्लॅटस तात्पुरते वापरण्यासाठी घेतलेले असतात. तिच्या वडिलांचा बिझिनेस असल्याने त्यांच्या मित्रपरिवारातील काही जणांनी मुंबईत काही फ्लॅटस विकत घेतलेले असतात व ते परदेशात असल्याने फ्लॅटस लग्नकार्यानिमित्ताने म्हणून मित्रांना वापरायला देत असतात. त्यामुळेच तर लग्नात कितीही पाहुणे आले तरी त्यांच्या राहण्याची सोय होणार असते.
लग्नासाठी म्हणून सर्व मैत्रिणी कारने निघतात. मधेवाटेत थोडे थांबून फोटोज काढणे, खाणे पिणे असे करत करत त्या सर्वजणी लग्नघरी येऊन पोहोचतात. त्यांचे तिथे खूपच आदरातिथ्य होते. त्यांना राहण्याकरता म्हणून जे फ्लॅटस दिलेले असतात ते पाहून तर त्या सर्वजणी खुश होतात. लग्नघरातून रात्रीचे जेवण उरकून जवळच असलेल्या जागेत की जिथे त्यांची राहण्याची सोय केलेली असते तिथे या सर्व मैत्रिणी येतात आणि आपापल्या बॅगा उघडून ड्रेस बदलतात व त्यांची गप्पा टप्पांना सुरवात होते. किती मस्त वाटतय ना इथे आल्यावर, उद्या काय करायचे, परवा केळवण आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर लग्न, त्यादिवशी तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही, हे आणि ते अशा गप्पांमध्ये रात्रीचे १२ वाजून कधी जातात हे त्यांना कळतही नाही. चला गं झोपा आता. उद्या लवकरच बाहेर पडू म्हणजे मॉल बीच असे काही ना काही असे सर्व बघता येईल. पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न कसे काय साजरे करतात याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. त्यांची मैत्रिण प्रिया व तिच्या मावसबहिणीच्या लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण यामुळेच तर हा योग आलेला असतो. त्यामुळे सर्वजणी खूपच आनंदात असतात.


उद्याचा दिवस संजलीच्या आयुष्यामध्ये लिहिलेला एक छान दिवस असेल आणि या दिवसामुळे मागच्या सर्व घडामोडींचा उलगडा होणारा ठरेल याची थोडीसुद्धा तिला कल्पना नसते. कशी असणार? आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे कोणाला माहीत असते का? सकाळी लवकर उठून न्याहरी करून सर्वजणी एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये येतात. त्या सर्वजणींना किती खरेदी करू नि किती नाही असे झालेले असते. साड्या, पंजाबी ड्रेसेस, काही आकर्षक वस्तू असे सर्व काही बघण्यात त्यांचा छान वेळ जातो. एका दुकानात तर साड्यांची आणि पंजाबी ड्रेस मटेरिअल्सची इतकी काही व्हरायटी असते की तिथे सर्वजणींची खरेदी सुरू होते. संजली म्हणते मी या सर्व पिशव्या घेऊन जाते व कारमध्ये ठेवते व थोड्यावेळाने येते तोवर तुम्ही बाकीची ठिकाणे बघा. कारमध्ये बसून मी जरा घरी फोन करून घरची खुशाली विचारते. शिवाय खरेदीच्या इतक्या पिशव्या झाल्या आहेत त्यातल्या काही पिशव्या तरी मी घेऊन जाते व कारमध्ये ठेवत असे म्हणून दोन हातात पिशव्या घेऊन, एका खांद्यावर तिची पर्स, हातात कारच्या किल्या व मोबाईल असे सर्व ओझे उचलून ती भराभरा शॉपिंग मॉलमधून बाहेर येत असते. तिने लिंबू रंगाची साडी तसाच मॅचिंग ब्लाऊज घातलेला असते, डोक्यावर गॉगल अडकवलेला असतो. छोटे कुंकू, शँपू केल्याने तिचे केसही थोडे भुरभुरे झालेले असतात.

चालत असतानाच तिला मागून एका पुरुषाचा आवाज येतो. "हॅलो, हॅलो, एक मिनिट, तुमची पिशवी" "कोण आहे? " अशा प्रश्नार्थक नजरेने ती मागे बघते आणि बघतच राहते. एकदम भांबावते. " अरे तू?? तू इथे कसा काय? " जवळ जवळ ती ओरडतेच. आणि तोही तिच्या हातातून पडलेली पिशवी तिला देत तिच्याकडे बघतच राहतो. अगं तुझ्या हातातून ही पिशवी पडली म्हणून देण्याकरता तुला हॅलो हॅलो म्हणून किती हाका मारल्या! आणि एकदम तूच अशी समोर येशील हे म्हणजे मी स्वप्न तर बघत नाही ना! असेच वाटत आहे मला. "होना! एक मिनिट. थोड्या पिशव्या घेना! आपण या कारमध्ये ठेवू व मग बोलू. संजली कारचे दार उघडून मागच्या सीटांवर सर्व पिशव्या ठेवते. "एक काम कर. तू कारमध्येच बस, मीही बसते. इथे इतकी गर्दी आहे ना! "

अमित व संजली दोघेही कारमध्ये बसतात. मोबाईल पर्समध्ये ठेवता ठेवता संजली अमितला विचारते " अरे कित्ती वर्षांनी भेटलास? कसा आहेस? कुठे असतोस? मला तुला बघून खूपच आनंद होत आहे." अमितही तिला म्हणतो "मलाही खूप आनंद होत आहे तुला बघून. कशी आहेस? तुझ्यात खूप फरक पडला आहे. एकदम मॉड बनली आहेस. " "तू मात्र अगदी पूर्वीसारखाच आहेस की रे! आणि आमच्या लग्नाला का नाही आलास? मी विचारले पण मला कोणी काही सांगितले नाही. आता तू पुण्याला ये आमच्या घरी. अमित तिला म्हणतो "अगं संजली ऐकून तर घे माझे. मी युएस मध्ये असतो. मी सध्या भारतभेटीमध्ये आलोय. आणि दोन दिवसांनी माझी फ्लाईट आहे. मी इथे काही खरेदी करण्यासाठी आलो होतो. तुझे लग्न झाले हे मला माहीत आहे, पण मी लग्नाला का आलो नाही हे नंतर मी सांगेन तुला कधीतरी" " अरे माझे लग्न तर इतके घाईत ठरले ना, मला खरे ते लग्न करायचेच नव्हते, मला खूप शिकायचे होते, प्रोफेसर व्हायचे होते. आईबाबांना मला कधीच सोडायचे नव्हते. पण ही आत्या, हिला खूप बरे नव्हते, हॉस्पिटलमध्ये होती, खूप सिरिअस होती. तिने हेकाच धरला की तूच माझी सून व्हावीस अशी माझी इच्छा आहे.
हंऽऽऽऽऽ त्या असे म्हणणारच. बरं मला एक सांग तू किती दिवस आहेस मुंबईत? " मी अजून दोन-तीन दिवस आहे. अरे मी इथे एका लग्नाला आली आहे मैत्रिणींबरोबर. माझ्या एका मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न आहे. ते परवा झाले की नंतर एक दोन दिवसत आम्ही निघू पुण्याला" अमित तिला विचारतो. मग उद्या भेटायचे का आपण? इतक्या वर्षांनी भेटली आहेस तर थोड्या गप्पा मारू. मी तुझ्या लग्नाला का आलो नाही ते मी तुला सविस्तर सांगेन. उद्या अगदी सकाळी नाही तरी दुपारपरंत भेटशील का? अंजली म्हणते, हो हो नक्की रे. मलाही छान वाटेल. पण उद्या भेटायचे म्हणजे जरा तारेवरची कसरतच आहे, पण बघते मी कसे काय जमते ते. मी तुला तसा फोन करेन. दोघेही एकमेकांचे फोन घेतात. आत्ता सुद्धा मला थोडा वेळ आहे मला. माझी थोडीफार खरेदी झाली आहे. बराच वेळ फिरतोय आम्ही. माझ्या मैत्रिणींना अजूनही काय काय बघायचे आहे.

आपण इथे कारमध्येच थोडावेळ बसू मग मी जाते. संजली एका मैत्रिणीला फोन लावते व विचारते तुम्ही कुठे फिरताय, किती वेळ लागेल... मी थोडावेळाने येते.... होहो.... " फोनवर बोलताना अमित संजलीकडे बघत असतो. मनात म्हणतो संजली मॉड वेषातही तितकीच सुंदर दिसत आहे. चेहऱ्यामध्ये तर काहीही फरक पडलेला नाही हिच्या. अगदी तसाच पूर्वीसारखा सुंदर. उद्या भेटलो की काय ते सर्व बोलू मनातले. नंतर परत भेट होईल का नाही ते सांगता येणार नाही. मी भेटल्यावर तिला किती आनंद झाला आहे हे तिच्या चेहऱ्यावरूनच कळते आहे. संजली पण फोनवरून बोलता बोलता अमितकडे बघत असते. मनात तिचेही विचारचक्र चालूच असते. अमित पूर्वीइतकाच स्मार्ट दिसत आहे. पण दोन दिवसात का जाणार हा युएसला? अनिलला भेटायला का नाही येणार हा? मुंबई पुणे जास्त अंतर कुठे आहे? मैत्रिणीशी फोनवर बोलून झाल्यावर ती मोबाईल पर्समध्ये ठेवून अमितकडे बघत तर अमित तिच्याकडेच बघत असतो "छान दिसत आहेस" असे तिला म्हण्तो. संजली गालातल्या गालात हसते आणि म्हणते कुठे भेटायचे आपण उद्या?
क्रमश:

Thursday, February 09, 2012

वास्तू (१)

आई नेहमी म्हणते या वास्तुने आपल्याला तारले आहे. अगदी खरे आहे ते! नुसते तारले नाही तर भरभरून दिले आहे. त्या वास्तुत राहिल्या आल्यानंतर २-४ महिन्यांनी माझ्या बहिणीचा जन्म झाला. मी दीड ते पावणे दोन वर्षाची होते. मी जेव्हा माँटेसरीत जायला लागले तेव्हा माझी बहीण पण हटून बसायची माझ्याबरोबर बालवर्गात यायला. मला अगदी अंधुक आठवत आहे की मी वर्गात सतरंजीवर सर्व मुलांच्यात बसले आहे आणि माझी पाटी मुळाक्षरांनी व पाढ्यांनी भरली आहे. आजोबा व आम्ही चौघे म्हणजे आईबाबा व आम्ही दोघी बहिणी खूप आनंदार राहिलो या वास्तुमध्ये. या वास्तूच्या म्हणजेच या घराच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल मी लिहिलेले आहेच. घरासमोरचे आंगण, घराच्या आजुबाजूला जी जागा होती त्यात विविध झाडांनी बहरलेली बाग याबद्दलही लिहिले आहे. जाईचे कोडकौतुक केले आहे. ते वाचल्यावर तर तुम्हाला वाटेल की ही जाई आपल्या अंगणात असती तर!

या लेखामध्ये मी घरामध्ये असणाऱ्या वस्तुंचे, आठवणींचे, गमतीजमतीचे वर्णन करणार आहे. पहिल्याप्रथम या घराला दोन्ही बाजूने तीन तीन पायऱ्या होत्या. बाहेरच्या खोलीला लागून तीन पायऱ्या होत्या. बाहेरच्या खोलीला लागून मध्ये एक भिंत होती त्यामागची खोली म्हणजे स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला लागून तीन पायऱ्या होत्या. पायऱ्यांना लागूनच सिमेंटचे उंबरठे होते. त्यावर लक्ष्मीची पाऊले रोज रांगोळीने काढली जायची. सणवार असतील तर पायऱ्यांवर दोन्ही बाजूला कडेने फुले, स्वस्तिके काढत असू. दोन मोठाल्या खोल्या व त्यामध्ये मोठाल्या फरशा होत्या. दारे खिडक्या लाकडाच्या होत्या. खिडक्यांना मध्ये आडवे लोखंडी गज होते. खिडकी आतून बंद करताना खिट्या होत्या. या खिडकीचे दार खिडकीच्या बाहेर उघडले जाई. खिडकीच्या डाव्या कोपऱ्यात आतल्या बाजुने एक क्लिपेसारखा आडवा हुक होता तो खिडकीच्या सर्वात खालच्या पट्टीवर असलेल्या हुकामध्ये अडकवला की खिडकीचे लाकडी दार स्थिर राहायचे. खिडकीतून अंगणात लावलेल्या जाईच्या फोफावलेल्या फांद्या आत येत असत. खिडकीतून समोर पाहिले की पेरूचे झाड दिसायचे.

दारांना एका बाजूने लोखंडी साखळीच्या आकाराच्या कड्या होत्या व त्या दुसऱ्या दारावरच्या लोखंडी हुकामध्ये अडकवून दारे लावले जायची. या दारांना आतूनही वरच्या बाजूला खिट्या होत्या. ही दार म्हणजे दोन आयताकृती रुंद फळ्या होत्या. ही सर्व दार व खिडक्या आकाशी रंगाच्या ऑईलपेंटने रंगवल्या जात. दुपारचे जेवण झाल्यावर थोड्यावेळासाठी आडवे झालो तर हे दार अर्धवट बंद करायचो. त्याकरता साखळीसारख्या दिसणाऱ्या कडीला एक रिबीन वेटोळा आकार देवून जोडली होती व रिबीनीचे दुसरे टोक दाराच्या दुसऱ्या फळीवर अडकवून दार अर्धवट बंद करायचो. असे केल्याने बाहेर कोणी आले का तेही कळायचे व थोडे वारेही यायचे. कोणी ओळखीचे आले तर तो दारावरची रिबीन काढून आत येई व परत दारावरची रिबीन अडकवे. हे असे माहीत झाले होते. त्यामुळे आम्हाला दार उघडण्याकरता उठावे लागत नसे.


आई सर्व प्रकारचे शिवण घरीच शिवायची, त्यामुळे दारे खिडक्यांना पडदे घरी शिवलेले असायचे. दोन खोल्यांमध्ये भिंत होती व त्यात कडेचा थोडा भाग तसाच उघडा ठेवला होता. तिथेही एक पडदा होता. बाहेर वारे वाहत असले की खिडकीच्या पदद्यामध्ये बाहेरची हवा शिरायची व पडदा खिडकीच्या आत पूर्ण फुगायचा. वारे पडले की फुग्यामधली हवा काढल्यावर फुग्याची जशी स्थिती होते तशी त्या पडद्याची व्हायची. खिडकीच्या मध्ये असलेल्या लोखंडी गजाना हा पडदा चिकटत असे. हे सर्व पडदे स्प्रिंगच्या तारेतून घातले जायचे. ह्या तारेला दोन्हीकडून हूक होते. ते खिडकीच्या वर व खाली दोन्ही बाजूना खिळे ठोकून अडकवले जायचे. दारावरच्या पडद्याला खालून झालर असायची. मुख्य दारावरचा पडदा व दोन खोल्यांमधून येण्याजाण्याकरता जी जागा होती तिथला पडदा, हे दोन्ही पडदे आई थोडे आखूड शिवायची व दोनी पडद्यांना झालर असायची. स्वयंपाकघरात छोटी बाथरूम होती. तिलाही दार नव्हते. पददाच होता. आमच्याकडे जेव्हा लोखंडी कपाट आले तेव्हा हा पडदा नेहमी पारदर्शक असायचा. तो अशासाठी की येताजाता सहज आरशामध्ये बघता यावे. आमच्या या घरी तक्ये व उशा होत्या, त्यांना पण आई अभ्रे घरीच शिवायची. महिन्यातून एकदा हे सर्व पडदे, अभ्रे धुतले जायचे. उशांना व तक्यांना शुभ्र धुतलेले अभ्रे घालताना छान वाटायचे. अभ्रे धुतल्यावर ते आटायचे त्यामुळे उशीवर अभ्रे चढवताना ती त्यामध्ये कोंबून बसवावी लागे. त्यादिवशी सर्व उशा लठ्ठ दिसायच्या!


आम्ही लहान होतो तेव्हा गॅसची शेगडी व गॅस सिलेंडर फरशीवर ठेवलेला असायचा व आई खाली बसूनच चहा व सर्व स्वयंपाक करत असे. या घरी खूप पाट होते. ते लाल ऑईल पेंटने रंगवले जायचे. आईचा एक छोटा जाड पाट ठरलेला असायचा. पाने घेताना पाट, त्यापुढे ताट, ताटात वाटी व बाजूला फुलपात्रे व दोन जाड तांबे घेत असू. त्यात एक छोटा गडुवाला तांब्या होता. या गडुवाल्या तांब्यातून आजोबा पाणी प्यायचे. जसा छोटा पाट आईचा ठरलेला होता तसाच हा गडुवाला तांब्या आजोबांचा ठरलेला होता. जेव्हा आईकडे तिची सर्व भाचवंडे जमायची त्यावेळेला जेवायला सतरंज्या घातल्या जायच्या. त्या घातताना त्याची चौपदरी गुंडाली करून घालत असु.
कपडे वाळत घालायला उंचावर लाकडी दांड्या होत्या. त्यावर कपडे वाळत घालायचो. त्याकरता दोन चार उंच काठ्या होत्या. त्यातल्याच एका काठीवर पाडव्याला गुढी उभारली जायची. काही दिवसांनी हिंडालियमचा एक चौकोनी ओटा आला. त्याला लागूनच ताटाळे असायचे व खाली डबे ठेवायला कप्पे होते. त्यानंतर कडप्पाचा ओटा आला. मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा पहिल्या कमाईचे मी सनमायकाचे डायनिग टेबल घेतले होते. त्यावर चहा प्यायला व जेवायला खूप छान वाटत होते. मोठ्या ताटांप्रमाणेच काही गोल स्टीलचे थाळेही होते. स्वयंपाकघरात दुभत्याचे कपाट होते व एक खूप मोठी लाकडी मांडणी होती. यात सर्व काही छान बसायचे. मोठे व छोटे डबे, मोठ्या व छोट्या पातेल्या, तांबे, भांडी, एक कप्पा भाजीकरता होता. खूप छान होती ही मांडणी. मांडणी व दुभत्याचे कपाट आजोबांनी एका सुताराकडून करवून घेतली होती. त्याचे डिझाईन आजोबांनी सांगितले होते.क्रमशः...

Thursday, February 02, 2012

२ फेब्रुवारी २०१२

काल लायब्ररीत जाऊन आल्यामुळे आज जायचे नव्हते, म्हणजे मी एक दिवसा आड बाहेर जाते, ते सुद्धा हवेवर व तब्येतीवर अवलंबून ठेवते, पण शक्यतोवर बाहेर पडते. काल सोनी चॅनलवर पाहिलेला पाकिजा व त्यातील गाणी आज मनात होती. झी मराठी आणि सोनीवर असलेल्या २-३ मालिका मी सध्या घरी असले तर दुपारच्या चहा घेताना पाहते. सकाळी मालिका पाहणे होत नाही. आज सारेगम असल्याने सकाळी ऑनलाईन झी मराठी पाहणे झाले. पूर्वी जी सारेगम झाली होती म्हणजे प्रसाद ओक, सुनील बर्वे आणि असेच काही कलाकार होते. त्यांची जास्त छान झाली होती सारेगम. आत्ताची जास्त छान वाटत नाहीये. ४० प्लस सारेगमचा शेवटचा सोहळा तर आम्ही चौघांनी मिळून खूपच एंजॉय केला होता. आम्ही दोघे व मित्रकुटुंबातील दोघेजण.

आज बिनसण्याचा वार होता बहुतेक. तसे खूप काही बिघडले नव्हते पण अगदी माझ्या मनासारखे झाले नाही की ते नेहमी बिघडल्यासारखेच असते. युट्युबवर गाणे रेकॉर्ड करताना मी नेहमी वेबकॅम मधून जे रेकॉरडिंग असते त्यातून करते. ते काही केल्या होत नव्हते. खरे तर पिसीवरच्या माईकमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. कदाचित युट्युबमध्येच असेल. दोन चार दिवसापासून काही गाणी मनात घोळत आहेत त्यापैकी एक डिजिटल कॅमवर रेकॉर्ड करून मग ते युट्युबवर अपलोड केले. हे खरे तर मी करत नाही. पूर्वी करायचे. अपलोडला खूप वेळ लागतो. २ ते ३ तास म्हणजे खूपच झाले. त्यात मी परवा बदामाची केलेली पावडर होती त्याच्या वड्या करायच्या ठरवल्या. त्यालाही वेळ लागला. एवढे करून वड्या पडल्याच नाहीत. परत तसाच गोळा एका डब्यात भरून ठेवला.

आज साबुदाणा भिजत घातला होता तो खिचडीसाठी. नेहमी नेहमी खिचडीच होते म्हणून आज साबुदाणे वडे केले पण तेही मनासारखे झाले नाहीत. या सर्वामध्ये दुपारचा चहा प्यायचा राहून गेला. तो नंतर केला तर तोही बिघडला. आज काय चालले आहे. काहिच धड होत नाही. आजकाल आमच्या अपार्टमेंटच्या मॅनेजर बाईंनी असा फतवा काढला आहे की बदकांना जर ब्रेड घालायचा असेल तर तो तळ्यावर जाऊनच घालायचा. अपार्टमेंटच्या समोर बदके दिसली तरी घालायचा नाही. बदकांना तर माझी इतकी सवय झाली आहे की दार उघडले आणि समोरच्या हिरवळीवर असतील तर लगेच चालत चालत येतात. पूर्वी तळ्यावर २ तास कसे निघून जायचे कळायचे नाही. सर्व बदकांमध्ये मला बसकी तपकिरी रंगाची बदके खूप आवडतात. तीच फक्त पूर्वी होती. आता तर खूपच झाली आहेत. ते पूर्वीचे दिवस खूप छान होते. आज थंडी अजिबात नसल्याने दार उघडे ठेवले होते. बदके सारखी येत होती. शेवटी न राहवून ब्रेड घेतला आणि तळ्यावर गेले. पण मला आवडणाऱ्या बदकांना ब्रेड जास्त मिळाला नाहीच. मला आवडणाऱ्या बदकांची संख्या कमी झाल्याने आता मी तळ्यावर ब्रेड घालायला जात नाही. अगदी क्वचित जाते.


अगदीच नाही म्हणायला त्यातल्या त्यात गाणे बऱ्यापैकी झाले आहे. प्रत्येक दिवस नाहीतरी वेगळाच असतो नाही का?