Thursday, May 30, 2013

३० मे २०१३

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला पाहिजे. काल संध्याकाळी तळ्यावर चक्कर मारायला गेले तर अजून एका बदकीणीला पिले झाली होती. तळ्याच्या काठाला ही बदकीण आपल्या पिल्लांना घेऊन बसली होती. तिची पिले तिच्या पंखाखाली होती. मी त्या पिलांना शोनुल्या मोनुल्या असे करून हाका मारल्या आणि ती पंखाच्या बाहेर आली. थोडी छायाचित्रे घेतली. एक विडिओ घेतला. खूप आनंद वाटला. तसा तर मला अजून एका गोष्टीनेही खूप छान वाटले होते. सध्या फेसबुकावर मी एका समुहामध्ये मला भरती करून घेतले आहे. त्याचे नाव आहे संगीत के सितारे. हा म्युझिक ग्रूप बरेच दिवसांपासून आहे. विनायक तिथे पूर्वीपासून आहे. तिथे वेगवेगळ्या थीम चालू असतात. दर २/४ दिवसांनी थीम असतात वेगवेगळ्या.

मागच्या आठवड्यात विनायक म्हणाला की चोरी चोरी चुपके चुपके थीम चालू आहे. त्यात विनायकने एक जुने गाणे टाकले होते. मी व विनायक नेहमीच युट्युबवर गाणी बघत असतो. मला ती थीम आवडली आणि मी तो समूह जॉईन केला. या थीममध्ये बसणारे मला पहिले कोणते गाणे आठवले असेल तर ते म्हणजे चोरी चोरी चुपके चुपके या शब्दांनी सुरवात होणारे आपकी कसम मधले गाणे. ते मी टाकणार होते पण मला टाकता आले नाही. ते कोणीतरी आधीच टाकले होते. दुसरे गाणे आठवले ते म्हणजे चोरी चोरी कोई आए चुपके चुपके सबसे चुपके .... हे पुनम धिल्लन वर चित्रीत झालेले गाणे. हे पण कोणीतरी टाकले होते. आपकी पसंद ही थीम आली मग त्यात मी निगाहे मिला हे गाणे टाकले. काल परत आपकी पसंद थीम होती त्यात मी ये दिल और उनकी हे गाणे टाकले. हे गाणे मला खूपच आवडते. हे गाणे ऐकताना तर मी खूप तल्लीन होऊन जाते.


तर आज थीम होती ज्या कुणाचे आईवडील पण नट/नटी होते त्यांच्या मुलांची गाणी टाका. तर मी तनुजाचे मुझे जा ना कहो मेरी जा हे गाणे टाकले. खरे तर हा एक छान विरंगुळा आहे. गाणे टाकताना आपण त्यावर विचार करतो. कोणते बरे टाकावे? त्यानिमित्ताने त्या थीमनुसार गाणीही ऐकतो. आणि त्यावेळेला जे गाणे आवडेल ते टाकतो. त्या समूहात दुसऱ्यांनी जी गाणी टाकली असतील ती पण पाहिली जातात आणि ज्ञानात भर पडते. पूर्वी ऑर्कुटवर अशा काही समूहामध्ये मी खूपच बिझी झाले होते ते दिवस आठवले. आजचा दिवस एका वेगळ्याच कारणासाठी छान गेला. मी अंजलीला अधुनमधून फोन करते. आज तिने मला तिची एक आठवण सांगितली ती ऐकून मला खूपच छान वाटले. सांगताना चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आणि तिच्या आठवणीत मी रमून गेले. खरेच अशा काही आठवणी आपण आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा शेअर करतो तेव्हा तिला आणि आपल्यालाही किती छान वाटते ना. आज आईबाबांशी फोनवर बोलले तेव्हा बाबा व मी खूप हासलो. विषय होता मराठी मालिकांचा. बाबा आणि मी नेहमी म्हणतो किती पाणी घालून वाढवतात या मालिका. अवास्तव विषय न पटण्यासारखे पण आपण त्या का बघत राहतो?कालचा आणि आजचा दिवस एक वेगळाच आनंद देणारा होता. प्रत्येक दिवस कसा वेगळा ठरलेला असतो, नाही का? कधी आनंदाचा तर कधी दुःखाचा, कधी मूड जाणारा तर कधी नाही त्या गोष्टींचा ताप देणारा.

Tuesday, May 21, 2013

माझे बाबा
"विसर प्रीत, विसर गीत, विसर भेट आपुली, यापुढे न चांदरात यापुढे न सावली" संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गाणे,, बाबा आम्हाला सांगतात, "मी हे गाणे ऐकले, गायक संगीतकार कोण हे सर्व जाणून घेतले" आणि बाबांनी रेडिओ घरी आणला आमच्या लहानपणीच. बाबांचा आवाज "सेम टु सेम" सुधीर फडके यांच्यासारखा आहे. बाबा पेटी खूप छान वाजवतात. त्यावर त्यांचे ३३ राग शिकून झाले आहेत. बाबा नेहमी म्हणतात की गाणे असावे तर ते सुधीर फडक्यांसारखे, जसे काही ते गाणे हवेतून तरंगत तरंगत येऊन आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. गाण्याप्रमाणेच बाबा उत्तम गोष्टी सांगतात. आम्ही दोघी बहिणी लहानपणी बाबांकडून गोष्टी ऐकायचो. रात्रीची जेवणे झाली की ते आम्हाला गोष्टी सांगायचे. बाबांना गोष्ट सांगायचा कंटाळा आला तरी सुद्धा बाबांना आम्ही म्हणायचो, बाबा एक तरी गोष्ट सांगा ना? मग आमच्या आग्रहाखातर ते एक गोष्ट सांगायचे आणि आम्ही झोपायचो. सर्व गोष्टींमध्ये आम्हा दोघी बहिणींना एक गोष्ट खूप आवडायची आणि ती म्हणजे रंजा रोह्याच्या बाहुल्या मंडईत जातात! पूर्वी सांगली मिरजेला त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या भाच्यांची लग्ने झाली त्यामध्ये त्यांच्या एका भाचीच्या लग्नात ती सासरी जाताना बाबांनी "लाडकी शकुंतला" हे गाणे गायले होते. त्या वेळेला आम्ही दोघी बहिणी शाळेत जात होतो. बाबांचे हे गाणे ऐकताना तर मला खूप रडू फुटते.  दुसरे एक गाणे म्हणजे गीतरामायणातले "बोलले इतुके मज श्रीराम" हे गाणे बाबा इतके काही छान गातात की ऐकताना अश्रुंच्या धारा वाहतात.गाणी गाणे आणि गोष्टी सांगणे याप्रमाणेच बाबांमध्ये अजून एक छान कला आहे ती म्हणजे बाबा उत्तम रांगोळ्या काढतात. आईबाबांच्या भाचवंडांची लग्नाची केळवणे आमच्या घरी झाली होती तेव्हा बाबांनी त्यांच्या ताटापुढे खूप सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. ताटाभोवती सुंदर महिरप बाबा खूप छान काढतात. त्यांच्या एका भाच्याच्या लग्नात त्यांनी नवरा नवरीची जी खास पंगत असते त्यांच्या प्रत्येक ताटाभोवती सुरेख महिरप काढली होती. पूर्वी कार्यालयात लग्नाच्या पंगती खाली बसत असत. पाटावर बसून पंगती जेवत असत. दिवाळीत आमच्या घरी सकाळी सडा घालून बाबा व आम्ही दोघी खूप रांगोळ्या काढायचो. बाब निसर्गाची चित्रे काढायचे व आम्ही दोघी बहिणी ठिपक्यांच्या रांगोळ्या दारासमोर अंगणात काढत असू.बाबा मला पहिलीत असताना शाळेत सायकलवरून सोडायचे. आमच्या घरी बाग असल्याने मी शाळेत जाताना माझ्या बाईंना द्यायला एक गुलाबाचे फूल घेऊन जायचे. ते मी माझ्या डाव्या हातात अलगद धरायचे. बाल शिक्षण मंदीर या शाळेमध्ये बाबा मला सायकलवरून सोडायचे. बाबांना मी सांगायचे. बाबा माझी शाळा सुटेपर्यंत नक्की शाळेमध्ये थांबाल ना? बाबा म्हणायचे "हो हो मी नक्की थांबणार. तू काळजी करू नकोस" माझी शाळा सुटेपर्यंत बाबा शाळेतच थांबले आहेत या भरवशावर मी शाळेत जायचे. एकदा काय झाले मधल्या सुट्टीत पाणी प्यायला मी खाली आले आणि बाबा आहेत का हे बघावे म्हणून शाळेच्या ऑफीसमध्ये पाहिले तर तिथे बाबा नव्हते. मी नंतर बाबांना तसे सांगितले की बाबा तुम्ही शाळेमध्ये नव्हता. तुम्ही मला खोटे सांगता तुम्ही शाळेच्या ऑफीसमध्ये बसलेले असता म्हणून. मग बाबा म्हणाले केव्हा पाहिलेस तू मला? त्यावर मी सांगितले की पाणी प्यायला आले होते तेव्हा मला तुम्ही कुठे दिसला नाहीत. तेव्हा म्हणाले हा तेव्हा होय? अग मला थोडे ऑफीसमध्ये काम होते म्हणून तेवढयापुरते मी गेलो होते. एकदा शाळेची सवय झाली तेव्हा नंतर मग मला कळाले की बाबा मला शाळेमध्ये सोडून तसेच ऑफीसमध्ये जात होते.


आमच्या घरापासून कमलानेहरू पार्क जवळ होती. आम्ही त्या बागेत खिंड ओलांडून चालत चालत चौघे जायचो. मी आईबाबा, रंजना व मी. तिथे आई बसायची हिरवळीवर व बाबा आमच्या दोघींबरोबर शिवाशिवी, लपंडाव खेळायचे. नंतर बाबांचा एक भेळवालाही ठरलेला होता. खेळून झाल्यावर मग घसरगुंडी, झोपाळा यावरही खूप खेळायचो आणि नंतर भरपूर भेळ खायचो. अजून मोठ्या झाल्यावर मग पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस असे सर्व खायचो. हा कार्यक्रम आमच्या दोघींच्या लग्नानंतरही खूप चालला. मी डोंबिवलीवरून आले की मग आम्ही चौघे कमलानेहरू पार्क मध्ये जायचो, पण त्यावेळी चित्र वेगळे असायचे. आमच्या दोघींचे लग्न झाले होते. बाबा पार्कला एक मोठी चक्कर मारून यायचे. तोवर आम्ही तिघी, म्हणजे मी आई व माझी बहिण हिरवळीवर बसून खूप गप्पा मारायचो. नंतर ठरलेली खादाडी. नंतर आमच्यामध्ये एक मेंबर वाढला तो म्हणजे माझी भाची सई. चित्र परत पालटले. बाबा सईबरोबर बागेत खूप खेळायचे, आम्ही तिघी गप्पा मारायचो. नंतर खादाडी ठरलेली. जाता येताना मात्र सई आजी आजोबांबरोबर रिक्शाने जायची. आम्ही दोघी चालत जायचो. त्यावेळच्या आमच्या दोघींच्या छान गप्पा व्हायच्या. रिक्शात बसताना आई आम्हाला बजावायची. रेंगाळत बसू नका हं. लवकर या घरी. आम्ही दोघी पण हो गं आई! असे म्हणायचो. आम्ही निवांतपणे गप्पा छाटत घरी यायचो.


रेडिओप्रमाणेच आमच्या घरी टेपरेकॉरर्डर आणि टेलिव्हिजन अचानक आले. बाबा खूप हौशी आहेत. टेपरेकॉरर्डर तर आम्ही अगदी खेळण्यासारखा वापरला. त्यावर गाण्याच्या भेंड्या, जाहिराती आम्हीच म्हणलेल्या, शिवाय गोष्टी, भांडणे, सर्व टेप केली. उन्हाळ्यात आमच्याकडे आईची भाचवंडे आली की बाबा आम्हाला सर्वांना अंगणात सतरंज्या अंथरून गोष्टी सांगायचे. भूताच्या गोष्टी सांगायचे. मग आम्ही जाम टरकायचो. कोणाला तहान लागली की त्याला अंगणातून स्वयंपाकघरात जाताना जाम भीती वाटायची. आमी दोघी बहिणी जेव्हा सज्ञान झालो तेव्हा आम्हाला आमच्या नावाने बाबांनी बँकेत खाते उघडून दिले होते. बाबांना फोटोग्राफीची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पूर्वी बॉक्स कॅमेरा होता. त्यांनी २/४ पेट्या भरतील इतके फोटो काढले होते. त्यातले पुरात खूप वाहून गेले. बाबांनी १९५१ ते १९६१ पर्यंत लोकांना इंग्रजी व गणित फुकट शिकवले. पूरानंतर आईबाबांनी दोघानीही शिकवण्या सुरू केल्या.माझे बाबा स्वभावानी खूप तापट आहेत पण तितकेच ते प्रेमळही आहेत. त्यांचा वाढदिवस मे महिन्यातला. त्यामुळे आमरस पुरीचा बेत ठरलेला असतो. २६ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यावर्षी ते ८२ वर्षाचे पूर्ण होतील. त्यांना रोहिणीविनायक कडून वाढदिवसाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा !Saturday, May 18, 2013

१८ मे २०१३

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालच्या दिवसाची थोडी भर घालायला पाहिजे. काल प्रचंड प्रमाणात गरम होते. उन्हाचा चटका बसेल इतके ! काल ग्रंथालयात जायचे खरे तर ठरवले होते, पण तापमान पाहिले आणि जाण्याचे रहित केले. उन्हामुळे दुपारची झोप खूप लागली. कूलर लावल्याने घर खूप गार झाले आणि कधी नव्हे ती खूप झोप लागली त्यामुळे रात्रीच्या झोपेचे खोबरे झाले !


पहाटेच्या सुमारास झोप लागली. पहाटे अगदी वाटले की घराच्या जवळ (कारने १५ मिनिटे) असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सूर्योदय बघावा की काय! हा कार्यक्रम केव्हा होणार आहे कोण जाणे? त्याकरता भल्या पहाटे उठावे लागते ना? ते कोण उठणार? समुद्रातून उगवणाऱ्या सूर्याचे खूप फोटोज मला अजूनही घ्यायचे आहेत. तो दिवस लवकरच जमवीन असा अगदी निश्चयच केला आहे मी आज ! कालचे जागरण त्यामुळे आज खूप उशीराने उठले. खरे तर उठवतच नव्हते. चहा घेतला. न्याहरी झाली आणि कधी नव्हे ते हेअर कलरही केला. नेहमीची घराची साफसफाई करून बाहेर जायला निघालो. आज मी पूर्वीचे काही पंजाबी ड्रेसही बाहेर काढले. उन्हाळ्यात बाहेर जाताना घालणार आहे. हा पण एक निश्चयच आहे ! आज दिवस आहे निश्चयाचा ! मागचे काही वीकेंड छान मस्त हवा होती आणि माझ्या आवडत्या समुद्रकिनारावर जायचे असे ठरवूनही झाले नाही. त्यामुळे आज काहीही झाले तरी जायचेच असे ठरवले. हवा छान होती, पण खूप छान काही नव्हती. कालच्या मानाने आज गरम खूपच कमी होते आणि जेवल्यावर आमच्या दोघांची स्वारी पोहोचली माझ्या आवडत्या समुद्रकिनाऱ्यावर. साधारण एक तासाचा ड्राईव्ह आहे.

तिथे पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे थोडे वाळून बसलो आणि मग तिथून रस्याने किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो. तिथे एक शेड आहे तिथे आम्ही बसतो आणि परत घरी परतायला निघतो. आज त्या शेड मध्ये इतके काही छान गार गार वारे होते की असे वाटले इथेच पथारी पसरून झोपावे !


आज समुद्रकिनाऱ्यावर चक्क दोन लग्ने होती ! लग्नाची गर्दी छान नटून थटून आली होती. सर्वांचे फोटो काढणे सुरू होते. मला पण त्यांचे फोटो काढावेसे वाटले. वाळून बसलो होतो तेव्हा समुद्रकिनारा खूप छान दिसत होता. वर निळे आकाश, निळा समुद्र, आणि तपकिरी वाळू. मस्त रंगसंगती जुळून आली होती. तिथे मी उभे राहिले आणि विनायकला एक फोटो घे असे सांगितले. आज मी टॉप पण खूप जुना घातला होता. हा टॉप मी सहसा घालत नाही. खरे तर तो आवडला म्हणून मी केव्हाचा घेतला आहे. पण आता तो घालणार आहे. तळ्यावर फिरायला जाताना आता जुने पंजाबी सूट घालायचे ठरवले आहे.


घरी आलो आणि गरमागरम चहा घेतला तरीही आज डोके अजूनही तसे दुखतच आहे. भाजी, धिरडे आणि भात केले. आज आता लवकर झोप लागणार असे वाटते. रोजनिशी लिहायचा कंटाळा आला होता पण आज लिहूच असे ठरवून लिहायला बसले. आज दिवस तसा म्हणायला गेला तर खूप छान असा गेला नाही. बरा गेला असे म्हणायला हरकत नाही.

Thursday, May 16, 2013

बाजारहाट.. (२)

लग्ना आधी आईकडे दोन भाजीवाल्या घरीच यायच्या. दोघींचे वेगवेगळे वार ठरलेले असायचे. भाजी ताजी असायची पण महाग असायची. त्या दोघीजणी भाजीच्या जड जड टोपल्या घेऊन यायच्या म्हणून आई त्यांच्याकडून भाजी घेत असे. आईकडे राहत असताना १५-२० दिवसांनी आमची चक्कर पुण्याच्या मंडईत होत असे. शनिपाराचा चौक आहे तिथून मंडईकडे जाणारा रस्ता आहे तिथे सुरवातीला बऱ्याच भाजीवाल्या बायका बसायच्या. ओळीने बसलेल्या असायच्या. त्यांच्या पुढ्यात छोट्या छोट्या टोपल्या, त्यात ठराविक दोन तीन भाज्या, वजन तोलण्यासाठी तराजू, वजने मापे असायची. त्यावेळी आम्ही तिघी म्हणजे आम्ही दोघी बहिणी व आई बसने मंडईत जायचो. भाज्या घेऊन मग ग्रीन बेकरीतले छोटे समोसे घेऊन रिक्शा करून घरी परतायचो.
मंडईतल्या भाजी खरेदीबरोबर इतर दुकानातील खरेहीही व्हायची. आमचे घर गावाबाहेर असल्याने बाकीच्या बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला गावात यायला लागायचे. तुळशीबाग, चितळे स्वीटमार्ट, लक्ष्मी रोड आणि नंतर सगळ्यात शेवटी मंडई ! तिथून सर्व भाजी घेतली की मग शनिपाराशी रिक्शा उभ्या असायच्या, त्यातल्या एका रिक्शेतून घरी परत. आमच्या तिघींच्या हातात ३-४ पिशव्या आणि रिक्शात बसताना सर्व पिशव्या, काही मांडीवर तर काही खाली ठेवायला लागायच्या. घरातून काय काय घ्यायचे आहे याची ही भली मोठी यादी ! मंडईत नारळवाला, कांदेबटाटेवाला ठरलेला होता ! कोथिंबीरीच्या गड्यांचे तर मोठे मोठे ढीग असायचे. मंडईत भाज्यांचे भाव ओरडून सांगत असत. नुसता कलकलाट ! मंडईत जिथे कांदे बटाटे विक्रीसाठी ठेवलेले असत तिथे नेहमीच खूप शांतता असायची. मेथीच्या किंवा कोथिंबीरीच्या गड्या की जे नाशिवंत आहेत त्या मालाचा खप पटापट झाला पाहिजे तिथे खूप गोंगाट. ३ ला २, ५ ला ४,, असे भाव ओरडून सांगायचे आणि माल हाहा म्हणता संपून जायचा. भाजी खरेदीमध्ये मला वाटे हा प्रकार खूप आवडायचा, अजूनही आवडतो. मिरच्यांचे वाटे, आल्याचे वाटे, चिंचेचे वाटे तर फुलांचेही वाटे त्यावेळी असायचे.
भाजी खरेदीमध्ये नारळ घ्यायचा असायचाच. एक नारळवाला होता तो प्रत्येक नारळावर त्याच्या बोटातल्या अंगठीने ठक ठक वाजवायचा. त्यांचे नाव बहुतेक पावगी होते. नारळ हलवून आत पाणी किती आहे याचा अंदाज घ्यायचा आणि मग त्यातला एक नारळ तो आम्हाला द्यायचा आणि सांगायचा. एकदम छान नारळ ! गणपती उत्सवात मोदकांसाठी निवडक नारळ बाजूला काढून ठेवत असे. तो नारळवाला एकदम छान नारळ, अजिबात खराब निघणार नाही असे निक्षून सांगायचा, तरीही आई त्याला परत विचारायची, नक्की चांगला निघेल ना? लगेच तो हो ताई, एकदम चांगला निघेल. तुम्ही किती वर्षे नारळ घेत आहात माझ्याकडून! बटाटे कांदे यांच्या जड पिशव्या आई त्यांच्याकडेच ठेवायची आणि त्यांना सांगायची की मी सर्व भाजी घेऊन येते तोवर या जड पिशव्या इथेच राहू देत. तो नारळवाला पण 'हो हो अगदी आरामात या. ' असे सांगून मग आम्ही तिघी फळभाज्या, पालेभाज्या, काकड्या, टोमॅटो असे सर्व खरेदी करायचो. व परत त्याच्याकडे यायचो.

सणवारांच्या दिवसात तर भाजी खरेदीसाठी नुसती धमाल यायची. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या पेट्या, करंड्या, थंडीमध्ये १००/१०० लिंबू खरेदी, मे महिन्यात कैरी खरेदी म्हणजे १०/१० किलो कैऱ्या आणायचो. लिंबे आणली की त्यात गोड लोणचे, तिखटमीठाचे लोणचे, सरबते, खाऱ्यातल्या मिरच्या असे कितीतरी व्हायचे! कैरीच्या दिवसात पन्हे, ते सुद्धा कच्च्या कैरीचे, उकडून कैरीचे असे वेगवेगळे, शिवाय मेथांबा. थंडीमध्ये आवळे भरपूर यायचे. त्याचेही बरेच प्रकार आई करायची. आवळ्याचे लोणचे, मोरावळा, पाकातला मोरावळा, औषधी मोरावळा. मोरंबा आणि गुळांबा यामध्ये आम्हा दोघी बहिणींना गुळांबा जास्त आवडायचा!

मटार मंडईत यायला लागले की १०/१० किलो मटार घ्यायचो. घरी आल्यावर मटार वर्तमानपत्रावर पसरायचा आणि प्रत्येकजण छोटी मोठी रोळी घेऊन मटार सोलायला बसायचा. मटारचे सोललेले दाणे रोळीत जमा व्हायचे. आणि मग सगळ्यांच्या रोळ्यातून मटारचे दाणे आई एका भल्या मोठ्या पातेल्यात जमा करून ठेवायची. त्या दिवशी घरभर मटारची हिरवीगार साले सर्वत्र पसरलेली असायची. या इतक्या १०/१० किलो मटारात ओला नारळ घालून केलेली उसळ कितीतरी वेळा व्हायची. सामोसे करण्यासाठीही परत एकदा खास मटार आणला जायचा. सामोसे तर आई इतक्या प्रमाणात करायची की येता जाता दिवसभर सामोसे खाऊन तृप्त व्हायचो.

हरबऱ्याच्या गड्यांचे तर विचारूच नका ! मंडईतून हरबऱ्याच्या गड्या आल्या की दुपारच्या वेळात प्रत्येकाच्या हातात हरबरा गड्डी. कोणी पायरीवर बसून खातयं तर कोणी अंगणात बसून तर कोणी डायनिंग टेबल वर हरबरा गड्डी ठेवून खातय. हा मोठा पसारा! हरबरा खाऊन त्याची टरफले जमा व्हायचीच, शिवाय हरबरा संपलेल्या गड्ड्याही बऱ्याच जमलेल्या असायच्या. संपलेल्या हरबरा गड्यांनी केरसुणी फिरवून केर काढतो त्याप्रमाणे सर्व टरफले एकत्र करायचो.जेव्हा आम्ही तिघी बसने निघायचो ती बस संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान असायची. निघताना आई जास्तीचे पैसे घेऊन ठेवायची. एकात एक बसणाऱ्या ७/८ पिशव्या घेत असू. फळभाजीसाठी एक, कांदेबटाटे व नारळासाठी एक, पालेभाजीसाठी एक, इतर काही घेतले आणि खायला घेतले तर त्यासाठी एक दोन पिशव्या असायच्या. भलीमोठी यादीही आठवणीने घेतली जायची. त्याकरता आई आम्हाला कितीतरी वेळा आठवण करून देत असे. आम्ही पण आईला अगं किती वेळा सांगतेस तेच तेच ! असे म्हणून चिडायचो. आई म्हणायची चिडू नका गं, आपले घर लांब आहे ना, मग काही राहिले तर परत चक्कर कशाला?


मंटईत एक 'आरस' नावाचे एक हॉटेल होते. हे हॉटेल काही अजबच होते. एक तर त्याचा प्रवेश बोळकांडीतून होता आणि हे हॉटेल चक्क मजल्यावर होते. तिथे बसले की खिडकीतून खालची रहदारी दिसायची. खरेदी सुरू होण्या आधी तिथे जाऊन मसाला डोसा, उत्ताप्पा आणि इडली सांबार, वर आयस्क्रीम असे खाऊन मग खरेदी सुरू ! प्रत्येक वेळी खरेदीचे वेगळेपण असायचे. कधी आरसमध्ये डोसा तर कधी पुष्करिणी भेळ तर कधी ग्रीन बेकरीतले छोटे समोसे व पॅटीस घेऊन ते घरी आल्यावर खायचो. खाऊन मग गरमागरम चहा !

क्रमश:...


Saturday, May 11, 2013

Art Photographyआकाशातील रंगांची रंगसंगती, त्याचबरोबर ढग, त्यांचे आकार, त्यातले रंग, शिवाय गवतफुले हे सर्व काही इतके काही छान दिसत असते की कॅमेरात बंदिस्त करावेसे वाटल्याशिवाय राहत नाही. सूर्यास्त काही वेळा अप्रतिम दिसतात. हे सर्व साठवून ठेवायला आणि नंतर वेळ जात नसेल तर पाहण्यासाठी खूप मस्त वाटत रहाते.


Friday, May 03, 2013

३ मे २०१३

गेल्या आठवड्यापासून सकाळी उठल्यावर दार उघडून पाहावे तर पावसाळी हवा आणि कमी जास्त जोराचा पाऊस असतो. मान्सूनचा पाऊस वाटतोय इतका रोजच्या रोज पडतोय, पुढच्या आठवड्यातही आहेच. मधूनच एखादी उन्हाची तिरीप येते आणि निघून जाते. अर्थात पाऊस मला आवडतोच पण तरीही स्वच्छ सूर्यप्रकाश पडला की जास्त हुरूप येतो हेही तितकेच खरे!आज सकाळी विविधभारतीवर एका कार्यक्रमात नर्गीसची गाणी लागली होती तर छायागीतमध्ये स्वप्नांवर आधारीत गाणी होती. त्यातली काही पहिल्यांदाच ऐकली. आता माझे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. ग्रंथालयात जात नाही. आता आठवड्यातून दोनदा शॉपिंग मॉल व वॉल मार्टला जायचे ठरवले आहे. आज कंटाळा आला होता आणि पायही दुखत होते तरीही गेले. गेले म्हणजे पाउले घराबाहेर पडायलाच मुहूर्त साधायला लागतो. एकदा का ती बाहेर पडली की आपोआप जाणे होते आणि मग उत्साह येतो. इथल्या बसेस म्हणजे काय नुसत्या गोल गोल फिरणाऱ्याच असतात. आणि त्यातूनही काही लिंका असतात. म्हणजे एका थांब्यापासून दुसरी बस पकडायची त्यात मध्ये अर्धा नाहीतर एक तास बाकड्यावर वाट बघत बसायला लागते.

अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर गणेश खिंडीमधून निघून जर डेक्कन जिमखान्याला जायचे असेल तर आधी शनिपाराला जावे लागते आणि मग तिथून दुसरी बस पकडून डेक्कनला यावे लागते. किंवा जर एकच बस गोल गोल फिरणारी असेल तर गणेश खिंडीत बसमध्ये बसायचे आणि मग ती बस आधी शनिपाराला जाऊन मग डेक्कनला येणार आणि मग परत गणेश खिंड आणि मग अशीच गोल गोल फिरत राहणार. पण आपल्याला काय बाहेर पडून वेळ घालवायचा आहे मग कशा का जात ना बसेस !

एका बसमधून उतरून अर्ध्या तासाने येणारी दुसरी बस थांब्यावर आली. सगळे जण एकेक करत चढत होते. त्यात एक चढणारी महिला होती. तिचे वजन इतके होते की तिचे तिलाच पेलवत नव्हते. डाव्या कडेवर एक मूल होते. एक मूल चालणारे होते. त्याच्या पाठी एक बॅकपॅक व शिवाय हातात एक छोटी बॅग. ती छोटी असली तरी त्या मुलीला ती जडच होती. त्या बाईच्या डाव्या कडेवर मूल आणि उजव्या हातात स्ट्रोलर आणि गंमत म्हणजे ती एकीकडे फोनवर बोलतही होती. उजव्या कानाजवळ फोन आणि तो तिने खांद्याचा आधार देवून धरला होता. ते सर्व पाहून मला खूप म्हणजे खूपच हसू येत होते. मुले खूपच शांत होती याचे कारण त्या दोघांच्या हातात लालीपॉप होते. चालणारी मुलगी होती ती बसमध्ये चढली व सीटवर बसली. ती दोघे मुले लालीपॉप खाण्यामध्ये इतकी काही गुंगली होती ते पाहून मस्त वाटत होते. बाईचे एकीकडे फोनवर बोलणे चालूच होते.

दुकानात खरेदी अशी काही केलीच नाही. चालून चालून भूक लागली. इथे स्टोअर्स इतकी काही मोठी असतात की चालून पाय दुखायला लागतात.  जे काही खरेदी करायचे योजले होते ते आता मॉलमध्ये जाऊनही बघेन आणि मग घेईन असे म्हणत्ये. आजचा रात्रीचा जेवणाचा बेत गुंडाळला. फक्त तिखटमीठाचा शिरा केला. चिप्स खाऊन पोट भरले होते. आजचा दिवस चांगला गेला.