Monday, September 28, 2009

दसरा शुभेच्छा!

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!दसरा आला की मला आठवण होते ती पाटीपूजनाची. माझे बाबा पूर्वी क्लास घेत असत. त्यात ते सर्वांना पाटी वापरण्याचा आग्रह करीत. आधी पाटीवर गणिते सोडवा, मग वहीत. क्लासला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नियम असायचा की येताना पाटी घेऊन येणे. पाटी आणली नाही, विसरली, अशी कारणे सांगून भागत नसे. जो कोणी पाटी आणायचा नाही त्याला आमच्याकडून पाटी पुरवली जायची, कारण आमच्याकडे १०-१५ पाट्या होत्या. लहानपणी दरवर्षी आणलेल्या पाट्या जपून ठेवल्या होत्या. त्या सर्व पाट्यांची दसऱ्याला पूजा होत असे. पाटीवर लिहायला रूळ असायचे. भुसा घालून भरलेले १०० रूळ एका खोक्यात असायचे. मग एक रूळ तुटला की दुसरा घे, दुसरा तुटला की तिसरा घे असे करता करता रुळाचे असंख्य तुकडे जमा व्हायचे.आईच्या घरापासून चतुः श्रृंगी चालण्याच्या टप्यात होती आणि नवरात्रात खूप गर्दी, त्यामुळे देवीचे दर्शन आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्यायचो. आईच्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मुली म्हणजे आमच्या मैत्रिणी अशा आम्ही सर्व पहाटे ४ ला सर्व आवरून घराच्या बाहेर पडायचो आणि चालत चतुः श्रृंगीला जायचो. त्यावेळेला पुण्यातली हवा स्वच्छ शुद्ध असायची. त्यमुळे खूप प्रसन्न वाटायचे. तिथून रिक्षा करून कसबा पेठेतल्या देवीचे दर्शन. मंडईत त्यावेळेला नुकतेच उजाडलेले असायचे. मग बांगड्या भरायचा कार्यक्रम. नंतर बसने घरी परत. त्या वयात साडी नेसण्याचे खूप आकर्षण होते, त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणी आईच्या साड्या नेसून आईचेच ब्लाऊज टाचून घालायचो. साडी नेसण्याचा उत्साह पाहून नंतर आईने आम्हाला एक काळा व एक पांढरा असे दोन ब्लाऊज शिवून दिले होते.पुढे नोकरी लागल्यावर ऑफीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी जेवणाच्या सुट्टीनंतर "पूजा मूड" असायचा. त्या ऑफीसमध्ये purchase, sales, accounts अशी departments होती. मग प्रत्येक department ला पूजेनिमित्त भेट व वेगवेगळी खादाडी. त्या कंपनीचे मालक मराठी असल्याने सगळीकडे मराठमोळे वातावरण होते.इथे अमेरिकेत आल्यावर दसऱ्याची एक मजेशीर आठवण आहे. आम्हाला पहिल्यांदाच एक मराठी मुलगा भेटला. त्याची ओळख झाल्यावर त्याला आम्ही दसऱ्याला जेवायला बोलावले. त्या शहरात एक थायी दुकान होते. तिथे क्वचित भारतीय भाजी दिसायची. तेव्हा कधी नव्हे ते छोटी हिरवीगार कारली दिसली. मग दसऱ्याच्या मुहूर्तावर भरली कारली व शेवायाची खीर केली. कारल्याच्या नादात मात्र शेवयाची खीर बिघडली. कारल्याची भाजी बघितल्यावर तोही खुष झाला.

तुमच्या सर्वांच्या अशाच काही खास दसरा आठवणी असतीलच, त्या वाचायला आवडतील.

Wednesday, September 23, 2009

अविस्मरणीय नायगारा!!! (७)डीजिटल कॅमेराने घेतलेले नायगारा धबधब्याचे चलचित्र

Tuesday, September 22, 2009

बगळा

आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे. इथे बरीच प्रकारची बदके आहेत. पांढराशुभ्र बगळा खूपच क्वचित दिसतो. आज दिसला आणि फोटो काढले.

अविस्मरणीय नायगारा!!! (६)

अमेरिकेत पाऊल पडल्या पडल्या प्रत्येकजण धाव घेतो ती नायगाराकडे! ऑर्कुटवर नायगारा धबधब्याचे फोटो पाहून पाहून असे वाटत होते की आता गेले नाही तरी चालेल! आमचा योग थोडा उशीराने आला पण आला तोच मुळी जबरदस्त योग आला, कारण की अमेरिका व कॅनडा अशा दोन्ही बाजूने नायगाराला पाहता आले. बरेच जणांकडून ऐकले होते की अमेरिकेपेक्षाही कॅनडातून धबधब्याचे दर्शन जास्त चांगले होते!गुगल मॅपवर १४ तासांचा कारचा प्रवास पाहिला व विचार केला की विमानानेच जावे म्हणजे नायगारामध्ये जास्त वेळ मिळेल. विनायकला कॅनडामधील मित्रालाही भेटायचो होते. कॉलेजमध्ये ते एकत्र शिकत होते. विमानाने बफेलो विमानतळावर उतरलो. भाड्याची कार ताब्यात घेतली व नायगराच्या एका भारतीय उपहारगृहात येऊन पोहचलो. तिथे बटाट्याचे परोठे खाल्ले व एक चहा घेतला. रस्त्यावरून बहुतेक सर्व देशी माणसेच फिरत होती. कॅनडातील मित्राच्या घराचा परत एकदा गुगल मॅप बघितला व कारमध्ये बसून प्रवास सुरू केला. तिथून दोन तासाचा प्रवास होता. बोलता बोलता एक एक्झीट चुकली. थोड्यावेळाने परत मुख्य रस्त्याला लागलो. दुसरी एक्झीट होती ती खूपच गोलमाल होती. सात नंबरच्या एका एक्झीटवरून बरीच ठिकाणे दाखवत होते. नेमके कुठे जायचे काहीच कळेना! इथे एका हॅमिल्टन शहरात घुसलो गेलो व भुलभुलैय्यात अडकलो! कार रेंटलचा पहिलाच अनुभव, त्यानून नवीन देशात प्रवास आणि त्यात भर म्हणजे एक्झीटा चुकलो. तसे आम्ही चुकलो नाही, गुगल मॅप काही वेळा नीट दिशा दाखवत नाहीत. जाम वैतागलो होतो.शेवटी एकदाचे ओंटारिओ मध्ये राहत असलेल्या मित्राच्या घरी पोहोचलो! गेल्यावर निवांतपणे गप्पा टप्पा झाल्या. गरमागरम चहा झाला. संजीवनीने जेवण अगदी माझ्या आवडीचे केले होते. दोन भाज्या, कोशिंबीर, लोणचे, आमटी, पोळी व गरम भात. पुणेरी जेवण जेवल्याने खूप समाधान झाले! जेवल्यावर मित्र म्हणाला कॅरम खेळायचा का? मी लगेचच हो म्हणाले. कॅरम!!! किती वर्षे झाली कॅरम खेळून! चौघेजण गेम खेळायला बसलो. कितीतरी वर्षांनी कॅरम पाहिला! शाळा कॉलेजमधले दिवस आठवले. आमच्या घरी अर्थातच आईबाबांच्या घरी सुट्टीमध्ये आम्हा भावंडांचा अड्डा असायचा. कुणी पत्ते खेळतयं , कुणी बुद्धीबळाचे डाव तर कुणी कॅरम. मला कॅरममध्ये खूप स्वारस्य होते. अवघड जागी असलेल्या सोंगट्या स्ट्रायकरने कट मारून घेण्यात मी खूप तर्बेज होते. मी, माझी बहीण, बाबा, मामेबहीणी, एकापाठोपाठ एक कॅरमसाठी नंबर लागायचे. काही वेळा पैसे पैसे खेळायचो. पांढऱ्या सोंगटीला २०, काळीला १० व राणी सोंगटीला ५० पैसे. ठराविक अंतरावर सोंगट्या ठेवून दुसऱ्या सोंगटीला धक्का न लागता सगळ्या सोंगट्या घ्यायच्या असाही एक खेळ होता. हे सर्व आठवले व खूप खूप आनंद झाला!!!!खूप वर्षात कॅरमची सवय कुणालाच नसल्याने आमच्या चौघांचा लिंबुटिंबुचा खेळ चालू होता. अधुनमधून चेष्टामस्करी व हसणे खिदळणे चालू होते. नंतर मित्राच्या मुलाने खूप छान चहा बनवला व साधारण १ च्या सुमारास झोपलो. दुसऱ्या दिवशी उशीराने उठलो. मित्राच्या बायकोने संजीवनीने अत्यंत चविष्ट उपमा केला होता. त्यावर चहा घेतला व निघालो ते थेट डेज इन हॉटेलमध्ये येऊन थडकलो. हॉटेलच्या खोलीचा ताबा घेतला. स्वच्छ हातपाय तोंड धुतले. हॉटेलमधून खाली उतर्लो तर एक पंजाबी हट दिसली. त्यात शिरलो आणि एक सुखद धक्का बसला! जेवण अतिसुंदर होते. तिखटजाळ व तेलाचे तवंग न आलेल्या भाज्या होत्या. उसळ, आमटी, कोशिंबीर, गरम गरम पोळ्या!! अजून काय हवे!! चविष्ट जेवण जेवल्यावर खूप ताजेतवाने वाटले. हटच्या बाहेर चक्क काही चिमण्या दिसल्या. छोट्या व गोड चिमण्या. टुणटुण उड्या मारायच्या. परत उडायच्या. उड्या मारण्यासाठी परत खाली यायच्या. त्यांचा फोटो घेण्याचा विचार होता पण घेतला नाही याची खूप चुटपुट लागून राहिली आहे.आता आम्ही धबधब्याच्या दिशेने चालायला सुरवात केली. जाऊन येऊन ५ मैल चालणे झाले. धबधब्याच्या कडेकडेने जाताना मजा येत होती. नायगारा नदीवरून एक पूल ओलांडून दुसरे दोन छोटे धबधबे लागतात व तेथून पुढे गेल्यावर कॅनडा बाजूने असणारा हॉर्सशू धबधबा अर्धा पहायला मिळतो. हा सर्व परिसर खूपच रमणीय आहे. झाडाझुडपांच्या मधून वाट काढली आहे. खूप लांबलचक वाट! मध्ये बसायला बाकडी आहेत आणि चालता चालता धबधब्याचा आवाज सारखा ऐकू येत असतो. मधले जे दोन छोटे धबधबे आहेत त्याच्या कठड्यावरून खाली पाहिले की नुसते पाहत बसावेसे वाटते. कड्यावरून प्रत्यक्ष खाली पडताना पांढरा शुभ्र धबधबा खाली असलेल्या छोट्या मोठ्या काळ्याभोर खडकांवर आदळत असतो. कोसळताना अनेकविध तुषारांचा एक प्रचंड धुळीसारखा दिसणारा लोळ निर्माण होतो. यापुढे अजुनही बरेच चालत पुढे जावे लागते. चालत चालत जाताना लांबवर एक लालसर छटा असलेला, साधारण गुलालासारखा रंग असलेल्या लोळ दिसला. तो होता हॉर्सशू फॉल. एव्हाना थोडी संध्याकाळ झाली होती. निसर्गनिर्मित गुलालासारखा दिसणारा रंग तिथे पोहोचता क्षणी फिकट जांभळा झाला!पांढरा शुभ्र धबधबा नुसता कोसळत होता. त्याचे तुषार अंगावर उडत होते. पाणी एकदम स्वच्छ व नितळ!! फोटो व विडिओ काढले. कठड्यावरून धबधब्याला पाहताना डोळे तृप्त होत होते. किती पाहू न किती नाही असे झाले होते. चालून चालून परत खूप भूक लागली. मग एक छान व्हनिला आयस्क्रीम खाल्ले. थोड्यावेळाने जेवून परत हॉटेलवर हजर. त्यादिवशी अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटल्यावर सारखा धबधबा दिसत होता! त्याचा एका लयीत वाजणारा आवाज ऐकू येत होता! पहाटे पहाटे मग थोडा डोळा लागला.नायगारामध्ये सकाळी ११ शिवाय कोणतेच उपहारगृह उघडत नाही. हॉटेलमध्ये कॉफी घेतली. तयार होऊन निघालो ते परत पंजाबी हटमध्ये. खरी तर खूप भूक लागली होती पण जेवले की संपले! म्हणून मग दोन सामोसे व चहा घेतला व निघालो धबधब्याची मुख्य आकर्षणे पहायला. maid of the mist , cave of the winds . maid of the mist ही एक बोट राईड आहे. ही बोट सगळ्यांना कॅनडाच्या हॉर्सशू धबधब्यासमोर नेते. तिथे गेले की अगदी पावसात भिजल्यासारखे होते म्हणून निळ्या रंगाचे रेनकोट देतात. रेनकोट घातल्यावर परत सगळ्यांचे फोटो काढणे सुरू! एक बोट नुकतीच निघाली होती. अर्ध्या तासाचा अवधी होता. तिथून बऱ्याच वरपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या व बाजुने धरायला लोखंदी बार होते. पायऱ्या पूर्ण ओल्या झाल्या होत्या. थोडे पाणी पण साचले होते. या पायऱ्यांवर सगळ्यात वरती चढून जो बाजूने धबधबा दिसत होता ना तो तर अति अति क्लासिक दिसत होता. मी व एक साऊथ इंडीयन मुलगी आम्ही दोघी भराभर वर गेलो! कारण की संधी सोडायची नाही. जाताना धबधब्याचे अगणित तुषार अंगावर उडत होते. तिथे एकेमेकींचे फोटो काढले. काही वेळाने वाऱ्याने दिशा बदलली व धबधब्याचे पाणी चक्क आमाच्या अंगावर कोसळले. पूर्ण भिजायलाच झाले. थोडीशी भीतीही वाटली. हळूहळू करत खाली उतरलो व बोटीमध्ये बसलो. बोट राईड छानच झाली!धबधब्याची खरी मजा येते ती cave of the winds या आकर्षणामध्ये! धबधब्याच्या समोरच एक लाकडी जिना केला आहे तिथे चढून धबधब्याच्या अगदी खालीच जाता तुम्ही. इथे तर पूर्ण अंघोळच होते. धबधब्याचा प्रवाह व आवाज इतका काही जबरदस्त असतो ना! पांढरा शुभ्र खळाळता धबधबा ओसंडून वाहत असतो. काळ्याभोर खडकांच्या आजुबाजुने वाट काढत वाहत असतो. इथून तर अजिबात जावेसे वाटत नाही. इथे सर्वांना पिवळे रेनकोट देतात. शिवाय वेगळ्या चपला पण देतात. हाच धबधबा आम्ही काल वरून खाली कोसळताना पाहिला होता. आज दुपारी उन्हात छान चमचमत होता. इथेउन वर पाहिले असता कड्यावरची माणसे ठिपक्यांसारखी खूप छोटी दिसतो होती. खूप खूप उंच! काळा पहाडी कडा व कड्याच्या दोन्ही बाजुने धबधबणारा धबधबा! एक प्रकारचे विश्वरूप दर्शनच! इथे आम्हाला दोन इंद्रधनुष्य दिसली! खूप जवळून, पायाला स्पर्श करणारी! इंद्रधनुचे रंग जवळून खूपच ठळक दिसत होते. परत चालत चालत दुपारच्या जेवणाला पंजाबी हट. मग हॉटेलमध्ये जाऊन फोटोज व विडिओज पीसीमध्ये भरले. मेल, ऑर्कुटवर चकरा मारल्या व थोडा आराम केला. रात्रीच्या जेवणासाठी कोहिनुर उपहारगृहात गेलो. तिथे छोले भटुरे व आंबा लस्सी घेतली.दुसऱ्या दिवशी परत ११ वाजता गरम सामोसे व चहा घेऊन निघालो ते रेनबो पूलावरून चालत चालत कॅनडात गेलो. इथून तर अमेरिकन धबधबा खूपच छान दिसत होता. मुख्य म्हणजे समोरून दिसत होता! फूटपाथवरून चालताना खूपच मजा येत होती. म्हातारी माणसे, छोटी मुले, तरुण तरूणी सगळे रमतगरमत चालत होते. मध्येच बाकड्यावर बसावे, मध्येच थांबून नायगाराला पाहावे, फोटो काढावे. इथे शेवटी एक आकर्षण आहे ते हॉर्सशू फॉलचे. हा धबधबा फारच छान आहे! इथे behind the falls हे एक सुंदर आकर्षण आहे. इथे बोगद्यातून जावे लागते पिवळे रेनकोट घालून. धबधब्याच्या पाठामागच्या खडकाला एक भलेमोठे भगदाड पाडले आहे. इथे बोगद्यातून बाहेर पडताना कसा लख्ख प्रकाश दिसतो तसाच प्रकाश इथेही दिसतो. या भल्यामोठ्या भगदाडातून धबधब्याचे मागून दर्शन होते. इथे तर धबधब्याचा आवाज प्रचंड मोठा असतो. इथे एक विडिओ घ्यायला हवा होता. थोडेसे खाली जाऊन एक छोटा गोलाकार भाग केला आहे. इथून साईडने धबधबा कोसळताना दिसतो. अगदी जवळून पाहता येते. वर पाहिले तर कितीतरी उंचच उंच!आता परत परतीच्या मार्गावर सुरवात झाली. जाताजाता मधेमध्ये थांबून धबधबा पाहणे, फोटो काढणे, थोडावेळ बाकावर बसणे, असे करत करत परत रेनबो पूलावरून अमेरिकेतल्या पंजाबी हटला परतलो. रेनबो पूल हा अमेरिका व कॅनडाला जोडणारा पूल आहे. जेवून परत हॉटेल मध्ये प्रवेश! थोडा आराम केला. ऑर्कुट, संकेतस्थळावर चकरा मारल्या व परत निघालो ते रात्रीचा रंगीबेरंगी धबधबा पहायला. ही चक्कर मात्र थोडी असह्य झाली कारण की सकाळीच ३-४ मैल चालणे झाले होते. आता हे शेवटचे दर्शन म्हणून परत निघालो होतो. जाऊन येऊन हा परिसर साधारण ५ मैलाचा आहे. फिकट जांभळा, पिवळा, लाल, हिरवा असे धबधब्याचे रात्रीचे रंग बघितल्यावर येताना मात्र चालणे अशक्य झाले होते. इतकी काही वाईट अवस्था झाली होती की विचारायची सोय नाही. पायात गोळे यायला लागले होते, प्रचंड भूक लागली होती! कधी एकदा पंजाबी हट दिसत्ये असे झाले होते. हटमध्ये गेल्यावर जेवणावर तुटून पडलो. एकमेकांशी अजिबात बोललो नाही. तांदुळाची खीर २-३ वाट्या प्यायली. लोणच्याची चव तर इतकी छान लागली ना! जेवल्यावर पाय दुखायचे थांबले. उत्साह आला. अडीच दिवसात आम्ही साधारण २० मैल चाललो.रात्री हॉटेलवर झोपता झोपता विचार केला की निसर्गाच्या सान्नीध्यात आपण काहीही करू शकतो. त्या दिवशी रात्री इतके काही समाधान वाटत होते ना! खूपच! धबधब्याला डावीकडून, उजवीकडून, मधून, खालून, वरून, कोपऱ्यातून, पाठीमागून पाहिले होते!! पांढऱ्या शुभ्र कोसळणाऱ्या धबधब्याला पाहून मन कसे अगदी तृप्त तृप्त झाले होते!!!!

Monday, September 21, 2009

अविस्मरणीय नायगारा!!! (५)


View from Canada रेनबो पूल ओलांडून कॅनडामध्ये चालत गेलो. इथून अमेरिकन फॉल्सचे समोरून जास्त चांगले दर्शन होते.

अविस्मरणीय नायगारा!!! (४)

Horseshoe Falls Canada

अविस्मरणीय नायगारा!!! (३)cave of the winds इथे धबधब्याच्या खाली खूप मजा येते. पूर्ण अंघोळ होते. इथेच आम्हाला दोन इंद्रधनुष्ये दिसली, खूप जवळून पायाला स्पर्श करणारी!!

अविस्मरणीय नायगारा!!! (२)

Maid of the Mist Boat ride

बोटीतून जाताना घेतलेले धबधब्याचे फोटो

अविस्मरणीय नायगारा!!! (१)

बोट राईड साठी थोडा वेळ होता म्हणून इथे जाऊन आलो. कडेकडेने पायऱ्या आहेत व बाजुला धरायला लोखंडी बार आहेत. इथे धबधबा जवळून पण बाजूने बघता आला. थोड्यावेळाने वाऱ्याने दिशा बदलली तर एकदम अंगावरच कोसळला थोडासाच पण पूर्ण भिजायला झाले. खूप छान वाटले इथे!