Tuesday, May 03, 2011

डेंटनचे दिवस...(२)

सत्या दुसऱ्या शहरात गेल्यावर मी व प्रविणाच होतो. आम्ही दोघी दुपारच्या एकमेकींकडे जाऊन गप्पा मारायचो. गप्पांमध्ये चहा असायचा व बरोबर बटाटा चिप्स. काही वेळेला आम्ही जिन्यात बसून गप्पा मारायचो. त्या अपार्टमेंटमध्ये बाहेरून जिने होते. ती माझ्याकडे बरेच वेळा कांदा, बटाटा वगैरे उसने मागायची. आम्ही दोघींनी असेच काही चमचमीत बनवले तर ते एकमेकींकडे द्यायचो. वेगवेगळ्या पदार्थांचे व वेगळी चव असलेले पदार्थ आम्हाला दोघींना खूप आवडायचे. त्यावेळेला मी कोबीची भजी खूप वेळा करायचे.





थोडे दिवसांनी आम्हाला कविता नावाची तेलगू मैत्रिण मिळाली. ती खूप अबोल होती. तिचे मित्रमंडळी म्हणजे टी. व्ही व कॉंप्युटर होते. तिला बाकीच्या जगाशी काही घेणेदेणे नसायचे. तिच्या घरी गेले की मात्र चांगले बोलायची पण लक्ष मात्र पूर्ण टी. ही बघण्यात असायचे. नंतर नंतर आमाच्या तिघींचे खाण्याचे पदार्थ द्यायला घ्यायला सुरवात झाली. कविता रेसिपी वाचून पदार्थ बनवायची. तिच्या हातची पदार्थांची चव खूप छान होती. नंतर काही दिवसांनी आम्हाला माधवी नावाची तेलगू मैत्रिण मिळाली. तिची व माझी दोस्ती जास्त जमली कारण की तिला व मला बडबड करायला खूप आवडायचे. दिवसातून खूप वेळेला आम्ही फोनवरून बोलायचो. बोलण्याचा विषय अमेरिका किती बोअर आहे आणि भारत किती चांगला आहे हाच असायचा. असे बोलले की आम्हाला खूप बरे वाटायचे. बोलण्यातून 'बोअर' हा शब्द आला की आम्ही खूप हसायचो व म्हणायचो की बोअर शब्द आपण किती वेळा वापरतो ना!



मी तिला विचारले की तू तुझा वेळ कसा घालवतेस तर तिने सांगितले की मी सर्व आवरून व स्वयंपाक करून ९ वाजता संगणकावर बसते याहूवर चॅटिंग करायला ती १२ ला उठते. त्यावेळी तिचे भारतातले मित्रमैत्रिणी यायचे. नंतर ३ ते ५ ती तिच्या अमेरिकेतल्या बहिणींशी चॅटिंग करायची. तिच्या नवऱ्याला चॅटिंग केलेले अजिबात आवडायचे नाही. मी पण तिला माझे रुटीन सांगितले की सकाळी रेडिओवर गाणी ऐकता ऐकता स्वयंपाक. विनायक घरी आला की जेवण व थोडी डुलकी काढून कोक पिऊन ग्रंथालयात व येताना विनायकच्या लॅबमध्ये जाऊन दोघे परत येतो. नंतर काहीतरी खायला करून परत विनायक लॅबमध्ये गेला की रेडिओ ऐकता ऐकता पत्रे लिहिणे


मी भारतातल्या मैत्रिणींना, सासूसासरे, आईबाबा, बहीण यांना पत्र लिहीते हे ऐकून तिला खूप छान वाटले. माझी पत्र लिहिण्याची कल्पना तिला आवडली व तिने पण काही पत्र लिहीली. विद्यापीठातच एक छोटे पोस्ट ऑफीस होते. मला ते खूप आवडायचे. आमची पत्रे लिहून तयार झाली की एकमेकींना फोन करून पोस्ट ऑफीसमध्ये यायचो पत्र टाकायला. मी वाढदिवसाची ग्रीटींगही पोस्टाने पाठवते हे ऐकून पण तिला छान वाटले. या पत्र टाकण्याच्या निमित्ताने आम्ही दोघी भेटायचो, बोलायचो. दुपारचे जेवण झाले की आम्ही यायचो पोस्ट ऑफीसमध्ये. नंतर चालत कधी ती माझ्याकडे यायची किंवा मी तिच्याकडे जायची. आमच्या घराशेजारी मॅकडोनल्ट होते. तिथे आम्ही व्हेज बर्गर खायचो. तिच्या घरी गेलो की ती कॉफी करायची व एकीकडे चिप्स आणि रेडिओवर गाणी ऐकायचो. गप्पा तर कायम असायच्याच आमच्या. तिलाही रेडिओवर गाणी ऐकायला आवडायची. तिला पदार्थ बनवून खाण्यात रस नव्हता. प्रविणाने एकदा बुंदी लाडू बनवले व मला दिले व कविताला दिले. आम्हाला दोघींनाही ते खूप आवडले म्हणून एकदा आम्ही तिघींनी मिळून आमच्या तीन फॅमिलीज करता बुंदी लाडू बनवले होते. प्रविणाला माझे समोसे खूप आवडायचे. एकदा कविताने व्हेज मँच्युरियन केले. नंतर तिला रेसिपी विचारून आम्ही दोघींनी पण बनवले.


काही दिवसांनी एक छोटे बांगला देशी शॉप सुरू झाले. तेथून आम्ही चित्रपटांच्या कॅसेट आणायचो. जी कॅसेट आणेल तिने ती सर्वांना द्यायची व मग नंतर परत करायची. त्यात एकदा मी 'कैरी' सिनेमाची कॅसेट आणली होती. प्रविणाला 'कैरी' खूप आवडला. एकदा कविताने 'लगान' चित्रपटाची कॅसेट आणली होती. तेव्हा लगान नवीन होता त्यामुळे ती कॅसेट दुसऱ्या दिवशी लगेच परत करायची होती म्हणून मग आम्ही सर्वांनी मिळून 'लगान' चित्रपट कविताच्या घरी पाहिला. तिघींच्याही घरी वेगवेगळी जेवणे झाली. नंतर मी सगळ्यांना जेवायला बोलावले व मराठमोळा स्वयंपाक केला व सांगितले आज अबिबात भात खायचा नाही, पोळ्या खा!



मी एकदा प्रविणाला विचारले की तुम्ही जेवणात भातच भात कसा काय खाता? तर तिने सांगितले की भाताबरोबर आम्ही रसम, सांबार, दोन भाज्या असे सर्व काही करतो व प्रत्येकाबरोबर भात खातो, व सर्वात शेवटी दही भात खातो. खरा तर मला भात जास्त आवडत नाही पण एकदा तिने सांगितलेल्या पद्धतीने सर्व काही केले आणि चक्क मी भरपूर भात खाल्ला. भाजीबरोबर भात खायला पण छान लागतो!

No comments: