Friday, October 20, 2017

मी अनुभवलेली अमेरिका ... (7)

मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा आमच्या लग्नाला एक तप पूर्ण झाले होते. काही वर्षे नोकरी केली पण गृहीणी म्हणून माझी खरी ओळख आहे. स्वयंपाक नामक जी चीज असते ती मी इथे अनुभवताना माझी सुरवातीला खूप चिडचिड झाली. इथे आल्यावर इलेक्ट्रीक शेगड्या बघितल्यावर माझे डोकेच फिरले. मला गॅसवर स्वयंपाक करायला खूप आवडतो. दुधं तापवायची सवय होती त्यामुळे मी कॅनमधले दूध आधी पातेल्यात ओतले आणि तापत ठेवले. गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवले. साय विरजण्यासाठी दुपारी दुध बाहेर काढले पण सायीचा थर काही दिसेना. अगदी थोडासा पातळ पापुद्रा पसरला होता दुधावर. ४ पर्सेंट फॅटवाल्या दुधावर कशी काय साय धरणार? मला वारणा आणि गोकुळ दुधाची सवय होती. दाट दूध. चहामध्ये अगदी थोडे घातले तरी पुरते. तिथल्या आणि इथल्या चहाची धुंदी वेगवेगळी. इथल्या चहाची धुंदी मला कधी आलीच नाही. पारंपारिक चहा करण्याची सवय इथे पार मोडून गेली. दुपारी मी चहाच्या ऐवजी कोक प्यायला लागले. सुरवातीला टी-बॅग्ज कापून त्यातली चहाची भुकटी घालून चहा बनवायचे. नंतर एका मैत्रिणीकडून कळाले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा बनवता येतो. तसे करून बघितले आणि दुध पाणी आणि चहाचे प्रमाण ठरवून ते निश्चित केले आणि पारंपारिक चहा बनवण्याच्या पद्धतीला काट मारून टाकली. एकतर इलेक्ट्रिक शेगड्या पटकन तापत नाहीत. त्यामुळे
चहा बनवताना आच तीव्र ठेवायला लागायची त्यामुळे चहाच्या पातेल्याची बुडे काळी पडायला लागली आणि मग ती घासून घासून कंबरडेमोडायला लागले. जाड साय नाही म्हणजे सायीचे दही नाही, लोणी नाही. घरचे कढवलेले तूपही नाही. ही सर्व कामे इथे आल्यावर बाद झाली. 

सुरवातीला मी दही भारतासारखेच घरी बनवायचे. दही लावण्याकरता विरजण मी प्रविणा कडून आणले होते. प्रविणा माझ्यासारखीच दही-दूध प्रेमी बघून मला खुप आनंद झाला होता. नंतर दह्याचे डबे आणू लागलो. अर्थात घरचे दही ते घरचे दही. भारतात असताना उसने मी कधी घेतले नव्हते कुणाकडून पण अगदी क्वचित वेळ आलीच आणि शेजारणीकडे मागितले तर नेमके ते त्यावेळी तिच्याकडे नसायचेच. इथे आल्यावर प्रविणा माझ्याकडून उसने घ्यायची. कांदा, बटाटा वगैरे. उसने घेणे आणि ते आठवणीने परत करणे हाही प्रकार बाद झाला इथे आल्यावर. उरलेल्या अन्नाचे काय करायचे? इथे कामवाल्या बायका येत नसल्यानेते कधीतरी त्यांना क्वचित देण्याचाही प्रकार घडला नाही. तसे तर लग्न झाल्यावर मुंबई मध्ये आल्यावर आणि दोघंच दोघे असल्यावर
जेव्हढ्याच तेवढे बनवण्याची सवय असल्याने उरलेल्या अन्नाचे काय करायचे याचा फारसा त्रास झाला नाही. आपण बनवलेला पदार्थमैत्रिणीच्या घरी वाडग्यातून नेवून देणे आणि तिच्याकडला वाडग्यातून आलेला पदार्थ आपणही चवीने खाणे हे मात्र मी खूप छान अनुभवले इथे. आमच्या तिघींचा ग्रुप होता. माझ्याकडून काय येतयं याची वाट बघायच्या मैत्रिणी. त्यांच्याकडूनही रसम, सांबारंम, लेमन राईस आणि पुलीहोरा असे वेगवेगळे पदार्थ माहीती झाले. आपल्याकडची साबुदाणा खिचडी, बटाटेवडे यांची चवही त्यांना आवडली. हळूहळू काळ जसा पुढेपुढे सरकत गेला तसतसे सर्वच्या सर्व कामे आपली आपणच करायची सवय लागून गेली.

भारतातल्या सगळ्या सवयी मोडून गेल्या. जसे की....

-दुधासाठी पिशवी दारात अडकवली की त्यात दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात.
-दार उघडले की पेपर दारातच असतो.
- केराचा डबा बाहेर ठेवलेला असतो तो कचराही केरवाला घेऊन गेलेला असतो.
-कामवाली बाई आली की धुणे, भांडी, केर, फरशी पुसणे
तीच करते. सर्व प्रकारची दळणे आणून देते.

No comments: