Friday, January 25, 2013

Wrightsville beach
















Art Photography





Art Photography























Friday, January 18, 2013

रस्ते

ध्यानीमनी जे असे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात. अगदी खरे आहे ते ! गेल्या आठवड्यात मला कॉलेज ऍव्हेन्यू रस्ता दिसला होता. नुसता दिसला नाही तर मला बोलावत होता. स्वप्नामध्ये त्या रस्त्यातला गजबजलेला चौक मला स्पषटपणे दिसत होता.






लग्नानंतर माझ्या स्वप्नात जो रस्ता यायचा तो आईबाबांच्या घराच्या समोरचा रस्ता होता. काही वेळा तर त्या रस्त्याची आठवण मला इतक्या काही तीव्रतेने व्हायची की मी लगेचच पुण्याला जाण्यासाठी बॅगेत कपडे भरायला सुरवात करायचे. तर असे हे रस्ते आपल्या जीवनाचा एक भाग बनून जातात.






आयुष्याला जशी सुरवात होते तशी आपली रस्त्याशी गाठ पडायला लागते. आधी शाळेत जाताना व नंतर क्रमाक्रमाने कॉलेज, नोकरी, राहते घर सोडून दुसऱ्या शहरात, किंवा दुसऱ्या देशात गेलो तर तेथील रस्ते, असे हे चक्र चालूच असते. यामध्ये काही रस्त्यांचे तर आपल्याशी एक नाते बनून जाते. नातेसंबंधासारखेच रस्त्यांशी गाठ पडणे, त्या रस्त्याचा सहवास घडणे, नात जडणे आणि त्यात सुद्धा काही रस्त्यांशी घट्ट मैत्री तर काहींच्या नुसत्याच आठवणी बनून रहातात.






पुण्याला गणेश खिंड रस्ता हा असाच आठवणींचा बनून राहिला आहे. खिंडीच्या उजवीकडे चालत गेले तर भांडारकर रस्त्यावरून कमला नेहरू पार्कपर्यंत हा रस्ता मे महिन्याच्या सुट्टीतला झाला होता. या रस्त्यांवरून शाळा कॉलेजमधल्या एप्रिल मे महिन्यांच्या सुट्टीत यावरून चालणे व्हायचे. खिंडीतून खाली उतरलो की डाव्या बाजूला समोरासमोर सिमेंटचे दोन कट्टे होते त्या कट्यावरून आम्ही त्या रस्त्यातल्या चौकाला सिक्स पेंशनर चौक असे नाव दिले होते. कमला नेहरू पार्कमध्ये चालत चालत त्या खिंडीतल्या रस्त्यावरून जायचो. डावीकडे बघितले तर त्या कट्ट्यावर ५-६ पेंशनर लोक येऊन बसलेले असायचे. खिंडीच्या डावीकडे चालत जाऊन चतुर्श्रींगिच्या देवीचे दर्शन घेऊन पुढे एका गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. चालताना खूप उत्साह यायचा. त्यावेळेला गर्दी नव्हती. भरपूर वारे व शुद्ध हवा होती. काही वेळेला हनुमान टेकडीवर बसून खाली जात असलेल्या वाहनांकडे बघताना कसा व किती वेळ जायचा हे कळायचे सुद्धा नाही. वेळेचे भानच उरायचे नाही.






आईबाबांच्या घरासमोरचा जो रस्ता होता त्याच्याशी तर खूपच घट्ट नाते आहे. प्रत्येक घरी समोरच्या अंगणात पाण्याचा सडा घातला जायचाच, शिवाय घरासमोरच्या रस्त्यावरही वेगळा सडा घालायचे प्रत्येक जण ! त्यामुळे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत रस्ता ओलाचिंब व्हायचा. त्यातूनही कोणी सडा घालायला विसरले असेल तर रस्त्याचा तो भाग कोरडा दिसायचा. या रस्त्यावरच सर्व घराची मिळून होळीपौर्णिमेला होळी पेटायची. आमचे घर त्या रस्त्याच्या टोकाला होते. तिथे हा रस्ता संपायचा. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजात जायचो तेव्हा आई त्या रस्त्यावर येऊन आम्हाला टाटा करायला उभी रहायची. आम्ही दोघी बहिणी चालत चालत जाऊन रस्त्याच्या शेवटी पोहोचलो की तिथून आम्हाला उजव्या बाजूला वळायला लागायचे व तिथून पुढे बस स्टॉप होता. उजव्या बाजूला वळायच्या आधी आईला फायनल टाटा केला की मग आईला आम्ही दिसेनासे व्हायचो. आमच्याकडे कुणी पाहुणे आले की त्यांनाही टाटा बाय बाय करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उभे ! त्यांनाही आमच्या फायनल टाटा बद्दल माहीती झाले होते !  या रस्त्याबद्दल अजून एक खासियत अशी होती की रिक्शाचा, स्कूटरचा आवाज आला की कोणीतरी आले आहे असे आम्हाला घरातच कळायचे. या रस्त्यावर सर्व विक्रेते यायचे. कुल्फीची गाडी घंटा वाजवत यायची. ढकलगाडीवरून बर्फाचा गोळा, शिवाय कांदेबटाटे वाले यायचे. सायकलवरून टोपल्यातून पेरू व हरबऱ्याच्या गड्ड्या सायकलीच्या मागच्या कॅरिअरला लावून विक्रेते यायचे.






अमेरिकेतील क्लेम्सन या छोट्या टुमदार शहरामध्ये दोन रस्ते एकमेकांना छेदून जाणारे होते आणि खूप रहदारीचे होते. त्यातला कॉलेज ऍव्हेन्युचा रस्ता होता तो खूप छान होता. या रस्त्यावरून आम्ही दोघे चालत गेलो नाही असा एकही दिवस नाही. या रस्त्यावरून आम्ही बसने व कारनेही गेलो आहोत पण चालत जायला हा रस्ता खूपच रमणीय आहे. एक तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ आहेत. दुसरे म्हणजे हा रस्ता उंचसखल आहे त्यामुळे चालताना व्यायामही होते. दम लागला तर मध्ये बसायला बाकडीही आहेत. या रस्त्याच्या फूटपाथवरून चालताना रस्त्यावरून धावणारी वाहनेही दिसतात. चालणारी दिसतात. या रस्त्यावरून जो काही आनंद मिळायचा ना त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही !







तर या रस्त्यांमध्ये काही रस्ते असे आहेत की ज्यावर सदा न कदा धावणारी वाहने असतात तर काही रस्त्यांवर एकही चिटपाखरू नसते. काही रस्त्यांवर बरीच गर्दी असते तर काही रस्ते इस्त्री केलेल्या कपड्यांसारखे सदैव गुळगुळीत व फॅशनेबल असतात. काही रस्ते गल्लीबोळातून जातात त्यामुळे खूप घाई असेल आणि लवकर पोहोचायचे असेल तर हे गल्लीबोळातले शॉर्ट कट रस्त कीती उपयोगाचे असतात ना ! अशा रस्त्यांचे मला खूप कौतुक वाटते. काही रस्ते नेहमी दुभंगलेले असतात, सतत खोदकाम चालू असते. या रस्त्यांनी मागच्या जन्मी कोणते पाप केले असेल कोण जाणे ! सतत आपला फावडे कुंदळांचा मारा !







आम्ही सध्या ज्या शहरात राहतो तेथे नव्याने रहायला आलो तेव्हा अपार्टमेंटच्या आवारातून बाहेर पडल्यावर लागूनच जो रस्ता लागतो त्यावर मी खूप चाललेली आहे. अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हाच मला माहीती झाले होते. घराच्या बाहेर पडा आणि चालत सुटा. रिकाम्या रस्त्यावरून भूतासारखी एकटी मी खूप चाललेली आहे. एक तर घरी बसून वेड लागते. बाहेर पडले की माणसे दिसतात आणि आपण माणसात असल्यासारखे वाटते. तर आम्ही जिथे राहते तिथे मी जेव्हा चालायला सुरवात केली तेव्हा पाच मिनिटांच्या अंतरावर स्टॉप साईन्स आहेत. दर वेळी एकेक स्टॉप साईन्स वाढवत जाऊन माझे चालणे १ तासाच्या वर होत असे. या रस्त्यावरून चालताना मला आनंद वाटला होता पण अगदी क्वचित वेळा. फक्त बाहेर पडून चालायला सुरवात केली की कंटाळा जातो इतकाच काय तो या रस्त्याचा उपयोग !






तर असे हे मला भेटलेले रस्ते ! तसे बरेच आहेत, पण तूर्तास इतकेच पुरे ! या सर्व रस्त्यांमध्ये माझा सर्वात लाडका रस्ता म्हणजे क्लेम्सनमधला कॉलेज ऍव्हेन्युचा रस्ता, याला विसरणे शक्यच नाही!!!



Friday, January 11, 2013

Art Photography