Friday, September 30, 2011

पानगळीचे रंगपानगळीचे रंग दरवर्षी जरी तेच असले तरी त्याचे फोटो घ्यावेसे वाटतात. यंदा पानगळीच्या रंगांना जरा लवकरच सुरवात झाली आहे असे वाटते. पिवळा, केशरी, हिरवापिवळा, लाल, शेंदरी असे अनेक रंग किती छान दिसतात ना? ही रंगीबेरंगी पाने झाडावरून खाली जेव्हा काळ्या मातीवर पडतात तेव्हा तर हे रंग खूपच खुलून दिसतात.

Wednesday, September 28, 2011

अनामिका ... (5)संजली अनिल यांचा संसार सुरू होतो, त्याचबरोबर संजलीचे कॉलेजही सुरू होते. सकाळचे कॉलेज करून संजली जेवायला घरी येत असते. अनिलची बँक जवळच असल्याने तोही दुपारचा जेवायला घरी येत असतो. दुपारी संजली कॉलेजचा अभ्यास करून संध्याकाळी अनिलबरोबर फिरायला जात असते. आत्याबाई तिला कोणतेही काम सांगत नाहीत की किंवा कोणतीही जास्तीची जबाबदारी टाकत नाहीत.कॉलेज संसार सुरू झालेला असला तरी नवीन लग्न झाल्यामुळे तिचे सणवारही सुरू होतात. श्रावण सुरू होतो व अंजलीचे आईवडील एकदा आत्याबाईंकडे माघारपणासाठी बोलावणे करायला येतात. संजलीला खूप आनंद होतो. ती माहेरी जाण्यासाठी बॅगेत कपडे भरते आणि आठवड्याभरासाठी आईकडे माघारपणाला येते. तिथे तिच्या मैत्रिणी तिला भेटतात. लग्न झाले असले तरी आत्याबाई संजलीला पंजाबी सूट घालण्याची परवानगी देतात. माघारपणाला आलेल्या संजलीचे तर आई अगदी खूप लाड करते. सासरी तुझे कसे चालले आहे, आत्याबाई कशा वागतात, अनिल कसा वागतो याची आवर्जून चौकशी करते. संजली खुश होऊन सांगते आईबाबा मी खूप आनंदात आहे आणि आत्याबाई मला पुढे शिकून देणार आहेत. अनिलही चांगला आहे.

दिवसामागुनी दिवस चालले असतात. संजली पदवीधर होते. तिला पुढचे शिक्षणही घ्यायचे असते त्यामुळे ती मास्टर्सला प्रवेश घेते. शिक्षण चालू असले तरी वाड्यात येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, वाड्यामध्ये काय नको काय हवे
याची जबाबदारी, अशी थोडीफार जबाबदारी आत्याबाई संजलीवर टाकतात. कॉलेज संभाळून इतर जबाबदाऱ्याही ती अगदी सहज पार पाडत असते. अनिल पण बँकेत खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचतो. मोठ्या पदासाठी त्याला बाहेरगावी जावे लागते. बॅकेतल्या मोठ्या पदाच्या जबाबदारी चांगली पार पाडत असतो. त्याला कधीकधी संजलीशी बोलायलाही वेळ होत नाही. आत्याबाईंना आता नातवाचे तोंड पाहायचे असते. तसे त्या संजलीला बोलूनही दाखवतात. संजली म्हणते अजून फक्त दोन वर्षे की तुमची मागणी मी पूर्ण केलीच म्हणून समजा. संजलीच्या शिक्षणात अनिलचीही पूर्ण साथ असते. त्यालाही मूल व्हावे असे वाटत असते पण एकदा का संजलीचे शिक्षण पूर्ण झाले की संजलीलाही आपल्या मुलाला चांगले वाढवता येईल असे त्याला वाटत असते.


मास्टर्सचे दुसरे वर्ष चालू असतानाच आत्याबाईंची तब्येत परत एकदा बिघडते. ब्लडप्रेशर व डायबेटीसचा आजार हळूहळू वाढत असतो. आत्याबाईंची सुश्रुषा, एकीकडे कॉलेज, आलागेला, शिवाय कधी कधी तर अनिल कामानिमित्ताने बाहेरगावीही जात असतो तेव्हा तर तिला बाहेरची कामे पण पडतात. संजलीची ही तारेवरची कसरत चालू असतानाच तिला दिवस जातात. तिला मुलगा होतो. आत्याबाईंची तब्येत परत सुधारते. आत्याबाई नातवाचे कौतुक करण्यात मग्न होऊन जातात. संजलीचे शिक्षण पूर्ण होते. एके दिवशी आत्याबाई संजलीला पूर्ण वाड्याचा ताबा आणि किल्या देतात. तिला सांगतात आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता मी कोणत्याही कामात लक्ष घालणार नाही. नातवाला सांभाळण्याचे काम मात्र मी आनंदाने करीन.
आता संजलीवर संपूर्ण वाड्याचीच नाही तर सर्व कुटुंबाची जबाबदारी येते. ती तिच्या अखत्यारीत वाड्याचा कायापालट करते. बाहेरगावी राहणाऱ्या काही कॉलेज विद्यार्थ्यांना ती वाड्यात पेईंग गेस्ट म्हणून ठेवते. अनिललाही दरम्यानच्या काळात एका कंपनीची मॅनेजरची ऑफर येते. संजली मुलाचे नाव सलील ठेवते. सलील हळूहळू मोठा होत असतो. त्याचा अभ्यास घ्यायची जबाबदारी पण संजलीच उचलते. घरात नोकरचाकरही वाढवते. संजली अनिल मिळून एक कार घेतात. संजली आता कारने जाऊन बाजारहाट, बाकीची कामे, मैत्रिणींना जाऊन भेटणे करत असते. संजली थोडी मॉड होते. तिचे कमरेइतके केस जाऊन आता शोल्डर कट येतो. काहीवेळा साडीवर स्लिवलेस ब्लाऊजही घालते. मोबाईल फोन, कार, अनिलची मोठ्या पदाची नोकरी, वाड्यात पेईंग गेस्ट म्हणजेच कॉलेजचे विद्यार्थी रहायला येतात. संजलीला वाटते की तिच्या आईवडिलांनीही त्यांच्या वाड्यात येऊन राहावे पण तिच्या या म्हणण्याला तिचे आईवडील नकार देतात. आपणही काहीतरी व्यवसाय सुरू करावा असे तिला वाटत असते पण अनिलचा त्याला विरोध असतो. अनिल तिला म्हणतो तुला आधीच खूप व्याप आहेत त्यानेच तू खूप दमून जातेस. मुलाचा अभ्यास, आईची तब्येत, तिची मोठी नणंद घरी आली की तिचे माघारपण,एक ना दोन सर्व तूच तर सांभाळतेस की, एवढे तुला पुरे नाही का?

संजली अनिल यांचा संसार छान चाललेला अस्तो. तशा थोड्याफार कुरबुरी, थोडीफार भांडणे, मदभेद हे तर चालूच असते पण तरिही दोघे खूप समंजस असल्याने जो चुकत असेल तो आपणहून माघार घेत असतो. वाड्यात पहिल्यापासूनच नोकरचाकर असल्याने संजलीवर कामाचा जास्त भार पडत नाही. तिचे काम म्हणजे सर्वांकडून कामे करवून घेणे, कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणे त्यामुळे तिलाही आपण आपले शिक्षण पूर्ण करून शिवाय सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकलो याबद्दल खूप आत्मविश्वास वाटत असतो. संसाराच्या या सर्व कारकिर्दीत तिच्या व अनिलच्या लग्नानंतरचा १२ ते १५ वर्षाचा काळ कधी मागे पडून जातो याचा पत्ताही लागत नाही.


आणि एके दिवशी....... संजलीच्या जीवनात अनेक घडामोडी उलगडणारा काळ येऊन उभा राहतो.... काय होते त्यादिवशी!!! .....खूप लवकर नाही तरी काही दिवसातच पुढील भाग घेऊन येते.

Sunday, September 25, 2011

बगळा

तोरण

पानगळीचा ऋतू आता सुरू झाला आहे. रंगीबेरंगी पाने झाडांवर दिसू लागली आहेत. ही पाने खूपच मनमोहक असतात. झाडावरून खाली काळ्या मातीवर गळून पडली की अजूनही छान दिसतात. हा ऋतू मला खूप आवडतो. क्लेम्सन या शहरात तर या पानांचा खूपच पसारा असतो. त्याचा अजून फोटो काढायचा आहे. काल खाली पडलेली ही पाने वेचली व सहज मनात विचार आला की याचे तोरण करू. हे तोरण करून दाराला लावले तर खूप नयनरम्य दिसत होते. पानगळीचे स्वागत अशा मराठमोळ्या पद्धतीने केले तर किती छान होईल ना. अनायसे दसराही येतो तर दसऱ्याला अशा रंगीबेरंगी पानांचे तोरण करून दसरा उत्सवात अजूनही छोटी भर घालता येईल.