Tuesday, August 30, 2011

आयरीन (Irene)

आयरीन नावाचे वादळ येणार आहे, म्हणता म्हणता येऊन थडकले की! हवामानाचा अंदाज सारखे सारखे वर्तविणारे दोन चॅनल्स पाहत होतो, एक म्हणजे १४ न्युज डॉट कॉम आणि वेदर डॉट कॉम. वादळाचा गोल गोल फिरणारा गोळा हळूहळू पुढे सरकत होता. साऊथ कॅरोलायनातून सरळ रेषेत cape hatteras, nc वर हे वादळ सरळ सरळ येऊन आदळणार होते. wilmington शहरात घुसणार नव्हते तरी खूप जवळून जाणार होते हे माहित होते पण तरीही.... त्याने अचानक दिशा बदलली तर ...?? म्हणजे थोडे जरी डावीकडे सरकले तर थेट आमच्याकडेच की! बातम्या त्याच त्याच असल्या तरी बघितल्या जात होत्या.एक दोन वर्षापूर्वी एक वादळ थेट आमच्या शहरात घुसणार होते, ते सुद्धा मध्यरात्री! म्हणून आम्ही जागे होतो, ऐनवेळी त्याने दिशा बदलली आणि ते दुसरीकडे निघून गेले! माझा तर मूडच गेला. या wilmington शहरात ना कधीही काहीही होत नाही! अति वृष्टी नाही, हिमवृष्टी तर नाहीच नाही, पण गेल्यावर्षी ती अनुभवाला आली आणि त्याचा आनंद लुटला. अर्थात कोणतेही तीव्र हवामान नाही! हे चांगलेच, नाही का!?

आमच्या शहराच्या जवळून जाण्याचा वादळाचा दिवस व त्याच्या आदल्या दिवशीचे हवामानाचे वेळापत्रक सारखे बघून बघून तोंडपाठ झाले होते. चक्रासारखे फिरणारे गोल गोल व त्यामध्ये हिरवे पिवळे लाल पट्टे (वादळाची तीव्रता दर्शवणारे) सरकत सरकत नक्की वादळ कुठे पोहोचले आहे हे समजत होते. काय काळजी घ्या, काय करा, काय नको हे पण वारंवार सांगत होते.
शनिवारी पहाटे वादळ येणार तर शुक्रवार सकाळपासूनच आकाशात ढग जमले होते, वारा वाहत होता, पाऊस पडत होता. अधुनमधून सर्वजण थांबतही होते. शुक्रवार सकाळी फुकटची कामे बाजूला सारून महत्त्वाची कामे उरकाल्यला घेतली. कॅमेराची बॅटरी संपली होती ती चार्जिंगला लावली, वादळाचे फोटो काढण्याकरता! होते नव्हते ते कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुरू केले. दुपारचा स्वयंपाक केला, त्यात भाजी जास्तीची करून ठेवली. वरणभाताचा कूकर लावला. परत थोड्या बातम्या बघितल्या. नेटवर इकडे तिकडे चकरा मारल्या. पाऊस व वारा वाढत होता. बातम्या बघून बघून डोके दुखायला लागले होते. सर्व काही टर्न ऑफ करून झोपले. ४ वाजता उठल्यावर फेसबुक पाहिले तर मैत्रिणीचा निरोप, अगं बातम्यांमध्ये wilmington red alert दाखवत आहे, काळजी घे गं!... अरेच्या, बघते गं परत बातम्या म्हणून परत बातम्या सुरू केल्या. वादळाचे गोल चक्र wilmington च्या जवळ येत चालले होते. जास्तीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता आणि उत्साह पण नव्हता. बातम्या बंद करून मैत्रिणींशी फोनवर बोलले व परत एकदा कामाला लागले. पिण्याचे पाणी होतेच, फळेही होतीच, फक्त ब्रेड व थोडे अजून जास्तीचे पिण्याचे पाणी आणून ठेवावे का? असे ठरवून गेलो तर दुकान बंद! अर्थात अडीत काहीच नव्हते.

संध्याकाळी खायला भाजणीचे थालिपीठ केले होते त्यात अजून एक दोन थालिपीठे जास्तीची लावली. रात्री आमटी व पोळ्या केल्या. आमटी जरा जास्त उकळली. पाऊस व वारा वाढत होता. लाईट गेले तर टेबलावर काडेपेटी व मेणबत्ती काढून ठेवली होती. मेणबत्ती जाड व बुटकी म्हणजे ती सहज बसते कोणत्याही बेसवर. परत एकदा बातम्या बघून झोपलो. यावेळी मात्र गोल गोल चक्रातले हिरवे, पिवळे व लाल पट्टे wilmington शहर ओलांडून जात आहे असे दिसले. चला झोपा आता! आले वादळ! तयारी तर सर्व करून ठेवली आहे. झोपले तर खिडकीच्या बाहेरून घों घों असा आवाज, मधून पावसाचा आवाज. झोपायचे होते पण काही केल्या झोप येईना! एक दोन वेळा नेटवर चक्कर मारून परत पीसी टर्न ऑफ केला. मध्यरात्री नंतर साधारण २ ते ३ च्या सुमारास वाऱ्याचा गोंगाट खूपच वाढला. बाहेरची झाडे जोरजोरात हलत होती. खिडकीच्या काचेतून दिसतही होते. जाणवत होते वादळ अगदी जवळ आले आहे ते! प्रचंड प्रमाणात गरम होत होते! छातीवर दडपण आल्यासारखे वाटत होते. पीसी ऑन केला तर मैत्रिणीचा फेसबुक वर निरोप, काय गं वारापासून कसा आहे? तिला सांगितले, हो गं बराच वाढलाय! असा निरोप लिहिला आणि बाहेर एकदम काळाकुट्ट अंधार दिसला. लगेच कळाले की लाईट जाण्याच्या मार्गावर आहेत. पीसी बिघडायला नको म्हणून लगेच टर्न ऑफ केला आणि काही क्षणातच पूर्ण लाईट गेले.
काळाकुट्ट अंधार! वाऱ्याचा घों घों असा आवाज. काचेतून बघावे तरी काळाकुट्ट अंधार! खिडकीबाहेरचे झाड खूप खाली वाकत होते, परत वर येत होते. वाऱ्याने त्या झाडाला खूपच सतावून सोडले होते. आता थोड्याफार विजाही चमकत होत्या. ओट्यावर व बाथरूम मध्ये मेणबत्या लावून ठेवल्या. स्वयंपाकघरात आले तर तिथे पाणीच पाणी झाले होते. साधारण पाऊल भिजेल इतपत पाणी बंद दारातून शिरले होते. दारावरही कोणीतरी थडथड आवाज करत आहे हे जाणवत होते. खूप नाही तरी किंचित रडकुंडीला आल्यासारखे झाले. जोपर्यंत लाईट आहेत तोपर्यंत काही जाणवत नाही पण एकदा का लाईट गेले की सर्वकाही ठप्प!!! सर्व जगाशी संपर्क तुटतो आणि एकटेपणाची भावना वाढते. हा एकटेपणा दोन तीन तासच टिकला. जशी सकाळ झाली तसा सूर्य वर आला आणि पूर्ण ढगाळलेल्या आकाशातून सुद्धा सर्व काही दिसायला लागले. हॉलमध्ये येऊन पडदा बाजूला सारला. पाउस व वारा यांचा खेळ चालूच होता. दार अगदी थोडे उघडून पाहिले तर वाऱ्याचा प्रचंड जोर! इतका की बाहेरचा वारा आत येऊन तुम्हाला तुमच्याच घरात उताणे पाडेल इतका! जोर करून परत दार लावून घेतले. फडक्याने घरात आलेले थोडे पाणी पुसून घेतले व फडके पिळून टाकले. कॉटवर आडवे पडण्याशिवाय काहीही करता येत नव्हते. उठल्या उठल्या चहा लागतो. गरम चहा नाही! मग थोडीशी साखर खाल्ली. परत आडवे पडलो, डोळे मिटून शांत! आठ नऊ वाजता भूक लागल्यावर थोडी बिस्कीटे व सफरचंद खाल्ले. लाईट नाही तर चहा नाही, अंघोळ नाही. विनायक पुस्तक वाचत होता. मी तशीच कॉटवर आडवी पडून राहिले. रात्रभराच्या जागरणाने थोडीफार गुंगी येत होती. परत उठून काचेतून वाऱ्याला आणि पावसाला बघत होते. १ वाजता जेवणे केली व परत दार उघडले. वारे होतेच पण जोर बराच कमी झाला होता. जाकिट घालून व ब्रेड घेऊन खाली तळ्यावर एक चक्कर मारून आले. वारा बऱ्यापैकी जोराचा होता! काही बदके आली ब्रेड खाय्ला काही तळ्याच्या दुसऱ्या काठावर बसली होती. बदकांचे पाय चालताना सरकत होते, पंख उडत होते.

लाईटची वाट पाहता पाहता शेवटी संध्याकाळी ६ ला लाईट आले आणि अगदी जीव आल्यासारखा वाटला. पहिल्याप्रथम चहा करून घेतला. फेसबुकवर अपडेट लिहिले आणि अंघोळी उरकल्या. बाहेर चक्कर मारायला गेलो. बरेच ठिकाणी पाणी साचून राहिले होते. जिकडे तिकडे रस्यावर झाडाची बरीच पाने व फांद्याही पडल्या होत्या. आमच्या कारला पण बरीच झाडाची पाने चिकटली होती. कारमधून वालमार्टला जाऊन आलो. बंदकांसाठी ब्रेड घेतला व घरी आलो. रस्ते रिकामे होते. वादळवाऱ्याच्या खाणाखुणा दिसत होत्या पण जास्त नाही. संध्याकाळी वारापाऊस दोघेही थांबले होते. वाऱ्याच्या आवाजाने डोके भणभणायला लागले होते. संध्याकाळी बरीच शांतता होती. तळे तुडुंब भरून वाहत होते. बदकांना ब्रेड घालण्यासाठी तळ्यावर गेले तर नेहमीप्रमाणेच टणाटण उड्या मारत बदके व त्यांची पिल्ले ब्रेड खायला आली. त्यांना मनसोक्त ब्रेड खायला घातला. आकाशही सुंदर दिसत होते. काळ्यानिळ्या ढगांमध्ये बरेच रंगही विखुरले होते. आकाशातील रंगाचे प्रतिबिंब पाण्यावर उमटले होते. आज तळ्यातले पाणी मोरपंखी रंगाचे दिसत होते! रात्री ९ वाजता जेवणे केली व झोपलो ते सकाळी ६- ७ जाग आली. अतिशय शांत सुंदर झोप लागली. सकाळी उठून दार उघडले तर स्वच्छ सुंदर सकाळ उगवली होती!!!!

http://youtu.be/w8bjhftaHCU?list=UUhWLgGIetuZckJWX_fPofRw


Tuesday, August 16, 2011

Art Photography
UNCW...7
Monday, August 08, 2011

मनात भरून राहिलेले! .... (1)

काही काही गोष्टी आपल्या मनात खूप भरून राहिलेल्या असतात आणि नंतर केव्हातरी अचानक त्या गोष्टी आपल्याला आठवतात. गोष्टी आठवल्या की आपले मन त्यामध्ये रममाण होऊन जाते.


एखादे कानातले, गळ्यातले, ड्रेस किंवा एखादा रस्ता, एखादा खाण्याचा प्रसंग, छान पुस्तक, किंवा एखादी आठवण असे सर्व काही. या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खूप आवडलेल्या असतात, मनात भरलेल्या असतात त्याहूनही अधिक त्या आपल्याला कालांतराने अशाच पटकन काही ध्यानीमनी नसताना आठवतात तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येत नाही.गेले दोन चार दिवस मला माझे पूर्वीचे कानातले झुमके आठवत आहेत. कॉलेजमध्ये असताना मला माझे कानातले पांढर झुमके आठवत आहेत. या आठवण्यावरूनच मला हे मनात भरून राहिलेले आठवून लिहावेसे वाटले. कुंकवामध्ये मला टिकली अजिबात आवड नाही. मला कुंकू म्हणजे ओले कुंकू लावायला आवडते आणि ते सुद्धा मरून रंगाचे. मरून रंगाच्या खाली एक अगदी छोटे काळे कुंकू लावायला आवडते. भारतातल्या ट्रीपमध्ये मी ही दोन्ही कुंकू गेल्यावर्षी आणली होती पण अगदी मोजून दोन वेळाच लावली. ती आता वाळूनही गेली असतील. टिकल्या लावल्या पण त्यातही मला जांभळ्या रंगाची टिकली मनात भरून राहिली होती. स्वेटर्समध्ये माझा एक लव्हेंडर रंगाचा व माझ्या बहिणीचा शाई रंगाचा स्वेटरही असाच मनात भरून राहिला आहे.बांगड्यांमध्ये मला काचेच्या बांगड्या मनापासून आवडतात त्यातही वर्ख लावलेल्याच आवडतात. लग्नानंतर सोन्याच्या बांगड्यांमध्ये या वर्ख लावलेल्या काचेच्या बांगड्या खूप उठून दिसायच्या. श्रावणात आईकडे गेले की ती नेहमी आम्हा दोघी बहिणींना बांगड्या भरत असे. त्यात मला गुलाबी रंगाच्या वर्ख लावलेल्या बांगड्या खूपच आवडून गेल्या होत्या. त्या मी बरेच दिवस जपूनही ठेवल्या होत्या.
लहानपणी आपण बरेच फ्रॉक घालतो, स्कर्ट घालतो, शर्ट पॅंट, पंजाबी ड्रेस घालतो व साड्याही नेसतो. या सर्वांमध्ये एक फ्रॉक माझ्या मनात भरून राहिलेला आहे. मोरपंखी आणि एक हिरव्या रंगाची वेगळीच शेड होती. असे दोनी रंग त्यामध्ये होते. त्यावरचे डिझाईन असे काही होते की अगदी निरखून बघितल्यावर इंग्रजी दुसऱ्या लिपीतले टी अक्षर त्या डिझाईनमध्ये सर्वत्र पसरलेले आहे असे दिसायचे. साड्यांमध्ये मोजक्या साड्या खूपच भरून राहिलेल्या आहेत. या सर्व साड्या आईच्याच आहेत. त्यात एक मरून रंगाची अमेरिकन जॉर्जेट होती, खूप पारदर्शक साडी, त्यावर असेच मोठे डिझाईन ते त्या साडीवर कोरल्यासारखे वाटायचे. विमलची गुलाबी रंगाची, बांधणीची लाल रंगाला हिरवे काठ असलेली साडी, शिवाय चाकलेटी रंगाची त्यावर मोठाली पिवळ्या रंगाची फुले असलेली साडी खूप भरून राहिल्या आहेत मनामध्ये. आईची एक प्युअरसिल्कची साडी मद्रासी रंगाची त्याचा तो मुलायम स्पर्श अजूनही आठवत आहे.पंजाबी ड्रेसमध्ये एक ड्रेस होता त्याचा रंग म्हणजे चाकलेटी, मोतीया व राखाडी रंग यांचे मिश्रण. हा ड्रेस तर इतका काही मनात भरला होता आणि खूप वापरला गेला. नुसता मी एकटीने वापरला नाही तर माझ्या बहिणीने व मामेबहिणीच्या मुलीनेही तो खूप वापरला. असाच अजून एक पॉलिएस्टरचा काळा पंजाबी ड्रेस ज्यावर डिझाईन म्हणजे पांढरे चौकोन, धुतला वाळत आणि वाळत घातला की १० मिनिटात वाळायचा. माझी आई खूप वेगवेगळ्या फॅशनचे ड्रेस घरीच शिवायची त्यात मॅक्सी नावाचा प्रकार होता. हा ड्रेसचा प्रकार असाच खूप मनात भरलेला. लांब केस असल्याने आई आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची, त्यात चार वेण्या हा प्रकार खूप मनात भरलेला आहे. जेव्हा आई आम्हां दोघी बहिणींच्या चार वेण्या घालायची तेव्हा आम्ही दोघी जाम खुशीत असायचो!


या अशा आठवणी आठवण्यापेक्षा ध्यानीमनी नसताना जेव्हा आठवतात की ज्या मनात खूप भरून राहिलेल्या आहेत त्या आपोआप वर येतात, त्यांना मुदाम आठवण्याची गरजच भासत नाही आणि जेव्हा त्या आठवतात त्याची मजा काही औरच! नाही का?

आणि ज्या काही मोजक्याच मनात काठोकाठ भरलेल्या आठवणी..... ज्या आठवल्या की ... ‍ज्याचे वर्णन म्हणजे अंगावरून हळूवार फिरवलेले मोराचे पीस... मनात उडालेले सुखाचे कारंजे, केवळ अवर्णनीय!मनात भरून राहिलेले घेऊन येईन पुन्हा कधीतरी!