Monday, June 05, 2017

H 4 Dependent Visa (2)

पोस्डॉक पर्व संपले. विनायकला नोकरी लागली.. परत नवीन राज्य आणि शहर. मला माहीती होतेच की आता आपला H 4 visa आहे आणि J 2 visa सारखे वर्क परमिट काढता येणार नाही. साडेतीन वर्षाच्या पोस्डॉक च्या काळात फर्निचर घेतले नव्हते ते घेतले. विनायकचे ऑफीस घराच्या जवळ १० मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असल्याने दुपारी तो घरी जेवायला यायचा त्यामुळे माझा सकाळचा वेळ पोळी भाजी करण्यात जायचा आणि त्यामुळेच मला एकटेपणा आला नाही. मनोगत मराठी संकेतस्थळ नव्यानेच माहीती झाले होते. मनोगताचा खूप मोठा आधार आम्हाला दोघांनाही वाटायचा. त्यावर येणारे लेख, कविता, चर्चा वाचता यायच्या. जेव्हा मनोगताच्या प्रशासकांनी पाककृती विभाग सुरू केला तेव्हापासून माझे रेसिपी लेखन सुरू झाले, म्हणजे साधारण २००५ सालापासून मी लिहायला लागले. रेसिपी लेखनाबरोबरच इतरही लेखन सुरू केले ते म्हणजे भारतातल्या आठवणी, अमेरिकेत येणारे अनुभव, प्रवासवर्णने. जसे सुचेल तस तसे लिहीत गेले. रोजनिशी लिहाविशी वाटली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच काळात झाला.





अपार्टमेंटच्या समोर जे तळे होते तिथे जाणे व्हायचे. तळ्यात असणारी बदके, पिले, कासवे यांना नित्यनियमाने ब्रेड खायला घालायला सुरवात केली. त्याचबरोबर फोटोग्राफी सुरू झाली. डिजिटल कॅमेराने एक ना अनेक फोटो काढणे नित्यनियमाचे झाले. फोटोंची संख्या काही हजारात गेली. तळ्यावर रोजच्या रोज जाण्याच्या आधी जो काळ होता तो तर विसरणे शक्यच नाही. इंटरनेटवरून जगातल्या माणसांची घरबसल्या सहज संपर्क साधता येतो हे त्या काळात म्हणजे २००५ च्या सुमारास कळाले. त्या आधी आमच्याकडे संघणक नव्हता तर प्रत्यक्ष भेटणारी व बोलणारी माणसे होती.मनोगत व ऑर्कुट मुळे याहू मेसेंजर वर शंभराने मित्रमंडळी जमली. सकाळी संगणक आम्ही जेव्हा ओपन करायचो तेव्हा याहू निरोपकाच्या खिडक्या आपोआप उघडायच्या. भारतातल्या व युरोपमधल्या मित्रमंडळींचे ऑफलाईन निरोप वाचायचो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
मित्रमंडळी बोलायला यायची. कॉनफरन्सेस व्हायच्या. . समजा रात्री झोप येत नसेल आणि संगणक उघडला तरीही कोणी ना कोणी बोलायला असायचेच. बोलायचे म्हणजे सुरवातीला आम्ही टाईप करून बोलायचे. नंतर मेसेंजरवरून कॉल करायला लागलो. आवाज ऐकण्यासाठी याहूपेक्षा गुगल टॉक जास्त छान होते. . ही सर्व मित्रमंडळी आमच्या घरातच वावरत आहेत की काय? असे वाटायचे इतके हे इंटरनेटचे माध्यम प्रभावी आहे.
ऑर्कुटवर दोन समुदायात सामील झाले ते म्हणजे H 4 Dependent visa मराठी मंडळ आणि H 4 अमराठी होममेकर्स इन युएस ए. या समुदायात होणाऱ्या पाककृती व निबंध स्पर्थेत भाग घेतला. अमराठी समुदायात झालेल्या एका स्पर्थेत माझी "इडली" विजेती झाली. बाकी काही स्पर्धेत काही पदार्थ उपविजेते झाले. उदा. रंगीत सांजा, भरली तोंडली इ. इ. साधारण ३ वर्षे याहू मेसेंजरवर मित्रमंडळी येत राहिली, बोलत राहिली आणि नंतर पांगत गेली. अदुश्य रूपात भेटले सर्वजण. आवाज फक्त ऐकायचा, फार फार तर काही वेळा विडिओवर एकमेकांना बघायचो.



भारतात बोलणे खुप कमी व्हायचे कारण की भारतात बोलण्यासाठी कॉलींग कार्ड विकत घ्यायला लागायचे. १० डॉलर्सला २० मिनिटे मिळायची सुरवातीला. नंतर नंतर ५ डॉलर्सला ६० मिनिटे मिळायला लागली. कॉलींग कार्डावरून बरेच नंबर फिरवायला लागायचे तेव्हा कुठे फोन लागायचा. इंटरनेटची फेज संपली. एकटेपणा जाणवायला लागला. घरात बसून बसून खूपच कंटाळा यायला लागला.


प्रत्यक्ष माणसे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी घराबाहेर पडावेच लागले. H 4 visa ची उर्वरीत कहाणी पुढील भागात.

No comments: