Thursday, June 15, 2017

H 4 Dependent visa (4)

आमच्या अपार्टमेंटच्या घरासमोर जे तळे होते तिथे माझ्यासारखीच काहीजण बदकांना ब्रेड खायला देण्यासाठी येत असत. लायब्ररीतले काम सोडून दिल्यानंतर आता पुढे काय? याचे विचारचक्र माझ्या डोक्यात सुरू झाले. क्लेम्सनला असताना चर्चमध्ये काम मिळाले तसे इथेही मिळू शकेल का? किंवा इथे जवळपासच्या चालण्याच्या अंतरावर डे-केअर किती आहेत? हे गुगलशोध करून शोधून काढले. त्यात चालण्याच्या अंतरावर एक डे-केअर आणि एक चर्च सापडले. ही दोन्ही स्थळे मी जेव्हा चालायचे तेव्हा मला माहिती होतीच पण आता नोकरीच्या निमित्ताने तिथे गेले, विचारले की इथे वेकन्सीज आहेत का? माझ्याकडे ग्रीन कार्ड आहे त्यामुळे मी कायद्याने नोकरी करू शकते हे त्यांना सांगितले. शिवाय थोडाफार अनुभव आहे आणि त्या अनुभवांची रेको लेटर्स पण आहेत हेही सांगितले. ही रेको लेटर्स घेऊन ठेव असे माझ्या बरोबर क्लेम्सन मध्ये काम करणाऱ्या रेणुकानेच मला सुचवले होते. चर्चमध्ये आणि डे-केअर मध्ये हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी मला अर्ज दिला तो मी तिथल्या तिथे भरून दिला. अर्ज भरून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही तुला कळवू. सध्या तरी आमच्या इथे कोणत्याही व्हेकन्सीज नाहीत. लायब्ररीच्या अनुभवानंतर मी शहाणी झाले होते. कोणत्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि मुलाखतीसाठी बोलावणे येईल अशी वाटही बघायची नाही.




एकदा तळ्यावर चक्कर मारत असताना तिथे एक बाई मला दिसली. ती आमच्या अपार्टमेंटच्या जवळच्या घरातून बदकांना ब्रेड घालायला यायची. तिच्या कारचा आकार पण जरा विचित्रच होता. तिने माझी व मी तिची चौकशी केली. ती म्हणाली "मी आधी न्युयॉर्कला रहायचे. पण आता इथे रहायला आले आहे. ती चर्चमध्ये जाते असे सांगितल्यावर मि तिला लगेचच कामाविषयी विचारले.. तर ती म्हणाली की नोकरी नाही पण चर्च मध्ये तू माझ्याबरोबर दर बुधवारी voluntary work करायला येऊ शकतेस. तु बुधवारी ये. तिथले काम बघ. तुला आवडले तर तू माझ्याबरोबर ये. मी तुला दर बुधवारी आणायला व सोडायला येत जाईन. मि इथेच राहते तुझ्या अपार्टमेंटच्या जवळच. मी तिच्याबरोबर बुधवारी गेले . तिथल्या चर्च मध्ये "अन्नवाटप" करतात ते कळाले. गरीबांसाठी चर्चमध्ये दररोज लागणारी ग्रोसरी घेऊन ठेवतात व त्याचे वाटप करतात. चर्चमध्ये एका मोठ्या खोलीत रॅक लावलेले असतात तिथे सर्व प्रकारची ग्रोसरी ठेवलेली असते. मधोमध टेबले असतात. त्या टेबलाभोवती आम्ही ओळीने उभे रहायचो. घरातून येताना कॅरी बॅग्ज आणायला सांगायचे. आपल्या घरी ग्रोसरी आणल्यावर बऱ्याच कॅरी बॅग्ज आमच्याकडे जमा झालेल्या असतात त्या घेऊन जायचे. तिथे गेल्यावर सर्वांनी आणलेल्या कॅरी बॅग्ज चेक करायचो. त्यातल्या खूप फाटलेल्या असतील त्या फेकून द्यायचो. व बाकीच्या चुरगळलेल्या बॅगा हाताने सरळ करून एकावर एक ठेवायचो म्हणजे माणसे ग्रोसरी घ्यायला आली की पटापट त्यांना हवे असलेले सामान भरून द्यायचो. दर बुधवारी सकाळी ९ ते १२ हे काम चालायचे. काही वेळा माणसे उशिराने येत. काही वेळा ९ लाच हजर राहत. दर बुधवारी मी कामाला जायला लागले खरी पण हे काम मला जास्त आवडले नाही. ८ ते १० बुधवारच गेले असेन. नोकरीचा विषय मी माझ्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकला.





विचार करता करता सुचले घरबसल्या काही ऑनलाईन शिकता येईल का? म्हणून नेहमीप्रमाणेच गुगलशोध केला तर त्यात मला काही कोर्सेस सापडले. हे कोर्सेस दीड ते दोन,, किंवा काही ३ ते ४ महिन्यांचे होते.
या सर्व कोर्सेस ची फी ८० ते १०० डॉलर्स अशी होती. यातले ३ कोर्सेस मी एकही डॉलर न भरता पूर्ण केले. कसे ते लवकरच लिहिन. या ऑनलाईनच्या कोर्सेस नंतर मात्र ओळीने जे काही घडत गेले ते खूप आनंद देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे होते !! माझ्या शिक्षणाचा काळ येऊन ठेपला होता.

4 comments:

संपदा कोल्हटकर said...

मध्यंतरी माझं ब्लॉगवाचन बंद पडल्यामुळे ही लेखमालिका सुरू झाल्याचं कळलं नव्हतं. आज वाचून काढले हे लेख. नेहमीप्रमाणेच छान आहेत!

rohinivinayak said...

हाय संपदा,, तुझी प्रतिक्रिया मला खूप आवडली. या लेखमालेत अजून २ ते ३ भाग होतील. प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! :)

Ashok chandode said...

खुप चांगले लिहिता तुम्ही वाचुन बरे वाटले

rohinivinayak said...

Anek dhanyawaad !! tumchi pratikriya vachun mala khup chhan vatle, utsah aala.