Monday, June 05, 2017

H4 Dependent visa (1)

१६ मे २००१ साली आम्ही दोघे अमेरिकेत टेक्साज राज्यात आलो. विनायकने भारतातल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि इथे तो Post -doctorate करण्यासाठी J1 visa वर आला व मी J2 Dependant visa वर आले. विनायकचे वय ४० होते आणि माझे ३६. विनायकला ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये  संशोधन करायला खूप आवडते, पण माझे काय? Dependent visa वर अमेरिकेत कायद्यानुसार नोकरी करता येत नाही. काहीजणी बेकायदेशीर  नोकऱ्या करतात पण आम्हाला तसे पटतही नाही आणि कधी केलेही नाही. J 2 visa वर कायद्याने वर्क परमिट काढता येते म्हणून मी व माधवीने १०० डॉलर्स भरून ते काढले. तिला डे केअर मध्ये नोकरी मिळाली आणि मलाही, पण माझ्या हातात तोपर्यंत कार्ड आले नव्हते त्यामुळे मला ती नोकरी करता आली नाही. त्यांना त्वरित कोणीतरी हवे होते. मी व माधवीने मिळून एका वर्षात बरेच काही केले. आमची छान मैत्री झाली. विनायकचा J 1 visa १ वर्षाचा होता म्हणून त्याला तातडीने दुसरी पोस्डॉक बघणे जरूरीचे होते व त्याला ३ युनिव्हरसिटीतून ऑफर आली. त्यापैकी त्याने क्लेम्सन विद्यापीठ निवडले. नवीन राज्य व नवीन शहर असल्याने मला पुन्हा एकदा visa चे नवीन कागदपत्र असल्याने वर्क परमिट काढावे लागले १०० डॉलर्स भरून, पण आम्ही ते काढले कारण की समजा नोकरी लागलीच तर वर्क परमिट नाही असे व्हायला नको.




माधवीला ज्या डेकेअरमध्ये नोकरी लागली ती नंतर तिने सोडली व दुसरीकडे रूजू झाली. मलाही त्याच कंपनीमध्ये नोकरी लागली होति. एक Aptitude test होती ती मी पास झाले आणि मॅनेजरचा घरी फोन आला की तुम्हाला कोणती शिफ्ट पाहिजे तर मी माधवीची शिफ्ट सांगितली ८ ते ४. मी कामावर ८ दिवसांनी रूजू होणार होते पण नंतर परत एक फोन आला की ती कंपनी बंद पडली आहे त्यामुळे मला लागलेली नोकरी करता आली नाही. त्या कंपनीत सीडी ऑरगनाइज करण्याचे काम होते. या सगळ्या गोष्टी १ वर्षाच्या आतल्या आहेत. नंतर केम्सनमध्ये आल्यावर जे वर्क परमिट काढले त्याचा मात्र पुरेपुर फायदा झाला. मला ३ नोकऱ्या लागल्या. पहिली नोकरी एका चर्चमध्ये दर रविवारी सकाळी ८ ते १२ अशी होती. चर्चमध्ये दर रविवारी इथे प्रार्थनेसाठी लोक येतात ते मुलांना घेऊन. पण अगदी छोट्या मुलांना तिथे एका खोलीत सांभाळण्याची सोय केलेली असते. इथे मी व २ युरोपियन बायका मुलांना सांभाळायचो. दुसरी नोकरी लागली ती एका चर्चमध्ये एक बाई इंग्रजीचे क्लास घ्यायची. क्लासमध्ये येणाऱ्या बायका चिनी, जपानी होत्या.. तो क्लास होईपर्यंत २ तास तिथे येणाऱ्या बायकांची मुले सांभाळण्याचे काम आम्ही दोघी म्हणजे मी व श्रीलंकेमधली रेणुका करायचो. पण ही नोकरी जास्त टिकली नाही कारण की मला एका डे केअर मध्ये सोमवार ते शुक्रवार ११ ते ४ अशी नोकरी मिळाली Toddler ग्रूप मध्ये.


मला फक्त शनिवार एकच दिवस मिळायचा घरातली इतर कामे करायला. दर बुधवारी संध्याकाळी ६ ते ८ अशी नोकरी सुरू झाली ती म्हणजे जिथे मी दर रविवारी जायचे तिथल्याच चर्चमध्ये बुधवारी संध्याकाळची प्रार्थना सुरू झाली. म्हणजे बुधवारी मी ४ ला घरी परत आले की रात्रीचा स्वयंपाक करून परत ६ ते ८ चर्चमध्ये जायचे. तिथेही एक युरोपियन बाई माझ्याबरोबर मुले सांभाळायला होती. पोस्डॉकच्या काळात साधारण ३ वर्षात मी दीड वर्ष या ३ नोकऱ्या केल्या. त्यानंतर विनायकचा visa बदलला तो झाला H 1 आणि माझा डिपेंडंट विसा झाला H 4 या visa वर मात्र वर्क परमिट काढता येत नाही. मला इथल्या नोकरीचा अनुभव छान आला.  माझी नोकरी म्हणजे फक्त पॉकेट मनीपुरतीच पण सॅलरी चेक बँकेत भरताना छान वाटायचे. स्वतः च्या कमाईचा एक आत्मविश्वास वाटायचा. Wells Fargo या बँकेचे नाव पूर्वी Wachovia होते.

हा लेख थोडाफार बदल करून मोहिनी घारपुरे- देशमुख हिने संध्यानंद वर्तमानपत्रात (blog) ब्लऍगविश्व या सदरात प्रकाशित केला होता. प्रकाशन वार व दिनांक - मंगळवार - ११ जुलै २०१७.




No comments: