Wednesday, August 06, 2014

६ ऑगस्ट २०१४

आज बरेच दिवसांनी उघडीप पडली होती. सध्या ऋतू जरी उन्हाळा असला तरी पावसाळा वाटावा इतका पाऊस पडत आहे. मागच्या आठवड्यात सूर्यदर्शन नव्हते. परवा तर पावसाळी वातावरणात संध्याकाळच्या सुमारास इंद्रधनुष्य पाहिले. पाऊस, आणि ढग असले की संध्याकाळी आकाशात वेगवेगळे रंग निर्माण होतात आणि ते क्षणाक्षणाला बदलत राहतात. त्यात गुलाबी, आकाशी, निळा, भगवा, मातकट, फिकट पिवळा असे निरनिराळे रंग आकाशात निर्माण झालेले मी कधीच पाहिले नव्हते ते या आम्ही ज्या शहरात राहतो तिथे पहायला मिळाले.

आज नेहमीप्रमाणेच विविध भारतीवरची गाणी ऐकत होते आणि गाणी ऐकताना त्याचे अर्थ निराळेच लागत होते. गाणी तर नेहमीचीच होती पण मला ती आज मन लावून बसून ऐकाविशी वाटत होती. मन भूतकाळात गेले नव्हते. वर्तमानकाळातल्या काही गोष्टी गाणे ऐकता ऐकता आठवत होत्या आणि खूप छान वाटत होते. आज संबध दिवस मनाची स्थिती तशीच होती. मन कुठेतरी हरवले होते. आज संध्याकाळी एका रेसिपीला मुहूर्त लागला, तो सुद्धा ७ ते ८ वर्षानंतर लागला. संध्याकाळी नेहमीप्रमाणे तळ्यावर गेले तर पूर्वी जी बसकी बदके होती ती आज बऱ्याच संख्येनी हजर होती. ४० ते ५० बदके होती. एकदा चालत जायची कुठेतरी , तर एकदा एकामागोमाग एक करत तळ्यात उतरायची. मी आज तळ्याभोवती एक चक्कर मारली. नंतर तिथे असलेल्या एका बाकावर बसले आणि आकाशात बघितले तर परत बरेच ढग जमा झाले होते. वारेही सुटले होते. बराच वेळ बसले आणि घरी आले. आज मात्र आकाशात अजिबातच रंग नव्हते. आज जी रेसीपी केली ती होती तुरीच्या डाळीच्या वड्यांची. वेगळ्या चवीमुळे वडे बरेच खाल्ले गेले त्यामुळे दुपारच्या पोळीचा लाडू करून खाल्ले तेच आजचे जेवण. नाहीतरी सकाळची भाजी उरली नव्हती आणि परत नवीन भाजी करायचा कंटाळाही आला होता.