Tuesday, March 08, 2016

Ingles Market Inc. - Hendersonville - North Carolina (1)




Diana नावाची एक स्पॅनिश बाई Ingles मध्ये काम करते. तिने एकदा एक रेसिपी केली आणि ती इंगल्सच्या हॉट बार मेनू मध्ये ठेवली. मी Carmen ला विचारले "आपण आपली रेसिपी इथे केली तर चालते का? " तर ती हो म्हणाली. नंतर मी Deli Manager Jamie लाही विचारले. तर ती म्हणाली चालेल. मला हॉट बार मध्ये वेगवेगळे मेनू ठेवायला नक्किच आवडतील. मग ती म्हणाली की तुला जर तुझी रेसिपी करायची असेल तर ६ ला यायला लागेल. माझी कामाची वेळ ८ पासून सुरू होते. तेरेसाला विचारले तर ती म्हणाली तुला इतक्या लवकर जमणार नसेल तर तुझी रेसिपी तू शनिवारी कर. मला बरेच झाले. कारण की ६ ला हजर राहायचे म्हणजे?? नको रे बाबा. मग एक दिवस ठरवला. ब्रेंडा कुकींगसाठी असते. तिला विचारले की या मोठ्या इलेक्ट्रिक फ्रायर मध्ये बटाट्याच्या चकत्या तळल्या जातील का? तर ती हो म्हणाली

विनायकला विचारले तर तो म्हणाला पहिली भजीच कर. भजी नक्की लोकांना आवडतील. चिकन फ्राय तर काय खपतात !

 पण एक प्रश्न होता की Ingles  हे अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स आहे, तिथे कुठे बेसन मिळणार? तर मी मैदा (All purpose flour)  वापरायचे ठरवले.  त्या दुकानात चक्क मला एका कंपनीचे तांदुळाचे पीठही दिसले. चिली पावडर आणि क्युमीन पावडरही दिसली. बटाटा भजी करण्याची निश्चित केले. आणि एका शनिवारी हा प्रयोग यशस्वी झाला. तिथे सोलाणे पण चांगले धारदार होते. सर्व साहित्य जमा केले. तयारी केली. बटाट्याचे पातळ काप केले तर तिथे काम करणाऱ्या काही बायकांनी ते कच्चे कापच खाल्ले ! जिथे ही लोक मासाचे तुकडे पचवतात तिथे बटाट्याचे काप तर किस झाड की पत्ती ! डॉन मला म्हणाली की मला असे कच्चे काप खूप आवडतात.

बटाटा भज्यांची तयारी झाली. पीठ कालवले तेव्हा त्यांना चव  घ्यायला सांगितले. कारण की अमेरिकन लोकांना तिखट मीठाची चव जास्त आवडत नाही. त्यामुळे आळणी चव असलेले पीठ भिजवले. ब्रेंडा म्हणाली की चिकन फ्राय करून झाले की तु भजी सोड. मला त्या इलेक्ट्रिक फ्रायरची जास्त कल्पना नसल्याने त्यांनाच विचारले. तर त्या म्हणाल्या की जनरली ३२५ फॅरनहाइट वर आम्ही फ्राय करतो.  चिकन फ्राय झाल्यावर मी बटाटा भजी एकेक करत सोडत गेले. साधारण  दीड किलो बटाट्याची भजी ३ मिनिटांमध्ये तळली गेली. तळून बाहेर काढल्यावर अर्थातच चव घेतली गेली आणि मग मेनू बार मध्ये एक वाडगा भज्यांचा ठेवला गेला. त्या सर्व नॉनवेज पदार्थांमध्ये बटाटा भजी खूप उठून दिसत होती. कस्टमर विचारत होते. कोणता पदार्थ आहे. ब्रेंडा सांगत होती ही पोटॅटो फ्राय आहेत. त्यामध्ये काय जिन्नस आहेत असे विचारल्यावरही ती सांगत होती. नमुन्याला भजी दिली जात होती. काहींनी मिलमध्ये बाकीच्या पदार्थांबरोबर घेतली.

बटाटा भजी तळून झाल्यावर मी माझे काम करायला घेतले. नंतर काही वेळाने लंच टाईम मध्ये जेवायला गेले. तिथे नंतर ऍन आली. ती म्हणाली तुझे पोटॅटो सगळ्यांना आवडत आहेत ! जेवणावरून आले तर ब्रेंडा म्हणाली. भजी संपत आली आहेत. अजून एक मोठा लॉट तळून ठेव. मग परत अशीच साधारण दीड ते २ किलो बटाट्याची भजी तळली. आणि नंतर ती वाडग्यातून हॉट बार मध्ये ठेवली गेली. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. स्टोअर्स मधले इतर मॅनेजर्सही चविला म्हणून एक एक घेऊन खात असताना दिसले. दुसऱ्या लॉट मध्ये मात्र मी तिखट पहिल्यापेक्षा जरा जास्तच टाकले. इथले तिखट म्हणजे काय दिव्यच असते !

तर Diana ने केलेली रेसिपी सांगते. तिने Jalapeno peppers मधल्या बिया काढल्या. त्यात चीझ भरले आणि ती मिरची बेकॉनच्या पट्टीने रॅप करून तळली. तिने आधी ५० बनवल्या.. पण तितक्या पटपट खपल्या नाहीत. बराच वेळ वाडग्यात दिसत होत्या. इथे रेसिप्या बनवायच्या म्हणजे फोडणीव्यतिरिक्तच पदार्थ शोधावे लागतील. मनात आहेत बरेच. पुढचा नंबर कुणाचा लागतो ते बघायचे !


मला Ingles Grocery Stores मध्ये नोकरी कशी लागली. तिथे कोण कोण काम करतात आणि इतर काही मजा, कामाचे स्वरूप हे पुढील भागात!

गुगल मध्ये सर्च केले असता Ingles Grocery Store ची चेन नॉर्थ कॅरोलायना व साऊथ कॅरोलायना मध्ये आहेत. अजून काही राज्यातही आहेत असे दिसले.

क्रमश : ....