Sunday, May 08, 2011

दिनांक ८ मे २०११दर रविवारचा सूर्यास्त आम्ही सहसा सोडत नाही. मी नेहमी म्हणते की आता बास करते सूर्यास्ताचे फोटो काढणे पण काही वेळा खूप वेगळा अस्त पाहण्यात आला की मोह होतोच. आमच्या शहरात एक नदी आहे त्यावर एक लाकडी पूल आहे तिथे चालायला छान वाटते. जाऊन येऊन एक दीड मैल चालणे होते. बरीच मंडळी मुलाबाळांसह इथे चालायला येतात. शिवाय इथे एक आयस्क्रीमचे दुकानही आहे. या पूलावर अधून मधून बसायला लाकडी ठोकळे केले आहेत. इथे चालणे तर होतेच शिवाय सूर्यास्तही पाहायला मिळतो.

ही नदी डाऊनटाऊनला आहे त्यामुळे इथे थोडी रेस्टॉरंट आहेत. इथल्या एका उपहारगृहाच्या पुढे एक फुलांचा वेल आहे. ही फुले मला नेहमी प्राजक्ताच्या फुलांची आठवण करून देतात. अगदी तशीच दिसतात. या फुलांच्या मध्ये फक्त नारिंगी रंग नाही. आज मला या लाकडी पूलावर लव्हेंडर रंगाची खूप नाजूक फुले दिसली. खूप छान होती. या सर्वांचे फोटो काढले की आपल्याकडे किती छान छान फोटोंचा साठा आहे असे वाटते. अशी सगळी स्मृतीतली फुले नंतर पाहताना मन प्रसन्न होते.

निघण्याच्या आधी आज मी बरेच दिवसांनी फोडणीचे चुरमुरे केले होते. ते खाल्यावर पण तोंडाला छान चव आली. ते खाऊन निघालो नदीवर जाण्यासाठी. आज सकाळी खरे तर काहीच करू नये असे वाटत होते कारण की आदल्या दिवशी रात्री झोपायला थोडा उशीर झाला होता. आपलीमराठीवर उशीराने एक चित्रपट पहायला सुरवात केली. पहिल्यांदा हा चित्रपट छान वाटला. नंतर महाबोअर झाला. पूर्ण नाही पाहिला. चित्रपटाला नीट पकड घेत नव्हती. चित्रपटाचे नाव यंदा कर्तव्य आहे. त्यापेक्षा मला तो पुणे मुंबई पुणे खूपच आवडला होता. पूर्णपणे संवादावर आधारित चित्रपट, शिवाय पुण्याचे शुटिंग पाहताना खूप छान वाटत होते. मी तो अजून एकदा तरी नक्कीच पाहणार आहे. आज संध्याकाळी आपली मराठीवर एका डॉक्टरने दिलेली माहिती पाहिली. प्रशांत दामले प्रश्न विचारत होते. खूप उपयुक्त माहिती होती रक्तदाब, मधूमेह व ऱ्ह्दयविकारावर.
नदीवरून आलो आणि मसालेभात केला भाज्या घालून कारण की काल थायीमधला फ्राईड राईसची चव रेंगाळत होती म्हणून परत मसालेभात केला. आज खरे तर कंटाळा आला होता रोजनिशी लिहायचा. साफसफाईची कामे करून व चालून खूप दमायला झाले होते पण लिहूच म्हणून लिहिली. संध्याकाळी बीचवर जायचे मनात होते पण बेत पालटला, कारण की चालणे झाले नसते.

2 comments:

Mangalsingh Dhanawat said...

खुपच सुंदर आहेत ही फुलांची अन सुर्यास्ताची छायाचित्रे. स्मृति वाचून अमेरिका सफर केल्याचा आनंद मिळतो.
धन्यवाद.
मंगलसिंग धनावत, जालना, महाराष्ट्र.

rohinivinayak said...

Thanks so much !!!