Monday, August 22, 2016

ओहरे ताल मिले नदी के जलमें

ओहरे ताल मिले नदी के जलमें
नदी मिले सागरमें
सागर मिले कौनसे जममें
कोई जाने ना

सूरज को धरती तरसे धरती को चंद्रमा
पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा
बुँद छुपी किस बादलमें कोई जानेना

अनजाने होंठो पर क्युँ पहचाने गीत है
कल तक जो बेगाने थे जन्मोंके मीत है
क्या होगा कोनसे पलमें कोई जाने ना

ओहरे ताल मिले नदी के जलमें

गीतकार : इंदिवर - संगीत - रोशन - चित्रपट - अनोखी अदा - गायक - मुकेश

Monday, June 27, 2016

२७ जून २०१६

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची बरीच भर घालायला लागेल. कालच्या दिवसामुळेच आजचा दिवस जास्त छान गेला. मागच्या आठवड्यात कामाचे बरेच हेक्टीक वेळापत्रक होते आणि कधी नव्हे ते मला रविवारी सुट्टी मिळाली.


गव्हाचे पीठ संपत आले होते म्हणून आम्ही इंडियन स्टोअर्स आणि उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. उपाहारगृहात जेवण छान होते. वडा सांबार, मसूराची उसळ, पाव भाजी, समोसा चाट, बटाटा मेथी मिक्स भाजी.. जेवल्यानंतार स्टोअर्स मध्ये भाज्याही छान मिळून गेल्या. अळुही मिळाले चक्क. मी तर थक्कच झाले ! कैरी मिळाली!  शिवाय मुळा पालासकट होता तो ही घेतला. सटर फटर  तोंडात टाकायला फरसाण , खारी, बिस्किटे, मुरमुरे, घेतले. शिवाय चक्क मला तिथे चितळ्यांचे गुलाबजामचे इंस्टट पाकीट दिसले त्यामुळे ते आणि खमणचेही घेतले. घरी आल्यावर चहा बिस्किट खाऊन झोप काढली.

नंतर बरीच आवरा आवर केली. इथे आल्यापासून काही खोकी आवरायची राहूनच गेली होती असे म्हणण्यापेक्षा मूड लागत नव्हता आणि नंतर नोकरीमुळे वेळही मिळत नव्हता. माझ्या अंगात आवरा आवरीचे वारे शिरले की मग ते थांबत नाही. रात्रीचे जेवण बाहेरच करू असे वि ला सांगितले आणि बाहेर पिझ्झा खाऊन आलो. बाकीचे सामानही बाहेरून आणले. दुधे ज्युस तर लागतातच. आज सकाळी आवडीची गवार केली.

सकाळीच पोळी भाजी झाल्याने कालचा आलेला उत्साह कामी लावला.  नंतर आवरा आवरी करून जेवण करून थोडी पडले. उठून पाहते तर अंधारलेले होते. दणादण वीज आणि वाऱ्यासह पाऊस कोसळला. पाऊस तर मला प्रचंड आवडतो. कैरीचे काय करावे बरे, असा विचार करता करता गुळांबा केला. बरीच वर्षे झाली.

गुळांब्याला पाहून! अर्थात पूर्वीची आईच्या हातची गुळांब्याची चव आलेली नाही. इथे तर असे पदार्थ केलेच जात नाहीत. एक तर  इंडियन स्टोअर्स मी जिथे राहते तिथे तिथे कायमच दूर असते. त्यातल्या त्यात नवीन ठिकाणी राहिल्या आल्यावर निदान एका तासाच्या अंतरावर तरी आहे त्यामुळे इथे आल्यापासून ते तरी एक सुखच मानावे लागेल. पाऊस पडल्याने कधी नव्हे ते कांदा भजी केली संध्याकाळी.

आता चहा बरोबर कांदा भजी आणि रात्रीला पोळीशी गुळांबा आहेच. उद्या बहुतेक तोंडल्याच्या काचऱ्या करीन म्हणते.  आजपासून इंडियन भाज्यांचा सप्ताह चालू झाला आहे. मुळ्याचा चटका आणि अळूची भाजीही करायची आहे.
इथे आल्यापासून हे दोन्ही पदार्थ करायची मिळाली आहे तर करते आणि रेसिपी लिहिते. गुळांब्याची रेसिपी पण लिहिणार आहे. तशी सोपी आहे. दुसऱ्या कैरीचे पन्हे नाहीतर  गोड लोणचे करण्याचा विचार आहे.

 खमण आणि गुलाबजामला कधी मुहूर्त मिळतो ते पहायचे. पुढच्या इंडियन स्टोअर्सच्या ट्रीप मध्ये फ्रोजन समोसे आणणार आहे म्हणजे समोसा चाट करता येईल.

कालचा आजचा दिवस तर खूप छान गेला. वेगळाच !!

Wednesday, May 25, 2016

Ingles Market Inc, Hendersonville, North Carolina (2)वीसशे पंधरा सालच्या धनत्रयोदशीच्या दिवशी माझी नोकरी सुरू झाली. नोकरीच्या पहिल्या दिवशी जेमिने माझ्या अमेरिकन पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी आणि स्टेट आयडी या कागदपत्रांच्या झेरॉक्स घेतल्या. काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या. ऑनलाईन काही माहिती भरली आणि माझी नोकरी सुरू झाली. पंचिंगसाठी तिने मला एक नंबर दिला आणि सांगितले हा तुझा यूजर आयडी, पासवर्ड तुला हवा तो घे. शिवाय तिने हेही सांगितले की जेवणाची अर्ध्या तासाची सुट्टी घेशील तेव्हा पण जेवायला जाताना व जेवण झाल्यावर तुला पंचिंग करावे लागेल. कामावर आल्यावर व जातानाही पंच कर असेही सांगितले. नंतर तिने मला एक टी शर्ट दिला व एक टोपी घालायला दिली. एक ऍप्रनही दिला. टी शर्ट मध्ये तुला कोणता रंग पाहिजे तेही विचारले.  टी शर्ट मध्ये ४ रंग आहेत.   विजार आपली आपण घ्यायची.  एक टी शर्ट इंगल्सतर्फे मिळतो आणि बाकीचे आपण विकत घ्यायचे.  मी टी शर्ट घातला. तोही विजारीमध्ये आत खोचला. विजारीवर पट्टा बांधला. ऍप्रन घालता. केसांचा बुचडा बांधला आणि कामाला सज्ज झाले. बांगड्या, अंगठ्या, घड्याळे काहीही घालायचे नाही. शिवाय लोंबते कानातलेही घालायचे नाहीत असे मला जेमिने सांगितले.


तिने माझी ओळख कार्मेन नावाच्या एका स्पॅनिश बाईशी करून दिली. आम्ही दोघींनी हस्तांदोलन केले.  एकमेकींकडे बघून हसलो आणि आमची कामाला सुरवात झाली.  ४-५ दिवसानंतर मला माझ्या नावाचा एक बिल्लाही मिळाला. टी शर्टाला हा बिल्ला अडकवायचा असतो. प्रशिक्षण असे वेगळे काहीच नाही ! थेट कामाला सुरवात आणि काम करता करता मला सर्व गोष्टी समजल्या आणि मी प्रत्येक कामात तरबेज झाले. कार्मेनने मला सर्व काही व्यवस्थित सांगितले. कार्मेन ही प्रामाणिक आणि मेहनती आहे. डेली विभाग हा खूप मोठा विभाग आहे. त्यात आम्ही दोघी म्हणजे मी आणि कार्मेन आहोत. शिवाय विकी नावाची एक बाई आहे. ही बाई अमेरिकन आहे. आम्ही तिघी उत्पादन विभागात आहोत. आमच्या पुढे सुशी बार, हॉट बार आणि सब बार या विभागातली लोकं काम करतात. आणि आमच्या मागच्या बाजूला सलाड बार आहे. त्याच्या शेजारी कुकिंग विभाग आहे. इंगल्स हे एक ग्रोसरी स्टोअर तर आहेच पण शिवाय या स्टोअरच्या आत फ्रेश फूड मार्केट आणि स्टार बक्स आहे. कॅफे कॉर्नर आहे. तिथे सर्व जण बसून जेवतात. गप्पा मारतात. वायफाय फुकट असल्याने बरेच लोक लॅपटॉपवर आपापली कामे करताना बसलेली दिसतात.आमच्या उत्पादन विभागाचे स्वरूप तसे बऱ्यापैकी मोठे आहे. आमचा ओटा अल्युमिनियमचा आहे ज्यावर आम्ही सतत काही ना काही बनवत असतो. ओट्याच्या खाली लागूनच छोटी छोटी शीतकपाटे आहेत. फ्रीजर हा स्टोअर्सच्या मागच्या बाजूला आहे. शिवाय मागच्या बाजूला दोन कचऱ्यापेट्या आहेत. एक आहे ती रिकामी झालेली खोकी तिथे टाकायची. दुसरी कचरापेटी नाशिवंत माल फेकण्यासाठी आहे. शिवाय डेली विभागात कामे करताना कचरा फेकण्यासाठी आमच्या बाजूला ड्रमसारख्या दिसणाऱ्या छोट्या कचरापेट्याही तिकडेच रिकाम्या केल्या जातात.  स्टोअर्सच्या मागच्या बाजूला जो फ्रीजर आहे तो फ्रीजर म्हणजे एक मोठी
खोलीच आहे . इथे भल्या मोठ्या बॉक्सेस भरलेल्या असतात ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात.  ब्रेड, व्हनिला चॉकलेट पूडींगचे डबे, पिझ्झा बेस, बऱ्याच प्रकारचे मांस वगैरे. डेली विभागाला लागूनच एक कोल्ड रूम आहे जिथे आम्ही केलेले पदार्थ छोट्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून, लेबलिंग करून ठेवतो.  हे प्लस्टीकचे पारदर्शक डबे काही छोटे तर काही मोठे असतात. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. काही पदार्थ बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आम्ही इंगल्समध्ये असलेल्या फ्रेश फूड दुकानातून आणतो. जो काही माल आणला असेल त्याची नोंद ठेवायला लागते. काही पदार्थांसाठीचा जो माल आहे तो आम्ही इंगल्स दुकानातूनच घेतो त्याची नोंद ठेवायला लागत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर सलाड बनवण्यासाठी लेट्युस, काकड्या, सिमला मिरची, छोटे टोमॅटो आम्ही फ्रेश फूड मधून आणतो.

आम्ही बरेच पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ बनवण्यासाठी आमच्या बऱ्याच चकरा होतात. कच्चा माल आणण्यासाठी फ्रिजर मध्ये जावे लागते. तिथून आले की पदार्थ बनवला जातो. बनवलेला पदार्थ ठेवण्यासाठी शेजारीच असलेल्या कोल्ड रूम मध्ये जावे लागते. शोकेस सारख्या दिसणाऱ्या स्टँड मध्ये पदार्थांचे डबे
 ठेवायला  लागतात.  त्यासाठीही चकरा होतात. अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीत आपला डबा आणि फोन घेण्यासाठी एका खोलीत जावे लागते. तिथून पंचिंग करण्यासाठी चालत जावे लागते.  हे पंचिंगचे ठिकाण स्टोअर रूममध्येच आहे पण जरा लांब आहे. तिथून पंचिंग केले की परत कॅफे कॉर्नर मध्ये येऊन जेवायचे. जेवण झाले की परत चालत पंचिंग करायला जायचे. तिथून परत चालत डबा आणि फोन ठेवण्यासाठी यायचे. चूळ भरण्याकरता आणि डोळ्यावर पाण्याचा हबका मारण्याकरता रेस्ट रूम मध्ये जायचे. तिथून परत आपल्या जागी येऊन कामाला सुरवात करायची.एकूणच काय काम करताना अनेक चकरा होतात. काम हे उभे राहूनच करायचे. आपण घरी सुद्धा ओट्याशी उभे राहूनच काम करतो ना ! अगदी तसेच. अर्थात इथे प्रत्यक्षात कुकिंग करायचे नसते. त्याकरता दुसरा विभाग आहे. आमचा स्टोव्ह, ओवन, याच्याशी अजिबात संबंध येत नाही. हातापायांची सतत हालचाल होते. पदार्थ बनवताना हाताची हालचाल. पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक आणताना चकरा होतात म्हणजे पायांची हालचाल. पदार्थ रॅक मध्ये ठेवण्यासाठी हात वर केले जातात. रॅकच्या मध्यभागी किंवा रॅकच्या खालच्या कप्यात बनवलेल्या पदार्थांचे डबे ठेवण्यासाठी खाली वाकले जाते. ओंडवे बसणे होते. आणि हो, पदार्थ बनवताना डोकेही शाबूत ठेवावे लागते बरं का !


नाहीतर प्रिंट झालेले लेबल दुसऱ्या पदार्थ्याच्या डब्याला तर चिकटवलेले नाही ना ! किंवा पदार्थ बनवताना दुसरेच कोणते तरी मांस घातले नाही ना ! असे गोंधळ झालेले आहेत आणि नजर चुकीने होऊ शकतात. उत्पादन विभागात बऱ्याच प्रकारचे मांसाचे सँडविचेस आम्ही बनवतो. शिवाय बऱ्याच प्रकारची सलाड बनवतो. पिझ्झे बनवतो. मी पक्की शाकाहारी असल्याने मला कोणत्या प्रकारचे मांस आहे ते ओळखता येत नाही. रंगावरून ते मी लक्षात ठेवले आहे. आयुष्यात कधीही कोणतेही मांस खाल्ले नाही आणि खाणारही नाही. काम करताना मात्र सगळीकडे मांस बघताना डोके सुन्न होऊन जाते. नोकरीचा हा एक भाग असल्याने दुसरा पर्याय नाही.


अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीत जेव्हा बसतो तेव्हा खूपच हायसे वाटते. आम्हाला अजून १० मिनिटांची विश्रांती आहे पण ती घ्यायला वेळ तर मिळाला पाहिजे ना ! माझ्या नोकरीचा वेळ सकाळी  ८ ते ४ आहे आठवड्यातून ४ दिवस आहे.  काहींचा ६ ते २, ७ ते ३, ९ ते ५ आहे तर रात्रपाळी साठी  दुपारचे २ ते रात्री १० अस आहे.  एखादवेळेस आमचे काम लवकर संपले तर मॅनेजरला सांगून घरी जाता येते किंवा तिथेच थांबून दुसऱ्या विभागाला मदर करायची असते.या नोकरीमुळे माझे वजन कमी झाले. मी चपळ आहेच पण अजून त्यात बरीच भर पडली. या प्रकारची नोकरी मी पहिल्यांदा करत आहे. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळत आहे. माझ्या कामाचे स्वरूप नक्की काय आहे आणि ते कसे केले जाते याची सविस्तर माहिती पुढील भागात !


क्रमश : ------

Thursday, April 07, 2016

Tuesday, April 05, 2016

Tuesday, March 08, 2016

Ingles Market Inc. - Hendersonville - North Carolina (1)
Diana नावाची एक स्पॅनिश बाई Ingles मध्ये काम करते. तिने एकदा एक रेसिपी केली आणि ती इंगल्सच्या हॉट बार मेनू मध्ये ठेवली. मी Carmen ला विचारले "आपण आपली रेसिपी इथे केली तर चालते का? " तर ती हो म्हणाली. नंतर मी Deli Manager Jamie लाही विचारले. तर ती म्हणाली चालेल. मला हॉट बार मध्ये वेगवेगळे मेनू ठेवायला नक्किच आवडतील. मग ती म्हणाली की तुला जर तुझी रेसिपी करायची असेल तर ६ ला यायला लागेल. माझी कामाची वेळ ८ पासून सुरू होते. तेरेसाला विचारले तर ती म्हणाली तुला इतक्या लवकर जमणार नसेल तर तुझी रेसिपी तू शनिवारी कर. मला बरेच झाले. कारण की ६ ला हजर राहायचे म्हणजे?? नको रे बाबा. मग एक दिवस ठरवला. ब्रेंडा कुकींगसाठी असते. तिला विचारले की या मोठ्या इलेक्ट्रिक फ्रायर मध्ये बटाट्याच्या चकत्या तळल्या जातील का? तर ती हो म्हणाली

विनायकला विचारले तर तो म्हणाला पहिली भजीच कर. भजी नक्की लोकांना आवडतील. चिकन फ्राय तर काय खपतात !

 पण एक प्रश्न होता की Ingles  हे अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स आहे, तिथे कुठे बेसन मिळणार? तर मी मैदा (All purpose flour)  वापरायचे ठरवले.  त्या दुकानात चक्क मला एका कंपनीचे तांदुळाचे पीठही दिसले. चिली पावडर आणि क्युमीन पावडरही दिसली. बटाटा भजी करण्याची निश्चित केले. आणि एका शनिवारी हा प्रयोग यशस्वी झाला. तिथे सोलाणे पण चांगले धारदार होते. सर्व साहित्य जमा केले. तयारी केली. बटाट्याचे पातळ काप केले तर तिथे काम करणाऱ्या काही बायकांनी ते कच्चे कापच खाल्ले ! जिथे ही लोक मासाचे तुकडे पचवतात तिथे बटाट्याचे काप तर किस झाड की पत्ती ! डॉन मला म्हणाली की मला असे कच्चे काप खूप आवडतात.

बटाटा भज्यांची तयारी झाली. पीठ कालवले तेव्हा त्यांना चव  घ्यायला सांगितले. कारण की अमेरिकन लोकांना तिखट मीठाची चव जास्त आवडत नाही. त्यामुळे आळणी चव असलेले पीठ भिजवले. ब्रेंडा म्हणाली की चिकन फ्राय करून झाले की तु भजी सोड. मला त्या इलेक्ट्रिक फ्रायरची जास्त कल्पना नसल्याने त्यांनाच विचारले. तर त्या म्हणाल्या की जनरली ३२५ फॅरनहाइट वर आम्ही फ्राय करतो.  चिकन फ्राय झाल्यावर मी बटाटा भजी एकेक करत सोडत गेले. साधारण  दीड किलो बटाट्याची भजी ३ मिनिटांमध्ये तळली गेली. तळून बाहेर काढल्यावर अर्थातच चव घेतली गेली आणि मग मेनू बार मध्ये एक वाडगा भज्यांचा ठेवला गेला. त्या सर्व नॉनवेज पदार्थांमध्ये बटाटा भजी खूप उठून दिसत होती. कस्टमर विचारत होते. कोणता पदार्थ आहे. ब्रेंडा सांगत होती ही पोटॅटो फ्राय आहेत. त्यामध्ये काय जिन्नस आहेत असे विचारल्यावरही ती सांगत होती. नमुन्याला भजी दिली जात होती. काहींनी मिलमध्ये बाकीच्या पदार्थांबरोबर घेतली.

बटाटा भजी तळून झाल्यावर मी माझे काम करायला घेतले. नंतर काही वेळाने लंच टाईम मध्ये जेवायला गेले. तिथे नंतर ऍन आली. ती म्हणाली तुझे पोटॅटो सगळ्यांना आवडत आहेत ! जेवणावरून आले तर ब्रेंडा म्हणाली. भजी संपत आली आहेत. अजून एक मोठा लॉट तळून ठेव. मग परत अशीच साधारण दीड ते २ किलो बटाट्याची भजी तळली. आणि नंतर ती वाडग्यातून हॉट बार मध्ये ठेवली गेली. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता. स्टोअर्स मधले इतर मॅनेजर्सही चविला म्हणून एक एक घेऊन खात असताना दिसले. दुसऱ्या लॉट मध्ये मात्र मी तिखट पहिल्यापेक्षा जरा जास्तच टाकले. इथले तिखट म्हणजे काय दिव्यच असते !

तर Diana ने केलेली रेसिपी सांगते. तिने Jalapeno peppers मधल्या बिया काढल्या. त्यात चीझ भरले आणि ती मिरची बेकॉनच्या पट्टीने रॅप करून तळली. तिने आधी ५० बनवल्या.. पण तितक्या पटपट खपल्या नाहीत. बराच वेळ वाडग्यात दिसत होत्या. इथे रेसिप्या बनवायच्या म्हणजे फोडणीव्यतिरिक्तच पदार्थ शोधावे लागतील. मनात आहेत बरेच. पुढचा नंबर कुणाचा लागतो ते बघायचे !


मला Ingles Grocery Stores मध्ये नोकरी कशी लागली. तिथे कोण कोण काम करतात आणि इतर काही मजा, कामाचे स्वरूप हे पुढील भागात!

गुगल मध्ये सर्च केले असता Ingles Grocery Store ची चेन नॉर्थ कॅरोलायना व साऊथ कॅरोलायना मध्ये आहेत. अजून काही राज्यातही आहेत असे दिसले.

क्रमश : ....
Friday, January 22, 2016

२२ जानेवारी २०१६आजचा दिवस स्नो चा होता. तसे तर बुधवारी पण थोडा पडला, म्हणजे नुसता भुरभुरला. गुरवारी वादळ येणार येणार म्हणून तयारीत गेला. उद्यापर्यंत पडणार आहे. कदाचित लाईटी जाण्याची शक्यता आहे. अर्थात लाईटी गेल्या नाहीतर तर खरेच खूप बरे होईल !आजची रोजनिशी लिहायची म्हणजे त्या आधीच्या दोन दिवसांची भर घालायला लागेल. काल मला कामाला जायचे नव्हते आणि आज जायचे होते पण वादळ आल्याने आज सुट्टी ! वि आणि मी आज दोघेही घरी भजन करत बसलो आहोत.काल मी बराच आराम केला. केसांना रंग लावला. पोळी भाजी सकाळीच झाल्याने नंतर काही काम नव्हते. युट्युबवर काही ना काही बघत होते आणि एकीकडे बातम्याही ऐकत होते. तर काल रात्रीपासून आजच्या वादळाची तयारी केली. ढोढो भात आमटी आणि रस्सा केला. पोळ्या ४ च केल्या. वाल मार्ट मध्ये काही जरूरीचे घेण्याकरता गेलो तर ही गर्दी ! प्रत्येक जण सामान भरभरून घेत होते !  केळी घ्यावी म्हणावी तर एकही शिल्लक नाही. ब्रेड घ्यावा  तर अगदीच २ ते ४ होते. त्यातला एक घेतला. दुध, पाणी, मेणबत्ती, बटाटा चिप्स, काही कुकीज असे काही ना काही घेतले. घरी आलो जेवलो. झोपच लागली नाही. खूप गरम होत होते. म्हणून कूलर लावला. नंतर इतके काही थंड झाले कि परत हीटर  लावला. मला ३ वाजेपर्यंत झोप नाही.  त्यात मला पहाटे स्वप्न पडले की बातम्यांमध्ये सांगत आहेत की निसर्गाने खूप मोठा पोपट केला आहे. कामावर जा. स्नो , पाऊस, वारे काही काही नाहीये ! जाग आली तर वि उठला होता. म्हणाला बाहेर बघ. सगळीकडे पांढरा बर्फ पसरलेला आहे.
बातम्या ऐकून ऐकून डोके पकून गेले होते. खूप मोठा राडा होणार आहे हे सांगत होते. स्लिट, पाऊस, वारे, स्नो, पावर जाईल तयारीत रहा. आज सकाळपासून माझे नि वि चे वेळापत्रक वेगवेगळे लागले होते. वि पहाटे ५ लाच उठला होता. मी झोप नाही म्हणून ९ ला उठले. नंतर चहा घेतला, दुदू प्यायले आणि मफलर टोपी, जाकीट घालून खाली गेले बर्फाचे फोटो काढायला. मला तर खूप मोठी फेरी मारायची होती पण खूपच गारेगार झाले होते.  फोटोसेशन झाल्यावर आधी अंघोळ करून घेतली. धुणे धूउन घेतले. लाईट गेले तर ! आमटी भात, रस्सा गरम करून खाल्ला.
ढाराढुर झोपावे म्हणावे तर अजिबात झोप लागली नाही.  वि ने ब्रेड आणि रस्सा खाल्ला. संध्याकाळी गरम गरम उकड खायला केली. आता रात्री परत भीतीपोटी उद्याचाही स्वयंपाक करून ठेवणार आहे. कारण की संध्याकाळी परत जास्तीचा स्नो पडणार आहे असे सांगत आहे.
सकाळी  उठलो आणि लाईटी नसल्या तर स्वयंपाक करून ठेवलेला केव्हाही चांगलाच.. उद्यापर्यंत कुठेही न जाण्याची शिक्षा आहे ! परवा मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश आहे !