Thursday, March 16, 2017

१६ मार्च २०१७

आजचा दिवस खुप बरे वाटले असे आपण म्हणतो ना तसाच आहे अगदी. काल आणि आज प्रचंड थंडी आहे. त्यामुळे काल कामावर जाऊ नये असेच वाटत होते. आज सुट्टी असल्याने आरामात उठले. कालच आजचा विनायक ला द्यायचा डबा तयार केला आणि माझ्यासाठीही पोळीभाजी.


थंडी म्हणजे महाभयंकरच आहे. त्यामुळे अंगदुखी आणि सोबत डोकेदुखीही आहे. आज मी  माझ्या मामेबहिणीशी बोलले. ती म्हणाली आम्ही काही बहिणी तिच्या लग्नात खूप लहान होतो. तिने आठवण सांगितली आणि मलाही ते आठवले आणि इतके काही छान वाटले ना ! ती म्हणाली तुम्ही माझ्या लग्नात रडलात, आणि विचारले तर म्हणालात ती रडली म्हणून मी रडले. आणि लग्नात रडायचे असते म्हणून आम्ही रडलो असे सांगायचात. मलाही ते आठवले आणि इतके हासू फुटले , विचार केला की असे हुकमी रडायला कसे काय आले आपल्याला? मजा असते ना लहांपणची ही.

आज मोनिकाशी फोनवर खूप बोलले. तिनेही तिच्या घरी तिची चुलत बहीण आली होती आणि त्या बहिणीची छोटी मुलेही आली होती. ती सर्व आल्यावर काय काय मजा केली असे तिने सांगितले. आणि तिची मुले कशी गोड आहेत हे वर्णन केले त्यामुळे अगदी तसेच्या तसे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. तिने केलेले वर्णन ऐकून खूपच छान वाटले मला. मग मी पण मी काय काय योजले आणि माझ्या मनात काय काय करायचे आहे भारतभेटीमध्ये ते तिला सांगितले.
 
 
आज एका म्युझिक ग्रुपवर एक थीम होती त्यामध्ये मी जैसे राधाने माला जपी हे गाणे टाकले. गाणे थोडे गाऊन पाहिले. मला हे गाणे पाठ आहे आणि जसेच्या तसे म्हणताही येते. पण म्हणायला तसे अवघड आहे. सराव करायला लागेल. मग मी रिमझिम गिरे सावन गायले आणि रेकॉर्ड केले. युट्युबवर अजून अपलोड करायचे आहे. छान गायले गेले माझ्याकडून. जाणवत आहे अगदी.

 तर आज गाण्यांवरून आठवत गेले आणि मग थोडेसे त्याबद्दल लिहून फेबुवर टाकले. आजचा दिवस खूप वेगळा आणि बरे वाटण्याचा गेला म्हणून मग रोजनिशीत तो लिहिला. आता झोपायला हवे. उद्या कामावर जायचे आहे. :( पण उद्या हवा तशी बरे आहे ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणायचे. फेबुवर लिहिलेले इथेही रोजनिशीत लिहीत आहे.
 
 
"लालला ललालाला लाललललल लललललाला" हा आलाप आहे "ये दिल और उनकी निगाहोंके साये" या गाणामधला. पूर्वी भारतात असताना आम्ही जेव्हा मोठाच्या मोठा टेप रेकॉर्डर घेतला होता त्याला स्टिरिओ साउंड होते त्याचे वेगळे बॉक्सेस होते. ज्या गाण्यांमध्ये बरीच वाद्ये आहेत अशी गाणी त्यावार जास्त चांगली वाजली जातात. प्रत्येक वाद्यवृंदाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. तेव्हा ये दिल और उनकी अगणित वेळा ऐकले आहे.




आयायटीत असताना जेव्हा आम्ही टु इन वन घेतला तेव्हा आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती ती होती आँधी आणि मौसमची. तेव्हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले होते. ब्लॉक्स नवीन असल्याने खोलीत गाण्याचा आवाज घुमायचा. या जागेत आम्ही" इस मोडसे जाते है" हे गाणे अगणित वेळा ऐकले आहे.
अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा आलो त्या जागेत टु इन वन घेतला. डॅलसवरून तेव्हा हिंदी गाणी २४ तास रेडिओवर प्रसारित व्हायची. तेव्हा "राधा कैसे न जले" हे गाणे रोज लागायचे. हे गाणे मी अगदी रेडिओला कान देवून ऐकायचे. काही रिकाम्या कॅसेट विकत घेतल्या त्यात एका विद्यार्थ्याने आम्हाला "मनमें नाचे मनकी उमंगे" हे गाणे रेकॉर्ड करून दिले होते. हे गाणे असेच अनेक वेळा ऐकले. या गाण्यात लताचा आवाज इतका काही मधुर आहे की कोणीतरी आपल्या कानात मध ओतत आहे असेच वाटते.



"अब कब आओगे बालमा" हे गाणे क्लेम्सन मध्ये राहत असताना बरेच वेळा ऐकले आहे. पाऊस पडतोय, आकाशातून ढग चालले आहेत आणि हे गाणे असे मिश्रण असायचे बरेच वेळा त्या खोलीत. क्लेम्सन मध्ये असताना डेस्क टॉप घेतला होता आणि त्यावेळी म्युझिक इंडिया ऑनलाईन वर बरीच आणि पाहिजे ती गाणी ऐकता येतात हे नव्यानेच कळाले होते. याच डेस्कटॉपवर "डोला रे डोला रे डोला रे डोला" आणि "होठोमें ऐसी बात" बरेच वेळा ऐकलेले आहे.




विल्मिंगटन मध्ये राहत असताना परत एकदा नव्याने टु इन वन आणला तेव्हा तेरे मेरे सपनेमधली गाणी बरेच वेळा ऐकली होती. काही कॅसेट आम्ही भारतातून येताना आणल्या होत्या तेव्हा त्यातली एक माझी अत्यंत आवडती कॅसेट म्हणजे तेरे मेरे सपने ची.





"देव माझा विठू सावळा" हे गाणे आणि झोपेतून जागे होणे अगदी एकाच वेळेला. पाऊस पडतोय. रेडिओवर भक्तीगीते लागलेली आहेत. उठावे तर लागणारच आहे. शाळा आहे ना !
गाण्यांच्या आठवणींमध्ये मन तरंगत तरंगत कुठच्या कुठे निघून जाते ना !
 
 

No comments: