Tuesday, September 05, 2017

हवेशीर घर


अपार्टमेंट सी सेव्हन मला पाहताच क्षणी आवडून गेले. एकमात्र तोटा होता की, या घरामध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद्दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. स्वयंपाकघराला लागूनच मोठाच्या मोठा हॉल होता. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक आरामदायी खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.


घराच्या दोन्ही बाजूला मोठाल्या बाल्कन्या होत्या. घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाक करता करता हॉलमध्ये ठेवलेला टीव्ही बघता यायचा. बाल्कनीला लागूनच एक जिना होता. या जिन्यात मी दुपारचा चहा पीत बसायचे. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्‍या बेडरूममध्ये यायचे. लॅपटॉपवर मैत्रिणींशी बोलायचे आणि मग तिथेच झोपून जायचे. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे.




बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. उन्हाळ्यातली वाळवणं मी याच बाल्कनीत वाळवायला ठेवत असे. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.
या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या आरामदायी खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. या घरातल्या मास्टर बेडरूमच्या खिडकीतून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा. चंद्राला बघून आपोआप गाणे गुणगुणले जायचे- ‘ये रात भीगी भीगी, ये मस्त नजारे, उठा धीरे धीरे वो चॉंद प्यारा प्यारा…’
असे हे माझे सुंदर-साजिरे घर माझ्या आठवणींचा ठेवा बनून राहिले आहे…
रोहिणी गोरे
वॉशिंग्टन, युएस

No comments: