Wednesday, September 02, 2015

Factory 2 U

चलो चलो चलो चलो Factory 2 U ! टेक्साज राज्यातले कपड्यांचे हे एकमेव दुकान इतरत्र कोठेही पाहिले नाही. हे दुकान बंद होण्याच्या मार्गावर होते म्हणून क्लोजिंग सेलची जाहिरात पाहिली.मी व माधवी मिळून तिथे जायला लागलो. रोज दुपारी दुपारची जेवणे झाल्यावर निघायचो ते संध्याकाळी परतायचो. ह्या दुकानात आम्ही अगदी इथपर्यंत गेलो की आता उरलेले सर्व कपडे फूकट घेऊन जा इतके सांगायचेच बाकी होते ! त्यात लहान मुलांचे कपडेही होते. माधवीला तिच्या भाचीकरता बरेच कपडे पाठवायचे होते. मी पण एक टी शर्ट घेतला होता. ६० सेंटस मध्ये ! आकाशी रंगाकडे झुकणारा, जरा वेगळाच रंग होता. काही दिवस घातला. 

आता असे वाटते की आठवण म्हणून तो टी शर्ट ठेवायला पाहिजे होता. क्लोजिंग सेलमध्ये रोज
थोडे थोडे सेंट कमी करत लेबले बदलली जायची.  सर्व खरेदी केल्यावर "अभी एक लास्ट ट्राय! " म्हणून आम्ही दुकानात गेलो तर ते बंद! बहुधा सर्व वस्तुंची विक्री झाली असावी. माधवीला त्या दुकानामधला एक छोटा फ्रॉक आवडला होता, पण त्याची किंमत जास्त होती. किंमत कमी होईल म्हणून आशेने तिथे ग्लो तर दुकान बंद!


 
 तिला खूप हळहळ वाटली. जवळपास १०० डॉलर्सची खरेदी तिने केली होती. एके दिवशी तिने मला घरी बोलावले व आत्तापर्यंतची खरेदी आपण परत पाहू असे सांगितले. ती दूपार छान गेली. लहान मुलांच्या छोट्या छोट्या कपड्यांचे कौतुक केले. मोजे, टोपडे, झबली आणि इतर काही एकेक करून हातात घेऊन "ये देख, कितना अच्छा है ना! " असे करत दुपार घालवली. माधवी व माझी खूप गट्टी जमली होती.
 
 
 फोनवरून अगणित गप्पा, म्हणजे लँडलाईन वरून हं ! लोकल कॉल्स फूकट होते ! प्रत्यक्षात भेटून कुठे कुठे जायचे हे ठरवणे व जाणे. त्यात जॉब हंटिंगचा भाग मुख्यत्वेकरून होता. त्याचे वेगळे अनुभव मी लिहीणारच आहे

 
 आम्ही दोघींनीही जे २ डिपेंडंट व्हिसावर वर्क परमिट काढले. त्याचा उपयोग माधवीला डेंटन शहरात झाला. आमचा डेंटनमधला कालावधी १ वर्षाचा होता. नंतर आम्ही क्लेम्सन शहरात आलो.
 
 तिथे माझ्या वर्क परमिटची मुदत वाढवून घेतली.  क्लेम्सन मध्ये मात्र वर्क परमिटचा उपयोग झाला. मला ३ नोकऱ्या लागल्या.
 मला फक्त शनिवार वार मोकळा असायचा. छानच गेले तिथले दिवस!

 
 
 

No comments: