Tuesday, September 18, 2012

Smith Creek Park (3)
आमच्या शहरात एक तळे आहे. तिथे चालायला खूप छान वाटते. मधोमध तळे आणि बाजूने चालणे होते. आजुबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. त्याचे फोटो घेत राहावेसे वाटतात. इथे सूर्यास्त खूप छान दिसतो. वर आकाशातले ढगांचे बदलते रंगही तळ्यात उमटलेले छान दिसतात.

Tuesday, September 11, 2012

रेल्वे


प्लॅटफार्म क्रमांक चार पर आनेवाली लोकल १२ डिब्बोंकी तेज लोकल है, यह लोकल, ठाणे घाटकोपर दादर यही स्टेशनोंपरही रुकेगी.... रेल्वे स्थानकांवर अशा होणाऱ्या घोषणा मला खूप आवडतात. सुरवातीला या घोषणा मी जेव्हा ऐकायचे तेव्हा मला अजिबात कोणताही पत्ता लागायचा नाही. कोणती लोकल, कोणता प्लॅटफार्म....


तिकीटे काढून विनायक अतिजलद वेगाने चालायचा, म्हणायचा चल लवकर... अरे हो ना, काय झाले? आपली गाडी आली का? झपाझप पावले टाकून धावत धावत जाऊन फलाटावर यायचो. काही सेकंदात धाड धाड धाड करत लोकल फलाटावर यायची. मी कधी डब्यात चढायचे व स्टेशन आले की कधी उतरायचे हि मला कळायचेही नाही. ईस्ट कुठे, वेस्ट कुठे, काहीही पत्ता लागायचा नाही. हळूहळू सवय होत गेली. माझा आणि लोकलचा संबंध जरूरीपुरताच आला. एकटी गेले तरी ऑफीसची गर्दी ओसरल्यावर जायचे व यायचे.

मला रेल्वे खूप आवडते ! फलाटावर उभे राहणे, गाटीत चढणे, चढल्यावर स्टेशनवर सोडायला आलेल्या माणसांना टाटा करून गाडी जेव्हा सुटते तेव्हा वाटते आपण अधांतरीच कुठेतरी चाललो आहोत. रेल्वेतली खिडकीतली जागा, त्यातून बाहेर बघणे, वळणे घेताना गाडी नागमोडी आकारात वळली की कशी मागून पुढून दिसते ती बघायलाही मला खूप आवडते. लग्नानंतर आम्ही दोघे जेव्हा पुण्याला जायचो तेव्हा कधीही रिझर्वेशन करून गेलो नाही. मुंबईहून पुण्याला जाताना प्रवास तीन ते चार तासांचा त्यामुळे तिकीट काढायचे आणि रेल्वेत बसायचे. कोल्हापूर किंवा सिंहगड एक्सप्रेसने जायचो. रेल्वेत चढल्यावर सोबत घेतलेल्या बॅगवर मी दोन्हीकडे पाय सोडून बसायचे. गाडीतल्या गर्दीतून वाट काढत चहावाले, चिकीवाले, कोल्डड्रींकवाले फिरायचे. कधी कधी दरवाज्यातच पाय सोडून बसायचो.रेल्वेमधून दारात उभे राहून बाहेरची हवा खायला खूप छान वाटते. रेल्वे जाताना जो रिदम तायर होतो तो ऐकण्यासाठी गाडीत खिडकीची जागा हवी. खिडकीत बसावे, डोळे मिटावे व रिदम ऐकावा. नाहीतर दारात उभे राहून गाडीबरोबरच शेजारचे धावते रूळ पाहत रिदम ऐकावा. विरुद्ध दिशेनी गाडी गेली तरी ती बघत त्या गाडीचा व आपण उभे असलेल्या गाडीचा मिळून जो रिदम तयार होतो तो पण छान असतो. ही रेल्वे मात्र अधून मधून थांबली की खूप कंटाळा येतो. कोणत्याही वाहनाला कसा सतत वेग हवा म्हणजे मग त्याची मजा लूटता येते. गाडी कशी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटापर्यंत पटापट गेली पाहिजे. याकरता मला फास्ट लोकल खूप आवडते. जेव्हा मला लोकलमधून प्रवास करण्याची सवय झाली तेव्हा मी शक्यतोवर फास्ट गाडीनेच जायचे. फास्ट लोकलची गाडी कोणत्या फ्लाटावर आहे याकडे माझे लक्ष असायचे. तिकीट काढताना फास्ट गाडीची घोषणा झाली तर घड्याळात बघून तिकिट घेऊन भराभर जिने चढायला, उतरायला, फलाटावरून एकीकडे गाडी येत आहे व भराभर पळून लेडीज डब्यापर्यंत धापा टाकत टाक्त जाऊन जय्यत तयारीने मला गाडीत शिरायला खूप आवडायचे, अर्थात बिना गर्दीच्या वेळी !रेल्वेत खिडकी जवळ जागा मिळाली की आपोआप बाहेर बघितले जाते. बाहेर बघता बघता एखादा घरगुती विचार सुरू होतो आणि आपण आपल्याच मनाशी बोलू लागतो किंवा बाहेरच्या गार वाऱ्याने हलकीशी एक डुलकी लागून जाते. या डुलकीतून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा एखादे स्टेशन आलेले असते आणि माणसांचा गोंगाट ऐकू येतो. चहावाले, कोल्ड्रींकवाले वडे समोसे घेऊन लोक गाडीतून वाट काढत फिरत असतात. एखादी नातेवाईक बाई कोणी खिडकीत बसलेल्या बाईला सांगत असते नीट सांभाळून जा गं, तर आपल्या शेजारचे बसलेले उठून गेलेले असतात. त्या जागी दुसरे प्रवासी येऊन बसलेले असतात.खूप पूर्वी जेव्हा आम्ही रेल्वेनी प्रवास करायचो. त्यात एखादवेळेला लग्नकार्यासाठी सर्व नातेवाईक एकत्र जायचो. त्यात आम्ही आतेमामे भावंडे खूप मजा करायचो. तेव्हा कर्जतच्या बटाट्यावड्याविषयी आम्हाला खूप कौतूक होते. खूप पूर्वी गाडी कर्जतला उभी राहिली की खिडकीजवळ वडे विक्रीला कधी येत नसत. कर्जतच्या मधोमध एका कांबाशेजारी गाडी येण्याच्या सुमारास गरम गरम वडे विक्रीकरता तयार असत. खूप मोठ्या अल्युमिनियमच्या ताटात हे वडे आले रे आले की लगेच त्याचा फडशा उडत असे. आमचे मामेअभाऊ आम्हाला प्रत्येकजणीला विचारायचे तुम्ही किती खाणार वडे. कोणी २ कोणी ३ असे करत करत २५ ते ३० वडे एका पानामध्ये गुंडाललेले यायचे. गाडीतली इतरही माणसे खाली उतरून वडे घेण्याकरता सज्ज असायची. त्या पूर्वीच्या वड्याला खूप चव होती. नंतरही अनेकवेळा प्रवास करूनही मला कर्जत स्टेशन आले की बटाटेवडा घ्यावासा वाटायचाच !जशी मला सर्व वाहनांमध्ये रिक्षा आवडते तसेच मला सर्व प्रवासामध्ये रेल्वेने प्रवास करायला खूप आवडतो. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये असणारे रेल्वे सीनही बघायला मला जास्त आवडतात. आठवून पाहा बरे हे सीन. शोलेमधली जयवीरूची गुंडांसोबतची फायटींग, पाकीझामध्ये चुकून लेडीज कपार्टमेंटमध्ये आलेला राजकुमार, डीडीएजजे मध्ये शाहरूखने गाडी सुरू होताच काजोलला दिलेला हात, चितचोरमध्ये झरिना वहाब अमोल पालेकरला शोधण्यासाठी येते आणि तो गाडीत तर बसला नाही ना म्हणून गाडीबरोबरच धावते, आराधनामध्ये एकीकडे रेल्वे आणि एकीकडे जीप किती छान दिसते !
तर असा हा रेल्वेचा प्रवास तुम्हाला आवडतो का?


Monday, September 10, 2012

फुलांची सजावट

Fort Fisher Sea Beach फोर्ट फिशर या समुद्रकिनाऱ्यावर काल फिरायला गेलो होतो. हा किनारा मला खूप आवडतो. इथे वाळूत बसणे होते. शिवाय इथे खडकावर बसून व उभे राहून समुद्रातील लाटांना पाहता येते. काल तूफानी वारे होते. वाळू उडत होती व लाटा उसळल्या होत्या. वाऱ्याने लाटा उलट्या होत होत्या. खूप छान वातावरण होते. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने एक छोटा रस्ता जातो त्यामुळे त्यावरून चालणे होते. चालताना एकीकडे भव्य समुद्रही दिसतो. पाण्यात तयार झालेले वेगवेगळे रंग छान दिसतात. त्या रंगांचे एका मागोमाग असे थर दिसतात. मातकट रंग, निळा , हिरवा अशा छान छटा दिसतात. वेगवेगळ्या कोनातून या समुद्राला पाहता येते. इथे सीगल्स असतात. वाळूत लहान मुलांनी छान कलाकृती केलेल्या बघायला मिळतात.