Sunday, October 18, 2015

१८ ऑक्टोबर २०१५


मागच्या आठवड्यात डाऊन टाऊन ला गेलो तर रंगांची बहार होती. फॉल रंगाची पिवळी झालेली पाने फूटपाथच्या दोन्ही बाजूने होती. मांडव घातलेला जणू असे दिसत होते. काल आणि आज हवा स्वच्छ आणि सुंदर होती त्यामुळे दोन्ही दिवस छान गेले. नाहीतर मागच्या तीनही वीकेंडला गचाळ आणि ढगाळ हवा आणि पाऊसही ! सूर्यप्रकाश असतो तेव्हा खरेच खूप छान वाटते आणि
सूर्यप्रकाशामध्ये जबरदस्त थंडी असली तरीही चालते. काल २६ इंटरस्टेला असलेल्या एका लोकल पिझ्झा गृहात गेलो. चविष्ट पिझ्झा आणि सलाडही छानच होते. आज ग्रीनवीलला गेलो. कणीक संपायला आली होती आणि इंडीयन भाज्याही घेता येतील म्हणून गेलो. तिथे गेल्यावर एका भारतीय उपहारगृहात जेवलो. साधारण ४ वर्षाने या उपहारगृहात गेलो होतो. जेवण छानच होते. शिवाय गोसरी, भाज्याही ताज्या मिळाल्या. 
ग्रीनवीलला आलोच आहोत तर तिथली एक पार्क बघण्याचे ठरवले. पार्क खूपच आवडून गेली. तिथे नदीही वाहते आणि ती धबधबा बनून वाहते. शिवाय आजूबाजूला चालायलाही बरीच जागा आहे. हिरवळ आहे. सर्व बाजूने धबधबा पाहिला. चालणे झाले. फोटो सेशनही झाले. अर्थात ते व्हायलाच हवे ना !


 ही पार्क लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण जोडपी, अश्या सर्वांकरता छान आहे. मागच्या वीकेंडला छान रंग दिसले म्हणून काल संध्याकाळी डाऊन टाऊनला फिरायला गेलो तर रंग उतरले होते. एक झाड मात्र नारिंगी रंगाच्या पानाने भरून गेले होते. त्याचा फोटो काढला.  शिवाय ही जी पार्क बघितली तिचे नाव आहे फॉल पार्क. तिथल्या धबधब्याचे काही विडिओ शूटींग घेतले. ही पार्क खूप आवडून गेली. एकूण वीकेंड खूपच छान गेला आहे त्यामुळे उत्साह आला आहे.

No comments: