Tuesday, December 29, 2015

आज इथं तर उद्या तिथं ! ... ( 8 )

क्लेम्सनमधून बाहेर पडल्यावर काही वेळाने ८५ महामार्गावर जाण्यासाठी ग्रीनवीलची एक मोठीच्या मोठी वेटोळी एक्झीट घ्यावी लागते. ही एक्झीट लक्षात राहिली याचे कारण इथे अमेरिकेत आल्यावर पहिलावहिला लांब पल्य्यचा प्रवास जेव्हा केला होता तेव्हा या भल्यामोठ्या वेटोळ्या एक्झीटवरून जाताना मी तर चक्क श्वास रोखून धरला होता !




त्या आधीचा एक रस्ता होता त्याचा उजव्या बाजुने एक वळण घेतले तेव्हा मी मागे वळून पाहिले आणि मनात म्हणाले "आता इथे परते येणे नाही" एक्झीट घेताना सुद्धा जाणवत होते की एक्झीट घेतोय ती आता शेवटची ! मन खूप भरून आले होते. कारमध्ये आम्ही दोघे पुढच्या सीटवर होतो. माझ्या पायाशी काही सामान होते. तर मागच्या सीटवर डेस्कटॉप आणि छोटा टीव्ही होता. त्याला आधार देण्यासाठी उश्या लावल्या होत्या.





हे सर्व सामान लावायला आम्हाला पूर्णिमाने मदत केली.  कारमध्ये सामान व्यवस्थित ठेवल्यावर आम्ही परत घरात आलो. रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. पूर्णिमेला आम्ही आमच्या फ्रीजमधले दूध व ज्युस दिले. ती म्हणाली, मी तुमच्याकरता कॉफी बनवते. रिकाम्या खोलीत आम्ही मांडी घालून बसलो. पूर्णिमाने आमच्या तिघांकरता कॉफी बनवली. ती प्यायली आणि मी कप विसळायला उठले तर मला एकदम हुंदकाच फूटला.  पूर्णिमेलाही रडू फुटले. आम्ही दोघीही रडलो. पूर्णिमा म्हणाली "बहूतही अच्छे दिन थे ना इधरके ! हम वो कभी नही भूलेंगे ! पूर्णिमा व अभिरामी या दोन्ही विद्यार्थिनी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावार रहायच्या. मी त्यांना बरेच वेळा बटाटेवडे, समोसे, साबुदाणा खिचडी द्यायचे. त्याही मला त्यांचे रसम आणि सांबार द्यायच्या.  तिथे राहत असताना आम्ही आमच्या कारमधून त्या दोघींना ग्रोसरीकरता न्यायचो. शुक्रवार ठरलेला. रात्रीची जेवणे करून ग्रोसरीला निघायचो.




आमचे विल्मिंग्टनला जायचे निश्चित झाल्यावर मी सामानाची बांधाबांध करायला सुरवात केली. मूव्हींगचा आधीचा अनुभव कामी आला ! एकेक करत १० ते १२ खोकी तयार झाली. त्या सर्व खोक्यांना चिकटपट्या चिकटवून त्यावर नवीन अपार्टमेंटचा पत्ता व फोन नं लिहिला. अपार्टमेंट बुक करतानाच तिथल्या ऑफीसमध्ये विचारून ठेवले होते. अमुक एका दिवशी आमचे सामान येईल ते तुमच्या ऑफीसमध्ये ठेवले तर चालेल का? त्यांनी लगेचच होकार दिला. इंडियातून आणलेल्या भल्या मोठ्या ४ बगा, त्यात सामान कडेकोट भरलेले ! शिवाय १० ते १२ खोकी एकेक करत ४ ते ५ चकरा कारने झाल्या.  जड खोकी विनायकने उचलून  कारमध्ये घालायची व ती युएस पीएस मध्ये नेऊन द्यायची. असा काही वेळ आमचा कार्यक्रम पार पडला. निरानिपटीने घर आवरले होते. प्रत्येक खोक्यामध्ये एकाच प्रकारचे सामान ठेवले होते.
म्हणजे एका खोक्यात स्वयंपाकाची भांडी, तर एका खोक्यात पुस्तके, तर एका खोक्यात सटरफटर सामान. जरूरीपुरते सामान मात्र आधीच वेगळे करून त्याची एक बॅग आम्ही आमच्या बरोबर घेणार होतो. टुथपेस्ट, ब्रश, कंगवे, घरात घालायचे व बाहेर घालायचे २ ४ कपडे, पेपर टॉवेल, टिशू पेपर, साखर, चहा, २ -४  चहा प्यायचे कप, पाणी पिण्याची भांडी, थोडी कणीक, तांदुळ, मिसळणाचा डबा, इ. इ. म्हणजे काही कारणाने आमच्या सामान आमच्या आधी पोहोचले नाही तर पंचाइत व्हायला नको ! निघायच्या आधीच घर रिकामे झाले होते. जरुरीपुरते सामान, डेस्क टॉप, लॅडलाईन फोन, टिल्लू टीव्ही इतकेच सामान खोलीत उरले होते. त्यादिवशी रात्री आम्ही पूर्णिमा अभिरामीकडे जेवलो. फ्रीजमधल्या उरलेल्या काही भाज्या त्यांना दिल्या. त्यांच्याकडे जेवून घरी आल्यावर झोपलो. झोप नीट लागली नाही कारण सामानाची बांधाबांध करून आणि अपार्टमेंटची स्वच्छता करून खूपच दमायला झाले होते.




क्लेम्सन मधले घर जरी लहान असले म्हणजे एकच खोली (स्टुडिओ अपार्टमेंट) तरी बाकीच्या दृष्टीने क्लेम्सनचे दिवस खूपच छान गेले होते. मी ३ ते ४ नोकऱ्या केल्या, मित्रमंडळ जमा झाले होते. एकत्र जेवणे होत होती. त्यामुळे हे सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला मन तयार नव्हते. अर्थात पोस्ट डॉक पर्व संपणार होते ते एका अर्थाने चांगलेच होते. एच १ च्या कॅप मध्ये वेळीसच गेलो होतो. माझा मात्र एच ४ व्हिसा झाल्याने मला नोकरी करता येणार नव्हती. आधीच्या विसावर वर्क परमिट काढल्याने मला नोकरी करता आली. वेगळा अनुभव मिळाला होता. नवीन शहरात मिळालेले अपार्टमेंट   छानच होते. २ बेडरून अपार्टमेंट, भरपूर सूर्यप्रकाश, समोरासमोर दारे, सिलींग फॅन होते. त्यामुळे नव्या जागेत जागेत जायला आम्ही दोघेही उत्सुक होतोच. शिवाय नोकरी निमित्ताने जाणार होतो आणि नवीन घरात नवीन फर्निचरही घेणार होतो. आत्तापर्यंतच्या साडे तीन वर्षात  आम्ही आमचे असे फर्निचर घेतले नव्हते. आधीच्या मूव्हींग मध्ये विमाना प्रवास होता तर या मूव्हींगमध्ये  आम्ही आमच्या कारने जाणार होतो ! प्रत्येक मूव्हींग वेगळ्या प्रकारचे असते, नाही का? 





दमणूक आणि मनातले विचार याने झोप काही लागत नव्हती. शेवटी बऱ्याच वेळाने लागली. सकाळी उठवत नव्हते पण उठायला तर हवेच ना ! उठून अंघोळी पांघोळी उरकल्या. वास्तूला नमस्कार केला आणि मनात म्हणाले "खूप छान गेले इथले दिवस" राजेश प्राचीने आम्हाला सकाळच्या न्याहरीला बोलावले होते. प्राचीने गरम गरम सँडविचेस बनवली होती. ती खाल्ली आणि त्यावर आलं घातलेला चहाही प्यायलो. त्यांचा निरोप घेतला व परत घरी आलो. कारमध्ये सामान ठेवलेले होतेच. पूर्णिमेचा निरोप घेतला आणि तिला आमच्या अपार्टमेंटची चावी दिली आणि ती ऑफीसमध्ये नेऊन दे असेही सांगितले. विनायकने कार सुरू केली आणि तिला टाटा बाय बाय करत हळूहळू कार रस्त्याला लागलीही! कारमध्ये बसण्या आधी परत एकदा खिडकीतून घराला बघून घेतले. हे घर कायमचे सोडून जात आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली.





त्या दिवशी निघताना भरपूर थंडी होती !  प्रवासात मधल्या वाटेत विश्रांती थांबा होता. तिथे थांबलो. प्रचंड थंडीमुळे बाहेर बाकावर बसून जेवता आले नाही. त्यामुळे कारमध्ये बसूनच पोळी भाजी खाल्ली. पाण्याची बाटली होतीच त्यामुळे बरे झाले ! साधारण संध्याकाळच्या सुमारास विल्मिंग्टनला येऊन पोहोचलो. एका मित्राच्या घरी आलो आणि तिथूनच सकाळी उठून आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. अपार्टमेंट वरच्या मजल्यावर होते. आमचे सामान आदल्या दिवशी येऊन पोहोचले होते ! सर्व खोकी, बॅगा, डेस्क टॉप, टिव्ही, एकेक करत आमच्या अपार्टमेंटमध्ये विनायकने व त्याच्या मित्राने वाहून आणले. मी बाकीच्या छोट्या बॅगा आणल्या. सकाळी सकाळीच जिना चढण्या उतरण्याचा भरपूर व्यायाम झाला. सामान उचलून उचलून अंगदुखीमध्ये आणखी भर पडली. नंतर विनायकने दूध आणले.


चहा प्यायल्यावर जरा थोडे बरे वाटले. हॉलमध्ये सर्व सामान होते. थोडावेळ जरा आडवे झालो आणि मग नंतर जवळच असलेल्या पिझ्झा हटमध्ये जेवण करून आलो. एकेक करून परत खोक्यांवर चिकटवलेल्या चिकटपट्या काढल्या आणि सामान काढले. स्वयंपाक घरातले सामान पटापट लावून घेतले. रिकाम्या जागेत परत एकदा नव्याने संसार मांडायला सुरवात झाली !!


क्रमश : .....

Friday, December 25, 2015

२५ डिसेंबर २०१५

आजचा दिवस नाताळचा, सुट्टीचा. आम्हाला दोघांनाही सुट्टी होती त्यामुळे ग्रीनवीलला जायचे ठरवले. मुख्य म्हणजे काल मला कामावर अर्धा दिवसच जायचे होते त्यामुळे दीड दिवसाची सुट्टी मस्तच गेली. काल विला सुट्टी होती त्यामुळे तो मला आणायला आणि न्यायलाही आला होता.

 काल कामावरच्या काही बायका नटून थटून आल्या होत्या. कामाचा कोणाचाही मूड नव्हता तरी काम हे करावेच लागते. विकीने मला एक छान गिफ्ट दिली.  गिफ्टमधले दिलेले कानातले घालून आज ग्रीनविलला गेलो. तिथे थाळी घेतली. काल आणि आज दिवसभर खूपच ढ्गाळ हवा आणि अधुनमधून थोडा थोडा पाऊस पडत होता. कालच्या अर्ध्या दिवसाच्या कामानंतरही थेट मेक्सिकन उपहारगृहात जेवण केले आणि आल्यावर आराम केला.  आराम केल्यामुळेच कालचा आजचा दिवस  जास्त छान गेला असे वाटते.


 दीड दिवसाच्या सुट्टीत बाहेरच जेवण, इंडियन भाज्या  घेणे झाले आणि हवाही खूप स्वच्छ आणि सुंदर नसली तरी छान वाटत होते. थंडीचे मात्र नाव नाहीये. खूप गरम होत आहे. उद्या कामावर जायचा खूप कंटाळा आला आहे. मागच्या वर्षीचा २५ डिसेंबरला आम्ही सॅन फ्रॅन्सिस्कोला होतो त्याची आठवण झाली. विकीने दिलेले कानातले मात्र मला खूपच आवडून गेले आहेत !

भारतीय उपहारगृह चालू असल्यानेच वेगळेपणा आला नाहीतर २५ डिसेंबरला सर्व काही बंद असते. मग घरातच करावे लागते.

Thursday, December 03, 2015

३ डिसेंबर २०१५

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला हवी. आज स्वच्छ सूर्यप्रकाश तर काल पाऊस आणि ढगाळ हवा. काल जेव्हा सकाळी कामाकरता दोघेही बाहेर पडलो तर आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस पडून गेला आहे ते चांगलेच  जाणवत होते ! सर्वत्र खूपच ओल दिसत होती तर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. असे वाटत होते झोपून राहावे कामावर जाऊच नये.!




कालचा दिवस खूप छान होता तर आज कामावर जायचे नसूनही झोपेत आणि आळसात दिवस गेला. आज हेअर कलर केला. काल रात्रीला केलेली भरल्या वांग्याची भाजी होती म्हणून आज मी वरण भाताचा कूकर लावला. आणि गरम भात त्यावर तूप व सोबत भरली वांगी. भात खाल्याने आणि डोक्यावरून अंघोळ केल्यानेच बहुतेक आज खूप झोप लागली होती. काल तसे काम बरेच कमी होते. चालताना हवेत सुखद गारवा होता. आल्यावरही थोडावेळ पडून कामे उत्साहाने केली.




कामावरची विकी आज माझ्या खूप प्रेमात पडली होती. तिथे मला क्लब संडविच कसा बनवायचा ते दाखवले. ती काल लवकर निघणार होती. तिचे कोलोस्ट्रोल खूप वाढल्याने तिच्या डॉक्टरांनी तिला वेज डाएट करा असे सांगितले आहे. आणि म्हणून ती स्टोअर्स मधले व्हेज बर्गर घेण्याकरता गेली आणि मला पण बरोबर नेले.  स्टोअरस मध्ये आता सर्वांना माहीत झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते ! विकीने निघताना मला हग केले. कार्मेन काल नव्हती आणि लुलू पण दुसऱ्या कामात बिझी होती.




रविवारी खूप काम होते इतके की सोमवार मंगळवार सुट्टी होती आणि आरामही बऱ्यापैकी झाला होता तरी पाय खूप दुखत होते.  पण कालचा दिवस मात्र छान च ! कमी कामाचा. बाहेर पावसाळी हवा. कामावरून निघताना बाहेर पडले आणि चालत आले तरी त्रास झाला नाही. उलट छान वाटत होते. पावसाने रस्त्याच्या कडेला ओहळ निर्माण झाले होते. थोडे थांबून त्या वाहत्या पाण्याकडे पाहत मनात विचार आले की आयुष्य हे ओहळासारखेच सतत वाहणारे हवे. थांबले तर आयुष्य ठप्प होऊन जाईल आणि मजाच निघून जाईल. 


 
काल आल्यावर मी गवार निवडली.  गवार निवडताना मी तल्लीन होऊन जाते इतकी मला ती निवडायला आवडते. आज कार्ल्याची परतून भाजी आणि मुळ्याची कोशिंबीर आहे. आज सुट्टी असल्याने संध्याकाळी कोरडी भेळ करून खाल्ली. चुरमुरे, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि इंडियन स्टोअर्स मधून आणलेली तिखट मिरची चुरडून लावली. अशी भेळ आम्हाला दोघांनाही खूपच आवडते. त्यात भाजके दाणे हवेच.


चला आता लागोपाट ३ दिवस कामाला जायचे आहे ! उद्या कामावार जायचे नाही याची मजा
आदल्या दिवशीच !
 
 

Thursday, November 26, 2015

२६ नोव्हेंबर २०१५

आजचा दिवस हवेसाठी खूपच छान होता. कमी थंडी, स्वच्छ सूर्यप्रकाश होता आणि म्हणूनच आम्ही ग्रीनवीलला जायचे ठरवले. जातायेता प्रवास सुखाचा झाला. रस्ते ओसाड होते कारण की आज Thanksgiving अमेरिकन लोकांचा सण. black friday करता संध्याकाळपासून गर्दी सुरू होणार.  इंडियन गोसरी आणि इंडियन जेवण असे ठरवल्याप्रमाणे झाले. आरामात उठलो. उठून व्यायाम केला. हल्ली गुरवारचा दिवस डोक्यावरून अंघोळीचा ठेवला आहे. याला कारण म्हणजे मला सध्या नोकरी लागली आहे. आणि दर आठवड्याचे कामावरचे दिवस बदलत रहातात.



आज दोघांनाही सुट्टी आहे आणि हवाही चांगली आहे म्हणून लगेचच बाहेर जायचा निर्णय घेतला. त्यात मला आजच सुट्टी आहे. विनायकला मात्र चार दिवस लागून सुट्टी आहे. नवीन नोकरीचा वेगळाच अनुभव आहे. तो मी लिहिणार आहेच. आज त्यातल्या त्यात निवांत वेळ मिळाला म्हणून रोजनिशी लिहीत आहे. काल खूपच थंडी होती. नोकरीवरून येताना चालत येते. खूप दमायला झाले होते. काल भाजणीची थालिपीठे जेवायला केली. आज रात्रीही कालच्या पिठाची उरलेली थालिपीठे आणि पटकन होणारी फ्रोजन बीन्सची उसळ करणार आहे. हल्ली आमच्या दोघांचा डबा मी रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे रात्रीचे जेवण व उद्याचा जेवणाचा डबा असा एकच मेनू असतो.


आज इंडियन उपहारगृहात छान पदार्थ होते. वडा सांबार, खेकडा भजी, मसूराची उसळ, कांदे वांग परतलेली भाजी आणि बिर्याणी छान होती‌. शिवाय नेहमीच्या ठरलेल्या इंडियन भाज्या इंडियन स्टोअर्स मधून घेतल्या. खारी, खोबरे, काजुकतली, बिस्कीटे, फरसाण हेही आवडीचे घेणे झालेच. नवीन शहरात आल्याने आम्हाला इंडियन भाज्या खायला मिळतात त्यामुळे चांगले वाटते. साधारण महिन्यातून एकदा जाणे होते, हेही नसे थोडके !

इंडियन मिरच्या आणि कढिपत्ता आणता येतो त्यामुळे पोहे आणि उपमे जास्त चवदार बनतात ! आज आलेही आणले आहे. तेही चांगलेच असेल. इंडियन चविष्ट भाज्या खाताना खूप छान वाटाते. गवार, तोंडली, कारली, घेवडा, भरल्या वांग्याला वापरता येणारी छोटी वांगी त्यामुळे पुढचा आठवडा भारतीय भाज्यांचा !



Sunday, October 18, 2015

१८ ऑक्टोबर २०१५


मागच्या आठवड्यात डाऊन टाऊन ला गेलो तर रंगांची बहार होती. फॉल रंगाची पिवळी झालेली पाने फूटपाथच्या दोन्ही बाजूने होती. मांडव घातलेला जणू असे दिसत होते. काल आणि आज हवा स्वच्छ आणि सुंदर होती त्यामुळे दोन्ही दिवस छान गेले. नाहीतर मागच्या तीनही वीकेंडला गचाळ आणि ढगाळ हवा आणि पाऊसही ! सूर्यप्रकाश असतो तेव्हा खरेच खूप छान वाटते आणि
सूर्यप्रकाशामध्ये जबरदस्त थंडी असली तरीही चालते. काल २६ इंटरस्टेला असलेल्या एका लोकल पिझ्झा गृहात गेलो. चविष्ट पिझ्झा आणि सलाडही छानच होते. आज ग्रीनवीलला गेलो. कणीक संपायला आली होती आणि इंडीयन भाज्याही घेता येतील म्हणून गेलो. तिथे गेल्यावर एका भारतीय उपहारगृहात जेवलो. साधारण ४ वर्षाने या उपहारगृहात गेलो होतो. जेवण छानच होते. शिवाय गोसरी, भाज्याही ताज्या मिळाल्या. 
ग्रीनवीलला आलोच आहोत तर तिथली एक पार्क बघण्याचे ठरवले. पार्क खूपच आवडून गेली. तिथे नदीही वाहते आणि ती धबधबा बनून वाहते. शिवाय आजूबाजूला चालायलाही बरीच जागा आहे. हिरवळ आहे. सर्व बाजूने धबधबा पाहिला. चालणे झाले. फोटो सेशनही झाले. अर्थात ते व्हायलाच हवे ना !


 ही पार्क लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण जोडपी, अश्या सर्वांकरता छान आहे. मागच्या वीकेंडला छान रंग दिसले म्हणून काल संध्याकाळी डाऊन टाऊनला फिरायला गेलो तर रंग उतरले होते. एक झाड मात्र नारिंगी रंगाच्या पानाने भरून गेले होते. त्याचा फोटो काढला.  शिवाय ही जी पार्क बघितली तिचे नाव आहे फॉल पार्क. तिथल्या धबधब्याचे काही विडिओ शूटींग घेतले. ही पार्क खूप आवडून गेली. एकूण वीकेंड खूपच छान गेला आहे त्यामुळे उत्साह आला आहे.

Sunday, October 04, 2015

४ ऑक्टोबर २०१५

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला लागेल. काल सकाळपासून वादळाचे वारे आणि पाऊस साऊथ आणि नॉर्थ कॅरोलायना मध्ये येणार होते त्याच्या वार्ता वेदर चॅनलला ऐकत होतो. तसे तर गेला आठवडाभर ढगाळी वातावरण आहेच आणि अधुनमधून पाऊसही आहेच.  शनिवारी ते सोमवार संध्याकाळपर्यंत वारे आणि वारेमाप पाऊसही पडणार याच्या बातम्या तर येत होत्याच. शिवाय पॉवर जाण्याची शक्यता आहे असेही सांगत होते. शनिवार सकाळपासूनच पावसाची रिप रिप चालूच होती. दार उघडून पाहिले तर हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. शनिवार रविवारची कामे तर असतातच पण थोडी पुढेमागे झाली तरी चालतात पण या वीकेंडला मात्र कामे करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. त्यात शिवाय पॉवर गेली तर? म्हणून दोन्ही वेळेचा स्वयंपाक करणे हे आपसूकच आले. पोळी, भाजी, भात आमटी केला. पॉवर होती म्हणून बरे झाले. घरात बसून बसून उबायला झाले होते. बाहेर जाऊन  घरा जवळच असलेल्या पिझ्झा गृहात जावे का असा विचार करत होतो. पण त्या आधी गोसरी उरकावी म्हणजे बाहेर पडावे म्हणून पावसातही बाहेर पडलो. ग्रोसरीचे काम झाले. बाहेर जेवायला न जाता रात्रीच्या जेवणाला भाजणीची थालिपीठे केली आणि व्हॅक्युमिंग केले. ढो ढो साठलेली भांडीही घासली. खूप वैतागायला झाले होते.





 दिवसभर पाऊस पडल्याने आणि वेदर वरच्या बातम्या पाहून पाहून उद्या म्हणजे रविवारी काय परिस्थिती आहे हे बघत होतो. रविवारी पावसाचा आणि वाऱ्याचाही जास्त दणका होता. रविवारी सकाळी उठलो तर कळाले की वाऱ्याने दिशा बदलली आहे. त्यामुळे जरा हायसे वाटले. आज दिवसभर ढगाळी वातावरण होते पण पाउस अजिबात नव्हता. काल कामेच कामे झाल्यामुळे आज बाहेर जेवायला पडायचेच आणि नंतरही बाहेर पडायचे असे ठरवले. आजचा पिझ्झा मात्र खूप समाधान देवून गेला. पूर्वी आम्ही इंटर स्टेट हायवे २६ वर लोकल पिझ्झा खाल्ला होता. तोच आज खायचे ठरवले. ३ महिन्यांपूर्वी आम्ही ज्या शहरात आता राहत आहोत तिथे आलो होतो आणि जागा आम्हाला या शहरात मिळाली आणि ती सुद्धा आयत्या वेळी. कंपनीच्या जवळ जागा मिळाली तर नाहीच पण जागा पाहण्याकरता गेलो आणि आम्ही ती आता रेंटने दुसऱ्यांना देवू केली आहे त्यामुळे झालेला मनस्ताप आणि नंतर या शहरात मिळालेली जागा पाहून जेव्हा परतीच्या वाटेवर निघालो तिथे आधी पेट्रोल भरू या आणि नंतर जेवणासाठी एक्झीट घेऊ या असे ठरवले आणि अचानक आम्हाला छान पिझ्झा मिळून गेला होता.




 फ्लॅट रॉकचा पिझ्झा तर छान होताच. शिवाय तिथले सॅलडही उत्तम होते. उकडलेली भेंडी. उकडलेले बीट, काकडी , टोमॅटो व कांद्याचे काप, ब्रेड क्रंब, दाक्षे सर्व काही छान होते. त्यामुळे आजची दुपार छान गेली. आल्यानंतर थोडे आडवे झालो. उठल्यावर नेहमीप्रमाणेच चहा घेतला. पाय मोकळे करण्याकरता बाहेर पडलो ते २ तासांनी घरी आलो. आमच्या अपार्टमेंटच्या लागूनच एक फूटपाथ आहे तो इंगल्स दुकानापर्यंत जातो. तिथे जाऊन येऊन माझ्या चालीने दीड तास लागतो. चालताना इतके काही छान वाटत होते. कैदेतून सुटल्यासारखे वाटत होते. गार सुखद हवा चेहऱ्याला आनंद देत होती. पाय चालून खूप मोकळे झाले. बाहेरच्या मोकळ्या हवेतला श्वासोच्छवास उत्साह वाढवत होता. वाऱ्याने आणि पावसाने दिशा बदलली म्हणून, नाहीतर आजही घरीच बसून आणि पॉवर जाईल म्हणून दोन वेळेचा स्वयंपाकही करावा लागला असता.




 शिवाय बाहेर न जाता घरी बसून बसून उबसल्यासारखे झाले असते. बाकी ठिकाणी मात्र हाहाःकार माजला आहे. ग्रीनविल, शार्लट , wilmington, Charleston आणि कोलंबियात अजूनही पाऊस चालू आहेत आणि ठिकठिकाणी पूर आले आहेत. घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. रस्त्यावरच्या साठलेल्या पाण्यात गाड्या तरंगत आहे. तर घराघरामध्ये पाणी आले आहे. नद्यांना भरपूर पूर आले आहेत.  Hurricane Joaquin , Category 4 हे जबरदस्त वादळ कुठेही अजून थडकले नाहीये. ते आता समुद्रात गेले तरी सुद्धा इतका पाऊस काय , वारा काय, न पूर काय. हे वादळ आले असते आणि थडकले असते तर प्रचंड हानी झाली असती. पावसाचा जबरदस्त फटका मात्र काही शहरांना बसला आहे.

Tuesday, September 29, 2015

3117 Enterprise Drive, Apt No C7


सी सेव्हन अपार्टमेंटमध्ये मला बरेच काही सूचत गेले आणि ते मी करत गेले. जे काही केले ते कायम आठवणीत राहिले आणि जे आठवणीत राहिले ते ब्लॉगवर साठवत राहिले. रोजनिशी लिहिण्याची कल्पनाही अशीच सूचली. म्हणजे ज्या दिवशी काही वेगळे घडले तर दिनांक टाकून लिहायचे. एके दिवशी मी भारतावरून आणलेली डायरी चाळत होते. त्यामध्ये सुरवातीला मी दिनांक टाकून एक दोन वाक्ये लिहिली होती. त्यावरून मला रोजनिशीची कल्पना सूचली.


याच जागेत आमच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यादिवशी सकाळपासून झिमझिम पाऊस पडत होता. सकाळी पाऊस पडायला सुरवात झाली ते अगदी रात्रीपर्यंत पडत होता. त्या दिवशीच्या जेवणात  मी आमच्या दोघांच्या आवडीचा बेत केला होता. शेवयाची खीर, पुरी, बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी. दुपारच्या आणि रात्रीचे जेवण हेच होते.  गरम गरम टम्म पुऱ्या विनायकला वाढल्या. आमच्या दोघांच्या ३ ते ४ फोटोंचे कोलाज केले आणि ते फेबुवर टाकले. स्टेटस मेसेज लिहिला की आजचा दिवस काय होता आणि कसा गेला. तिथे मला खूप शुभेच्छा आल्या. असा आमचा २५ सावा लग्नाचा वाढदिवस आगळावेगळा साजरा झाला आणि म्हणूनच तो जास्ती लक्षात राहिला आहे!


 इथे फॉल सीझनमध्ये पानगळती होते. सर्वत्र रंगीबेरंगी पानांचा सडा पडलेला  असतो. फॉल सीझनमधल्या एके दिवशी मी बाल्कनीत उभी होते तर खालच्या अंगणात बराच सडा पडला होता. लगेच खाली गेले, पाने गोळा केली आणि वर आले. ती पाने मी एका बशीत मांडली. नंतर त्याच पानांचे दसऱ्याला एक तोरण बनवले. सुई दोरा घरात होताच. सुईत दोरा ओवला आणि एकाड एक वेगवेगळ्या रंगाची पाने ओवली. तयार झालेले तोरण मी दारावर बांधले. त्या तोरणाकडे खूप कौतुकाने बघत होते मी !


याच जागेत मला एक कथा लिहायला सुचली. आपोआप सूचत गेली आणि ती भराभर मी वहीत लिहीत गेले. कथा लिहायला मूद्दामहून कधीच बसले नाही. काही वेळा इतके काही सूचत जायचे की ते पटकन वहीत उतरवून काढायचे. हे जे सूचले ते एक आश्चर्यच म्हणावे लागेल. कथा संपूर्ण पणे डोक्यात आहे. अर्धी ब्लॉगवर लिहून झाली आहे. अर्धी बाकी आहे. बघू आता कधी सुचतय ते. जेव्हा सूचेल तेव्हा ती कथा पूर्ण होईल. याच घरात काही सेंकदाकरता भूकंप झाला होता. कधी नव्हे ते एक वादळ याच घरात येऊन गेले. अगदी सुरवातीच्या काळात एक दिवस खूप पाऊस पडला आणि एक छोटे बेडूक पिल्लू घरात आले होते. त्या पिल्लावर पण जे काही सुचले ते लिहून काढले होते. ब्लॉगवर आहे. या घरात रेसिपीज खूप करून झाल्या. पूर्वी कधीही न केलेल्या रेसिपीज या घरात केल्या गेल्या. अनेक प्रकारच्या वड्या तर केल्याच. शिवाय बाहेरच्या बाल्कनीत उन्हाळ्यात काही वाळवणाचे प्रकारही केले.



जेव्हा मी ली रिंगरला वेदर शॉट साठी फोटो पाठवत असे, ते तो वेदर चॅनलला दाखवणार आहे का, यासाठी मी रोज उठल्यावर मेल चेक करायचे. पण काही वेळा उठायला उशीर झाला तर विनायक मला उठवायचा आणि सांगायचा "रोहिणी लवकर ऊठ, तु पाठवलेला फोटो दाखवत आहेत. असे म्हणल्यावर मी ताडकन उठायचे. आम्ही तिथून निघण्याच्या काही दिवस आधी फेबू स्टाईल फोटो दाखवत होते.

 म्हणजे जेव्हा मी ली रिंगरच्या फेबू पेजवर तो फोटो पाठवला तर माझी फेबुची प्रोफाईल व नकाशा दाखवायचे की हा फोटो कुठे काढला आहे.  नदीवरचा एक शेवटचा सूर्यास्ताचा फोटो पाठवला होता.
तो त्याने फेबू स्टाईल दाखवला. त्याने मला खूपच आनंद झाला होता.

 दर रविवारी नदीवर चालायला जाणे आणि सूर्यास्त बघणे आणि त्याचा फोटो काढून तो ली रिंगरला पाठवणे हा कार्यक्रमच ठरून गेला होता.

 क्रमश : ....

Wednesday, September 23, 2015

3117 Enterprise Drive, Apt No C 7



सी सेव्हन मधली एक बेडरूम की जी नंतर माझीच होऊन गेली होती. याचे कारण पहिल्यांदा तिथे डेस्कटॉप होता. नंतर लॅपटॉप आला. आधी इंटरनेट कनेक्शन खूप स्लो होते, नंतर ते फास्ट झाले. मास्टर बेडरून मधून मध्यरात्री मी हळूच उठून दुसऱ्या बेडरून मध्ये यायचे. डोक्यात सतत काही ना काही घोळत असायचे आणि जे काही सुचेल ते लगच्यालगेच वहीत उतरवण्यासाठी मी दुसऱ्या
बेडरूम मध्ये येत असे. 





वहीत लिहिण्यासाठी म्हणून यायचे खरी, पण ते लिहून झाल्यावर साहजिकच मला डेस्कटॉप उघडून मनोगतावर काय काय लेखन  आले आहे ते बघण्याचा मोह व्हायचा व याहू मेसेंजर आपोआप उघडल्यामुळे तिथे असलेल्या काहीजणींशी बोलणेही व्हायचे. असे करता करता ती बेडरूम माझीच होऊन गेली ! पहाटे जेव्हा मला आपोआप जाग यायची तेव्हा पक्षांची चिवचिव ऐकू यायची. बेडरूमला लागूनच एक झाड होते. तिथे पक्षी असायचे. हे पक्षी पहाटे पहाटे खूप छान गप्पा मारायचे. एकाने किलबिल  केली की लगेचच दुसरा पक्षी त्याच्या आवाजात त्याला साथ द्यायचा. मधूनच तिसऱ्या पक्षाची त्याच्या आवाजातली साथ. वेगवेगळे आवाज एकमेकांना साथ देत आहेत हे ऐकून खूप छान वाटायचे.   हा काळ साधारण पहाटे ५ ते ६ च्या सुमाराचा असायचा. एकदा का उजाडायला सुरवात झाली की पक्षांची किलबिल अचानकपणे बंद व्हायची.  एकदा जेव्हा मला अशीच पहाटे जाग आली तेव्हा या पक्षांच्या गप्पा मी डिजिकॅम मधून टेप केल्या होत्या. काहीवेळेला जेव्हा पहाटे जाग यायची तेव्हा मी खिडकीतून डोकावले की फटफटलेले दिसायचे. आकाशातही सुंदर रंग जमा झालेले असायचे. दार उघडून बघायचे तर उजवीकडे क्षितिजावर लालसर छटा उमटलेली असायची. . लगेचच कॅमेरा घेऊन खाली जायचे. हवेत एक प्रकारचा छान थंडावा असायचा.




क्षितीजावर उमटलेली लालसर छटा छेदून सूर्याचा लाल गोळा हळुहळू सरकत वर यायचा. काही क्षणातच लाल चुटुक गोळ्याचे पिवळ्या रंगात रूपाअंतर व्हायचे आणि नंतर पांढरा शुभ्र सूर्य दिसायला लागायचा. डोळे दिपून जायचे. एकदा तर लाल चुटूक सूर्याच्या पार्श्वभूमीवर आकाशातील रंग आणि ढगांचेही वेगळे रंग होते. आकाशात कुणीतरी पेंटींग केलयं असेच वाटत होते. सूर्योदयाची अशीच काही वेगवेगळी रूपे मी कॅमेरात साठवलेली आहेत. शिवाय ती ली रिंगरलाही पाठवलेली आहेत.





 विल्मिंग्टन मध्ये कोणताही ऋतू तीव्र नव्हता. १० वर्षात मोजून ३ वेळाच हिमवर्षाव झालेला आहे. २००९ साली हिमवृष्टी झाली ती म्हणजे कापसा सारखा स्नो पडून सर्वत्र पांढर झाले खरे, पण काही क्षणातच ढ्गात लपलेला सूर्य वर आला आणि बर्फाचे पाणी पाणी झाले. २०११ साली चा स्नो मात्र छानच पडला. जिन्यातही बर्फाचा ढीग साठला होता. त्यावरून चालत खाली उतरणे म्हणजे एक दिव्यच होते. पण तरीही कठड्याचा आधार घेत घेत खाली उतरले. पूर्ण अपार्टमेंटच्या आवारात सावकाश चालत एक चक्कर मारली. तळ्याच्या आजुबाजूला साठलेला बर्फ आणि मधोमध पाणी खूप छान दिसत होती.  बदकांचे पाय चालताना घसरत होते. अनेक फोटो घेतले. नंतर स्नो मॅन, स्नो डॉल आणि स्नो गर्ल बनवली. या बनवलेल्या कलाकृतींचेही फोटो घेतले. २०११ सालची हिमवृष्टी खूप आनंद देवून गेली. २०१४ साली मात्र जो बर्फ पडला तो खुप क्रिस्पी होता. त्यावरून चालणे खूप अवघड होऊन बसले होते. या बर्फाचेही रूप छानच दिसत होते. जिन्यावर साठलेल्या बर्फाची एक स्नो वुमन बनवली.  




 अगदी सुरवातीला जेव्हा या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा प्रत्यक्षातले मित्रमैत्रिणी कोणीही नव्हते आणि अशी परिस्थिती १० वर्षे झाली तरी तशीच राहिली. ऑनलाईन मित्रमंडळी जमा होण्या आधी सुरवातीला डेस्कटॉपवर म्युझिक इंडिया ऑनलाईन वर गाणी ऐकायचो. शिवाय मनोगतावर लिहिलेल्या कविता, लेख, चर्चा वाचायचो. जेव्हा मनोगतावर पाककृती विभाग सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या लेखनाला सुरवात झाली. पण एकूणच या सर्वांच्या आधी मी टिव्ही बघत होते. डीश नेटवर्क घेतले होते. तिथे सोनी, झी सिनेमा आणि सहारा वन अशी ३ चॅनल्स घेतली होती. तिथल्या काही मालिका मला अजूनही आठवत आहेत. त्या अनुक्रमे "एक लडकी अंजानी सी" " हरे काँच की चुडियाँ"  "वो रहनेवाली महलोंकी" "साँस बिना ससुराल"  "वैदेही" खूप छान होत्या या मालिका. मला खूपच आवडल्या होत्या. घरही मी खूप टिपटॉप ठेवायचे.  शिवाय झी सिनेमावर सिनेमे पाहण्यातही छान वेळ जायचा. त्यावेळेला कॉलिंग कार्ड होते. १० डॉलरला २० मिनिटे मिळायची.  या कार्डावरून भारतात फोन व्हायचे. नंतर ही कार्ड स्वस्त झाली. vonage  आल्यापासून मात्र अगणित इंडिया कॉल्स सुरू झाले. अमर्याद बोलणे सुरू झाले. अमेरिकेत झालेल्य मैत्रिणींशीही अमर्याद बोलणे सुरू झाले ते आजतागायत !!




 रात्री जेवल्यावर फिरायला जायची सवय की जी भारतापासून होती. ती इथे २००१ ला आल्यानंतरही ४ ते ५ वर्षे टिकली. नंतर मात्र विनायकचे ऑफीसमधले काम वाढल्यावर आमच्या दोघांचे मिळून फिरणे बंद झाले. इतरत्र शनिवार रविवार होत असे. पण रोजच्या रोज चालणे हे बंद झाले. मी संध्याकाळचे चालणे सुरू केले. अपार्टमेंटच्या आवाराबाहेर जो रस्ता होता तो डाव्या बाजूला विनायकच्या ऑफीसकडे जाणारा होता आणि उजवा रस्ता काही वेळाने बंद होऊन परत त्या रस्त्याला दोन वेगवेगळे रस्त फुटत होते. मी त्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांना ज्या स्टॉप साईन्स आहेत की ज्या काही  ठराविक अंतर पार पाडून गेल्यावर असतात त्या सर्व ऍड करत खूप चालायचे. 
सर्व मिळून माझे तासाच्या वर चालणे व्हायचे.



विनायक रविवारी सकाळी २ मैल चालून यायचा. त्याने एक रस्ता शोधून काढला होता की जो 
पूर्ण वेटोळा होईपर्यंतचा   रस्ता होता.

 क्रमश : .....




Monday, September 21, 2015

१९ सप्टेंबर २०१५




शनिवारी जेव्हा वि म्हणतो मला आज ऑफीसला जायचे आहे तेव्हा मला खूप आनंद होतो ! कारण की मी पण त्याच्याबरोबर ऑफीसला जाते. आज नेहमीप्रमाणे सकाळी साफसफाईची कामे उरकल्यावर निघालो. मेक्सिकन उपहारगृहात जेवण केले आणि थेट ऑफीस गाठले. जायचा यायचा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे. वि ची कंपनी डोंगराच्या पायथ्याशी आहे तर सध्या आमचे घर डोंगराच्या वर आहे. ३ ते ४ छोटी गावं ओलांडून जावे लागते. जाताना उंच उंच डोंगर व डोंगरावरच्या माथ्यावरची घनदाट झाडे दिसतात की जी आभाळाला भिडलेली आहेत. परत येताना चढ लागतो आणि डोंगर खाली खाली जात आहे असे दिसते. आज आफीसमध्ये मी थोडी युट्युबवर गाणी ऐकली. नंतर मिटींग रूम मध्ये जाऊन थोडे अभ्यासाचे वाचले. नंतर चहा केला. व्हाईट बोर्डवर काहीतरी जसे येईल तसे स्केच पेनने उमटवले. वि चा फोटो काढला. नंतर थोडा वेळ ऑफीसच्या समोर असलेल्या सफरचंदाच्या झाडाखाली सावलीत बसले. वि चे काम साधारण ३ ते ४ तास होते. ते झाल्यावर निघताना चॉकलटे खाल्ली. घरी आल्यावर परत एकदा चहा घेतला. रात्रीच्या जेवणासाठी भाजणीची थालिपीठे खाल्ली. एकूण आजचा दिवस छान गेला !

3117 Enterprise Drive, Apt No. C 7



अपार्टमेंट नंबर सी सेव्हन हे पाहताच क्षणी मला खूप आवडून गेले. एक मात्र तोटा होता की अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताक्षणीच स्वयंपाकघर होते, पण तरीही बाकीच्या खोल्या व त्यांची रचना आम्हाला दोघांनाही आवडली. हॉल व दोन बेडरूम यांना सीलींग फॅन होते आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. डोक्यावर फॅन फिरल्याशिवाय आम्हाला दोघांनाही झोप लागत नाही. थंडीमध्ये हीटर लावलेला असला तरीही डोक्यावरती फिरता पंखा हवाच हवा ! हॉलच्या दोन्ही बाजूने बाल्कन्या होत्या. हॉलच्या एका बाजूला मुख्य दार व दुसरी बाजू सरकत्या दाराची होती. ही दोन्ही दार उघडी ठेवली की हवा खेळती रहायची. खेळत्या हवेचा झुळूका जेव्हा अंगावरून जायच्या ना, तेव्हा खूप छान वाटायचे. या दोन दारांच्या मध्ये आम्ही सोफ्याच्या स्टाईलची आरामदायी खुर्ची ठेवली होती. त्या खुर्चीवर बसले की खेळती हवा अंगावर यायची. या खुर्चीवर मी मांडी घालून जेवायला बसायचे. याच खूर्चीत बसून मी फोनवरून बोलायचे. याच खुर्चीत बसून विनायक पोथी वाचायचा.


ही खूर्ची खास रेसिपींच्या फोटोसाठीही होती. त्यावर मॅट ठेवून त्यावर डीश ठेवायचे. त्यात तयार केलेला पदार्थ असायचा.  शिवाय सणावारी विविध पदार्थांनी तयार केलेली ताटेही या फोटोत असायची. ही खूर्ची आमच्या कायम लक्षात राहील इतकी छान होती.  जेव्हा या अपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा सर्व खोल्या रिकाम्या होत्या. आमच्याकडे भारतावरून आणलेल्या ४ बॅगा, एक डेस्कटॉप व एक टिल्लू टीव्ही होता. ज्या दिवशी या अपार्टमेंटमध्ये रहायला आलो तेव्हा काहीही करावेसे वाटत नव्हते. मन पूर्णपणे क्लेम्सनमध्येच अडकलेले होते.  संपूर्ण एक दिवस आम्ही आमच्या फर्निचर खरेदीसाठी घालवला. एका बेडरूम मध्ये एका टेबलावर आमचा डेस्कटॉप विराजमान झाला.  त्याच्या बाजूला एक कॉटही बसली. तिथेच फोन व इंटरनेट कनेक्शनही आले ! ही खोली पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. 



स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जायचे व परत त्याच बेडरूम मध्ये येऊन बसायचे. १० वर्षात आमच्या दोघांचे सर्व बोलणे याच खोलीत झाले आहे. एक तर फोनवरून बोलायला तिथल्या कॉटवर बसून बोलायचो. सर्वात मुख्य म्हणजे डेस्कटॉपवरून अनेक मित्रमैत्रिणींशी बोललेलो आहोत.  त्यावेळेला याहू मेसेंजर होते. मनोगत ही साईटही नवीनच होती. मनोगतावरून अनेक मराठी मित्रमैत्रिणी जमा झाले होते.  याहू मेसेंजरच्या मित्रमंडळींच्या यादीत ७० ते ८० जण जमा झाले होते. मी संध्याकाळी जे काही खायला करायचे ते मनोगतावर पाककृती विभागात टंकत होते. नंतर एकेक करत मागच्या आठवणी व अनुभव लिहीत गेले. आत्तापर्यंतचे सर्व आयुष्यच लिहून काढले म्हणा ना ! माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच अपार्टमेंट मध्ये झाला. डिजिटल कॅमेरातून रेसिपींचे आणि इतर अनेक निसर्गाचे फोटो काढायचा मुहूर्त याच अपार्टमेंटमधून झाला. नंतर आर्कुटवरच्या मैत्रीणीही याहूमध्ये ऍड झाल्या.




 सकाळी उठल्यावर डेस्कटॉप ऑन केल्या केल्या याहू मेसेंजरही आपोआप उघडायचा. लगेचच खिंडक्यातून निरोप यायचे. "काय गं रोहिणी, उठलीस का? " " काका कसे आहात? "  "ए रोहिणी आज अंताक्षरी आहे ते माहीत आहे ना तुला? " "आज दुपारी कॉंफर्न्स करू या का? तुला वेळ झाला की मेसेज टाक"   काही ऑफ लाईन मेसेजही असायचे.  आम्ही डेस्कटॉप ठेवलेल्या बेडरूम मध्ये बसून इतके काही बोलले आहोत की आम्ही साधे बाहेर फिरायलाही कधी बाहेर पडलो नाही. आम्हाला एकटेपणा कधीच आला नाही!  याच खोलीत मला झोप येत नसेल तर मेसेंजर ऑन करून जो कोणी असेल तिच्याशी मी बोलत बसायचे.काही वेळा जे काही लिहायचे जे मनात घोळत असेल तर मध्यरात्री उठून मी वहीत लिहिलेले आहे. माझ्या आठवणीतली दिवाळी हा लेख तर मी मध्यरात्रीत उठून मनोगतावर टंकला आहे.




आमचे घर वरच्या मजल्यावर होते. दोन घरांना मिळून एक मोठी बाल्कनी होती व त्याच्या मधोमध जिना होता. दुपारचा चहा मी काहीवेळा जिन्यात बसून प्यायला आहे. बाल्कनीच्या कठड्यावर येऊन काही पक्षी बसायचे. मुसळधार पाऊस झाला की अपार्टमेंटच्या आवारात असलेले तळे तुडुंब भरायचे. ते बघायचा मोह मी कधी टाळलेला नाही. बाल्कनीत उभे राहिले की उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा तर डाव्या बाजूला सूर्यास्त! हॉलच्या दुसऱ्या बाजूला जी बाल्कनी होती त्याला लागूनच एक झाड होते. या झाडाचे फोटो मी प्रत्येक ऋतूमध्ये घेतलेले आहेत.  आकाशातील बदलते रंग या झाडाच्या पार्श्वभूमीवर खूप खुलून दिसायचे त्यामुळे फोटोही छान यायचा. एका वर्षी ऐक दिवाळीच्या पहाटे आकाशात खूप छान रंग जमा झाले होते. लगेचच दिवाळीची आठवण म्हणून त्या झाडाचा फोटी घेतला. या अपार्टमेंटच्या आवारातील काही झाडांचे फोटो कायम लक्षात राहतील असे आहेत. स्प्रिंगमधले गुलाबी रंगाने डवरलेले झाड, फॉलमधले नारिंगी रंगाने डवरलेले झाड तर एक झाड बर्फाने आच्छादलेले होते. त्याच्या पर्णहीन फांद्या बर्फाच्या वजनाने झुकल्या होत्या.


 क्रमश : .....

Sunday, September 06, 2015

६ सप्टेंबर २०१५









आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला पाहिजे. शनिवारी apple festival ला गेलो होतो . मजा आली. Hendersonville downtown ला मजा मजा होती. गर्दी पहायला मिळाली. नवरा बायको, आजी आजोबा, नातवंडे, तरूण मुले मुली, सर्व प्रकारची माणसे होती.. मुले तर खुप खुशीत होती. आम्ही apple pie, apple juice, ice-cream, popcorn घेतले. एका स्टेजवर गाणी गात होते. रस्त्यावर काही मुले नाचत होती. रस्त्याने जाता जाता सर्वजण चरत होती. झोपाळे, पाळणे होते. face painting होते.




आम्ही उद्याही या जत्रेला जाणार आहोत आणि थोडी खादाडी करणार आहोत. झोपाळा, पाळणे यातही बसणार आहोत. face painting करून घेण्याची इच्छा जागृत झाली आहे.  भाजलेले कणीसही खाणार आहोत. रस्त्याने जाताजाता बरेच स्टॉल लावलेले आहेत. ते बघत बघत, मध्येच काही ठिकाणी बसत बसत, चरत चरत संध्याकाळचा वेळ छान गेला. सर्वत्र ५ डॉलर्स चे पार्किंग लावलेले आहे. आणि हो उद्या फुगे पण घेणार आहे मी ! ही सर्व मजा लहान मुलांनीच करावी असे कुठे कोणी लिहून ठेवले आहे का? कोणत्याही वयात मजा करावी, नाही का? असे सर्व मी फेबुवर लिहिले खरे पण परत आज गेलो नाही. एक तर आज खूप उन होते. काल कसे अगदी मनासारखी ढगाळ हवा होती. संध्याकाळचे चालणेही झाले. जत्राही बघून झाली.



आज संध्याकाळी उन्हे उतरल्यावर निघालो ते सावकाशीने  Inglesच्या दुकानात गेलो. तिथे थोडे खाल्ले, कॉफी प्यायली व परत सावकाशीने घरी परतलो.
माझ्या चालीने जाऊन येऊन ८० मिनिटे लागली.

 ingles च्या दुकानासमोर apple country बुसचा बस स्टॉप आहे तो आहे की नाही एकदा खात्री करून घेतला. आता मी एका आठवड्यात एकदा तरी या बसने जाणार आहे. एकदा एका आठवड्यात ingles पर्यंत चालत जाऊन परत यायचे व एका आठवड्यात बसने जायचे असे ठरवले आहे. आजचा दिवस अजून वेगळा गेला म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी एक वेगळा पिझ्झा खाल्ला. त्यावर टॉपिंग म्हणजे चक्क वांगे आणि लसूणही होते. भाजलेला कांदा व सिमला मिरचीही होती. तिथे खूप गर्दी होती आणि हे उपहारगृह आत आणि बाहेरच्या गॅलरीत पण डायनिग होते.


 आम्हाला बाहेर जागा मिळाली ते बरे झाले. सुखद गार वारे होते तिथे! आणि आजुबाजूला थोडी फुलझाडे पण लावली होती. रात्रीला मुडाखी केली. त्यात मी लसूण, दाणे, सिमला मिरची, कांदा, मोहरी जिरे हिंग आणि अगदी थोडी हळद, तिखट व धनेजिरे पूड घातली. थोडीशी साखर.  अशी सौम्य खिचडी आम्हाला दोघांनाही आवडते त्यावर साजूक तूप हवेच. तळलेला पापड आणि कोशिंबीर असेल तर सोनेपे सुहागा.


 बसने जायचे म्हणजे आधी ४० मिनिटे चालत जायचे. नंतर बसने साधारण तासभर लागेल असे वाटते. कारण की बसने मी शेवटच्या ingles दुकानाच्या बस स्टापलाच उतरणार आहे. हे दुकान दुसऱ्या छोट्या शहरात आहे. एकूण येण्याजाण्यात आणि बसच्या प्रवासात माझे ३ ते ४ तास तरी जातील. इथे कोणाला घाई आहे. बाहेर पडणे हा उद्देश आहे.

Wednesday, September 02, 2015

Factory 2 U

चलो चलो चलो चलो Factory 2 U ! टेक्साज राज्यातले कपड्यांचे हे एकमेव दुकान इतरत्र कोठेही पाहिले नाही. हे दुकान बंद होण्याच्या मार्गावर होते म्हणून क्लोजिंग सेलची जाहिरात पाहिली.मी व माधवी मिळून तिथे जायला लागलो. रोज दुपारी दुपारची जेवणे झाल्यावर निघायचो ते संध्याकाळी परतायचो. ह्या दुकानात आम्ही अगदी इथपर्यंत गेलो की आता उरलेले सर्व कपडे फूकट घेऊन जा इतके सांगायचेच बाकी होते ! त्यात लहान मुलांचे कपडेही होते. माधवीला तिच्या भाचीकरता बरेच कपडे पाठवायचे होते. मी पण एक टी शर्ट घेतला होता. ६० सेंटस मध्ये ! आकाशी रंगाकडे झुकणारा, जरा वेगळाच रंग होता. काही दिवस घातला. 





आता असे वाटते की आठवण म्हणून तो टी शर्ट ठेवायला पाहिजे होता. क्लोजिंग सेलमध्ये रोज
थोडे थोडे सेंट कमी करत लेबले बदलली जायची.  सर्व खरेदी केल्यावर "अभी एक लास्ट ट्राय! " म्हणून आम्ही दुकानात गेलो तर ते बंद! बहुधा सर्व वस्तुंची विक्री झाली असावी. माधवीला त्या दुकानामधला एक छोटा फ्रॉक आवडला होता, पण त्याची किंमत जास्त होती. किंमत कमी होईल म्हणून आशेने तिथे ग्लो तर दुकान बंद!


 
 तिला खूप हळहळ वाटली. जवळपास १०० डॉलर्सची खरेदी तिने केली होती. एके दिवशी तिने मला घरी बोलावले व आत्तापर्यंतची खरेदी आपण परत पाहू असे सांगितले. ती दूपार छान गेली. लहान मुलांच्या छोट्या छोट्या कपड्यांचे कौतुक केले. मोजे, टोपडे, झबली आणि इतर काही एकेक करून हातात घेऊन "ये देख, कितना अच्छा है ना! " असे करत दुपार घालवली. माधवी व माझी खूप गट्टी जमली होती.
 
 
 फोनवरून अगणित गप्पा, म्हणजे लँडलाईन वरून हं ! लोकल कॉल्स फूकट होते ! प्रत्यक्षात भेटून कुठे कुठे जायचे हे ठरवणे व जाणे. त्यात जॉब हंटिंगचा भाग मुख्यत्वेकरून होता. त्याचे वेगळे अनुभव मी लिहीणारच आहे

 
 आम्ही दोघींनीही जे २ डिपेंडंट व्हिसावर वर्क परमिट काढले. त्याचा उपयोग माधवीला डेंटन शहरात झाला. आमचा डेंटनमधला कालावधी १ वर्षाचा होता. नंतर आम्ही क्लेम्सन शहरात आलो.
 
 तिथे माझ्या वर्क परमिटची मुदत वाढवून घेतली.  क्लेम्सन मध्ये मात्र वर्क परमिटचा उपयोग झाला. मला ३ नोकऱ्या लागल्या.
 मला फक्त शनिवार वार मोकळा असायचा. छानच गेले तिथले दिवस!

 
 
 

Monday, August 31, 2015

CFCC - North Campus - Wilmington - NC - (3)

Wednesday, August 26, 2015

CFCC - North Campus - Wilmington - NC - (2)

"टॉक टॉक टॉक" असा आवाज आला की समजावे की Clarke बाई आल्या ! खूप उंच टाचेच्या चपला, केस मोकळे, पेहराव नेहमी वन पीस, गळ्यात मोठाल्या माळा, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हाताने फळ्यावर लिहीणार. १० वाजून १० मिनिटे होत आली तरी सुद्धा अजून Mr. Currin कसे आले नाहीत? आम्ही सर्वजणी माना वेळावून भिंतीवरच्या घड्याळाकडे बघतो न बघतो तोच करीन यांचा वर्गात प्रवेश!   Hey, how are you  doing? असे म्हणत येणार. सतत हसतमुख, प्लेन शर्ट व नेहमी टाय लावणारच ! शुक्रवारी मात्र जीन  आणि टी शर्ट.





दोघांची रोल कॉल घ्यायची पद्धत वेगळी आहे. Mr. currin वही उघडून प्रत्येकाचे नाव वाचणार व आम्ही " here" असे म्हणले की "where" असे म्हणून त्या विद्यार्थ्याकडे बघूनच हजेरी लावणार. मी आधी येस म्हणायचे मग हीयर असे म्हणायला लागले. Mr. Clarke बाईंनी पहिल्यांदाच रोल कॉल घेताना सगळ्यांचे चेहरे पाहून लक्षात ठेवले आणि नंतर प्रत्येक वेळी हजेरी लावताना बारीक डोळे करून पाहणार कोण कोण आलयं ? आणि मग त्यानुसार हजेरी लावणार.



Clarke बाईंची शिकवण्याची पद्धत मला आवडली. धड्यातले मुद्दे फळ्यावर लिहून नंतर प्रत्येक मुद्दा विस्ताराने सांगणार. Mr. Currin फळ्यावर एकही अक्षर लिहिणार नाही. धड्यातली २ - ४ वाक्ये वाचून दाखवणार  व आमच्याकडून त्यांना चर्चा अपेक्षित असे. give an example, Rohini, what do you think?   असे  म्हणल्यावर मी उत्तर द्यायचे व लगेचच yes, that's correct !  इतर बायकाही सांगायच्या, शंका विचारायच्या. कुणी शंका असेल तर हात वर करणार, मग तिला म्हणणार "येस मॅम" अधून मधून विनोद, कुणाचा रिंग टोन वाजला की मध्यच पॉज घेऊन हासणार. मी आधी पुस्तक न्यायचे नाही, मग न्यायला लागले. जाडी जाडी पुस्तके धरून हात दुखतात म्हणून न्यायचे नाही. मी एका सेमेस्टरला २ विषयच घेते. कॉलेज ५ विषय घ्या असे सुचवते. काही जण ५ नाहीतर काही जण ३ विषय घेतात.




 ३ किंवा ५ विषय घेतले की भलेमोठे धोपटेच घेऊन यावे लागते. विमानतळावर न्यायला चाके असलेल्या छोट्या बॅगा कशा असतात ना तश्याच बॅगा काही जणी आणतात तर काही जणी बॅकपॅक आणतात. काही जणी खूप लांबून येतात. वर्गात पहिल्या दिवशी कोणी ज्या खुर्चीवर बसलेले असेल ती खुर्ची त्याची/तिची होऊन जाते. एकदा काय झाले एका ब्लॅक मुलीची ठरलेली खुर्ची होती त्यावर गोरी बाई बसली. ब्लॅक मुलगी त्या दिवशी उशीराने आली तर तिने त्या गोरीकडे रागाने पाहिले. आणि दुसरीकडे जाऊन बसली. मग गोरी तिला सॉरी म्हणाली.


वर्गात शिकवत असताना मी निरिक्षण करत बसायचे. कोण काय काय करतयं? कुणी नखं खातयं तर कुणाकुणाला बसल्या बसल्या डुलकी लागलेली असायची. कुणाला बरे नसेल तर तो बाकावर डोके ठेवून झोपायचा तर कुणी फोनवर टेक्स्ट करत बसायचे. मध्येच कुणीतरी मागे वळून घड्याळाकडे बघायचे, तसे तर मी पण काही वेळा बघायचे मागे वळून तास संपायला किती वेळ आहे?, कुणी पाणी पितयं तर कुणी कोक पितय, तर कोणी वर्गात बसून विषयाच्या नोटस लिहीतयं. एक ना दोन बरीच मजा मजा बघायला मिळायची. मी लेक्चर ऐकताना एकीकडे वहीच्या पानावर नक्षी काढत बसायचे. हाहाहा. वेळ संपत आली की पुसतके वह्या दप्तरात ठेवायला लागायचे. करीन सर घळ्याळाकडे बघून लेक्चर आवरते घ्यायचे आणि विचारायचे any questiions?



 इथे सेमेस्टरच्या पहिल्याच दिवशी त्या सेमेस्टरचा अभ्यासक्रम, गृहपाठ, परीक्षा यांचे पूर्ण सेमेस्टरचे वेळापत्रक देतात. गृहपाठ खूप असतो. करीन यांच्या विषयाला तर दर १५ दिवसांनी  २ टॉपिकवर परीक्षा व एका टॉपिकवर गृहपाठ असायचा.  त्यातून २ विषय म्हणजे सततचे गृहपाठ आणि परीक्षा चालूच असतात. डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर एका सेमेस्टरला ३ किंवा ५ विषय घेतले तरच वेळेत तो पूर्ण होऊन नंतर नोकरीसाठी प्रयत्न किंवा एकीकडे नोकरी व शिक्षण घेणारेही काहीजण आहेत. मला मात्र कशाची चिंता नाही. मी वेळ जाण्याकरता शिक्षण घेत आहे. इथली परीक्षेत true or false, multiple choice , short answers असे असते.

मला इथल्या कॉलेजचा अनुभव खूपच छान आला आहे. घरातली कामे म्हणजे स्वयंपाक, कचरे टाकणे,
भांडी घासणे, ग्रोसरी, साफसफाई  गृहपाठ, परीक्षा  म्हणजे सततचा अभ्यास करून खूप दमायला होते पण मन खूप आनंदी रहाते.

 कॉलेजला जाणे, त्या आधी पटापट आवरणे, अभास करणे एकूणच सर्व करून मी खूपच चपळ बनले होते. परीक्षेत ९० च्या पुढे मार्क पाहून इतके काही छान वाटायचे ना !



अर्थात विनायकच्या मदतीमुळेच (अभ्यास व इतर कामे) मी हा पॅरालीगलचा डिप्लोमा पूर्ण करीन हे अगदी नक्की!  पुढील भागात विल्मिंग्टनच्या आठवणी एकेक करून लिहीत राहीनच, तूर्तास इतकेच !




क्रमश : ....

Sunday, August 23, 2015

CFCC - North Campus - Wilmington - NC (1)



Hendersonville , एक छोटे टुमदार शहर, आजूबाजूला हिरवेगार डोंगर, डोंगरावरची झाडी आभाळाला टेकलेली, त्यामुळे तयार झालेली निसर्गाची रंगसंगती अप्रतीम! पण तरीही .... Wilmington शहरातले मी बरेच काही मिस करत आहे. सी. एफ . सी‌सी, नॉर्थ कॅप्सस, प्रो.Hugh currin , Susan Clarke , friends Jennifer, Katrina, Erin ली रिंगरला पण मी खूपच मिस करत आहे. वेदर संदर्भात मी ली रिंगर्ला फोटो पाठवायचे व लगेचच तो वेदर न्युज चॅनलला " वेदर शॉट ऑफ द डे" मध्ये दाखवायचा. साधारण मार्च २०१३ ते जून २०१५ पर्यंत त्याने मी पाठवलेले तीस फोटो दाखवले. आता नवीन शहरी केबल नेटवर्क बदलले आहे त्यामुळे फोटो पाठवणे नाही की ते वेदरशॉट मध्ये येणे नाही.


 Wilmingtonn मधले कॉलेज लाईफ मी कधी मिस करेन असे तर कधीही वाटले नव्हते !! २०१४ मार्चच्या सुमारास गुगल शोध घेतला, तो अश्यासाठी की काहीतरी ऑनलाईन शिकता येईल का? कॅंपुटर कोर्सेस करता येतील का हे शोधत होते. मी पुर्वी म्हणजे १९९९ साली ADCP CDAC चा कोर्स केला आहे त्यामुळे एकदम काहीतरी नवीन शिकायचे असे नव्हते. गुगल शोधामुळे मला बरेच काही ऑन्लाईन कोर्सेस सापडले पण त्याच्या फिया प्रत्येकी ७५ ते ८० डॉलर्स होत्या.


 तितक्यातच वेदर न्युज चॅनलला हेच कोर्सेस ग्रंथालयाचे सदस्य असल्यास फूकट होते. मला खूपच आनंद झाला! ग्रंथालयाचे सदस्य कार्ड वापरून ऑनलाईन कोर्स जॉईन केला. त्यात एक कोर्स Explore career as a paralegal असा होता. सुरवातीला एक सोपा कोर्स घेतला. इंग्रजी ग्रामर की जे आपण सर्व शाळा कॉलेजातून शिकलो आहोत.  दुसरा कोर्स ऑनलाईन पुस्तके बनवण्याचा होता पण तो मी अर्धवट सोडून दिला. सुरवातीला मी जाम उत्साही होते. पण नंतर विचार केला की ब्लॉगवर लिहिले आहे त्याचे परत पुस्तक बनवण्यात काही अर्थ नाही. Explore career as a paralegal हा कोर्स मला खूपच आवडून गेला. आणि त्यातून परत एकदा मी गुगल शोध घेतला की हाच कोर्स कॉलेज मधून करता येईल का? कशी गंमत आहे बघा, वेदर चॅनल वर परत आमच्या शहरामधल्या कम्युनिटी कॉलेजची जाहिरात दाखवली. फॉल सेमेस्टर ला रजिस्टर करा ! Wilmington मधल्या कम्युनिटी कॉलेजचे मुख्य कँपस आहे डाऊन टाऊनला आणि मला येण्याजाण्यासाठी बसही होती. अगदी कॉलेजच्या समोर बस स्टॉप होता आणि घराच्या अगदी जवळ बस स्टॉप नसला तरी खूप लांबही नव्हता.


शिकण्याच्या बाबतीत माझे नशीब खूप जोरदार होते. पॅरालीगलचा हा कोर्स नॉर्थ कँंपसला शिकवत होते आणि हे ते आमच्या घराच्या ५ मिनिटांच्या कार ड्राईव्ह वर होते! मागच्या वर्षीच्या फॉल सेमेस्टरला मि कॉलेजला जायला सुरवात केली. फॉल व स्प्रिंग सेमेस्टर खूपच छान गेल्या. समर सेमेस्टरला डिप्लोमाचे कोर्सेस नव्हते. काही होते ते ऑनलाईन होते पण मला ऑनलाईन म्हणजे परत घरातूनच बसून करा, कॉलेज निमित्ताने बाहेर जाणे येणे होणार नाही म्हणून घेतले नाहीत. प्रत्यक्षात कॉलेज ला जाऊन लेक्चरला बसण्यात जी मजा आहे ती ऑनलाईन नाही. जून जुलै कडे आमच्या नशिबाची चक्रे जोराने फिरली आणि विनायकच्या नोकरीबदलामुळे  आम्ही वेस्टर्न नॉर्थ कॅरोलायना मध्ये आलो.

 गेल्या आठवड्यापासून माझी परत फॉल सेमेस्टर सुरू झाली पण, कॉलेजमध्ये न जाता ऑनलाईन !  नवीन शहर हे नॉर्थ कॅरोलायना राज्यामध्येच असल्याने मला उरलेला डिप्लोमा ऑनलाईन करता येईल. पण तरीही कॉलेजमधली मजा काही वेगळीच आहे. आणि तीच मी खूप मिस करत आहे. आज या सर्व गोष्टींची प्रखरतेने आठवण झाली आणि सर्व काही कागदावर आणि नंतर ब्लॉगवर उतरवल्याशिवाय काही खरे नाही म्हणून भराभर उतरवले.


क्रमश .....




Saturday, August 15, 2015

१५ ऑगस्ट २०१५


आम्ही नवीन शहरात येऊन पडलो तेव्हा दर शनिवारी किंवा रविवारी चालण्यासाठी जागा शोधायची असे ठरवले आणि ती लगेचच सापडली. काही कारणानिमित्ताने आम्ही हॅडरसन शहराच्या डाऊन टाऊन ला गेलो होतो तेव्हाच ठरवले की जागा चालण्यासाठी खासच आहे ! आम्हाला दोघांनाही डाऊन टाऊन खूपच आवडले आहे. सुंदर आहे. इथे ७ चौक आहेत आणि प्रत्येक चौकात काही ना काही आहेच. उपहारगृहे, दुकाने, दोन्ही बाजूने चालण्यासाठी फूटपाथ, असे सर्व काही आहे. प्रत्येक चौकात सिग्नल्स आहेत. शिवाय फूटपाथला लागून पार्किंग लॉटस आहेत. मला थोडीशी लक्ष्मुमी रोडची आठवण झाली. फूटपाथवर बसण्याकरता बाकडी, खुर्च्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येक सिग्नलच्या बाजूला डाव्या व उजव्या बाजूला काय काय आहे ते लिहिले आहे. इथे सर्व काही म्हणजे ग्रंथालय आहे, पोस्ट ऑफीस आहे, फार्मर्स मार्केट आहे.

 गुगलींग करून ठेवले होते व आम्ही आज इथल्या डाऊन टाऊन मध्ये असलेल्या पिझ्झागृहात जाणार होतो. इथला पिझ्झा चुलीवरचा होता, म्हणजे वुडफायर पिझ्झा हो ! इथे आम्हाला शाकाहारी पदार्थ सापडले. आजचा पिझ्झा तर खासच होता. टॉपिंग खूपच वेगळे असल्याने तोंडाला चव आली. टॉपिंग्ज होती झुकिनी , पालक अरूगुला, सिमला मिरची, ही तर असतेच नेहमी, आणि हो नेहमीप्रमाणे लाल कांदाही होता आणि चक्क लसूण होता. आता उद्या आम्ही इथेच पोटॅटो पिझ्झा खायला जाणार आहोत. शिवाय इथे ग्रील्ड सँडविचही आहे. काही इटालियन, मेक्सीकन आणि शिवाय थाई व चायनीज उपहारगृहे पण आहेत.


 संध्याकाळी परत डाऊन टाऊन ला जाण्याचे ठरवले कारण की ढगाळ हवा होती. निघणार तितक्यात बदाबदा पाऊस पडायला सुरवात झाली. मग अर्धा पाऊण तासाचे निघायचे ठरवले पण फक्त गोसरी करायचे ठरवले. पाऊस अजुनही झिमझिमतच होता. भूक लागली म्हणून वाल मार्ट मध्येच असलेल्या मॅक डोनल्ट मध्ये फ्रेंच फ्राइज खाले आणि बाहेर पाहिले तर पाऊस थांबलेला होता. डाऊन टाऊनला चालून बरे वाटले. नंतर ग्रोसरी केली आणि घरी आलो.

इथे सर्व परिसर टेकड्यांचा आहे. खूप डोंगराळ प्रदेश असल्याने उंच सखल पणा सतत असतो. वाल मार्ट उंचावर आहे तर सॅम्स क्लब खाली आहे. तिथून वळले आणि घराकडचा रस्ता धरला तर परत खूप उतार आहे. हा उंचसखलपणा आम्ही २००३ ते २००५ मध्ये अनुभवला आहे क्लेम्सन मध्ये असताना. आमच्या इथून क्लेम्सन तासाभराच्या अंतरावर आहे. ऍशविल पण तितकेच येईल हळूहळू करत आजुबाजूच्या शहरांमध्ये जाणे होईलच.


आज चालताना फुलझाडे होती तिथल्या काही फुलांचे फोटो घेतले. टणटणीच्या फुलांचा एक फोटो घेतला. ही फुले खूप छान होती. राणी रंग, लिंबू कलर म्हणजे फिकट पिवळा व लाल चुटूक असे एकत्रित रंग होती.

Saturday, August 08, 2015

८ ऑगस्ट २०१५





आजचा दिवस खूप भरगच्च गेला. आज वि ला ऑफीसला जायचे होते, थोडे काम होते. म्हणून आमच्या दोघांची वरात बरोबर १२ वाजता निघाली. एके ठिकाणी थोडे काम होते ते केले. नंतर ऑफीसच्याच रस्त्यावर एक मेक्सिकन उपहारगृह आहे तिथे जेवलो. नंतर ऑफीसमध्ये वि ने २ तासांचे काम उरकले.





तसे मला अजिबातच बोअर झाले नाही कारण की मी ऑफीसच्या बाहेरच्या आवारात सफरचंदाच्या झाडाखाली एका बाकड्यावर बसले होते. हे सफरचंदाचे झाड आहे बाजूच्या जंगलात, पण त्याच्या फांद्या मात्र ऑफिसच्या आवारात अगदी जमिनीला टेकतील इतक्या वाकलेल्या आहेत. त्यावर बरीच सफरचंद लटकलेली दिसली आणि बाकड्याच्या आजूबाजूला सफरचंदांचा सडा पडलेला होता. त्यातली बरीच वाया गेलेली दिसत होती. विनायकचे ऑफीसमधले काम उरकले व त्यानंतर एका जंगलात जायचे ठरवले होते तिथे गेलो. वळणावळणाचे रस्ते पाहून डोके उठले होते. तिथला एक धबधबा दुरूनच पाहिला कारण की घरी परतायचे होते. ६ ला घरी परतलो आणि चहा घेतला. उन्हामुळे डोके पण दुखत आहे. शिवाय धबधबे बरेच लांबवर असतात ! तिथे जायला कमीतकमी १ मैल तरी वर खाली वळणे घेत चालावे लागते. यापुढे जेव्हा जाऊ तेव्हा धबधब्याच्या पायथ्याशी उतरून धबधब्यात पाय सोडून निवांतपणे बसणार आहोत. तिथे अजून ५ ते ६ धबधबे आहेत. हा धबधबा इतका काही छान आहे की खडकावरून पांढरे शुभ्र दूध वाहत आहे असेच वाटते !




सफरचंदाच्या फांद्या वाकून खाली बाकड्यावर छान सावली आहे. इथे वि व त्याचे मित्र मध्यल्या जेवण्याच्या  सुट्टीत जेवायला बसतात. झाडाखाली सावलीत बसून जेवण , किती छान ना ! नुकतेच आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यातच पूर्वेपासून पश्चिमेकडे प्रयाण केले आहे. या आधी सपाट प्रदेश, समुद्रकिनारा आणि नदी होती. नवीन ठिकाणी डोंगरच डोंगर आहेत ! घसरगुंडीसारखे आणि वळणावळणाचे रस्ते आहेत. आजुबाजूला जंगल आणि पर्वतरांगा आहेत. खूप छान निसर्गरम्य प्रदेश आहे. सध्या आम्ही निसर्गाचे वेगळे रूप अनुभवत आहोत.

Wednesday, August 05, 2015

अघटित (२)

लग्नानंतरचे पाच सहा महिने पटकन निघून जातात. मानसीचा संपूर्ण वेळ घराची साफसफाई, नवेनवे पदार्थ करण्यात जातो. शिवाय ती कार घेऊन शॉपिंगसाठी आणि जीममध्ये पण व्यायामाकरता जात असते. बरेच वेळा एकटी असताना ती तिच्या मनात समुद्रावर जाण्याचे बेत आखत असते. केव्हा मिळणार मला समुद्र पहायला? सहा महिने होत आले, अजून अमितला वेळ होत नाही ? त्याचा तिला रागच येतो. अधुनमधून अमितजवळ लाडीगोडी लावून ती विषय काढायची, तेव्हा अमित तिला म्हणायचा "मी सांगितले ना, तुला नक्की नेईन म्हणून ! मी प्रॉमिस कधीच विसरत नाही.




आणि एक दिवस अचानक समुद्रावर जाण्याचा योग जुळून येतो. जुळून येतो म्हणजेच कामानिमित्तानेच ! तिकडे एके ठिकाणी एका प्रोजेक्टवर त्याला काम येते आणि लगेचच तो त्या कामाला होकार कळवतो. विचार करतो एकीकडे काम आणि एकीकडे समुद्रावरची सफर असे दोन्ही होऊन जाईल. एक दिवशी तो ऑफीसमधून घरी येतो आणि मानसीला सांगतो की आपण येत्या शनिवारी समुद्रावर जात आहोत. मी हॉटेल पण बुक केलेले आहे. आणि ते सुद्धा समुद्रकिनारीच ! हे ऐकल्यावर मानसीला खूप आनंद होतो आणि त्या आनंदात ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते तुला माहीत आहे मला किती आनंद झाला आहे ते ! अमित म्हण्तो "हो ते तुझ्या कृतीवरून दिसते आहे ! मानसी म्हणते "इस खुशी के मौके पर कुछ हो जाए? चल ना, आपण डिनरला बाहेरच जाऊ आज. आईने कुरियने मला काही नवीन फॅशनचे  पंजाबी सूट पाठवले आहेत, त्यानिमित्ताने मला त्यातला एक घालायला मिळेल. असे म्हणून ती पटकन स्वयंपाक घरात अमितसाठी आलं घालून चहा करायला जाते. तिच्या आल्याच्या चहाची सवय अमितला इतकी लागते की तो  आपण कॉफी पीत होतो हे तो संपूर्णपणे विसरून जातो. 




शनिवारी सकाळी लवकर उठून ते दोघे तयार होतात. कारमध्ये बसताना बाकीच्या इतरतयारीबरोबर ते दोघे  आपापल्या आवडीच्या सीडीज घेतात. हॉटेलवर कार पार्क करेपर्यंतही मानसीला धीर नसतो. खाली उतरल्यावर रूममध्ये जाण्या आधीच मानसी समुद्रावर धावते. अथांग पसरलेला समुद्र डोळे भरभरून पाहते. कितीतरी शंख शिपले ती  वेड्यासारखे गोळा करते. तोपर्यंत अमित रूमचा ताबा घेतो आणि खाली येतो तेव्हा मानसी लॉबीमध्ये बसलेली त्याला दिसते. तिला म्हणतो "चल जरा वर जाऊन विश्रांती घेऊ. नंतर जेवायला बाहेर पडू. वर रूममध्ये जाऊन ते दोघे थोडी विश्रांती घेतात. मानसीला थोडी डुलकी लागते. अमित थोडावेळ आडवा होतो आणि उठतो आणि लॅपटॉप घेऊन ऑफीसचे काम करतो. मानसी उठून पाहते तर अमित कामाला लागलेला. हे काय? इथेही कामच? पण तीही समजून घेते. कामानिमीत्ताने का होईना आज आपण समुद्रावर आहोत. त्याचे काम संपल्यावर ती दोघे बाहेर जेवून येतात. रूममध्ये आल्यावर मानसी म्हणते. तु दमला असशील तर तू आराम कर. मी जरा समुद्रावर जाऊन येते. रात्रीचा समुद्र कसा दिसतो ते बघते. अमित म्ह्णतो " तू म्हणजे ना, कठीण आहेस. रात्रीला काय बघायचे समुद्राला? किनाऱ्यावर कोणीही नसेल आता. पण मानसी कुठली ऐकायला. "चल मी जाऊन येते जरा किनारी. येतेच लगेच. पण उशीर झाला तर काळजी नको करूस.



मानसी किनाऱ्यावर येते. थंडीचे दिवस सरत आलेले असतात आणि त्यामुळेच समुद्रकिनारी खूप तुरळक माणसे असतात. समुद्राच्या काठावर मानसी उभी राहते आणि समोरच्या समुद्राला बघते. चांदण्यात समुद्राचे रूप थोडे वेगळे दिसते. लाटा काळसर दिसतात. चंद्राचा प्रकाश असला तरीही तो इतका नस्तो याचे कारण आकाश ढगाळलेले असते.  लांबवर एखाद दुसरी बाई किंवा एखाद दुसरा माणूस तिला चालताना दिसतो.




किनारी उभे राहून ती इकडे तिकडे बघत असते. सुखद गार वारा असतो. वाराही थोडासा भुरळ पाडणारा, सुखावणारा. त्यादिवशीचे तापमानही थोडे गरमच असते त्यामुळे मानसीला तिथे उभे रहायला छान वाटते. काय करावे? चालावे का थोडे ? असे म्हणून ती चालायला लागते. डावीकडे असलेल्या लाटा बघत बघत ती चालत असते आणि एके ठिकाणी येऊन थांबते. सहज मागे वळून बघते. अरे आपण किती दूरवर चालत आलो आहोत? मागे बघितल्यावर पूर्णपणे काळोख पण तरीही अगदी थोडे मिणमिणते दिवे असतात. काही ठिकाणी हॉटेलचे बाहेरच्या आवारातले मिणमिणते दिवे चालू असतात. मानसी भरभर चालायला लागते. अरेच्या आपले हॉटेल कुठे गेले. सगळीकडे तिला एकसारखेच दिसायला लागते. आता मात्र मानसी थोडी घाबरते. ती थोडी मागे चालत जाते तर थोडी परत पुढे चालते. आपले हॉटेल नक्की कुठे आहे? आपण फोन पण घेतला नाही बरोबर ! अजून खूप मागे चालायचे की अजून बरेच पुढे आहे? भांबावलेल्या अवस्थेत तिला काहीही सूचत नाही. मग एके ठिकाणी येऊन बहुतेक इथूनच आपण बाहेर पडलो , आत जाऊन बघू. तर ते हॉटेलच असते जिथे त्यांची रूम बुक केलेली असते. तिच्या हातापायातली ताकद पार निघून जाते.



 भरभर चालून दम लागतो म्हणून हॉटेलच्या बाहेरच्या आवारात थोडी बाकडी ठेवलेली असतात तिथे ती बसते. हॉटेलच्या मागच्या बाजून समुद्राचे प्रवेशाचे दार असते. हळूहळू करत ती जिना चढते आणि रूम मध्ये येते. अमित म्हणतो काय गं झाला का समुद्र बघून. एक ५ मिनिटामध्ये माझे काम संपेल. मग आपण एक मस्त मुव्ही बघूया. हो चालेल. मानसी पण त्याच्याकडे बघून उत्तर देते. थोड्यावेळाने एक इंग्लिश मुव्ही बघायला लागतात दोघेजण, पण मानसीचे त्याकडे लक्ष नसते हे अमितच्या लक्षात येते. मूव्ही पाहिल्यावर दोघेजण झोपतात. मध्यरात्र संपत आल्यावर मानसी खूप घाबरून अमितला मिठी मारते. अमित म्हणतो काय गं झाले? अशी घाबरलेली का आहेस? काही होत आहे का तूला? मानसी नकाराची मान हलवते. अमित म्हणतो काल खूप दगदग झाली तुझी. मी आहे तुझ्याबरोबर, घाबरू नकोस. उद्या आपण इथे एक चांगली बाग आहे तिथे जाऊ. तिथे गेल्यावर तुला बरे वाटेल. तिथून पुढे अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती बघू आणि उशीरानेच जेवून हॉटेल ला परतू? ठीक आहे? अमितने दुसऱ्या दिवशीचा प्लॅन सांगितल्यावरतिला जरा   हुशारी येते.




 ती झोपण्याचा प्रयत्न तर करते पण बराच वेळ तिला झोप लागत नाही. तिचे विचारचक्र चालू राहते. आपल्याला समुद्रावर फिरायला गेलो तर इतके छान का वाटत होते? सुखद वारा आणि तोही भूल पाडणारा का होता? कुणीतरी बोलावल्यासारखे आपण इतका वेळ समुद्रावर
भारावून गेल्याप्रमाणे का चालत होतो? उद्या तर अमितने पूर्णवेळ बाहेर जायचा प्लॅन बनवलाय आणि परवा तर आपण निघणार ! मग समुद्राला अजूनही खूप डोळे भरून कधी पाहणार आपण? अमितला समुद्र आवडत नाही का? की फक्त तो माझ्याचसाठी इथे आला आहे? मला अजूनही काही दिवस इथेच राहावे असे का वाटत हे? मला समुद्राची सर्व रूपे पाहायची आहेत. काल रात्री पण समुद्र किती शांत होता. लाटा कशा हळूहळू पडत होत्या.  एक ना अनेक प्रश्न. विचार करता करता तिला झोप लागते. थोडी उशीरानेच तिला जाग येते.

क्रमशः .....



Monday, July 06, 2015

Art Photography














Wednesday, June 17, 2015

सांगायचं राहून जाईल म्हणून सांगतो...

 15.12.1997



सांगायचं राहून जाईल म्हणून सांगतो
तसं काही विशेष नाही
पण जरा आठवून पाहतो .... ॥....

डोळे पाणावले
तुमच्या प्रेमाने मन भरले
आयुष्याचे दीन सरले
आता तुम्ही वास्तू बांधा
मनामनातील दुवे सांधा
मी जरा दूरूनच पाहतो
सांगायचं राहूनच जाईल....  ॥१॥

तुम्ही समजूतदार मुलं
जशी प्राजक्तीची फुलं
दुःख तर सर्वांनीच सोसलं
मात्र दीनवाणे राहिलो नाही
कष्टाला मागे सरलो नाही
हे सर्व तोच ना पाही?
आता मी नामात रंगून जातो
सांगायचं राहूनच जाईल .... ॥२॥

शिकवू का रे मुलांना?
माझ्याच ? की नातवांना
सांज झाली अरे शुभं करोती म्हणा
आई वडिलांना विसरू नका
विनयाने जरा खाली वाका
मी पुन्हा आठवण देतो
सांगायच राहूनच जाईल .... ।३॥

तुमचे यश मला पाहू दे
अंगणी मुले खेळू दे
सर्वत्र कसे मंगल होऊ दे
मी आणि शिर्पा इथेच आहे
शिवार कसं डोलत आहे
तुकोबाचे अभंग गातो
सांगायच राहूनच जाईल .... ॥४॥



poem by Nilkanth Balkrishna Ghate (my father)

Tuesday, June 16, 2015

Art Photography










Monday, June 08, 2015

८ जून २०१५


मी जरी आज रोजनिशी लिहीत असले तरी हे जे काही वेगळे घडले ते शनिवार रविवारचे मिळून आहे. काल खूप दमायला झाले होते म्हणून रोजनिशी लिहिली नाही ती आज लिहीत आहे. वेगळे घडले म्हणजे शनिवारी आम्ही घराची साफसफाई करून बाहेर जेवायला जातो ते गेलो नाही. वि ला म्हणाले की आजचा दुपारचा व रात्रीचा स्वयंपाक , म्हणजे दोन्ही वेळेचा एकाच वेळी स्वयंपाक करते , त्याप्रमाणे तो केला. मला एक रेसिपी करायची होती म्हणजे जी मला सुचलेली तिचा योग आला. वि च्या ऑफीसमधल्या मित्राने झुकिनी स्वॅश त्याच्या बागेतले २ दिले होते. तर मी मुगाची डाळ भिजत घालून  भाजीत  दाण्याचे कूट  व झुकिनी चिरून टाकली व भाजी केली. अर्थात त्यात अजून थोडे बदल करून परत एकदा भाजी करून मग त्याची रेसिपी लिहिणार आहे. तर शनिवारी २ भाज्या केल्या. एक झुकिनी प्लस मुग डाळ , दुसरी पालक व अरूगुला त्यात मिक्स कांदाही घातला जोडीला. अशी भाजी मी नेहमीच करते. ही भाजी पण मला सुचलेली आहे आणि तिची रेसिपी पण लिहिली आहे. शिवाय टोमॅटो व गाजर मिक्स अशी कोशिंबीर केली. दोन्ही वेळच्या पोळ्या केल्या आणि मसूर डाळ रात्रीसाठी भिजत घातली. गेले २ दिवस आणि आजही प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सोबत हवेत आर्द्रताही आहेच. तर जेवण करून आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली आणि उठल्यावर चहा घेऊन आमच्या जवळच्या तळ्यावर चालायला गेलो. तिथे छन सूर्यास्त पहायला मिळाला आणि फोटोही घेतले. ते ली रिंगरला पाठवून दिले. बघू आता तो वेदर शॉट मध्ये दाखवतो का ते ! चालल्यावर खूप बरे वाटले.



खरे तर रात्री जेवणाला पोळी भाजी होती. पण मला फोडणीची पोळी करायची खूपच हुक्की आली आणि चविष्ट फो. पो केली. बाकीच्या भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या. मसूराची उसळ केली होती. ती फ्रिजमध्ये टाकली. उद्याला होईल म्हणून. रविवारी सकाळी साफसफाईची कामे झाली. बाहेर जेवायला गेलो. पण आज जरा काहीतरी वेगळे म्हणून पानेरा ब्रेड उपहारगृहात गेलो. तिथे सँडविच, टोमॅटो सूप आणि मँगो स्मुदी घेतली. जरा काहीतरी वेगळेपण आले. मला मॉलमध्ये सोडून वि लायब्ररीत जाऊन घरी परतला. मला घरात घालायला मॅक्सी घ्यायचे होते. स्कर्टही बघितले. आवडलेही पण माझ्या मनाप्रमाणे मला मॅक्सी खूपच आवडून गेले आणि खरेदी केले. तिथल्या एका दुकानात कानातले खूपच छान होते. ते नुसते बघितले. खरे तर मला मोठ्या रिंगा घ्यायच्या होत्या. पण तिथे त्या नव्हत्या. वि परत मला न्यायला आला. मॉलमध्ये चालून आणि उन्हाळ्याचा सगळीकडे ए‌सी लावतात तोही मला सहन होत नाही, म्हणून माझे डोके प्रचंड दुखत होते. घरी आल्यावर चहा घेतला. नंतर कणिक भिजवून पोळ्या केल्या. आदल्या दिवशीची मसूराची उसळ होतीच. नंतर ग्रोसरी करता अजिबात जाववत नव्हते पण जावे हे लागतेच. ती करून आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते. आल्यावर लक्ष या मालीकेचा एपिसोड पाहिला आणि झोपलो. "तू जीवाला गुंतवावे" ही मालिका चांगली वाटत आहे. त्यात पाणी ओतायला सुरवात केली नाही म्हणजे बरे होईल. विषय वेगळा आहे. त्यामुळे जरा चांगले वाटत आहे.


जरा वेगळे गेले दोन दिवस. हवा मात्र अजिबातच चांगली नाहीये! उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे तरीही तापमान बरेच वाढलेले आहे !!

Saturday, June 06, 2015

Art Photography