Monday, September 24, 2018

२४ सप्टेंबर २०१८

आज मला कामावर ऑफ होता त्यामुळे सकाळी सावकाशीने उठले. विनुलाही थोडे बरे वाटत नसल्याने तोही कामावर गेला नाही. बरे वाटत नव्हते म्हणजे काहीवेळेला हवा सतत बदलती असल्याने अंगदुखी आणि ताप आल्यासारखे वाटते तसे झाले होते. माझेही तसेच झाले होते थोडेफार. पण मग काहीतरी दिवसाचा वेगळेपणा होण्यासाठी मी आज वालमार्टला जायचे ठरवले. नेटही नव्हते. मग घरी बसून करायचे काय?   निघताना उसळ भात खाऊन निघाले. विनुने मला दुकानात सोडले आणि तो घरी आला. आज मी रिलॅक्स मूड मध्ये मला जे काही पाहिजे होते ते बघितले. तीन तास "हे बघ ते बघ" करण्यात गेले.


रविवारी ग्रोसरी केली नव्हती म्हणून बाकीचीही ग्रोसरी केली. त्यामध्ये आज हिरवी द्राक्षे बरीच आली  होती, ती घेतली. अनसॉल्टेड दाणे घेतले. कानातले तर मी नेहमीच बघते. त्यात मी आज कानातले भोपळे घेतले.
बाकी नेहमीचीच आठवड्याची  भाजी, दुध, दही, कांदे बटाटे वगैरे खरेदी केली.  विनू मला घरी आणण्यासाठी वालमार्ट मध्ये आला. आज दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते. मला उद्या कामावर जायचे नसल्याने आज निवांतपणा आहे. उद्याची पोळी भाजी करून झोपायच्या आधी या वेगळ्या दिवसाची रोजनिशी टंकत आहे. कानातले भोपळे आता मी कामावर जाईन तेव्हा घालीन आणि आज मला दुकानात बॅकपॅकही छान मिळून गेली.


१० डॉलर्सची मुळ किंमत मला सेल मध्ये ३ डॉलर्स ला मिळाली. ती पण एखाद दिवशी कामावर घेऊन जाईन.



त्यात  जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली, स्वेटर आणि टोपी  हे सर्व नीट  मावेल का ते आधी बघितले पाहिजे. मावल्यास तीच कामावर जाण्याची बॅग करीन. अर्थात त्याला पर्स सारखे आतले कप्पे नाहीयेत त्यामुळे बाकीचे सर्व कश्यात ठेवायचे? म्हणजे पैसे, क्रेडीट कार्ड, फोन,
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे. 

Wednesday, September 19, 2018

दीड दिवसाचा गणपती

मी सासरमाहेरची कोब्रा असल्याने सासूआईकडे दीड दिवसाचा गणपती ! सगळे सणवार कसे अगदी सुटसुटीत. घोळ घालणे घाटे आणि गोरे यांना अजिबात सहन होत नाही.  तर आम्ही दोघे लग्नानंतर पवईला राहत होतो आणि गणपतीला घरी पुण्याला जायला आम्ही दोघेही उत्सुक असायचो.





गणपतीच्या आदल्या दिवशी डेक्कनएक्सप्रेसने रिझर्वेशन न करताच जायचो. एक छोटी सुटकेस असायची.  गाडीला खूप गर्दी असायची.उभ्यानेच प्रवास करायचो. घरी आलो की गरमागरम चहा सासूबाई करायच्या. मग कामाला सुरवात. आमच्या घरी आम्ही दोघे, सासुसासरे, दोन दीर एक जाऊ आणि चुलत सासुसासरे , चुलत दीर आणि नणंद असायची. गणपतीच्या दिवशी विनुचा मित्र हरिश हा ब्राह्मण म्हणून जेवायला असायचा. सासूबाई त्यांच्या दीरांना विचारायच्या, " काय हो भाऊजी किती नारळ लागतील आपल्याला" ते म्हणायचे कमीत कमी
१० ते १२ लागतील. मग घेऊन याल का मंडईतून. लगेच भाऊजींची स्वारी मंडईत जायला निघायची. नारळ घरी आले की सर्व जण नारळ खवायला बसायचे. शेजारणींकडून २ विळ्या आणि घरातली एक असायची. नारळ खवून झाले की सासूबाई मोदकांचे नारळ तयार करून ठेवायच्या. मंडई जवळच असल्याने बाकीचे  सर्व आणायला विनू आणि काका जायचे सकाळी उठून. चुलत सासूबाई आणि चुलत नणंद आवरून यायच्या. आधी सगळा स्वयंपाक करून नंतर सासूबाई मोदकांसाठी उकड करायला घ्यायच्या. मोदक वळण्यामध्ये गोऱ्यांच्या घरात माझी कॉलर एकदम ताठ असायची कारण आईकडे गणपतीत आम्ही दोघी बहिणी आईला मोदक वळायला मदत करायचो. तसे मला बऱ्यापैकी वळायला जमायचे. माझ्या सख्या सासूबाई, जाऊ,  चुलत सासूबाई आणि नणंद अगदी मैत्रिणीसारख्या. आम्ही सगळ्या जमलो की एकमेकींकडे पाहून हासायला सुरवात.  मोदकांवरून तर हासणे खूपच व्हायचे. चुलत सासूबाई म्हणायच्या "ए रोहिणी कडे बघून सगळ्यांनी मोदक वळा हं" आमचे नाही बुवा चांगले होत. लगेच फिदीफिदी हासणे सुरू व्हायचे.

सासूबाईंनी उकड काढून दिली की मी ती मळून घ्यायचे आणि सर्व मोदक वळायला सुरवात करायचे. एकेकाने मोदक करून ठेवले की हासायला सुरवात. मोदकांची नाके बघण्यासारखी. एका मोदकाचे नाक जाडजूड तर एकाचे फेंदारलेले तर एकाचे बसके. एकाचे खूपच सरळ तर एकाचे खूप उंच ! काही मोदक खाली बसलेले तर काही मोदकांना कळ्यांचा पत्ताच नाही. ए, चला हं पटपट आवरा बरं !  सासूबाई ओरडायच्या. मग चांगले चांगले मोदक बघून त्या आधी त्या उकडायच्या नैवेद्यासाठी. सगळे मोदक उकडून झाले की सर्व जेवायला बसत. मग सासरे , चुलत सासरे, विनू, दोघे दीर यांच्या मोदकांवर कॉमेंटी सुरू व्हायच्या. हा मोदक कुणी केला गं ? अशी विचारणा व्हायची. मग " मी नाही बाई " अशी सारवासारवी. काही मोदक हसरे तर काही मोदकांची पारी इतकी  पारदर्शक की पारीतून सारण दिसायचे. काही मोदक फूटून सारण बाहेर यायचे. मग विचारणा व्हायची असे कसे झाले मोदक? सासूबाई म्हणायच्या काही नाही हो. खा. चांगले आहेत ते. काही मोदक हासलेत. असे म्हणले की आम्ही पण " हासरे मोदक ??" म्हणून हासायचो.  काही वेळेला आमची नजरानजर झाली तरी हासायचो. हासायला काही कारणच नसायचे. चुलत सासूबाई म्हणायच्या. ए बास हं आता.



ए हा कोणी केला गं मोदक? किती पॅचेस लावलेत? मोदक करताना तुटला की आम्ही उकडीचे पारीला पॅच करून लावायचो. हा मोदक आहे की लाडु? काही मोदकांच्या कळ्या खूप बाहेर आलेल्या. गणपतीच्या दिवशी हासतखेळत मोदक करायचो आम्ही सर्व जण. मोदक करता करता तयार झालेला  मोदक हातावर ठेऊन विचारायचो. हा बघं गं कसा झालाय? छान आहे की !
नको जाऊ देत. आपण लाटूनच करू ना. ते चांगले होतात बघ. चुलत सासूबाई पोलपाटावर उकडीचा गोळा थोडा लाटायच्या आणि मग त्याला कळ्यांचा आकार द्यायचा. मग थोडे फार लाटून थोडेफार हाताने वळून वेगवेगळ्या आकाराचे मोदक तयार व्हायचे. आणि आम्ही सर्वजणी पोट धरधरून हासायचो. जेवताना बाकीचे पण सर्व मुद्दामूनच हा कोणी केला मोदक? की परत हशा पिकायचा.  असा हा  सासरच्या गणपतीचा दिवस हासण्यामुळे खूपच लक्षात राहिला आहे.



Saturday, September 15, 2018

फ्लोरेन्स नावाचे वादळ

फ्लोरेन्स नावाचे प्रचंड मोठे वादळ आले त्यात विल्मिंग्टन या शहराची खूपच मोठी हानी झाली आहे. खूप वाईट वाटत आहे. या शहरात आम्ही २००५ ते २०१५ पर्यंत राहत होतो. जवळपास असणारे सर्व समुद्रकिनारे पाहिलेत. तिथले बरेच फोटोज घेतले आहेत. केप फिअर नदीवर तर दर शनिवार रविवार पैकी एक दिवस चालायला जायचो.नदीवर बरेच सूर्यास्त पाहिले. तिथे तर पाणीच पाणी झाले आहे. एका विडिओ मध्ये आणि न्यूज चॅनलवर सर्व प्रकारची झालेली हानी दाखवत आहेत. पेट्रोल पंप उध्वस्त झाले आहेत. कॅरोलायना बीचवर एकीकडे समुद्र आणि एकीकडे रस्त्यावर पाणी आहे. राईटसवील समुद्रकिनाऱ्याची तर खूपच वाट लागली आहे. मोठमोठाली झाडे मुळासकट खाली जमिनीवर पडली आहेत. सर्व रस्तेच नाही तर विल्मिंग्टनपासून सुरू होणारा महामार्ग ४० नेस्तनाबूत झाला आहे. रस्ता दिसतच नाहीये. तिथे फक्त पाणी चिखल आणि असंख्य पाने आणि झाडे पडली आहेत. घरांची छपरे उडाली आहेत. जवळजवळ ४० इंच पाऊस झाला आहे. न्युजमध्ये असे सांगत आहेत की तिथे महिनाभर इलेक्ट्रीसिटी नसणार आहे. न्यू बर्न जॅक्सनविल या छोट्या शहरांची पण खूप नासधूस झाली आहे. हे वादळ आले तेव्हा ते प्रचंड मोठे म्हणजे ५०० मैल व्यासाचे होते.




विल्मिंग्टन पासून ऍशविल पर्यंत आम्ही ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने हे वादळ येत आहे. विल्मिंग्टन शहरातून बाहेर पडण्यासाठी आधी ७४/७६ रस्ता नंतर महामार्ग ९५ नंतर २० कोलंबिया - साऊथ कॅरोलायना, नंतर ते २६ स्पार्टनबर्ग महामार्गाने ऍशविलला म्हणजे उद्या येईल. पण हे वादळ इथे येईपर्यंत पार मरतुकडे होऊन गेलेले असेल. वादळ जरी साऊथ कॅरोलायना कडे सरकले असले तरीही अजून विल्मिंग्टन, रॅले मध्ये पाऊस पडत आहे.मनात विचार चालू आहेत की आपण आत्ता तिथे राहत असतो तर काय करावे लागले असते? पहिले म्हणजे शहर सोडायलाच लागले असते आणि ते सुद्धा वेळेवर. नंतर विचार करून जाऊ कि नको असे करत बसलो तर अजूनच बरेच अडथळे निर्माण झाले असते. घर सोडून जाताना एक आठवडा पुरेल असे सर्व काही घ्यायला लागले असते. कपडे, औषधे, थोडे अन्न आणि पाणी. शिवाय होॅटेल बुक करून जास्तीत जास्त उंचावर म्हणजे आम्ही आता जिथे राहत आहोत तिथे आलो असतो. डेबिट क्रेडीट कार्डे, फोन, लॅपटॉप, कॅश, असे सर्व काही बरोबर घेऊन जे जे काही सुचेल तेही बरोबर घेऊन जरी निघालो असतो तरी वाहतुक मुरंबा लागला असता.










आणि वादळ शमून गेल्यावरही परत आपल्या शहरात गेल्यावर म्हणजे तसे पटकन जाताही आले नसते. कारण रस्त्यावरून जाता आले नसते. शिवाय तिथे गेल्यावर घरातल्या वस्तुंची काय हानी झाली असेल? याचे विचार मंथन, शिवाय पॉवर नाही. त्यामुळे इंटरनेट नाही. फोन नाही. असे एकेक करून बरेच विचार मनात येत आहेत. विल्मिंग्टन शहरातले दिवस आठवत आहेत. या शहराची प्रलयासारखी झालेली अवस्था न्युज मध्ये पाहून खूप वाईट वाटत आहे. :( Rohini Gore

Thursday, September 06, 2018

फोटोग्राफी (1)



मी पाठवलेले अजून २ फोटो इथे शेअर करत आहे. ली रिंगरच्या पेजवर ते आहेत. अजून एक फोटो मी पाठवला होता ढगांचा तो हवामानतज्ञ ली रिंगरने वेदर शॉट ऑफ द डे मध्ये काल दाखवला. तो टिव्ही वरचा फोटो मला बघता आला नाही कारण की केबल चॅनल मध्ये आम्ही जिथे राहतो ते शहर कव्हर होत नाही. म्हणून त्याने मला स्क्रीन शॉट पाठवला. तो इथे शेअर करत आहे. वरून तिसरा फोटो हा वेदर शॉट ऑफ द डे आहे जो टिव्ही वर १४ न्यूज चॅनलवर दाखवला.