Thursday, June 30, 2011

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख....











काल तळ्यावर गेले होते. बदके काय करत आहेत याचे निरिक्षण केले. काही जण तळ्यात पंख फडफड करीत अंघोळ करत होती. काही निवांतपणे झाडाखाली बसली होती. आज पहिल्यांदा मला बदकांची पिसे पहायला मिळाली. एक उंच मानेचे बदक कुठेतरी तंद्री लावून बसले होते. नेहमीची बदकीण व तिचे पिल्ले मात्र दिसली नाहीत.

Art Photography










Wednesday, June 22, 2011

अनामिका ...(4)



हॉस्पिटलमधून आल्यावर आत्याबाई बऱ्यापैकी स्थिरस्थावर होतात. त्यांचा मुलगा अनिल आत्याबाईंना रोजच्या रोज , औषधे वेळेवर घेत जा, रागीटपणा कमी कर असे बजावत असतो, कारण की आता यापुढे काही झाले तर डॉक्टर आपल्यालाच दोषी ठरवतील असे त्याला वाटत असते. डॉक्टर अनिलला सांगतात, तुमच्या आईला मोठा हार्ट ऍटॅक येऊन गेला आहे. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या, पण वेळेवर औषधपाणी, जेवणखाण याकडे आता तुम्हालाच लक्ष द्यायला हवे. आणि दुसरे म्हणजे त्यांना राग येईल, त्रास होईल असे काहीही होऊन देऊ नका म्हणजे मग काहीच काळजी नाही.









यापुढे आत्याबाईंना त्रास होईल, राग येईल असे काहीच घडणार नसते कारण की हॉस्पिटलमध्ये असतानाच आत्याबाईंनी त्यांच्या भावाकडून व मुलाकडून वचन घेतलेले असते आणि ते म्हणजे संजलीला या घरची सून करून घेण्याचे वचन. आत्याबाई हॉस्पिटलमध्ये असताना खूप विचार करतात आणि संजलीला लग्नाची मागणी घालण्याचे निश्चित करतात आणि तेव्हापासून त्यांच्या तब्येतील फरक पडायला लागतो. त्या विचार करतात की एक तर आपण या ऍटॅकमधून वाचलेले आहोत. आताच आपण काही हालचाल केली नाही तर एके दिवशी संजली व अमितच्या लग्नाची बातमी येईल. लक्ष्मी ज्या अर्थी एवढे सांगत होती त्याअर्थी त्यात काहीतरी तथ्य नक्किच असले पाहिजे. आणि संजली व अमितला मी कधीही एकत्र बघू शकत नाही. आजारपणाचे निमित्त करून वेळीसच झटपट हालचाली करायला हव्यात हे तर अगदी त्यांच्या मनानेच घेतलेले असते.







संजलीच्या आईवडिलांना हा लग्नाचा प्रस्ताव आत्याबाईंकडून अशा पद्धतीने येईल असे कधीच वाटलेले नसते. खरे तर अश्या प्रकारे लग्नाचा धक्काच त्यांना बसतो. आत्याबाईंचा भाऊ त्यांना समजावतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या संजलीला सून करून घेण्याचा हेकाच धरून बसतात. संजलीचे आईवडिल यावर विचार करतात आणि नंतर होकार कळवतात. एक तर या स्थळामध्ये काही खोट काढण्यासारखे नसते. वडिलोपार्जित गडगंज इस्टेट, मुलगाही स्वकर्तबगार असतो. रूपानेही चांगला असतो, फक्त त्यांना संजलीचे शिक्षण पूर्ण होऊन तिला तिचा जोडीदार कसा हवा हे विचारून संजलीचे लग्न करायचे असते. संजली तर हा लग्नाचा प्रस्ताव ऐकून खूप चिडते आणि म्हणते , मला तर आत्ता लग्नच करायचे नाही. मी खूप शिकणार आहे. मला प्रोफेसर व्हायचे आहे आणि जो मुलगा माझ्या आईवडिलांना सांभाळेल त्याच्याशीच मी लग्न करेन. असे ठामपणे सांगते. शेवटी संजलीला आईवडिल खूप प्रकारे समजावतात. आत्याबाईंची तब्येत, स्थळ म्हणून कसे चांगले आहे. शिवाय मुलगा पण काहीही न करता इस्टेटीत लोळणारा नाहीये, तुझे शिक्षणही नक्किच आत्याबाई पूर्ण करतील असा विश्वास तिला देतात. शिवाय हे पण समजावतात की आत्याबाईंचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी आमच्या संसारात काही प्रसंगी खूप मदत केली आहे.






अनिल या लग्नाला तयार असतो कारण की त्याच्यापुढे दुसरा पर्यायच उरत नाही. नकार कशासाठी देणार? संजली रुपाने खूप चांगली आहे शिवाय समजूतदार आहे. फक्त त्याला इतक्यात लग्न करायचे नसते. संजलीला सून करून घेण्याचा विचार आईच्या डोक्यात का आणि कसा आला याचा मात्र खूप विचार करूनही त्याला उत्तर सापडत नाही. तसा तो आईला ओळखून असतो. तिच्या मनात नक्की काहीतरी विचारचक्र चालू आहे पण ते कोणते आहे आणि या प्रकारचा लग्नाचा प्रस्ताव तिच्या मनात का आला आहे याचा मात्र त्याला थांगपत्ता लागत नाही. आपली आई हट्टी व रागीट आहे याबद्दलचे आईचे रूप अनिलने पूर्वीही बघितलेले असते पण एकीकडे ती किती कर्तबगार आहे याची जाणीवही असते. तिचा स्वभाव प्रेमळ आहे ती कुणाचे कधी वाईट अरणार नाही याची खात्रीही असते.









संजलीचे कॉलेजचे पुढचे वर्ष सुरू होण्याच्या आतच लग्न लावू असे आत्याबाईंचे मत असते. वार्षिक परीक्षाही नुकत्याच झालेल्या असतात. सुट्टीही चालू असते. आत्याबाईंच्या मतानुसार लग्नाच्या तयारीला सुरवात होते. १५ दिवसाच्या आत सर्व तयारी होणार असते कारण की लग्नाला योग्य असा चांगला मुहूर्तही येणाऱ्या काही दिवसातच असतो. संजली व तिच्या आईच्या आत्याबाईंकडे फेऱ्या सुरू होतात. कधी साडी खरेदी निमित्ताने, तर कधी रुखवतात काय ठेवायचे, देण्याघेण्याच्या साड्या खरेदी, कोणते कार्यालय, किती माणसे बोलवायची. हे आणि ते अशा बऱ्याच याद्या. आत्याबाईंना खूप उत्साह आलेला असतो. संजली तर त्यांना आवडत असतेच पण आता ती या घराची सून होणार म्हणून तिची सर्व हौसमौज पुरवण्याकरता तिला काय हवे काय नको अशी त्यांची विचारपूस सुरू होते. लग्नात घालण्याकरता तिच्या पसंतीचे दागिने, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, केळवणे या ना त्या प्रकारची सर्व धांदल, घाईगडबड सुरू होते. वाड्यातील सर्व नोकर मंडळी कामाला लागतात. लग्ना आधीच वाड्यावर लोंकाची ये जा, वर्दळ सुरू होऊन काही वेळेला अनिल संजलीला आत्याबाई मुद्दामहून कोणत्यातरी कामाला पाठवतात कारण की त्यानिमित्ताने त्यांनाही जरा गप्पा मारता येतील. लग्नाचे त्यांचे असे काही वेगळे ठरवायचे असेल तर तेही त्या दोघांना मनमोकळेपणाने ठरवता येईल. शिवाय गप्पांमधून लग्ना आधी एकमेकांची आवडनिवड कळेल .









लग्नाचा दिवस उजाडतो. पुण्यातले मोठे कार्यालय घेऊन खूपच दणक्यात लग्न पार पडते. संजलीला लग्नाच्या दिवशी खूप सजवतात. आत्याबाईंनी तिच्याकरता मरून रंगाचा शालू तिच्या आवडीने घेतलेला असतो. सोन्याच्या प्रत्येक दागिन्याने संजली सजते. सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडे, गोठ, वाकी, नथ, पोहेहार, नेकलेस, अंगठी, बिंदी, कानातले झुमके, मेखला, हिरवा चुडा भरून संजली गौरीहार पूजायला बसते. संजलीचा स्वभाव पण हौसमौज करून घेण्याचा असतो त्यामुळे तीही आनंदात असते. आपण इतक्यात लग्न करणार नव्हतो हे ती पार विसरून जाते. अनिलकडे आता ती तो आपला होणारा नवरा या नात्याने बघते. तसे तर आत्याबाईंचा हा भाऊ मानलेलाच असतो. खूप दूरच्या नात्यातला पण नोकरीनिमित्ताने पुण्यात राहिलेला असतो. पुण्यात असल्याने आत्याबाई व त्यांचे येणे जाणे असते. शिवाय त्याच्या संसारात आत्याबाईंनी वेळोवेळी मदतही केली असते. लग्नात प्रत्येक जण संजलीचे कौतुक करत असतो. शुभमंगल होते. लाजाहोम होतो आणि अनिल संजलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्र घातल्यावर तर संजलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. अनिलबरोबर संजलीचा वाड्यात गृहप्रवेश होतो.







दुसऱ्या दिवशी सत्यनारायण होतो आणि हळुहळू करत लग्नात जमलेली पाहुणे मंडळी त्यांच्या घरी जायला निघू लागतात. आता संजलीचे वेगळे दैनंदिन जीवन सुरू होते. घरामध्ये काम असे काही नसतेच. नोकरांना कामे सांगून ती करवून घेणे हेच एक मोठे काम असते पण हे काम पण आत्याबाई तिच्यावर लगेच सोपवत नाहीत. एके दिवशी अनिल संजलीला आत्याबाई त्यांच्या खोलीत बोलावून घेतात आणि सांगतात की तुम्ही दोघांनीही माझे ऐकलेत व लग्नाला होकार दिला. मी आता खूप खुशीत आहे. संजली तू तुझ्या आईवडिलांची मुळीच काळजी करू नकोस. माझे त्यांच्याकडे लक्ष आहे. आणि हो तुझे शिक्षणही तू पूर्ण कर. ती सर्व जबाबदारी माझी पण त्यानंतर मात्र मी वाड्याची सर्व जबाबदारी तुझ्यावर सोपवणार आहे आणि ती तू चांगल्या रितीने पार पाडशील अशी माझी खात्री आहे.


क्रमश:

Saturday, June 18, 2011

१८ जून २०११

उन्हाळा असल्याने लवकर जाग येते. सहाच्या सुमारास छान उजाडते. आमच्या बेडरूमच्या खिडकीबाहेरच एक झाड आहे तिथे पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. हे पक्षी काय काय गप्पा मारत असतात, एकमेकांना साद घालत असतात. मी त्यांच्या गप्पा टेप केलेल्या आहेत. हे पक्षी साधारण चार ते पाचच्या सुमारास जागे होतात आणि चिवचिवाट करतात.






आज जाग आली आणि खिडकीतून डोकावले तर फटफटले होते. उत्साह असला तर बाहेर जाते तळ्यावर आणि सूर्योदय पाहते. शिवाय बदकांना ब्रेडही घालते. आज बाहेर पडले तर थोडे आभाळ भरून आले होते, वाटले आज सूर्योदय पहायला मिळतोय की नाही कुणास ठाऊक. पण खूप छान सूर्योदय होता आज. आभाळामुळे आकाशात थोडे रंगही आले होते. सूर्योदयापूर्वीचा आकाशातील चंद्र पाहिला. बदकांना ब्रेड घातला. बदकीण आणि पिल्ले यांची दिवसभरात आमच्या अपार्टमेंटच्या समोरच्या हिरवळीवर बरेच वेळा चक्कर असते. फोटो घेतले.






आज पहिल्यांदा उपवासाचे सर्व पदार्थ बनवण्याचा मुहूर्त लागला. खरे तर अमेरिकेत राहिल्या आल्यापासून आमटी भगर, बटाट्याची भाजी वगैरे बनवण्याचा पहिल्यांदाच योग पहिल्यांदाच आला. तसे मी कालच ठरवले होते की आज उपवासाचा मेनू बनवायचाच. जसे की शनिवार रविवार बाहेर जेवणे नाहीतर इडली सांबार, डोसे असे काहीतरी वेगळे असतेच. पण आज उपवासाचा मेनू होता. आम्ही दोघे कोणतेही उपास करत नाही त्यामुळे केलेही जात नाही. उपवासाचे सर्व पदार्थ मात्र खूप आवडतात. भारतात असतानाही बाकीचे उपवास करायचो नाही कधी, फक्त आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र करायचो. उपवासाचे पदार्थही किती छान आहेत आपल्याकडे.






दुसरे म्हणजे आजकाल मी माझ्या आवडीची गाणी सीडी वर रेकॉर्ड करून डिव्हिडी प्लेअरवर ऐकते मनसोक्त. आज पदार्थ बनवताना एकीकडे गाणीही लावली होती. छान वाटले. जसे की मला स्वयंपाक करताना गाणी ऐकायला आवडतात तसेच सोफ्यावर किंवा पलंगावर पडून डोळे मिटून गाणी ऐकायलाही खूप आवडतात. आज मी एक छान पुस्तकही वाचायला घेतले आहे. बरेच वाचून झाले. मन खूप ताजेतवाने झाल्यासारखे वाटत आहे या पुस्तकामुळे. आज संध्याकाळ उलटल्यावर मी तळ्यावर परत एक चक्कर मारली. ही बदकीण व तिची पिल्ले कुठे झोपतात हे पाहिले. तळ्यावर चक्कर मारताना दिसली. एका खूप छोट्या झुडुपाखाली सगळी एकमेकांना चिकटून बसली होती. शांतपणे. ही बदकीण व तिची पिल्ले मला अजिबात घाबरत नाहीत. त्यांना माझी सवय झाली आहे.





आज रात्री स्वयंपाक नव्हताच. दुपारचे उरलेले गरम करून खाल्ले. जेवणानंतर ब्ल्युबेरी खाल्ली. आजचा दिवस खूपच वेगळा आणि छान गेला. खूप आनंद मिळाला आज मला.

Art Photography









Thursday, June 16, 2011

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ...(७)









आज तळ्यावर दुपारी गेले होते. खूप उन नव्हते, थोडे वारे वाहत होते. बदकीण व तिची पिल्ले एका छोट्या झाडाखाली झोपली होती. त्या पिल्लांच्या जवळ जाऊन बसले होते मी पण झाडाखाली. वारे असल्याने झाडाखाली खूप छान वाटते होते. थोडी सावली पण होती. बदक पिल्ले पेंगुळताना खूप छान दिसत होती. आज मस्त फोटोज मिळाले.