Sunday, November 21, 2010

खिलते है गुल यहाँ खिलके बिखरनेको...


आज बरेच दिवसांनी परत गुलाबाच्या झुडुपाला कळ्या दिसल्या, आणि परत आज कळ्यांचे फोटो खूप घेऊ असे झाले. उमलताना पण फोटो घ्यायचे आहेतच.

Tuesday, November 16, 2010

Wednesday, November 10, 2010

नणंद -भावजय दोघींची दिवाळी साजरी झाली ऑनलाईन! Photo!....(3)


नणंद -भावजय दोघींची दिवाळी साजरी झाली ऑनलाईन! Photo! ...(2)

अनुराधा व मी दोघींनी केलेला दिवाळीचा फराळ व अनुराधाच्या घरातली इतर सजावट, पणत्या, दिव्यांची माळ.

....continued .... (3)

नणंद -भावजय दोघींची दिवाळी साजरी झाली ऑनलाईन!...(1)

सध्या माझी चुलत नणंद आहे साऊथ आफ्रीकेमध्ये. ती व मी रोज गुगल टॉकवर बोलतो. बोलता बोलता ती सहज म्हणाली "आपण ऑनलाईन दिवाळी साजरी करायची का? " हो तर! छानच! मी म्हणाले. तसा मी ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये या आधीही भाग घेतला आहे त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम सुद्धा किती छान वाटतात याचा मला अनुभव आहे. ती नवीनच आहे अजून या ऑनलाईन प्रकरणाला!तर अनुराधा म्हणाली की आपल्याकडे जे काही आहे त्यातच आपण सर्व करायचे. अगदी काही नाही तर फार फार तर फुगे फुगवून लावू आपण! हो गं. नक्कीच जास्तीत जास्त काय करता येईल ते बघू! मी म्हणाले. आधी आपण ठरवू या की काय काय करायचे. जास्तीत जास्त गोष्टी ठरवल्या तर त्यातले थोडेफार तरी होतेच होते. मी ठरवले होते की सर्व दिवाळी फराळ करायचा. काही पदार्थ झाले काही झाले नाही. दरवर्षी ठरवते चकली, शेव करायची, पण हिम्मत होत नाही, कारण की चकली सोऱ्यातून पाडण्यासाठी खूप ताकद लागते. शिवाय उभे राहून मंद आचेवर सावकाशीने तळणे म्हणजे खूपच कंटाळवाणे काम आहे ते! या वर्षी ठरल्याप्रमाणे कोरड्या खोबऱ्याच्या करंज्या मात्र केल्या. छानच झाल्या! आमच्या शहरात भारतीय दुकान नसल्याने आधी घेतलेले गोटा खोबरे मी अगदी जपून ठेवले होते!अनुराधाकडे सोऱ्या नसल्याने तिने चकल्या शेव विकत आणल्या. तिने गोड व खारे शंकरपाळे दोन्ही केले! पातळ पोह्यांचा चिवडा करणार होती पण भारतीय दुकानात ते उपलब्ध नव्हते. दिवाळीच्या आधी पटापट पोह्यांचा खप होतो असे तिथला भारतीय दुकानदार म्हणाला. तिने रव्याचे पाकातले लाडू केले. मी दोन प्रकारचे लाडू, करंज्या व शंकरपाळे केले. पातळ पोह्यांचा चिवडा तर काय कधीही मनात आला तरी करतो आपण म्हणून मग जाड पोह्यांचा चिवडा केला. पातळ पोह्यांचा चिवडाही करणार होते पण करायचा राहून गेला. त्याकरता खोबऱ्याचे पातळ कापही करून ठेवले होते! शंकरपाळ्याचे मात्र यावर्षी बिनसले होते. काय चूक झाली माझ्या हातून काय माहीत! पण शंकरपाळे करण्याकरता लागणारी मोठी पोळी लाटताच येत नव्हती. विरी जात होती!अनुराधाने पणतीला पर्याय म्हणून कणकेचे दिवे केले. शिवाय रंगीबेरंगी छोट्या दिव्यांची माळही विकत आणली. एक छानसे तोरण विकत आणले. ठरवल्याप्रमाणे नरक चतुर्दशीला मी बासुंदी पुरी केली. संध्याकाळी लक्ष्मीपूजनही केले. इथे आल्यापासून मी डॉलर्सबरोबर रुपयांची पण पूजा करते. २०,१०,५ व १ अशा कोऱ्या करकरीत नोटा आहेत ज्याची मी दरवर्षी लक्ष्मीपूजनाला पूजा करत आली आहे. ते मी एका पर्समध्ये अजूनही जपून ठेवले आहेत. खरे तर कोऱ्या करकरीत डॉलर्सच्या नोटा पण ठेवायला पाहिजेत आणि रुपयांसारख्याच 'पूजेसाठी फक्त' जपूनही ठेवायला पाहिजेत. पुढच्या वर्षीपासून नक्की करणार असे!मी व अनुराधाने ठरवले की रविवारी ऑनलाईन दिवाळी साजरी करु. पाडवा भाऊबीज पण आहे त्यादिवशी आणि दोघींचे नवरे पण रविवार असल्याने घरीच असतील. आमची जेवणे झाल्यावर म्हणजे अमेरिकेतील घड्याळाप्रमाणे दुपारी २ व साऊथ आफ्रीकेतील घड्याळाप्रमाणे संध्याकाळी ७ वाजता ऑनलाईन आलो. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघींनी साड्या नेसल्या होत्या. skype वर विडिओ कॉल केला आणि बोलायला सुरवात केली. २०१० च्या सुरवातीला मी भारतात गेले होते व आईची एक साडी मला खूप आवडली म्हणून येताना आणली. त्यावरचा आईचाच ब्लाऊज टॅकींग करून तोही आणला. शिवाय आम्ही दोघी बहिणी कॉलेजमध्ये असताना आईने आम्हाला दोघींना कोल्हापुरी साज घेतले होते. तो कोल्हापुरी साजही आणला येताना बरोबर. ऑनलाईन दिवाळीच्या निमित्ताने मी ती साडी नेसली व गळ्यात कोल्हापुरी साज घातला.अनुराधाकडे संध्याकाळ असल्याने वेबकॅमवर ती दोघे दिसत होती पण ठळकपणे दिसत नव्हती. इथे परदेशात ट्युबलाईट नसतात ना, मिणमिणते दिवे असतात त्यामुळे प्रकाश नीट पडत नाही. आमच्या इथे दुपार असल्याने त्यांना वेबकॅमवर आम्ही स्पष्ट व ठळक दिसत होतो. एकमेकींनी कानातले गळ्यातले पाहिले. एकमेकींच्या साड्यांचे कौतुक केले. परक्या देशात मुद्दामहून भारतीय कपडे घातले जात नाही त्यामुळे अशा सणाच्या दिवशी खूप अप्रुप वाटते. अनुराधाने आमचे विडिओ कॉल स्नॅप्स घेतले. मी पण त्या दोघांचे घेतले. आम्ही दोघीनी फराळाचे काय काय केले आहे ते एकमेकींना दाखवले. अरविंदरावांनी दोन फुलबाज्या उडवल्या. अनुराधाने सर्व घर पणत्यांनी कसे सजवले आहे ते वेबकॅमवर दाखवले. मजा म्हणजे तिच्याकडे स्वयंपाकाला एक बाई येते. तिला पण आम्ही वेबकॅमवर पाहिले. तिने आम्हाला हात हलवून हाय! केले! तिने बनवलेला आलू पराठाही तिने आम्हाला दाखवला! अशा रितीने आमची ऑनलाईन दिवाळी खूप छान साजरी झाली!दुसऱ्या दिवशी एकमेकींशी बोलताना आम्हाला इतके काही छान वाटत होते ना! असे वाटत होते की आम्ही दिवाळीला एकमेकींच्या घरी जाऊन आलो! skpe ची विडिओ व ऑडियो कॉल क्वालिटी खूपच छान आहे! अनुराधा व मी रोहिणी दोघींच्याही फराळाचे फोटो, शिवाय अनुराधाने घरात केलेली सजावट, ऑनलाईन बोलत असताना घेतलेले एकमेकांचे वेबकॅमवरचे फोटो देत आहे.

कशी वाटली मग आमच्या नणंद-भावजयची ऑनलाईन दिवाळी!

.... continued ..... (2)