Saturday, November 25, 2017

भारतभेट २०१७

जेव्हा सईचे लग्न ठरले त्या दिवसापासून मी आईशी आणि बहिणीशी फोनवर लग्नाविषयीच गप्पा मारत होते. कोणती साडी कोणत्या वेळेला नेसायची, लग्नाची खरेदी झाली का ,, केळवणे कोणाकडे झाली, इ. इ. ते अगदी मी आईच्या घरी येईपर्यंत. आईच्या घरी आलो आणि एकेक दिवस अगदी लागलेले होते. आईकडे सई आणि रंजना आदल्या दिवशीच आल्या होत्या. घरी गेल्यागेल्या गप्पांबरोबर आलं घातलेला चहा रंजनाने केला आणि त्यानंतर मनसोक्त पोहे खाल्ले रंजनाने केलेले आणि गुडुप झोपी गेलो. विनय विदुला आईकडे कधी येऊन पोहोचले कळले देखिल नाही. उठल्यावर अंघोळी उरकून लगेचच जेवायला बसलो. विनयने रंजनाला लग्नाचे केळवण केले होते त्यात आमची पण हजेरी लागली होती. चविष्ट आणि छान जेवण होते. शेवभाजी,,बटाटेवडे, चिरोटे, सोलकढी, पुलाव, इ. इ. अहेराची देवाणघेवाण झाली. त्यात माझाही नंबर लागला आणि विनयने मला घेतलेले ड्रेस चे कापड खूप आवडून गेले.


लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या अहेराची खरेदी केली. मी आईला आणि रंजनाला साड्या घेतल्या. गलानी दुकानात गेल्यावर साड्या बघत होतो. पहिली जरीची साडी दाखवली तीच खरे तर आवडून गेली होती पण अजून काही साड्यांचे प्रकार दाखवता का ? असे दुकानदाराला सांगितल्यावर त्याने लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यातले वेगवेगळे रंग दाखवले. पिवळा, निळा, लाल, आकाशी, नारिंगी,,, पण आईच्या साड्यांचे अनेक रंग झाले होते. अबोली रंग झाला नव्हता. माझ्या मनात हाच रंग साडीचा घ्यायचा होता. तो नेमका नव्हता. गडद पोपटी रंग आईच्या साडीचा घेतला त्याला जांभळ्या रंगाचे काठ होते. हा रंग झालेला नव्हता. साडी अप्रतिम होती. नंतर लगेच रंजनाची साडी घेतली. डिझाईनर साड्यांचे बरेच प्रकार पाहिले. आणि त्यात एक सुंदर साडी लगेचच आवडून गेली. साडीचा रंग म्हणजे लाल रंगामध्ये गुलाबी रंगाचे मिश्रण होते. "हिच साडी" मी सई रंजना आणि सुरेशचे एक मत झाले. रंजनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

तिसऱ्या दिवशी आमच्या तिघींची केशरचना कशी करायची? याची एक ट्रायल घेतली. पार्लरवाली आमची मैत्रिणच असल्याने तिच्या पार्लर मध्ये रिलॅक्स बसलो होतो. एकीकडे गप्पा चालू होत्या. योगिताने पटकन केशरचना केली आणी ती आम्हाला आवडली सुद्धा. मला वाटले होते की अंबाडा घालताना केसांमध्ये एक मोठ्ठा बॉल घालतील आणि त्यावर केस वळवून घेतील. मी आधी साशंक होते. माझे केस सुळसुळीत असल्याने केसात घातलेला बॉल मध्ये वाटेत पडला तर? :D पण तसे काहीही नव्हते त्यामुळे शंकेचे निरसन लगेचच झाले. माझी, रंजनाची व सईची सीमांत पूजनासाठी आणि दुसऱ्या दिवशीचीही केशरचना ठरवली गेली.


२ नोव्हेंबरला घरचे केळवण झाले. मोजून ४ प्रकारच केले. कारण की लग्नघरातले सदस्य केळवणे खाऊन खाऊन थकली होती. गोड म्हणून मोदक केले. आवडीचे म्हणून बटाटेवडे केले. आणि मिसळ, काकडी, टोमॅटो व कांद्याचे काप. योगायोग छान होता. केळवण्याच्याच दिवशी सईचा वाढदिवस होता. त्यामुळे रात्री चॉकलेट केक, सईला आम्ही तिघींनी औक्षण केले. फोटोसेशन झाले. एकेक दिवस बिझी बिझी... नंतर एकापाठोपाठ एकेक म्हणजे रंजनाला केळवणाला आलेला अहेर आणि तिने देण्याकरता आणलेला अहेर बघितला. नंतर एके दिवशी घरच्या शुभ कार्याच्या करंज्या केल्या. करंज्या करताना खूपच हासलो. एके दिवशी ग्रहमख आणि नंतर हॉल मध्ये जेवण , बांगड्या आणि मेंदी करता रंजनाचे घर नुसते भरून गेले होते. दुपारपासून ते रात्री १० पर्यंत मेंदी काढणाऱ्या मुली बसल्या होत्या. एकेकीच्या हातावर मेंदी काढली जात होती. बांगड्या भरल्या जात होत्या. प्रत्येकीचे हात हिरव्या बांगड्यांनी छान सजले होते. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी झाली. मी २ ओळीचे गाणे म्हणले. " मनभावन के घर जाए गौरी घुंघट में शरमाए गौरी, बंधी रहे ये प्यार की डोरी हमें ना भूलाना" मी रंजना आणि सईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले.


या सर्व दिवसांच्या मध्ये एकदा आईच्या मैत्रिणींनी खूप छान केळवण केले. एका ग्रुपने इडली सांबार, गोडाचा शिरा आणि चटणी, एका ग्रूपने ढोकळा, आप्पे, चटणी, चिरोटे आणि नंतर अमूलचे आईसक्रीम. छान डिझाइन च्या पर्सेस दिल्या. मला हे सर्व अनुभवताना खूपच छान वाटत होते. अशी मजा अमेरिकेत नाही. लग्न झाल्यानंतर एके दिवशी मला भेटायला भाग्यश्री आणि सविता आईकडे आल्या आणि आम्ही नैवेद्यम मध्ये जेवायला गेलो. सविताचे ऑफीस आईच्या घराच्या जवळ होते म्हणून हे शक्य झाले. आम्ही लहानपणच्या मैत्रिणी जवळ जवळ ३५ वर्षांनी भेटलो. इतकी वर्षे मध्ये गेली असे जरासुद्धा जाणवत नव्हते. त्याच निरागस गप्पा होत्या.
श्रुती मंगल कार्यालयात जमले सर्वजण. नंतर योगिताने आमच्या तिघींचा मेक अप केला आणि छान केशरचना केली. आमच्या हातात आमच्या मामे बहिणींनी पोहे दिले, पाणी दिले , चहा दिला. सर्वजणी आमच्या तिघींचे कौतुक करत होत्या. बहिणी बहिणींचे प्रेम असेच असते निरागस. आमच्या वहिन्या पण खूप छान आहेत आमच्यात मिक्स होणाऱ्या. एकाच मांडवात मला समस्त नातेवाईक भेटत होते.


आदल्या दिवशी मुलाकडची मंडळी सोलापूरवरून आली. बस ४० जणांची होती. नवऱ्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना कार मध्ये बसवून घेऊन आले आणि माझ्या बहिणीने त्यांना औक्षण केले. त्यांच्यासाठी गुलाबफुलांच्या पायघड्या सर्व भाचे कंपनीने मिळून तयार केल्या होत्या. पायघड्यावरून सर्व मुलाकडची मंडळी चालत आली. त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी फुलांच्या पाकळ्या उधळल्या. स्वागत खूपच छान झाले. सीमांतपूजन झाल्यावर गाण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात वेळेअभावी तो तासाच्या आतच संपवावा लागला. मोजकीच आणि प्रसंगानुरूप गाणी खूप छान गात होते. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, फुलले रे क्षण माझे फुलले रे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू,, आणि शेवटचे गाणे होते मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना,,, यात सई, सुजीत, नवऱ्या मुलीचे व नवऱ्या मुलाचे आईवडील नाचले. अगदी थोडक्यात पण हा गाण्याचा कार्यक्रम खूपच छान झाला. कार्यक्रम संपल्यावर जेवणे. जेवणात कढी, रस्सा, गोडाचा शिरा, पुरी,इ. इ् होते.
सईबरोबर आम्ही दोघी बहिणी पण नटलो. सईचा तसा आग्रह होता. आमचे नवरे म्हणालेच "कोणाचे लग्न आहे ? तुमचे की सईचे? काय एवढ्या नटताय? आम्ही दोघीही काही कमी नाही बोलायला. आम्ही म्हणालो सई बरोबर आम्ही पण लग्न करणार आहोत. मी म्हणाले मांडवात जो कोणी चांगला दिसेल त्याला आम्ही माळ घालू. :D :D. "काय करायचे ते करा" इति आईचे जावई. लग्नाच्या दिवशी लग्नघटिका जवळ जवळ येत होती. आधी सगळे विधी असल्याने ते शांतपणे बघायला मिळाले. एकीकडे नातेवाईकांबरोबर गप्पाटप्पा होत होत्या. सईची आजी खूपच उत्साही होती. तिच्या मैत्रिणी आल्यावर लगेच त्यांच्या घोळक्यात शिरली. ठरवलेल्या मुहूर्तावर "शुभमंगल सावधान" झाले आणि सई सुजीत विवाहबद्ध झाले. फोटोज आणि विडिओज चालूच होते, अगदी आदल्या दिवशी सुरवात झाली ते सई सासरी निघेपर्यंत. आम्ही खूप रडलो. अर्थातच. घरी आल्यावर शांत शांत जाणवत होते. घाईगडबड संपली होती. दुसऱ्या दिवशी रंजना सुरेश सोलापूरला रवाना झाले ते मुलीच्या सासरच्या घरी. तिथे रिसेप्शन आणि पूजा होती.


सई सासरी गेली तशी माझ्याही बॅगांची आवरा आवर सुरू झाली. आईचे घर मी परत निघाल्याने आणि रंजनाचे घर सई सासरी गेल्याने रिकामे होत होते. मि निघायच्या आधी सई - सुजीतही पुण्यावरून ठाण्यास जायला निघाले ते त्यांच्या घरात जाण्यासाठी. नवीन संसार मांडायला सासुसासरे आले होते. सई सुजीत खुप गोड दिसत होते. आम्ही दोघे डोंबिवलीत आलो खरे पण अगदी आदल्या दिवशी रात्री. दुसऱ्या दिवशी सोसायटीची एक महत्त्वाची मिटींगला हजर रहायचे होते. दिवस उजाडला मात्र ! वेळ इतका झरझर सरला की विमानतळावर जाण्यासाठी वेळ येऊन ठेपली. आमच्या सोसायटीत शैलाताई - खाडीलकर आणि सुषमा - नेर्लेकर यांना भेटलो. शैलाताईंनी मला त्यांच्या हाताने विणलेली टोपी आणि मफलर दिला भेट म्हणून. दर भेटीत त्या काही ना काही छान भेटवस्तू देतात. सुषमाने मला एअरटाईट डबे दिले. ओलाची टॅक्सी शैलाताईंनी बुक करून दिली. त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही टॅक्सीत बसलो ते विमानतळावर जाण्यासाठी. प्रत्येक भारतभेटीमध्ये एखादी मैत्रिण आणि एखादा नातेवाईक यांना भेटणे होते कारण की मी दर भारतभेटीत जास्तीत जास्त वेळ आईबाबांना देते. त्यामुळे आईबाबांना आणि मला खूप समाधान मिळते. मित्रमंडळींच्या यादीत बऱ्याच जणांना भेटलेली आहे. तरी सुद्धा बरेच जण बाकी आहेत. एक विचार घोळतोय. सर्वांना एकत्र मीच बोलावेन.
लवकरात लवकर जमवायला हवे हे खरेच !! :)
पहिले पाऊल टाकिते मी
तुझ्यासवे ते विश्वासाने //१//
दुसरे पाऊल तुझ्यासंगती
तुझ्या नि माझ्या प्रेमाचे //२//
तिसऱ्या पाऊली सांगते तुज मी
वागवीन मी सर्वांनाच आदराने//३//
चवथे पाऊल टाकू दोघे मिळूनी
आप्तस्वकीयांच्या आशीर्वादाने //४//
पाचव्या पाऊली जागतील आशा
पूर्ण करूया मनोरे सुखस्वप्नांचे //५//
सहावे पाऊल असेल तुझे नि माझे
उजळतील दाही दिशा समाधानाने //६//
सातव्या पाऊली वचने देऊन
आपण राहू मैत्र सात जन्मांचे //७//
वरची सात पाऊले मला आपोआप सुचली ती रुखवतात होती.
लग्नमय भारतभेटीची कहाणी समाप्त :) :D
Rohini Gore