Sunday, February 23, 2014

२३ फेब्रुवारी २०१४


आजचा दिवस कायम लक्षात राहील असा होता. थोडा गडबडीचा, तर थोडा दमणूकीचा तर आनंद देणारा अधिक असा होता. आज  पहिल्याप्रथमच समुद्रातून सूर्य वर येताना पाहिले. सूर्यदर्शन खूपच छान झाले. आज मुख्य म्हणजे हवा चांगली होती. ढग नव्हते, वारा नव्हता, पाऊसही नव्हता. आज काहीही झाले तरी जायचेच असे ठरवले होते.





आमच्या घरापासून समुद्रकिनारा १५ मिनिटांच्या कार ड्राईव्ह वर आहे त्यामुळेच हे जमले. खूप दिवसापासून इच्छा होती ती पूर्ण झाली आणि हा सूर्योदय बघण्याचा अनुभव तर खूपच छान होता. नेहमीप्रमाणेच फोटोसेशन झाले पण तरीही प्रत्यक्ष सूर्याला वर येताना बघण्याचा आनंद काही औरच होता. दुसऱ्यादिवशी लवकर उठून कुठे जायचे असेल तर मला अजिबात झोप येत नाही तरी थोडी लागली. ३ वाजता जाग आली. घड्याळात बघितले तर अजून ३ तासांचा अवधी होता. आजचा सूर्योदय अजिबात हुकवायचा नव्हता. त्यामुळे जागीच राहिले. नाहीतर काहीवेळा पहाटे पहाटेच डोळा लागतो आणि एकदम उन्हे वर येतात. निघालो तर उजाडायला सुरवात झाली होती. तिथे पोहोचलो तर समुद्राच्या आजुबाजुला वर आकाशात गुलाबी रंग विखुरलेला दिसत होता. लालबुंद सूर्य अगदी थोडा दिसत होता. आज काय झाले होते की लालबुंद सूर्याच्या अगदी बरोबर पुढे ढगांचा एक मोठा पट्टा आला होता. आणि त्यामुळे तो त्यातून वर येईपर्यंत पिवळा कम शेंदरी रंगाचा झाला होता. पहाटे पहाटे फटफटले असे जे म्हणतात ना ते मस्त दिसत होते. ढगाच्या वर सूर्य हळुहळू वर सरकत होता.




आज आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले आणि जर पाऊस पडला असेल तर आकाशात निरनिराळे रंग जमा होतात असा अनुभव आहे. आज तसे नव्हते पण तरीही हळूहळू सूर्य वर येतोय आणि ढगामागूनही तो जेव्हा वर आला तेव्हा अगदी खास आपण त्याच्या दर्शनासाठी आलोय आणि त्याने दर्शन दिले आहे असे वाटत होते. अगदी काही सेकंदाने सूर्य एकदम पांढरा शुभ्र आणि तेजस्वी दिसला. त्या आधी सूर्यप्रकाशाची पिवळी किरणे पूर्ण समुद्रावर पसरलेली होती. एकूणच सर्व काही छान दिसत होते. साधारण तासभर आम्ही दोघे समुद्रकिनारी होतो. थंडी होतीच. फोटो काढताना हात पार गारठून गेले होते. पटापट येऊन कारमध्ये बसलो आणि हीटर चालू केला तेव्हा बरे वाटले. आल्यावर परत एकदा चहा घेतला.




आल्यानंतर डोसे करायचे होते जेवणासाठी. ते ठरवले नव्हते पण झाले. काल दुपारी विनायक ऑफीसला गेला आणि त्याला यायला थोडा उशीर झाला असे वाटले म्हणून मी भाताचा कूकर लावणार होते. कणिक फ्रीजमधून बाहेर काढली आणि स्वयंपाकाला सुरवात करणार होते तितक्यातच वि आला आणि मग दर शनिवारी आम्ही बाहेर जेवायला जातो त्याप्रमाणे गेलो. कूकरमधले तांदूळ पाण्यात बराच वेळ राहिल्याने मग त्यातच थोडे तांदुळ घालून उडीद डाळही भिजवली आणि आज मसाला डोश्याचा बेत झाला. बासमती तांदुळाचा डोसाही छान लागतो ते कळाले. आजचा मसाला डोसाही चविला छान झाला होता. उकडून बटाट्याची भाजी, नारळाची चटणी, सांबार आणि मोठमोठाले डोसे खायला खूप मजा आली. कालच्या जागरणामुळे दुपारी थोडे झोपणे झाले. काल सर्व ग्रोसरी आणि साफसफाई झाल्याने आज आता संध्याकाळी कुठेही बाहेर पडलो नाही.




आज संपूर्ण दिवस डोळ्यासमोर सारखा आजचा सूर्योदय येत आहे. आता यापुढे हवामान चांगले असेल तर जास्तीत जास्त सूर्योदय बघणार आहोत. आज एक जाणवले की मी सूर्यास्ताचे बरेच फोटो घेतले आहेत आणि त्याचा आनंदही खूप मिळाला आहे. पण आज मात्र उलटे झाले आहे. फोटोपेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रत्यक्ष सूर्योदय बघण्याचा आनंद मिळाला. सूर्यास्त बरेच जमवलेत. आता सूर्योदय बरेच जमवायचे आहेत.


आज जर सूर्याच्या समोर जर ढगांचा पट्टा नसता तर लालबुंद सूर्य बघायला मिळाला असता. वर लालबुंद सूर्य आणि त्याच्या तळाशी निळेशार पाणी , किती छान ना !

Wednesday, February 12, 2014

१२ फेब्रुवारी २०१४



आजचा दिवस  घडामोडींचा होता. हिवाळ्यातली हिमवृष्टी आणि वादळे इथे अमेरिकेत होतच असतात. आमचे गाव या वादळाच्या पट्ट्यात कधीच येत नाही हे एका अर्थाने खरच खूप चांगले आहे. वादळाचा थोडाफार प्रभाव आमच्या शहरावर पडतो इतकेच. तसे तर आमच्या गावात हिमवृष्टी कधीच होत नाही. ९ वर्षात ४ वेळाच झाली आहे आणि ती सुद्धा महाभयंकर नाहीच. अगदी पहिला स्नो तर काय पडला पडला म्हणेपर्यंत गेला पण. नाही म्हणायला दुसरा स्नोफॉल म्हणजे २०११ मधला चांगला होता. तो एकच दिवस होता. १० दिवसापूर्वी पडला तोही जरा वेगळाच आणि आजचा तर खूपच वेगळा. या चार स्नो फॉलमध्ये बर्फाची वेगवेगळी रूपे पहायला मिळाली.





२०११ चा स्नोफॉल मात्र छान अनुभवायला मिळाला. त्यात मी स्नो डॉल, स्नो गर्ल आणि स्नो मॅन बनवले होते. भुसभुशीत बर्फ पडला तर चांगले वाटते. पण जरा का तसा न पडता आईस रूपासारखा पडला तर कटकट होऊन बसते. आईस म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये जसा असतो तसा बर्फ पडतो. हवेतून कापसासारखा हलका पांढराशुभ्र पडला तर त्याची मजा असते. आमच्या राज्यात बाकीच्या शहरात दणाणून हिमवृष्टी झाली आहे. हवामान चॅनल वर वीज जाईल असा संदेश देत होते. पण तरीही आपल्या शहरात जाणे शक्यच नाही म्हणून मी तशी निर्धास्त होते. सकाळी उठल्यावर विनायक ऑफीसमध्ये चालतच गेला. जवळच ऑफीस असल्याने ते शक्य होते. गाडीवर बर्फ जमा म्हणजे चिकटून बसला होता. तो खरवडायलाच लागणार होता. आमच्याकडे खरवडण्यासाठीचे हत्यार नव्हते. तसे ते मुद्दामहून घेणे कधीच झाले नाही कारण की तशी वेळच येत नाही . त्यामुळे तो चालत गेला. चालण्यासारखी परिस्थिती होती कारण की जमिनीवर बर्फ साठलेला नव्हता. यावेळी तो फक्त झाडांवरच लपटलेला दिसत होता. फेसबुकावर येरझाऱ्या आणि बाकीची भाजी आणि नेहमीची फोनाफोनी करून झाली. भाजी झाली आणि आज कणिक भिजवायची होती इतक्यात आपण डोळे कसे मिचकावतो तसे लाईटनेही २ ते ३ वेळा मिचकवले. लाईट जाणार की काय? थोडी शंका आली. लगेचच भराभर पाऊले उचलली. म्हणजे पटकन कणिक भिजवून अगदी मोजून ५ मिनिटे कणिक मुरल्यावर लगेच पोळ्या करून घेतल्या. थोड्या रात्रीसाठी पण लाटून ठेवल्या. गरम पाणी आहे तोवर लगेचच घाई घाईने अंघोळ उरकली.









अंघोळ उरकल्यावर वरण भाताचाही कूकर लावणार होते पण तितक्यात लाईट गेले. दुपारची जेवणे झाली. विनायक ऑफीसला चालत गेला आणि आता काय करावे बरे या विचारात मी थोडी आडवी झाले. लाईट काय दोन चार तासात येतीलच पण नाही आले तर आणि उद्याही आले नाहीतर? त्यापेक्षा उजेड आहे (तसा खूप उजेड नव्हता) तोवर काही ना काही दुकानातून घेऊन येऊ. खाली उतरणार आहोतच तर कचराही टाकू म्हणून जय्यत तयारीनिशी म्हणजे सर्व अंगाला सर्व बाजूने लपेटून घेतले. आणि जिन्याला धरून सावकाशीने खाली उतरले. कचरा टाकला आणि छत्री उघडून चालू लागले. पुढच्या चौकातच दुकान आहे. जास्त लांब नाही पण तरीही बोचरे वारे असल्याने शॉर्ट कटने गेले. वारे इतके होते की मी छत्री डोळ्यासमोर धरली होती. या शॉर्ट कट रस्त्याचे मी आज मनापासून आभार मानले. तसे तर हा रस्ता बनवला नाही. आमच्या अपार्टमेंटच्या समोर गॅस स्टेशन आहे आणि आमच्या दोघांमध्ये तारेचे कुंपण आहे. पण हे कुंपण लोक नेहमीच तोडून टाकतात त्यामुळे हा रस्ता तयार झाला आहे. चालत दुकानात गेले तर आत लाईट नव्हते. पॉवर नसली तरी जनरेटर असतो. पण या दुकानात का नव्हता कोण जाणे. दुकानातल्या मॅनेजरने दार उघडले आणि सांगितले की पॉवर नाहीये. सॉरी. मी म्हणाले की मी इमर्जन्सी साठी काही वस्तू घेण्याकरता आली आहे. तरी तो सॉरीच म्हणाला. मग मी बाहेरच्या बाकड्यावर थोडी दम खायला बसले . तितक्यात एक बाई बाहेर आली आणि मला सांगितले की तुला मॅनेजर बोलावत आहे. मी आत गेले आणि माझ्याबरोबर कॅशिअरही चालत चालत दुकानभर काही गोष्टींसाठी फिरला. दुकानात अगदी तुरळक मंद लाईट होते. तो मॅनेजर म्हणाला की नंतर येऊन पैसे द्या तर मी म्हणाले नको माझ्याकडे कॅश आहे. तेव्हा मग पैसे दिले आणि परत  शॉर्टकटने घरी परतले. येताना झाडांकडे बघत होते. सर्व झाडे बर्फाने वेढलेली होती. एका हातात सामानाच्या कॅरी बॅगा होत्या. छत्री मानेने सावरली व एका हाताने फोटो घेतले. काय जरूर आहे का एवढे क्ररायची. पण हे क्षण गेले की गेले परत थोडीच येणार आहेत?







थंडीने जाम गारठले होते. आल्यावर चहा प्यावासा वाटत होता पण पॉवर नसल्याने कुठला आलाय चहा. सर्व कसे अगदी ठप्प होऊन जाते. मायकोवेव्ह नाही. इलेक्ट्रिक शेगड्या चालत नाही की गरम पाणी नाही. तसे गरम पाणी थोडावेळ टिकते. सामानात बटाटा वेफर्स, बिस्किटे आणि ब्रेड आणला होता. फळे होतीच , पिण्याचे पाणी होतेच त्यामुळे तितकी चिंता नव्हती. लाईट उद्याला आले नाहीत तर ब्रेड सँडविच खायचे असे ठरवले. टोमॅटो, काकडी, कांदा यांचे काप, थोडे लोणचे लावायचे ब्रेडला आणि साजूक तूप लावायचे. टोमॅटो केचप बरोबर असे हे जेवण आम्ही उद्या करणार होतो.


हिटर नसल्याने जाम थंडी वाजायला लागली. एरवी हिटर चालू असला की साधा स्वेटर ही घालायला लागत नाही पण आज बाहेर जाताना जसे लपेटून जातो तसेच लपेटून शिवाय मफलर गुंडाळून , दुलई घेऊन आडवी झाले. डोळे मिटून आडवे पडण्याशिवाय काहीच करता येत नाही लाईट गेले की. थंडी वाजून ताप भरतो की काय असे वाटू लागले. परत उठले. गरम पाणी आहे तोवर दुपारची साठलेली भांडी घासून टाकूया म्हणून घासली आणि तितक्यात लाईट आले. पण आले म्हणता म्हणता गेलेही. नंतर परत थोड्यावेळाने असेच झाले. लाईट आले म्हणून पटकन मायक्रोवेव्हचे घड्याळ सेट करून चहा ठेवायला गेले तर परत लाईट गेले. नंतर परत बराच वेळ लाईट नाहीत. असे वाटले की बहुधा आता ते येत नाहीत. आजची रात्र थंडीत कुडकुडत आणि ठार अंधारात काढावी लागणार बहुतेक असे वाटून गेले. अंधारून येत होते आणि तितक्यातच दिवेलागणीच्या सुमारास दिवे लागले. विनायक पण घरी आला. लाईट आल्यावर इतके काही हायसे वाटले. हिटरने संपूर्ण घर गरम झाले आणि आम्हीही गरमागरम चहा घेतला. आता काही लाईट जाणार नाहीत हे माहीती असून सुद्धा मी लगेच वरण भाताचा कूकर लावून घेतला. जेवताना आम्ही बोलत होतो की हेच जर लाईट आले नसते तर मेणबत्तीच्या प्रकाशात झोपून राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता ना ! थंडी असल्याने रात्रभर चांगलीच हुडहुडी भरली असती. कोणत्याची गोष्टींची  कमतरता असली कीच त्या त्या गोष्टींची  किंमत कळते ना ! आज रोजनिशी लिहायला मजा येत आहे.

Sunday, February 09, 2014

वेदर फोटो






१४ न्यूज कॅरोलायनावर अजून ३ फोटो दाखवले. हे फोटो मी केप फिअर नदी आणि फोर्ट बीचवर काढलेले आहेत. डिसेंबर महिन्यात एका संध्याकाळी नदीवर आकाशात खूप छान रंग जमा झाले होते आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. बीचवरचा फोटोही त्या दिवशी असाच छान मिळून गेला. ओहोटी असल्याने समुद्रात असलेले काढ खडक व शेवाळे पहायला मिळाले. त्यामुळे हा फोटोही दाखवला. १४ न्यूज चॅनलचे नाव आता टाईम वार्नर केबल असे झाले आहे.  


Thanks to Lee Ringer, Meteorologist, 14 News Carolina !

Friday, February 07, 2014

७ फेब्रुवारी २०१४

 प्रत्येक दिवस खरच खूप वेगळा असतो , नाही का? तुम्ही म्हणाल त्यात काय, नेहमीचेच रूटीन असते की, वेगळा कसा? तर तसे नाहीये. छोटी गोष्ट का असेना पण ती वेगळी घडते. काही वेळा छोटीशीच गोष्ट खूप तापदायक ठरते तर काही वेळा खूप उत्साह वाढवणारी असते. तसे तर गेले दोन दिवस असेच काही ना काही वेगळे घडतच आहे. रविवारी समुद्रकिनाऱ्यावर गेलो तोही दिवस असाच काहीतरी खास होता. म्हणजे ओहोटी अनुभवायला मिळाली आणि त्यातून नवीनच काहीतरी गवसले. त्याचा फोटो काढला.  हा फोटो माझ्या मनात घर करून राहिला आहे. तो फोटो मी वेदर चॅनलला पाठवला आणि तो त्यांनी दाखवला. शिवाय वेबसाईटवरच्या फोटो गॅलरीतही लावला आहे. तसाच आजचा दिवस वेगळा आहे.






फेसबुकावरच्या दोन म्युझिक ग्रुपात आम्ही दोघेही आहोत, तिथे रोज काही ना काही थीमा सुरू असतात. त्याप्रमाणे गाणी टाकायची असतात. म्हणजे युट्युब वरच्या गाण्याच्या लिंका द्यायच्या असतात. आज एका ग्रुपमध्ये एक थीम अशी होती की सिनेमाचे नाव गाण्याच्या मुखड्यात न येता ते अंतऱ्यात यायला हवे. थीम आली आणि माझ्या मनात एकच गाणे आले ते म्हणजे तेरे मेरे सपने मधले ए मैने कसम ली. या गाण्यात तिसऱ्या कडव्यात या सिनेमाचे नाव आले आहे. तो अंतरा म्हणजे एक तन है , एक मन है , एक प्राण अपने, एक रंग एक रूप तेरे मेरे सपने. लगच्या लगेच हे गाणे टाकले. त्यामुळे मी आज खूप उत्साहात आहे. मला अभिमान आणि तेरे मेरे सपने मधली गाणी खूपच आवडतात. प्रत्येक वेळी ऐकताना आनंद देतात. गाताही येतात.





गेले दोन दिवस माझ्या मनात आई पूर्वी करायची ती वड्या घोळत होत्या. आल्याच्या वड्या करायच्या म्हणून रिकोटा चीझ आणलेच होते म्हणून त्या वड्याही केल्या गेल्या. आल्याच्या वड्या झाल्या, नंतर तीळाच्या वड्या झाल्या आणि आज टोमॅटोच्या वड्या झाल्या. पहिल्यांदाच केल्या. आधी थोड्या बिघडल्या. मग दुरूस्तही केल्या. रंग सुंदर आला आहे. या वड्यामध्ये बटाटा आणि थोडा नारळाचा खवही घालतात. आज दोन बटाटे जास्त उकडले होते बटाट्याचे डांगर करायला. संध्याकाळी खायला म्हणून केले होते. तितकी मजा आली नाही. बटाट्याचे डांगर खाताना खास मूड यायला लागतो. म्हणजे असे की बटाट्याचे पापड लाटताना अधून मधून डांगर खायला जास्त मजा येते. आज वांगे कांदे आणि टोमॅटो याचा रस्सा बिघडला. गांग्याच्या रस्सा भाजीत तेल कमी पडले की भाजी पांचट होते. शेवटी रात्रीच्या जेवणामध्ये या भाजीला वरून थोडी फोडणी करून घातली आणि फोडणीमध्ये थोडे लाल तिखट घातले आणि मग भाजीला खूप छान चव आली. जेवणे झाली. भांडी घासली. आणि रोजनिशी लिहायला बसले. आता झोपते. पण आजचा दिवस ए मैने कसम ली या गाण्याने खूपच आनंदात गेला.

Sunday, February 02, 2014

२ फेब्रुवारी २०१४



आजचा दिवस चांगला, स्वच्छ हवेचा होता. सकाळी उठल्यावर चहापाणी झाले आणि गॅलरीत उभी राहिले तर आहाहा, खूप छान हवा होती. असे वाटत होते की विंटर जाऊन स्प्रिंग सुरू झाला की काय? आणि मनात एकच विचार आला की बीचला फिरायला जावे. थोड्यावेळाने आज स्वयंपाक काय करायचा, की करूच नये , बाहेरच जावे, असा विचार करता करता भेंडीची भाजी आणि पोळी केली. विनायकच्या मनातही आज बीचवर जावे असे होते. हवा चांगली आहे ना? मग बाहेर पडा आणि दिवस सत्कारणी लावा. उगाच संगणकाच्या समोर बसून टिचक्या मारत बसू नका. असे संभाषण आमच्या दोघांच्यात हवा चांगली असेल की होतेच होते.





जेवण करून लगेचच समुद्रकिनारी जायला निघालो. आमच्या शहरापासून फोर्ट फिशर बीच साधारण १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे̮. जेवण करून आडवे पडले की दिवस संपला. मग  कसला आलाय समुद्रकिनारा ! उन्हाळ्यात ठीक आहे. दिवस संपता संपत नाही इतका लांबलचक असतो. मग या दिवसात जेवण करून, नंतर थोडी डुलकी काढून दुपारचा चहा घेऊन निघाले तरी चालते. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा रणरणते उन नसेल तर आम्ही सर्व तयारीनिशी बाहेर जेवूनच थेट बीचवर जातो. सकाळी नित्यनियमाची घरेदारे आवरण्याची व साफसफाईची कामे करून बाहेर जेवायला पडायचे ते थेट संध्याकाळी घरी परतायचे.   अर्थात वीकेंडलाच. नाहीतर आठवड्याचे रूटीने हे ठरलेलेच असते की ! तर आम्ही निघालो आमच्या लाडक्या समुद्रकिनाऱ्यावर. याला मी खडकवासला बीच असे नाव दिले आहे. हा समुद्रकिनारा मला मनापासून आवडतो.





आजचा समुद्ररकिनारा काही वेगळाच होता ! आमची नेहमीची फेरी असते ती म्हणजे या किनारी आधी उजव्या बाजूला चालत जायचे. मग थोडे वाळून बसून उठायचे आणि समुद्रकिनाऱ्याच्या दुसऱ्या म्हणजे डाव्या टोकापर्यंत चालत जायचे. पण हे चालणे किनाऱ्यालगत होत नाही म्हणजे तसे चालताच येत नाही. समुद्राला लागून जे मोठमोठाले अवाढव्य खडक आहेत त्याच्या बाजूने एक रस्ता आहे तिथून चालत दुसऱ्या टोकाला यायचे  आणि मग परतायचे.



 या रस्त्यावरून चालताना एकीकडे समुद्र दिसत असतो आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज येतो.  आज आम्ही काय केले तर आधी डाव्या बाजूच्या टोकाला गेलो आणि कधी नव्हे ते समुद्राचे पाणी आम्हाला नेहमीपेक्षा कमी वाटले. म्हणजे ओहोटी सुरू होती. ओहोटी आम्ही कधी पाहिलेली नव्हती. ओहोटीमुळे काय झाले होते की समुद्रकिनाऱ्याचा एक वेगळाच नजारा आज पहायला मिळाला. समुद्रातले काळे खडक आणि त्यावर साठलेले हिरवे शेवाळे असे वेगळेच काही दिसले. नेहमी समुद्राच्या लाटा खडकावर आदळत असतात आणि त्याचा आवाजची येत असतो. आज तसे नव्हते. विनायक म्हणाला आता आपण उजव्या नेहमीच्या टोकाला असेच चालत जाऊ. वरून रस्त्यावरून जायला नको. आणि चक्क आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरून उजव्या टोकाला चालत आलो. असे कधीच होत नाही. कारण की भरतीमुळे सदैव पाणी असते. समुद्रालगतच्या खडकामध्ये तर खूप छान छान मोठे शिंपले अडकले होते. मी हात घालून काढण्याचा प्रयत्न केला पण ते तिथून अजिबात हलत नव्हते इतके ते त्या खडकांमध्ये अडकले होते. सीगल्स तर नेहमी मजा मारत असतात समुद्रकिनारी !





आज हवा चांगली असली तरी किनाऱ्यावर बऱ्यापैकी गारठा आणि वारा होता. अर्थात तो सहन होत होता. काल केलेल्या आल्याच्या वड्या बरोबर नेल्या होत्या. त्या खाल्या आणि जरा बरे वाटले. घरी आलो आणि चहा प्यायला. अजून दोन कामे बाकी होती ती म्हणजे ग्रंथालयात पुस्तके परत करायची होती आणि केबल चॅनलवर काही चॅनल्स का दिसत नाहीत हे पण विचारायचे होते. १४ न्यूज वेदर चॅनलची तर आम्हाला खूपच सवय झाली आहे. ती दोन्ही कामे केली आणि विचार केला की ग्रंथालयात आलोच आहोत तर नदीवरचा सूर्यास्त पाहून जाऊ. सूर्यास्त चांगला होता पण तितका चांगला नाही. थोड्यावेळ बसलो आणि थंडी वाढायला लागली म्हणून लगेच घरी परतलो. आज जेवायला काय करावे? परत कंटाळाच आला होता. मग भाज्या घालून सांजा केला आणि भांडी घासून रोजनिशी लिहायला बसले आहे. आजचा दिवस समुद्रकिनाऱ्यावरच्या दिसलेल्या वेगळ्या नजाराने खूप वेगळा भासत आहे. अता चहा प्यायची तल्लफ आली आहे. तो पिऊन मग झोपणार.