Friday, May 22, 2009

पक्षी
Thursday, May 14, 2009

तीर्थस्वरूप मामा


मामा! हो, आनंदमय मूर्ती, माझे वडिल. देखणे व्यक्तिमत्त्व, गौरवर्ण, सुवर्णकांती, विशाल भाल, हासरे निळेशार घारे डोळे. पाहिल्यावर कोणालाही आदरयुक्त आपुलकी वाटावी. लहान मुलांवर तर फार प्रेम. श्रीकृष्णाने घाबरलेल्या दिग्मुढ अर्जुनाला रथारूठ असताना रणांगणात गीता सांगितली, तशी या बालकृष्णाने संसारात राहून, गीता आत्मसात करून, पदोपदी मला ती अनुभवायला लावली. सर्व काही कृष्णार्पण करावे, आपल्याकडे कोणत्याही कर्माचा कर्तेपणा घेऊ नये हे सांगितले. संसारात राहून, तीर्थातील बिल्वपत्राप्रमाणे त्यातील एक सुद्धा दव बिंदू त्यांनी आपल्या अंगास लागू दिला नाही. "ही सर्व तुझी इच्छा " असे म्हणत ते वागले.

बालपणी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांची आई कैलासवासी झाली आणि मामा पोरके म्हणून लोकांकडून उपेक्षाच झाली. कित्येकदा मामा देवळात जाऊन बसत. कधी नदीकाठी तर कधी कृष्णेकाठी वाळवंटात वेळ काढत. स्मशानातील एकांताचा त्यांना खूप सहवास घडला. निर्सगात ते बरेच रमत. निसर्गातील परमेश्वर त्यांना पूर्ण दिसला होता. त्याने मात्र मामांची कधीच उपेक्षा केली नाही. निसर्गाने त्यांना आनंद दिला, प्रेम दिले व दुसऱ्यावर निर्व्याज प्रेम करायला शिकविले. प्रेम वाटत जावे, दिल्याने दुप्पट होते. त्यांना प्रेम करणे माहीत, परतफेडीची अपेक्षा त्यांनी कधीच केली नाही. उन्हाळ्यात सायंकाळी घाटावर बसावे, तर थंडीत उबेसाठी प्रेताजवळ शेकावे. कुणाकडे काहीही मागू नये, अगर त्रास देण्यांस कुणाकडे जाऊ नये, हे त्यांचे व्रत. याला अपवाद त्यांची ताई (माझी आत्या पोंक्षे) तिच्याकडे मात्र ते आई म्हणून जात. तिच्या सहवासातच त्यांनी बालपणातून तारुण्यात पदार्पण केले. अर्थात दारिद्र, दुःख व अपमान याची त्यांना साथ होतीच. देवही त्यांना दुःखात टाकीत होता. कुंतीप्रमाणे त्यांनी ईश्वराकडे संकटे मागितली पण त्यातून सुटण्याचा मार्ग दाखव, तुझी आठवण असू देत असे सुचविले.

सन १९५७ मे, २ तारखेस माझे लग्न झाले. ती. आईचे निधनानंतर म्हणजे सन १९३६ नंतर पुन्हा आम्ही (मी, सौ निर्मला
चि. मदन, व ती. मामा) आगाशे वाडा २१५/१ शनवार मध्ये संसार थाटला. काल परवापर्यंत मामा आमच्यात वावरत होते. आतां वार्धक्याने त्यांचे शरीर थकले होते. अवयव हळूहळू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात होते. तरी मन आनंदी, सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व दैनंदिन कार्यक्रम अति उत्साहाने आमच्याकडून करून घेत. अजातशत्रू असल्याने कोणाशीही वैरभाव नाही. त्यांच्या वर सर्वांचेच प्रेम होते. ते चैतन्य आज दि. २०/७/१९८० रोजी पहाटे २.४५ वाजता पाहता पाहता अनंतात विलीन झाले. आकाशातून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले.

मामांची सेवा माझ्यापेक्षा कितीतरी अधिक आणि मनापासून कुणी केली असेल तर ती सौ निर्मलाने केली. खरोखरीच मामांच्या आईची भूमिका तीने पूर्णपणे बजावली. अलीकडेच म्हणजे तरी पाच वर्षापासून मामांना स्वतःस आंघोळ करता येत नसे. हीने रोज त्यांच्या अंगास साबण लावून आंघोळ घालण्यापासून तो त्यांना भात भरविण्यापर्यंत सर्व काही आस्थेने केले. आम्हां सर्वांनाच त्याची पदोपदी त्यांची आठवण येत आहे. जाताना आमच्याकडे (मी, सौ निर्मला, चि. रोहिणी, चि. रंजना व चि. सुहास देवधर) पाहून मामांनी त्यांची सर्व पुण्य आम्हाला वाटून दिले. चि. सुहास देवधर वर तर त्यांचे नातवाप्रमाणे प्रेम होते, आणि अगदी शेवटी तोच त्यांच्या जवळ होता. त्यांच्या आत्म्याला सतगदी मिळालीच आहे. आता ते नाशिकला पंचवटीत रामपदी स्थिरावले आहेत. आता विष्णुपुरीत त्यांचे वास्तव्य राहील.

सौ निर्मलावर त्यांचा पूर्ण विश्वास. "मामा! अजून एक पोळी घ्यायची आहे. नंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक भात (भातवाढीने एकदा वाढला की जेवढा होतो त्याला ते एक भात म्हणत. ) वाढीन., " असे हीने म्हणले की त्यावर "असं म्हणतेस? बरं मग वाढ एक पोळी, " असे म्हणत व भात घेत. सकाळी उठल्यावर तोंड धुवून ते एक फुलपात्र दुध घेत. पुढे पुढे त्यांना डोळ्याने दिसत नसे. त्यांनी रोहिणी, रंजनाकडून एका कागदावर देवाची नावे लिहून घेतली होती. तो कागद त्यांच्या खिशात असे. मामा सकाळी उठल्यावर रंजना रोहिणीस जवळ बोलवत व कागदावरील नावे वाचावयास सांगत, त्या त्या वेळी हात जोडून नमस्कार करीत. रंजना, रोहिणी बरोबर ९.४५ सकाळी जेवत व दुपारी ३ पर्यंत झोप घेत.


एका अरब कंपनीत नोकरी करण्याचे ठरवून ते मुंबईत दाखल झाले व बोटीने आफ्रीकेत गेले. बोटीचा पंधरा दिवसाचा प्रवास. एका डायरी त्यांनी त्रोटक माहिती लिहून ठेवली होती. बोटीवर एका अरब पठाणांशी मामांची दोस्ती झाली. मामा पण त्या अरबा सारखेच गोरे, लालबुंद व प्रकृतीने सणसणीत होते. रोज सायंकाळी मामा डेकवर जात. तो अरबही डेकवर येत असे. सुर्यास्ताच्या वेळी संपूर्ण आकाश व ढ लालबुंद असे. डेकवर खूप वारा असे. त्या रम्य वातावरणात त्यांच्या गप्पा रंगत. असाच एक दिवस तो मामांना म्हणाला, " देखो बेटा, ये ध्यानमें रख. ये दुनियामे दिस किसीको देना नही, दिलसे देना दिल, अगर सच्च्या दिल नही मिला तो नही मिला, फिर कम दिलसे मत मिल, जो दिलवाला है, उसे दिल देना" हे जाणून मामांनी कुचक्या मनोवृत्तीच्या लोकांशी कायमचे संबंध तोडले होते.


श्री शंकरावर मामांचे निस्सीम प्रेम आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात मी आलो. नाव निळकंठ आणि स्वभाव तसाच. डोळ्यातून दोनच भावना दिसणार. एक प्रेमाचा गहिवर नाहीतर अंगार. अश्रू वाहणार नाहीतर अग्नीकुंडातील ज्वाला व ठिणग्या. एक उत्तर ध्रुव माहीत नाही तर दक्षिण ध्रुव. दोन ध्रुवांमध्ये सृष्टी परसलेली आहे, निसर्ग आहे, सौंदर्य आहे या कशाचीच पर्वा नाही. हिमालयातील कैलास शिखर माहिती, नाहीतर स्मशानातील चिताभस्म लावून जगाकडे तोंड फिरवून शून्यात दृष्टी लावून बसणे माहिती. मामा स्वतः बाळकृष्ण- विष्णू आणि भक्ती शंकरावर आणि म्हणून मी कसाही बोललो तर त्यांना राग येत नसे.


मामांची शंकरावर केव्हापासून भक्ती जडली ते त्यांनी कधी सांगितले नाही, पण लहानपणीच्या उपेक्षेमुळे त्यांना शंकर भक्ती, विरक्ती आवडली असावी. ते नेहमी कामावर असताना, आंघोळ केल्यावर मातीची साळुंका करून त्याची पुजा बेलाची पाने वाहून करीत व नंतर कॅनॉलचे पाण्यात त्याचे विसर्जन करीत. ते पि. डब्ल्यु. डी मध्ये इरीगेशन वर कामावर लागले. प्रथम प्रथम कॅनॉलवरील कॉजवेची दुरूस्ती, मैलाचे दगडांची मांडणी व अशीच लहान कामे त्यांच्याकडे आली होती. एकूण सर्वच नोकरी निसर्गाच्या सान्निध्यात गेली. पुढे मामांनी एक चांदीची डबी करून त्यात शंकराची साळूंका ठेवली. दुसऱ्या एका डबीत बेल असे. १२ वाजता दुपारी कामावर कॅनॉलमध्ये डुबी मारून, ओलेत्याने शंकराला बेल वाहून नमस्कार करीत.

मामांची निरा राईट बँक कॅनॉलवर बदली झाली. निरेपासून पूर्वेस अर्ध्या मैलावर पी. डब्ल्यु. डी चा पिंपरा बंगला होता. तेथील तार मास्तर दंडवते त्यांच्याशी मामांची मैत्री जमली. निरा स्टेशनसमोर पी. डब्ल्यू डी च्या क्वार्टर्स होत्या. त्याच्या जवळच एका झोपडीवजा केमळाच्या घरात आम्ही राहत होतो. घर केमळाचे, कुडाच्या भिंती, वर पत्रा. घरासमोर अंगण, स्वच्छ सारवलेल्या जमिनी, अंगणासमोर एक खूप मोठे कडूनिंबाचे झाड होते. कडूलिंबावर सकाळी, सायंकाळी मोर येऊन बसायचे. जमिनीवरून झाडावर जाताना पिसाऱ्याचा झपाटा मागे लोंबत असे. आजुबाजूला खूपच झाडी होती. घरामागील टेकडीवरून काळ्या तोंडाची, लांब शेपटीची वांदरे नेहमीच झाडावर येत. पत्र्यावर उड्या मारत. आमच्या हातातील हरबरा, कणसे न्यायला ती कमी करीत नसत. असाच एकदा मदन उघडा बाहेर अंगणात रांगत असता एका हुप्याने त्याचा रट्टा धरून त्याला अलगद पत्र्यावर नेले. मामा व आई दोघेही घाबरले. त्यांनी त्या वानरास शेंगाचे आमिश दाखवून मोठ्या युक्तीने मदनला खाली आणले.


मला माझी आई आठवते. नऊवारी पातळ नेसायची. कपाळावर चंद्रकोर असे. कानात कुड्या मोत्याच्या, बुगडी, ठुशी होती. मी पाच वर्षाचा असेन. हातात पाटी घेऊन, आईचा हात धरून मी कॅनॉलच्या पाटावरून पलीकडे असलेल्या पत्र्याच्या शाळेत जायचो. मी लहानपणी रूप रडायचो. आईला सोडत नसे. आई गेल्याचा प्रसंग आठवतो. मला व मदनला उचलून शेजारी राहत असलेल्या काळे यांच्या घरात नेऊन ठेवले होते आणि आश्चर्य असे की आज काही तरी निराळे झाले आहे, आणि आता रडायचे नाही हे मनोमनी समजले. त्यानंतर आई दिसलीच नाही. आठवणीत मात्र चांगलीच राहिली व तीनेच आम्हाला दुसरी आई दिली. ती माझी नथुमावशी. मी तिलाही आईच म्हणे. आठवू लागले तसा मी पुण्यात मावशीकडे आलो. शाळेत जाऊ लागलो. मामा सांगत असत की , "आयुष्यात मी फक्त दोन वेळाच गहिवरलो. एक तुझी आई गेलू तेव्हा व मग पुढे मुंबईस तुझी बहीण चि. नलिनी गेली तेव्हा. " बाकी सर्व दुःखे मामांनी पचवलेली आहेत. त्यास मोठ्या धैर्याने तोंड दिले. आईच्या निधनानंतर मात्र मामांना पूर्ण वैराग्य आले.


निरेच्या डाक बंगल्यात तार मस्तर श्री दंडवते राहत. तिथेच मामा आईच्या निधनानंतर राहिले. मास्तर स्वयंपाक करीत असत. माका कॉफी घेत व मास्तर चहा घेत. दोघांची गाढ मैत्री होती. मास्तरांना दोन मुली. दोघींची लग्ने झाली होती. इंदुमती व सुमन. सुमन देशपांडे यांच्याकडे दिली होती. अर्धवट संसार टाकून मास्तरांची बायको देवाघरी गेली, पण मास्तरांनी दोनही मुलींचा चांगला संभाळ केला. दुसरे लग्न केले नाही. मामांचीही परिस्थिती तशीच होती. दोन समदुःखी मने जवळ आली होती.

गोवईकर चाळीत मामा रात्री माळ्यावर झोपत. रात्री ते सतार वाजवत असत. जून महिना आठवतो. मृगाचा घनदाट पाऊस कोसळत असे. पत्र्यावर त्या पाण्याचा ताल वाजत राही. मामा सतारीत रंगलेले असत. गादीवर पडल्या पडल्या मी श्री गो. ग. लिमये यांचे "प्रतापगडचे युद्ध " हे पुस्तक वाचत असे. वाचता वाचता केव्हा झोप लागे कळत नसे. सकाळी उठून पाहावे तो मामा केव्हाच उठून हडपसरला गेलेले असत. मामांना वाचनाचा नाद होता. पुणे नगर वाचनाचे ते वीस वर्षे मेंबर होते. पुरानंतर आम्ही १९५४ सदाशिव, साने बंगल्यात राहत होतो पेन्शन घेतली होती. जेवणानंतर ते वाचनालयात जात व सायंकाळी ४.३० च्या सुमारास येत.

निरेला असताना आषाढीचे वारीस जाणाऱ्या वारकऱ्यांचा निरा लोणंद येथे दोन दिवस मुक्काम असे. त्यावेळी दोनचार वारकऱ्यांना मामा घरी घेऊन येत अ जेवावयास घालीत. असेच एकदा, एका वारकऱ्याने आपल्या पोतडीतून एक सांब शंकराची साळुंका काढून मामांना दिली. पुजेत ठेऊन त्यांची पुजा करीत जा असे सांगितले. मामांनी त्याला एक चांदीची डबी केली व त्यावर फणा काढलेला चांदीचा नाग करवून घेतला. तो त्यांच्या पुजेत असे. पुढे आईच्या निधनानंतर मला व मन्याला सौ मनुमावशी सोलापुरला घेऊन गेली व चि. बेबीस सौ आक्का मावशीने इचलकरंजीला नेले. थोडे दिवसानंतर मी व मदन सौ मथुमावशीकडे पुण्यास आलो. ती. भास्कर मामाने आम्हास पुण्यास आणले.


पाचसहा वर्षाखाली मामा मला अधुनमधून म्हणायचे , " हे बघ, आता मला घरी राहवयाचे नाही. मला तू कुठंतरी पोहचव. त्यावर मी म्हणे, " मामा तुम्हाला मदनकडे जायचे आहे का? त्यावर ते म्हणायचे, " त्याच्याकडे मला बिलकुल जावयाचे नाही. त्याचे नाव सुद्धा काढू न्कोअस. अस म्हणत. मी म्हणे , " मग माला कुठं जावयाचे आहे तुम्हाला? " हे पहा, मला एखाद्या देवळात नेऊन सोड. मी तेथे राहीन. माझा कुणालाच त्रास नको. त्यावर मामा, आजकाल तशी देवळे तरी कुठे राहिली आहेत? त्या वास्तुकडे कोणीही पाहत नाही. देवाची पुजा व्हायची अगर सांजवात लावायची मारामार. तुम्ही तिथे काय करणार? इथे नाही का बरे वाटत? असे मी म्हणायचो. परंतु त्या निष्पाप जीवाला आपले देवच रक्षण करील, तो माणसासारखा खास निष्ठूर नाही, असे वाटत असावे. या जगाचा व जगातील खोट्या मायेचा त्यांना उबग आला होता हे खचित. मन्या त्यांना दुरावला होता व माझ्याकडे घरामुळे झालेल्या त्रासाचा त्यांना मनोमनी वीट आला होता. पण मी तरी काय करणार? होऊ नय ती मोठी चूक माझ्या हातून झाली होती, व त्याचा परिणाम मात्र सौ निर्मला, रोहिणी, व रंजना यांच्याबरोबर मामांना नक्कीच होत होता. वय झाले होते म्हणण्यापेक्षा माझ्यावरील आलेल्या संकटाने मामांचे मन दडपले गेले होते. घरातील एकूण त्रासामुळे ते वैतागले होते. त्या सर्वांचे कारण मी होतो, फक्त मीच.

एकदा अशीच रात्रीची वेळ होती. काही वादविवाद झाले असतील. मामा म्हणाले " मी हा जातो घरातून निघून. " मी ही त्यांना म्हणालो " जाता? जा! दार उघडेच आहे. पण नीट विचार करून जा. त्यावर ते धडपडत (कारण अलीकडे त्यांना कमी दिसत असे. चष्म्याने सुद्धा दिसत नसे. अंदाजाने ते घरात वावरत) पलंगाच्या कडेकडेने दाराजवळ गेले. एक पायरी उतरलेही. डाव्या हाताने जाईच्या वेलीची फांदी धरली होती. थोडे थांबले. लांब नजर टाकी उभे राहिले व परत मागे फिरले. मी म्हणालो " मामा! जाताना? मग परत फिरलातसे? " तेव्हा एक पाय खोलीत टाकून हळूच म्हणाले " फार अंधार आहे बाहेर. उद्या सकाळीच जाईन. त्यावर मी म्हणलं " अहो मामा, ज्याला जावयाचे आहे ना, त्याला रात्र काय अन दिवस काय" त्यावर तेही हसले व आम्हीही हसलो.


पण अखेर त्यांनी आपले शब्द खरे केले. पहाटे २.४५ वाजता अंधारातच त्यांची प्राणज्योत आम्हांस सोडून घरबाहेर गेली आणि जड शरीर मात्र, दुपारी स्वच्छ उन्हात आम्हाला एकाकी इथे टाकून गेलं या जगात न येण्याकरितां!


लेखक : श्री निळकंठ बाळकृष्ण घाटे (माझे वडिल)