Monday, June 15, 2009

इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी - पवई

आयायटी पवई, वसतिगृह ११, खोल्या क्रमांक ६९, ७० चा ताबा आम्ही घेतला व नव्यानेच सूरू झालेल्या वैवाहिक जीवनाची सुरवात झाली. विनायकने त्याचे वसतिगृह क्रमांक ९ चे सामान आणले. त्यात एक हॉटप्लेट होती. हॉटप्लेट बघितल्यावर मला खूप आनंद झाला व ठरवूनच टाकले की आपण सगळा स्वयंपाक हॉटप्लेटवरच करायचा.



दुसऱ्या दिवशी उठल्यावर गरमागरम चहा झाला. दूध गरम केले. कूकर लावला. पाऊण तास झाला तरी त्याला वाफ धरेना! अरेच्या हे काय? पोळ्या करायला घेतल्या. पहिली पोळी करपली कारण की आच खूपच होती. प्लग काढला. विचार केला, तापल्या तव्यावर पोळ्या करून घेऊ, तर दुसरी पोळी खूपच कडक झाली कारण की तोपर्यंत तवा निवत चालला होता. दोन-तीन दिवसामध्ये दोन चार वेळा फ्युज उडाले.



गॅसला नंबर लावला तर तो १५ दिवसांनी मिळेल असे कळाले. आता काय करायचे?! विनायक म्हणाला बाहेर जाऊन आता पहिला स्टोव्ह विकत घेऊन येतो. स्टोव्ह!!?? स्टोव्हवर स्वयंपाक !? आईकडे स्टोव्हमध्ये रॉकेल कसे भरतात, स्टोव्हला पिना कशा करतात ते पाहिले होते पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. स्टोव्हच्या एकूणच खूप भानगडी असतात. रॉकेलचा डबा, रॉकेल स्टोव्हमध्ये भरण्याकरता एक काचेची बाटली, रॉकेल ओतताना वापरायचे नरसाळे, पिनांचे व काडेपेटीचे बंडल. स्टोव्हमध्ये रॉकेल भरताना ते जर बाहेर आले तर पुसायला लागणारी फडकी! नुसता व्याप नि ताप! सुरवातीला त्रास झाला व खूप चिडचिड झाली पण नंतर हे सर्व जमायला लागले. एकदा स्टोव्ह पेटवला की त्यावर स्वयंपाक कसा उरकायचा तेही कळाले. आधी कूकर लावायचा, तो होईपर्यंत भाजी चिरून घ्यायची. कूकर झाला की भाजी करायची. भाजी परतता परतता कणीक भिजवायची, भाजी झाली की पोळ्या, पोळ्या झाल्या की वरण फोडणीला टाकायचे. ते झाले की सर्वात शेवटी दुध तापवून घ्यायचे कारण की वसतिगृहात कुठचा आलाय फ्रीज! कारण की दुध नासले की संध्याकाळचा चहा करता परत दीड दोन मैल पायपीट! स्टोव्हवर क्रमाक्रमाने करण्याच्या स्वयंपाकामध्ये जर का काही उलटेसुलटे झाले तर एका भांड्यात नुसते पाणी घालून ते तापवत ठेवायचे कारण एकदा का स्टोव्ह बंद झाला तर परत तो कोण पेटवणार? वाजणारा स्टोव्ह बंद झाल्यावर कसे शांत शांत वाटायचे.



या आयायटीमध्ये इतके काही चालावे लागते की एकदा गेटबाहेर काही सामान आणण्याकरता गेले की सर्व काही आठवून आणावे लागायचे. वसतिगृह ११ हे आधी फक्त मुलींचे होते. वसतिगृह १० व ११ अशी वसतिगृहे बांधली होती. आयायटीमध्ये मुले जास्त व मुली कमी त्यामुळे ११ च्या बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या म्हणून लग्न झालेल्या विद्यार्थ्यांना वरचे मजले दिले होते. वसतिगृहामध्ये एका खोलीत एक कॉट, एक टेबल, एक खुर्ची व लोखंडी कपाट होते. एका खोलीचे स्वयंपाकघर बनवले व एक खोली ही झोपायची खोली केली. स्वयंपाकाच्या खोलीतल्या कपाटामध्ये सर्व पीठाचे डबे व इतर पोहे, साबुदाणे वगैरे ठेवले. ह्या खोल्यांना भिंतीतले कोनाडे होते, ते मला आवडायचे. एका कोनाड्यात देवघर केले. एका कोनाड्यात भाजी व एकात दुधदुभते. दुधदुभते व्यवस्थित ठेवायला मला खूप आवडते चिनीमातीच्या बरण्या व सट होते. दूध तापले की ते नासू नये म्हणून मी ते पातेले एका खोलगट डीशमध्ये ठेवायचे व डीशमध्ये पाणी. ताकाला छोटी बरणी होती, लोणी सटामध्ये पाणी घालून मग त्यात ठेवायचे. भाजीच्या कोनाड्यात २-३ प्लॅस्टीकच्या झाकणवाल्या टोपल्या होत्या. एक कांदे बटाटे ठेवायला, दुसरी मध्यम आकाराची, त्यामध्ये दोन दिवसांची भाजी व एका पिटुकल्या टोपलीमध्ये आले लसूण, त्या टोपलीचे झाकण उलटे करून त्यावर ओल्या फडक्यात मिरच्या कोथिंबीर.



सुरवातीला महानंदा दुधाच्या पिशव्या मिळायच्या. माझी आई घरातले सर्व शिवण शिवते. एकदा आईने कापडी पिशव्या शिवल्या होत्या व त्यात थोडे कापड उरले होते तर त्याची आईने खूप छोटी पिशवी शिवली होती, ती मला खूपच आवडायची. ती पिशवी मी बरोबर आणली होती, यासाठी की सहज कुठे बाहेर फिरायला गेल्यावर मिरच्या कोथिंबीर व एखादी पावशेर भाजी आणण्याकरता. पण या पिशवीचा उपयोग मला दुधाची पिशवी ठेवण्याकरता होईल असे कधीच वाटले नाही! ही पिशवी आम्ही दाराच्या कडीला अडकवून ठेवायचो. दुधवाला दुधाची १ लिटरची पिशवी त्यात ठेवून जायचा. ती पिशवी मी इथे अमेरिकेत येण्याअगोदरपर्यंत वापरली !! सुरवातील मिक्सर नसल्याने मी आईकडून एक दगडी रगडाही आणला होता. त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण व थोडी चटणी होईल इतका छोटा होता. आईकडे एक बाई दगडी रगडे व पाटे वरवंटे विकायला यायची. त्यावर चटणी वगैरे करताना खाली आवाज जाऊ नये म्हणून मी एक तरट घालायचे. तरटाची चौकोनी घडी त्यावर टॉवेल पागोट्यासारखा गुंडाळून, त्यावर हा रगडा ठेवायचे !



बाकी वसतिगृह म्हणजे चाळीसारखेच असते ना! त्यावेळी आम्ही १०-१२ जोडपी होतो, त्यात चार महाराष्ट्रीयन. या जोडप्यांमध्ये काहींच्या बायका पी. एचडी करणाऱ्या होत्या व त्यांचे नवरे बाहेर कंपनीत कामाला जायचे. तर १-२ जोडपी दोघेही पी.एचडी करणारी होती. काही रसायनशास्त्र व भौतिक शास्त्रामध्ये संशोधन करणारे होते,तर काही अर्थशास्त्र व गणिता मध्ये. 1200 रूपये शिष्यवृतीमध्ये धुणे भांडीवाली बाई लावणे परवडणारे नव्हते म्हणून आम्ही सर्व बायका धुणेभांडी घरीच करायचो. हसतखेळत धुणेभांडी. सकाळी ९ वाजता आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिले की आमचेच राज्य. वसतिगृहाच्या सर्व खोल्या समोरासमोर होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी पॅसेजमध्ये जमा व्हायचो. एकीकडे गप्पा, गाणी ऐकणे व धुणे भांडी व आमच्या अंघोळी करता नंबर लावायचो. ए तुझी भांडी झाली की मी शिरते हं बाथरूममध्ये. एकीची भांडी, तर दुसरीचे धुणे तर तिसरीची अंघोळ, असे सर्व २ तास चालायचे. मग मात्र स्वयंपाकघरात शिरायलाच लागायचे कारण की १ वाजता सर्वांचे 'हे' जेवायला घरी यायचे. काही दिवसांनी आमच्या घोळक्यामध्ये एका छोट्या मुलाची भर पडली. मीनाक्षीला एक "सुंदर" नावाचा गोंडस मुलगा झाला. तो त्याच्या आईकडे कधीच नसायचा. त्याला घेण्यासाठी आमचे नंबर लागायचे. तो पूर्ण पॅसेजमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगायचा. मीनाक्षीला तिचे काम करायचे असेल तर मला विचारायची "सुंदर को देखेगी क्या? " मी लगेच हो हो. नक्कीच. मला काय त्यानिमित्ताने सुंदरशी खेळायला मिळायचे.



हा सुंदर रांगत रांगत प्रत्येकीच्या घरी जायचा. रांगताना मध्येच बसायचा. आमच्या घोळक्यामध्ये कुणी जात असेल तिच्या मागोमाग जायचा, मग ती उचलून परत त्याच्या आईकडे द्यायची. भांडी घासून आले आणि जर का सुंदर असेल तर धुतलेली सर्व भांडी टबाच्या बाहेर आलीच म्हणून समजा! सुंदर एकेक करत सर्व भांडी टबाच्या बाहेर काढायचा. वाट्या कालथे, झारे तर त्याला खूप प्रिय. फरशीवर दणादणा आपटायचा वाट्या! त्याचा अजिबात राग यायचा नाही. आम्ही हसलो की त्याला अजुनच चेव चढायचा. एकदा तर सगळी भांडी बाहेर आणि हा टबात जाऊन बसला! एकदा मी पूजा करताना आला. मग मी त्याच्या कपाळावर गंध लावले, नैवेद्याचे लोणी साखर खायला दिले. एकदम खुष! मी त्याला बाप्पाला "जयजय" करायला शिकवले. आईने मला पुजेसाठी देव्हारा दिला होता, शिवाय तेल व तूप वाती. त्यावेळी फुलपुडी पण चांगली येत असे. लाल, पांढरी, पिवळी फुले, दुर्वांची जुडी, तुळस, बेल असे सर्व काही. त्यामुळे पूजाही साग्रसंगीत व्हायची. मीनाक्षीने मला सांगून ठेवले होते की तुझी पुजा झाली की मला बोलवत जा. मग ती व सुंदर येऊन नमस्कार करून जायचे. सुंदरला सांगायची "भगवान को प्रणाम करो" की लगेच सुंदर त्याचे छोटे हात जोडायचा व "जयजय" म्हणायचा.



आमचा संसार वसतिगृहात थाटला जाणार आहे म्हणून सर्व नातेवाईकांनी आम्हाला स्टीलच्या भांड्याकुंड्यांचाच अहेर दिला होता. त्यात एक स्टीलची बादली होती, त्यात स्वयंपाकाला लागणारे पाणी व एक छोटी कळशी होती त्यात पिण्याकरता पाणी. बादली व कळशी रोजच्या रोज घासून त्यात ताजे पाणी भरायचे. तशी भांडी पण लगच्यालगेच घासायला लागायची व रोजचे धुणे गरम पाण्यात भिजवून ते दुपारी धुवायचे. आईकडे धुणे भांडी करायची कधीच सवय नव्हती. धुणेभांड्याची सवय नसल्याने चादरी व विनायकचे शर्ट पॅन्ट धुवून हात दुखायला लागायचे. त्यातून मैलमैल चालणे! धुणे वाळत घालण्यासाठी खोलीत ज्या तारा बांधल्या होत्या त्या खूपच उंच होत्या. खुर्चीवर उभे राहून मी काठीने धुणे वाळत घालायचे. वर पाहून मान दुखायला लागायची. धुणे धुतल्यावर पिळताना माझ्या हातून कपडे नीट पिळले जायचे नाहीत, बरेच पाणी रहायचे. म्हणून मग विनायक मला सर्व कपडे नीट पिळून द्यायचा. वर पाहून एका रेषेत कपडे वाळत घालताना मान दुखायची.




मी व माझी मैत्रिण भैरवी एक दिवसा आड भाजीला जायचो. माझी मुंबईतली पहिलीच भाजी खरेदी होतो. तेव्हा मुंबईत चार आण्याचा मसाला मिळायचा. भाजीवाल्याने विचारले "आपको मसाला चाहिए क्या? " मी "मसाला म्हणजे? तिखट मीठ? " नाही हो. मिरच्या, आलं, कढिपत्ता, कोथिंबीर" मी " अरे वा! हे सर्व चार आण्यांमध्ये. हो हो , द्या ना!! " हा मसाला मला खूप आवडायचा. मी ओल्या फडक्यात तो ठेवायचे, ३-४ दिवस पुरायचा. भाजी कॅरी बॅग मध्ये घालून मिळते हे पण मला नवीन होते. गेटबाहेर एका केरळी माणसाचे दुकान होते. आयायटीला ३ गेट होती. एक मुख्य गेट व एक मार्केट गेट. त्यामध्ये एक गेट होते, ते त्यातल्या त्यात जवळ पडायचे. त्या दुकानातला केरळी मुलगा रोज रात्री वसतिगृहात यायचा २ मोठ्या पिशव्या घेऊन. त्यात केळा वेफर्स, सर्व प्रकरची बिस्कीटे, चिवडे, फरसाण व अंडी असायची. एकदा आम्ही सर्व बायकांनी मिळून त्याला पटवले की आमच्याकरता तू रोज भाजी आणशील का? त्याने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत कारण त्याचीच भाजी विकली जायची.



वसतिगृहामध्ये आमच्या कोणाचे फोन आले की रखवालदार खूप जोराने ओरडून नंबर पुकारायचा. मग धावत धावत जाऊन फोन घ्यायचा. बरेच वेळा खाली जाईपर्यंत फोन बंद व्हायचा. आम्हाला करमणूक म्हणजे एका हॉलमध्ये टीव्ही होता. मेनगेटसमोर एक राधाकृष्ण नावाचे हॉटेल होते. लक्ष्मी नावाचे एक टपरीवजा हॉटेल होते तिथे कुल्फी छान मिळायची. किराणामालाचे महाराष्ट्र ग्रेन स्टोअर्स होते, तिथे अमुल श्रीखंड मिळायचे व त्रिकोणी जाड कागदाच्या अमुल दुधाच्या पिशव्या मिळायच्या. ह्या पिशव्या आयत्यावेळी कोणी आले तर उपयोगी पडायच्या. नंतर आयायटी ते घाटकोपर बससेवा सूरू झाली. त्यावेळेला बहुतेक जाऊन येऊन १ रुपया तिकीटे होते. ही बस सूरू झाली तेव्हा आम्हाला खूप उपयुक्त ठरली. एकदा उन्हाळा सुरू झाला तेव्हा मी व भैरवीने घाटकोपरला जाऊन गार पाण्याचे "माठ" आणले होते बसमधून!!



वसतिगृह ११ मधले दिवस खूपच छान जात होते. दुपारी २ ते ५ एकमेकींकडे जाऊन गाणी ऐकणे, गप्पा मारणे, चहा, भजी खाणे, दुपारचे निवांतपणातले उद्योग म्हणजे भरकाम, विणकाम, एंबॉसिंग, हातावर मेंदी काढणे, नेलपॉलिश लावणे. एके दिवशी आम्हाला कळाले की लग्न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक्स देणार आहेत आणि ते सुद्धा लाकडी सामानासह! आम्ही रोज पहायला जायचो बांधकाम कुठपर्यंत आले आले आहे ते पाहण्यासाठी. नाव पण किती छान "तुलसी" ब्लॉक्स. हे एका छोट्या टेकाडावर होते समीर कंपनीच्या समोर वसतिगृहाच्या आवारातच! छोट्या टेकाडावर असल्याने भरपूर वारे!! एकदम चकाचक. यामध्ये भिंतीतली कपाटे होती, मोठा, बेड, डायनिंग टेबल, खुर्च्या, भिंतितले कोनाडे इथे पण होते स्वयंपाक घरात. खिडक्यांना काचेची सरकती दारे होती. मोठ्या हॉलला मोठे काचेचा दार व बाल्कनी. बाल्कनीत उभे राहिले की खूप मस्त वारे यायचे. इमारत गोलाकार होती. बाहेरून जीने. खूप वेगळे व छान डिझाईन होते. शिष्यवृत्ती वाढल्याने काहीनी छोटे टीव्ही तर काहीनी टु-इन वन घेतले होते. मला आठवत आहे आमची पहिलीवहिली खरेदी टु-इन - वनची. त्यात आम्हाला एक कॅसेट फ्री मिळाली होती. ती आम्ही आँधी व मौसमची घेतली होती. या ब्लॉकमध्ये मी आँधी चित्रपटातले "तुम आ गये हो नूर आ गया है... " हे गाणे बरेच वेळा ऐकले. या आधी एक रेडिओ होताच विनायच्या बॅचलर जीवनातला. या टु-इन-वन मध्ये मी रेडीओवरची आवडती गाणी टेप केली होती.



आता खरे तर जीवन थोडे जास्त सुधारले होते. शिष्यवृत्ती वाढली होती त्यामुळे मनासारखी थोडी खरेदी पण करता येत होती. शिवाय त्यात भर म्हणून सेपरेट ब्लॉक्स पण मिळाले होते आयायटीकडून. तेही नवे कोरे, खूप छान. पण तरीही........ रम्य दिवस होते ते वसतिगृह ११ मधलेच!!!

आयायटीमधले सर्व दिवसच खूप रम्य होते. Those days were golden days!!!!