Saturday, June 21, 2014

२१ जून २०१४आजचा दिवस ली रिंगरचा होता. वेदर चॅनलवर रोजच्या दिवसाचे अंदाज वर्तविणारे सर्व आज आम्ही राहत असलेल्या शहरात आले होते. स्टॉर्मफेस्ट २०१४ या एका कार्यक्रमात वेगवेगळ्या वेदर चॅनलचे लोक आले होते. म्हणजे थोडक्यात त्यांची एक सभा भरली होती आमच्या शहरातल्या केप फिअर म्युझियममध्ये. शुक्रवारीच ली ने याची घोषणा केली होती आणि "मी तिथे हजर असणार आहे" असे पण सांगितले होते. शिवाय त्याच्या फेसबुकावरच्या पेजवर पण त्याने लिहिले होते. आम्ही आलोत. आम्हाला भेटा. मी पण लगेच या स्टेटसला लाईक करून "आम्ही येणार आहोत " असे लिहिले होते. तेही त्याने लाईक केले.
आज सकाळी उठलो आणि विनायक एका कामाकरता बाहेर पडला. मला म्हणाला मी येई तोवर तू तयार रहा. तो आल्यावर निघालो लगेचच. तिथे पोहोचलो आणि तिथे सुरू असलेल्या कार्यक्रमात जाऊन बसलो. तिथे एक जण वादळे कशी येतात याबद्दलची थोडक्यात माहिती सांगत होता. पूर्वी आलेल्या वादळांच्या फोटोंचे स्लाईड शो दाखवले. काही जणांनी प्रश्न विचारले. ते झाल्यावर ली रिंगरची भेट घेतली. आम्ही दोघांनी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि विनायकने सांगितले. "ही रोहिणी" त्याने अगदी लगेचच ओळखले आणि म्हणाला " ओऽह, रोहिणी!, तू खूप सुंदर सुंदर फोटो पाठवतेस त्याबद्दल अनेक धन्यवाद" मी पण त्याला म्हणाले कि तूला पाहून आणि भेटून मलाही खूप आनंद झाला आहे. मग आमचे एक फोटो सेशन झाले. त्याने सुचवले की न्यूज बॅनरच्या पार्श्वभूमीवर फोटो काढू. तिथल्या एकाला ली रिंगरने विनंती केली की आमच्या तिघांचा एक फोटो काढ. फोटो झाल्यावर मला सांगितले "बघ चांगले आलेत का"हा ली रिंगर खूपच उत्साही आहे !  मार्च २०१३ ला मी याला फोटो पाठवायला सुरवात केली. मार्च २०१३ ते जून २०१४ पर्यंत त्याने मी पाठवलेल्या फोटोंपैकी १३ फोटो दाखवले. हे जे फोटो चॅनलला मी पाठवते ते मला विनुने सुचवले. विनू मला म्हणाला की तू इतके फोटो काढत असतेस तर या चॅनलला पाठवत जा. आणि हा सिलसिला सुरू झाला. त्यातला एक फोटो आहे तो माझ्या कायम लक्षात राहील अस आहे. तसे सूर्योदयाचे बरेच फोटो काढले आणि पाठवले पण त्यातला एक फोटो होता याबद्दल लिहिते. मला काही केल्या रात्रभर झोप येत नव्हती. शेवटी पहाटे दार उघडून बाहेर बघितले तर थोडे झुंजूमुंजू होत होते. आकाशात पावसाळी ढग जमा झाले होते. सूर्योदय दिसण्याची शक्यता अजिबात नव्हती. तरीही मी तशी बाहेर उभी राहिले. ढगांमधून सूर्य हळूहळू करत वर आला. त्याची किरणे जमिनीवर पसरली आणि त्याच वेळी क्लिक केले. आणि लगेचच परत सूर्य ढगा आड निघून गेला. हा फोटो मला खूपच आवडून गेला आणि तो ली रिंगला पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच हा फोटो दाखवला. त्याची मेल आली ही तू पाठवलेला हा फोटो पहा. मेल बरोबर "खूपच सुंदर फोटो" अशी त्याची प्रतिक्रिया पण आली.ली रिंगर स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहे. त्याने काढलेले फोटो अर्थात एखादाच क्वचित या वेदर चॅनला तो दाखवतो.  जोपर्यंत मी विल्मिंग्टन शहरात आहे तोपर्यंत मी या वेदर चॅनलला फोटो पाठवत राहणार. मी ली रिंगरची अत्यंत आभारी आहे.  मी व विनू वेदर चॅनल वर रोजच्या रोज दाखवणारे फोटोज पाहत असतो. आम्हाला दोघांनाही त्याला प्रत्यक्ष पाहण्याची खूप उत्सुकता होती.  आज तो आमच्या शहरात येणार आहे म्हणल्यावर आम्ही लगेचच त्याची भेट घ्यायची ठरवली. आज मि खूप आनंदात आहे.


सूर्योदयाचा माझ्या लक्षात राहिलेला फोटो इथे देत आहे.  आजचा दिवस असा होता तर !


Sunday, June 15, 2014

१५ जून २०१४


आजचा दिवस कोडे सोडवण्याचा दिवस होता. फेसबुकावरच्या एका म्युझिक ग्रुपवर कालच काही कोडी आली होती आणि आज सकाळी उठलो तर अजून काही आलेली दिसली. विनायकने पण २ कोडी घातली होती. कोड्याकरता आता हे एक चांगले झाले आहे की गूगलींग करता येते पण काही कोटी गूगलला दाद देत नाहीत.  सिनेमे, गाणी, ट्युन्स, संवाद अश्या सर्व प्रकारची कोडी होती. त्यात मला २ कोडी सोडवता आली. एक कोडे अर्धवट आले तर एक अजूनही डोके खाजवत आहे.
आज सकाळचे आमच्या घरातले दृश्य असे काहीसे होते. "आमच्या दोघांच्याही मांडीवर आमचे लॅपटॉप होते आणि सकाळचा जवळजवळ सगळा वेळ आम्ही नाकासमोर लॅपटॉप ठेवून कोडी सोडवत होतो. आम्ही सकाळी न्याहरी अशी वेगळी घेतच नाही. दुधेच पितो आणि त्यात शक्तीवर्धक प्रोटीनच्या पावडरी घालतो. तर ही दुधेच मुळी आज आम्ही १२ ला प्यायली. त्या आधी कोडी सोडवली. पोटात भुकेचे कावळे कावकाव करत होते. त्यांना दूध पिऊन शांत केले. नंतर जे काम नेहमीच रेंगाळते ते म्हणजे केसांना रंग लावण्याचे काम, ते केले. असे करता करता ३ वाजायला आले. बाहेरही जावत नव्हते की घरी पण जेबणासाठी काही बनवावे असे वाटत होते. काय करावे?? शेवटी एकदाचे बाहेर पडलो. साफसफाई आणि ग्रोसरीची कामे कालच झाली होती.

जेवलो, घरी आलो, थोडी विश्रांती घेतली. परत कोडी सोडवण्यासाठी लॅपटॉपवर हजर झालो. आज हवा छान होती. हवेत आर्द्रता अजिबात नव्हती त्यामुळे समुद्रकिनारी जायचे असे ठरवले. बरेच बरेच दिवसांनी आमच्या जवळच असलेल्या (म्हणजे कारने १५ मिनिटे) किनाऱ्यावर गेलो. आहाहा इतके काही छान वाटत होते. सुखद वारे होते आणि समुद्र मस्तच दिसत होता. समुद्र नेव्ही ब्ल्यू रंगाचा आणि त्याच्या लाटा पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या. ही रंगसंगती अगदी बघत बसावी इतकी छान दिसत होती. बरेच चाललो आज वाळूचे किनाऱ्यावर कट्
टे तयार झाले होते. चालणारी मंडळी तिथे अधुनमधून बसत होती. 

आजच ठरवले की हवा छान असली की वीकेंडला समुद्रकिनारा गाठायचा. पूर्वी आम्ही इथे दर शनिवार रविवार ६ नंतर पडी असायचो. तर आजचा दिवस होता कोडी सोडवण्याचा. खरेच प्रत्येक दिवसाचे असे काहीतरी वेगळे असतेच , नाही का? आता उद्या कोड्यांची उत्तरे आली की अरेच्या, हे गाणे होते ! असे होऊन जाईल.
किनाऱ्यावरचा सुर्यास्तही छान होता पण सूर्योदय बघायला जास्त मजा येते. मजा येते म्हणण्यापेक्षा समुद्रातून सूर्याचा उदय होतोय हा अनुभव तर मी कधीच विसरणार नाही. जास्तीत जास्त सुर्योदय बघायला हवेत.

Monday, June 09, 2014

९ जून २०१४आज पहाटे सुमारे ६ च्या दरम्यान सूर्योदयाच्या वेळी जाग आली. सूर्योदय पाहिला आणि परत झोपले. ढगाळलेले वातावरण व अगदी पुण्यासारखा रिमझिमणारा पाऊस आहे आज. दुलईतून उठावेसे वाटत नाहीये. असे वाटत आहे की असेच झोपून राहावे. आजचे ढगाळी व पावसाचे वातावरण थेट पुण्याची आठवण करून देणारे आहे आणि फीलही तसेच आहे.

"पूर्वी पहाटे ६ पासून पुणे स्टेशनवर रेडिओवर लागणारी गाणी, पाऊस, आणि शाळा कॉलेजला जायला उठायचे आहे पण उठवत नाहीये. गाणी ऐकत असेच झोपुन् राहावेसे वाटत आहे." एक गाणे आठवले ते लागायचे पूर्वी. युट्युबवर शोधले आणि सापडले.  गाण्याचे बोल आहेत "देव माझा विठू सावळा"


हे गाणे ऐकले आणि मन व्याकूळ झाले. आईबाबांचे पूर्वीचे घर आठवले.  आजचे वातावरण की जे ढगाळ होते आणि पाऊस पडत होता. मला हे गाणे कसे काय एकदम आठवले ते कळतच नाहीये. म्हणजे असे की ते पूर्वी कधी पाहिले, किंवा काही काही गाणी कशी आपण परत परत ऐकत राहतो, किंवा काही वेळेला फक्त मराठी गाणी ऐकाचाच मूड येतो. यापैकी काहीच झाले नव्हते. आजचा सगळा दिवस खूपच कंटाळवाणा गेला. एक तर कालच्या साफसफाईने आणि आधीच्या आठवड्यात जरा चालणे नेहमीपेक्षा खूप जास्त झाल्याने दमायला झालेच होते आणि त्यात भर म्हणजे ही हवा. आज काहीही केले नाही. पडून राहिले. जेवायच्या वेळेला कणिक भिजलेली होती. पटकन होणारी भेंडीची भाजी केली. दुपारी पण भूक लागली नाही. नाहीतर काहीतरी चमचमीत गरमागरम खायला करते. काल रात्रीचे थोडे भाजणीचे थालिपीठ उरले होते तेच खाल्ले. रात्रीचे जेवायला पण काही वेगळे असे केले नाही. दुपारचीच पोळी भाजी खाल्ली.
जरा काही अगदीच वेगळे म्हणजे एका म्युझिक ग्रुप मध्ये रोज थीमा बदलतात त्यात आजची थीम होती गीतकार साहिर यांची रोमॅटीक गाणी. त्यामुळे माझे नेहमीचे आवडते गाणी निगाहे मिलाने को जी चाहता है टाकले. शिवाय एका ब्लॉग वर जरा वेगळे वाचायला मिळाले. ते वाचूनही छान वाटले. पण नेहमी कसा अगदी उत्साह असतो, आठवणी येतात, गाणी ऐकली तर त्यातले एखादे गाणे दिवसभर रेंगाळत राहते तसे काहीच झाले नाही. डोळ्यावर सतत झापड आहे. सारखी झोप येत होती आज पण झोप लागत नव्हती. आषाढासारखे डल्ल्ल वातावरण भरून राहिले होते आज दिवसभर. कालचा दिवस मात्र निरानिपटी कामाचा गेला आणि त्यामानाने काल बऱ्यापैकी उत्साह होता.या दिवसाचे कंटाळवाणे रूप लिहावे म्हणून रोजनिशी लिहिली इतकेच.

Tuesday, June 03, 2014

Hanging Rock State Park - North Carolinaहॅगिग रॉकला गेलो तेव्हा यावेळेस खूपच मजा आली. एक तर हवा छान होती आणि सगळीकडे हिरवेगार झाले होते. धबधब्याचे पाणी बर्फासारखे थंड होते. दरीतली हिरवळ तर खूपच सुंदर दिसत होती. पूर्वी गेलो तेव्हा सगळीकडे पालापाचोळा आणि झाडांवर काटक्या होत्या. तरी सुद्धा छान वाटतच होते  पण यावेळेस डोळ्याना सर्वत्र हिरवेरंगच  दिसत होते. हिरव्या रंगांच्या कितीतरी छटा पहायला मिळाल्या.