Monday, June 08, 2015

८ जून २०१५


मी जरी आज रोजनिशी लिहीत असले तरी हे जे काही वेगळे घडले ते शनिवार रविवारचे मिळून आहे. काल खूप दमायला झाले होते म्हणून रोजनिशी लिहिली नाही ती आज लिहीत आहे. वेगळे घडले म्हणजे शनिवारी आम्ही घराची साफसफाई करून बाहेर जेवायला जातो ते गेलो नाही. वि ला म्हणाले की आजचा दुपारचा व रात्रीचा स्वयंपाक , म्हणजे दोन्ही वेळेचा एकाच वेळी स्वयंपाक करते , त्याप्रमाणे तो केला. मला एक रेसिपी करायची होती म्हणजे जी मला सुचलेली तिचा योग आला. वि च्या ऑफीसमधल्या मित्राने झुकिनी स्वॅश त्याच्या बागेतले २ दिले होते. तर मी मुगाची डाळ भिजत घालून  भाजीत  दाण्याचे कूट  व झुकिनी चिरून टाकली व भाजी केली. अर्थात त्यात अजून थोडे बदल करून परत एकदा भाजी करून मग त्याची रेसिपी लिहिणार आहे. तर शनिवारी २ भाज्या केल्या. एक झुकिनी प्लस मुग डाळ , दुसरी पालक व अरूगुला त्यात मिक्स कांदाही घातला जोडीला. अशी भाजी मी नेहमीच करते. ही भाजी पण मला सुचलेली आहे आणि तिची रेसिपी पण लिहिली आहे. शिवाय टोमॅटो व गाजर मिक्स अशी कोशिंबीर केली. दोन्ही वेळच्या पोळ्या केल्या आणि मसूर डाळ रात्रीसाठी भिजत घातली. गेले २ दिवस आणि आजही प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सोबत हवेत आर्द्रताही आहेच. तर जेवण करून आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली आणि उठल्यावर चहा घेऊन आमच्या जवळच्या तळ्यावर चालायला गेलो. तिथे छन सूर्यास्त पहायला मिळाला आणि फोटोही घेतले. ते ली रिंगरला पाठवून दिले. बघू आता तो वेदर शॉट मध्ये दाखवतो का ते ! चालल्यावर खूप बरे वाटले.खरे तर रात्री जेवणाला पोळी भाजी होती. पण मला फोडणीची पोळी करायची खूपच हुक्की आली आणि चविष्ट फो. पो केली. बाकीच्या भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या. मसूराची उसळ केली होती. ती फ्रिजमध्ये टाकली. उद्याला होईल म्हणून. रविवारी सकाळी साफसफाईची कामे झाली. बाहेर जेवायला गेलो. पण आज जरा काहीतरी वेगळे म्हणून पानेरा ब्रेड उपहारगृहात गेलो. तिथे सँडविच, टोमॅटो सूप आणि मँगो स्मुदी घेतली. जरा काहीतरी वेगळेपण आले. मला मॉलमध्ये सोडून वि लायब्ररीत जाऊन घरी परतला. मला घरात घालायला मॅक्सी घ्यायचे होते. स्कर्टही बघितले. आवडलेही पण माझ्या मनाप्रमाणे मला मॅक्सी खूपच आवडून गेले आणि खरेदी केले. तिथल्या एका दुकानात कानातले खूपच छान होते. ते नुसते बघितले. खरे तर मला मोठ्या रिंगा घ्यायच्या होत्या. पण तिथे त्या नव्हत्या. वि परत मला न्यायला आला. मॉलमध्ये चालून आणि उन्हाळ्याचा सगळीकडे ए‌सी लावतात तोही मला सहन होत नाही, म्हणून माझे डोके प्रचंड दुखत होते. घरी आल्यावर चहा घेतला. नंतर कणिक भिजवून पोळ्या केल्या. आदल्या दिवशीची मसूराची उसळ होतीच. नंतर ग्रोसरी करता अजिबात जाववत नव्हते पण जावे हे लागतेच. ती करून आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते. आल्यावर लक्ष या मालीकेचा एपिसोड पाहिला आणि झोपलो. "तू जीवाला गुंतवावे" ही मालिका चांगली वाटत आहे. त्यात पाणी ओतायला सुरवात केली नाही म्हणजे बरे होईल. विषय वेगळा आहे. त्यामुळे जरा चांगले वाटत आहे.


जरा वेगळे गेले दोन दिवस. हवा मात्र अजिबातच चांगली नाहीये! उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे तरीही तापमान बरेच वाढलेले आहे !!

2 comments:

Anonymous said...

hi रोहिणी,

अॅटलांटा आणि पानेरावरचे लेख विशेषकरून आवडले. ते मत्स्यालय खूपच छान आहे आणि पानेराची सूप्स आणि सँडविचेसही.

rohinivinayak said...

Thanks so much !! :)