Thursday, December 03, 2015

३ डिसेंबर २०१५

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला हवी. आज स्वच्छ सूर्यप्रकाश तर काल पाऊस आणि ढगाळ हवा. काल जेव्हा सकाळी कामाकरता दोघेही बाहेर पडलो तर आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस पडून गेला आहे ते चांगलेच  जाणवत होते ! सर्वत्र खूपच ओल दिसत होती तर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. असे वाटत होते झोपून राहावे कामावर जाऊच नये.!




कालचा दिवस खूप छान होता तर आज कामावर जायचे नसूनही झोपेत आणि आळसात दिवस गेला. आज हेअर कलर केला. काल रात्रीला केलेली भरल्या वांग्याची भाजी होती म्हणून आज मी वरण भाताचा कूकर लावला. आणि गरम भात त्यावर तूप व सोबत भरली वांगी. भात खाल्याने आणि डोक्यावरून अंघोळ केल्यानेच बहुतेक आज खूप झोप लागली होती. काल तसे काम बरेच कमी होते. चालताना हवेत सुखद गारवा होता. आल्यावरही थोडावेळ पडून कामे उत्साहाने केली.




कामावरची विकी आज माझ्या खूप प्रेमात पडली होती. तिथे मला क्लब संडविच कसा बनवायचा ते दाखवले. ती काल लवकर निघणार होती. तिचे कोलोस्ट्रोल खूप वाढल्याने तिच्या डॉक्टरांनी तिला वेज डाएट करा असे सांगितले आहे. आणि म्हणून ती स्टोअर्स मधले व्हेज बर्गर घेण्याकरता गेली आणि मला पण बरोबर नेले.  स्टोअरस मध्ये आता सर्वांना माहीत झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते ! विकीने निघताना मला हग केले. कार्मेन काल नव्हती आणि लुलू पण दुसऱ्या कामात बिझी होती.




रविवारी खूप काम होते इतके की सोमवार मंगळवार सुट्टी होती आणि आरामही बऱ्यापैकी झाला होता तरी पाय खूप दुखत होते.  पण कालचा दिवस मात्र छान च ! कमी कामाचा. बाहेर पावसाळी हवा. कामावरून निघताना बाहेर पडले आणि चालत आले तरी त्रास झाला नाही. उलट छान वाटत होते. पावसाने रस्त्याच्या कडेला ओहळ निर्माण झाले होते. थोडे थांबून त्या वाहत्या पाण्याकडे पाहत मनात विचार आले की आयुष्य हे ओहळासारखेच सतत वाहणारे हवे. थांबले तर आयुष्य ठप्प होऊन जाईल आणि मजाच निघून जाईल. 


 
काल आल्यावर मी गवार निवडली.  गवार निवडताना मी तल्लीन होऊन जाते इतकी मला ती निवडायला आवडते. आज कार्ल्याची परतून भाजी आणि मुळ्याची कोशिंबीर आहे. आज सुट्टी असल्याने संध्याकाळी कोरडी भेळ करून खाल्ली. चुरमुरे, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि इंडियन स्टोअर्स मधून आणलेली तिखट मिरची चुरडून लावली. अशी भेळ आम्हाला दोघांनाही खूपच आवडते. त्यात भाजके दाणे हवेच.


चला आता लागोपाट ३ दिवस कामाला जायचे आहे ! उद्या कामावार जायचे नाही याची मजा
आदल्या दिवशीच !
 
 

2 comments:

Anonymous said...

Tumhi jashya gavar nivadtana tallin hota na agdi tasach maalahi baryach bhaajya nivadtana hota, avdicha kaam ahe majha! :-) amhi adhun madhun kachcha chivda banavto, toh pan sukhya bhele sarkhach pan farsan nasta tyaat, dadpe pohe chya javal paas ahe asa samja. Amhi recently ithe Katyaar Kaljat Ghusli pahila, khupach sundar cinema ahe! Ithe suddha houseful hota. Tumhi pan nakki paha tithe ala ki. Tyatli gaani tar mantramugdha karnari ahet, tumhi aiklich astil pan tyach barobar saaglya kalakarani kaam hi khup chaan kelay. Tumhaala nakki avdel.

- Priti

rohinivinayak said...

are vaa, mastach ! Thanks Priti !