Wednesday, August 26, 2015

CFCC - North Campus - Wilmington - NC - (2)

"टॉक टॉक टॉक" असा आवाज आला की समजावे की Clarke बाई आल्या ! खूप उंच टाचेच्या चपला, केस मोकळे, पेहराव नेहमी वन पीस, गळ्यात मोठाल्या माळा, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हाताने फळ्यावर लिहीणार. १० वाजून १० मिनिटे होत आली तरी सुद्धा अजून Mr. Currin कसे आले नाहीत? आम्ही सर्वजणी माना वेळावून भिंतीवरच्या घड्याळाकडे बघतो न बघतो तोच करीन यांचा वर्गात प्रवेश!   Hey, how are you  doing? असे म्हणत येणार. सतत हसतमुख, प्लेन शर्ट व नेहमी टाय लावणारच ! शुक्रवारी मात्र जीन  आणि टी शर्ट.

दोघांची रोल कॉल घ्यायची पद्धत वेगळी आहे. Mr. currin वही उघडून प्रत्येकाचे नाव वाचणार व आम्ही " here" असे म्हणले की "where" असे म्हणून त्या विद्यार्थ्याकडे बघूनच हजेरी लावणार. मी आधी येस म्हणायचे मग हीयर असे म्हणायला लागले. Mr. Clarke बाईंनी पहिल्यांदाच रोल कॉल घेताना सगळ्यांचे चेहरे पाहून लक्षात ठेवले आणि नंतर प्रत्येक वेळी हजेरी लावताना बारीक डोळे करून पाहणार कोण कोण आलयं ? आणि मग त्यानुसार हजेरी लावणार.Clarke बाईंची शिकवण्याची पद्धत मला आवडली. धड्यातले मुद्दे फळ्यावर लिहून नंतर प्रत्येक मुद्दा विस्ताराने सांगणार. Mr. Currin फळ्यावर एकही अक्षर लिहिणार नाही. धड्यातली २ - ४ वाक्ये वाचून दाखवणार  व आमच्याकडून त्यांना चर्चा अपेक्षित असे. give an example, Rohini, what do you think?   असे  म्हणल्यावर मी उत्तर द्यायचे व लगेचच yes, that's correct !  इतर बायकाही सांगायच्या, शंका विचारायच्या. कुणी शंका असेल तर हात वर करणार, मग तिला म्हणणार "येस मॅम" अधून मधून विनोद, कुणाचा रिंग टोन वाजला की मध्यच पॉज घेऊन हासणार. मी आधी पुस्तक न्यायचे नाही, मग न्यायला लागले. जाडी जाडी पुस्तके धरून हात दुखतात म्हणून न्यायचे नाही. मी एका सेमेस्टरला २ विषयच घेते. कॉलेज ५ विषय घ्या असे सुचवते. काही जण ५ नाहीतर काही जण ३ विषय घेतात.
 ३ किंवा ५ विषय घेतले की भलेमोठे धोपटेच घेऊन यावे लागते. विमानतळावर न्यायला चाके असलेल्या छोट्या बॅगा कशा असतात ना तश्याच बॅगा काही जणी आणतात तर काही जणी बॅकपॅक आणतात. काही जणी खूप लांबून येतात. वर्गात पहिल्या दिवशी कोणी ज्या खुर्चीवर बसलेले असेल ती खुर्ची त्याची/तिची होऊन जाते. एकदा काय झाले एका ब्लॅक मुलीची ठरलेली खुर्ची होती त्यावर गोरी बाई बसली. ब्लॅक मुलगी त्या दिवशी उशीराने आली तर तिने त्या गोरीकडे रागाने पाहिले. आणि दुसरीकडे जाऊन बसली. मग गोरी तिला सॉरी म्हणाली.


वर्गात शिकवत असताना मी निरिक्षण करत बसायचे. कोण काय काय करतयं? कुणी नखं खातयं तर कुणाकुणाला बसल्या बसल्या डुलकी लागलेली असायची. कुणाला बरे नसेल तर तो बाकावर डोके ठेवून झोपायचा तर कुणी फोनवर टेक्स्ट करत बसायचे. मध्येच कुणीतरी मागे वळून घड्याळाकडे बघायचे, तसे तर मी पण काही वेळा बघायचे मागे वळून तास संपायला किती वेळ आहे?, कुणी पाणी पितयं तर कुणी कोक पितय, तर कोणी वर्गात बसून विषयाच्या नोटस लिहीतयं. एक ना दोन बरीच मजा मजा बघायला मिळायची. मी लेक्चर ऐकताना एकीकडे वहीच्या पानावर नक्षी काढत बसायचे. हाहाहा. वेळ संपत आली की पुसतके वह्या दप्तरात ठेवायला लागायचे. करीन सर घळ्याळाकडे बघून लेक्चर आवरते घ्यायचे आणि विचारायचे any questiions? इथे सेमेस्टरच्या पहिल्याच दिवशी त्या सेमेस्टरचा अभ्यासक्रम, गृहपाठ, परीक्षा यांचे पूर्ण सेमेस्टरचे वेळापत्रक देतात. गृहपाठ खूप असतो. करीन यांच्या विषयाला तर दर १५ दिवसांनी  २ टॉपिकवर परीक्षा व एका टॉपिकवर गृहपाठ असायचा.  त्यातून २ विषय म्हणजे सततचे गृहपाठ आणि परीक्षा चालूच असतात. डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर एका सेमेस्टरला ३ किंवा ५ विषय घेतले तरच वेळेत तो पूर्ण होऊन नंतर नोकरीसाठी प्रयत्न किंवा एकीकडे नोकरी व शिक्षण घेणारेही काहीजण आहेत. मला मात्र कशाची चिंता नाही. मी वेळ जाण्याकरता शिक्षण घेत आहे. इथली परीक्षेत true or false, multiple choice , short answers असे असते.

मला इथल्या कॉलेजचा अनुभव खूपच छान आला आहे. घरातली कामे म्हणजे स्वयंपाक, कचरे टाकणे,
भांडी घासणे, ग्रोसरी, साफसफाई  गृहपाठ, परीक्षा  म्हणजे सततचा अभ्यास करून खूप दमायला होते पण मन खूप आनंदी रहाते.

 कॉलेजला जाणे, त्या आधी पटापट आवरणे, अभास करणे एकूणच सर्व करून मी खूपच चपळ बनले होते. परीक्षेत ९० च्या पुढे मार्क पाहून इतके काही छान वाटायचे ना !अर्थात विनायकच्या मदतीमुळेच (अभ्यास व इतर कामे) मी हा पॅरालीगलचा डिप्लोमा पूर्ण करीन हे अगदी नक्की!  पुढील भागात विल्मिंग्टनच्या आठवणी एकेक करून लिहीत राहीनच, तूर्तास इतकेच !

क्रमश : ....

No comments: