Wednesday, June 12, 2013

आज इथं तर उद्या तिथं !...(३)

विनायकला अमेरिकेत post doctorate मिळाली. हे शिक्षण नसून यात पदवी नसते तर विद्यापीठात संशोधनाचा अनुभव घेता येतो आणि जे संशोधन केले त्याचे पेपर जर्नल्समध्ये प्रकाशित होतात. संशोधन करण्याकरता विद्यापीठात अर्ज करावा लागतो. तिथल्या प्राध्यापकांनाही संशोधक हवेच असतात. अमेरिका सरकारकडून त्याकरता विद्यापीठांना अनुदान मिळते. फेलोशिप खूप काही नसते पण दोघांचे भागेल इतपत असते. अमेरिकेत खाण्यापिण्याच्या खर्चा व्यतिरिक्त इथल्या घराचे भाडे आणि जीवन विमा उतरवण्यासाठीच जास्त पैसा लागतो. जीवनविमा हा उतरवावाच लागतो. कारण की जर का काही बरे वाटत नसेल तर डॉक्टर लोक बिनाविम्याची केस हातात घेत नाहीत. आणि त्यातून जर का हातघाईची पाळी आलीच तर दिवाळे वाजते इतका खर्च येतो.हिंदुस्तान लिव्हरमध्ये एखाद्याच्या कपाळावर जर अमेरिका किंवा इंग्लंड सारख्या देशाचा शिक्का नसेल किंवा तुमच्या मागे कोणी गॉडफादर नसेल तर प्रमोशन मिळत नाही. हुशारीला आणि मेहनतीला काही किंमत नाही. हिंदुस्तान लिव्हरमध्ये जॉईन होण्या आधी त्यावेळच्या बॉसने विनायकला सांगितले होते की तुमचा post doctorate करण्याचा विचार असेल तर जॉईन होऊ नका. घराचा हप्ता आणि त्यातून लग्न झाल्यामुळे वाढलेली जबाबदारी म्हणून नोकरीच करणे अत्यावश्यक होते. शिवाय परदेशात जाण्यासाठी पैसेही भरपूर लागतात ते कोण देणार होते?


अंधेरीत जेव्हा आलो तेव्हापासून २ वर्षाच्या आत हिंदुस्थान लिव्हर अंधेरीचे केमिकल युनिट बंद पडण्याच्या मार्गावर होते त्यामुळे विनायक दुसऱ्या नोकरीच्या शोधात होताच. त्याचवेळी त्याचा तांडेल नावाचा मित्र अमेरिकेतून आला होता व आम्हाला भेटण्यासाठी घरी आला. गप्पांमध्ये त्याला नोकरीविषयी कळाले आणि तो म्हणाला की तू post doctorate साठी अर्ज का नाही करत? मी तूला माझ्या गाईडचा ईमेल पत्ता व अजून २/४ पत्ते देतो तिथे तू अर्ज कर. विनायकने ईमेल केला आणि लगेचच एकाचे उत्तर आले. ईमेलने पत्रव्यवहार आणि काही गोष्टींची पूर्तता केली आणि उत्तराची वाट पाहत होतो. आमचे अमेरिकेला जाणे कोणत्याही प्रकारचे अडथळे न येता झाले तर नवलच होते! वाईट घटनांचा क्रम लागलेलाच होता. त्यात एकाने उच्चांक गाठला. विनायक जणू मरणाच्या दारात उभा होता. या परिस्थितीत आम्हाला बऱ्याच जणांची मदत झाली. कंपनीतल्या सर्वजणांची खूप मदत झाली. शिवाय डोंबिवलीचे आमचे मित्रवर्य श्री नेर्लेकर आणि विनायकचा आत्येभाऊ व त्याची बायको राहुल वैशाली त्या भयाण रात्री मला धीर देत होते. विनायकचे आईवडील, माझे आईबाबा, माझी बहीण व तिचे यजमान पुण्यावरून धावत आले व मला धीर दिला. त्याचवेळी प्राध्यापक ऍलन मर्चंड यांचे post doctorate in organic chemistry करता अपॉईंटमेंट लेटर आले.अमेरिकेला जाण्याच्या पूर्वतयारीसाठी आमच्या दोघांची प्रचंड दमणूक झाली. विनायकला मात्र उत्साह आला होता. पोटापाण्याची पुढची व्यवस्था हवीच ना ! संसाराचा पसारा खूप वाढला होता. कंपनीचा राजीनामा दिला आणि बऱ्याच कागद पत्रांची पूर्तता केली. पुण्याला राहत असलेल्या दोघांच्या आई वडिलांना भेटून आलो. आमच्या दोघांचा व्हीसा झाला. सासुबाईंनी सर्व नातेवाईक व विनायकच्या मित्रमंडळींना जेवायला बोलावले. आई त्यावेळी नेमकी माझ्या भाच्याकडे रहायला गेली होती. ती तिथून लगेच परत येणार होती व आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलावणार होती. पण मीच नाही म्हणाले. तिला म्हणाले की वेळ अगदी कमी आहे. तुमच्या सर्वांचीच खूप धावपळ झाली आहे आणि मी नंतर तुझ्याकडे रहायला येणारच आहे. पुण्यावरून परत अंधेरीला आलो आणि सत्यनारायण घातला आणि संध्याकाळी प्रसादाला फक्त आणि फक्त कंपनीतल्या लोंकाना बोलावले. कंपनीतल्या मैत्रिणींनी नंतर आम्हाला जेवण दिले. पुण्याला विनायकच्या मावशीने प्रवासाला नेता येण्याजोगी एक मोठी बॅग भेट म्हणून दिली. त्याच्या मामाने एक रेडिमेड शर्ट दिला आणि दुसऱ्या मावशीने पाकीटातून पैसे दिले.

विनायक आधी जाणार होता आणि मी आईकडे राहून ३ ते ४ महिन्यांनी जाणार होते. कंपनीतल्या एकाने असे सुचवले की जर तुमच्या दोघांचा व्हिसा झाला असेल तर एकत्र जाणे केव्हाही चांगलेच. एकाला एक असलेले चांगले कारण की तिथे तुम्ही नव्यानेच जात आहात. प्राध्यापक मर्चंड यांनीही आम्हाला तुम्ही दोघे येऊ शकता. इथे राहण्याची तात्पुरती सोय माझ्या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यात होऊ शकेल असे कळवले. त्यामुळे आम्ही दोघांनी एकदम जाण्याचा निर्णय घेतला. आता मात्र एकेक दिवस कमी कमी होत निघण्याची वेळ जवळ येत चालली. आईबाबा, रंजना, तिचे यजमान आणि माझी भाची सई आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी आली. येताना आईने मला शाई रंगाचा पंजाबी सूट व मला व विनायकला तिथे खूप थंडी असते म्हणून चांगल्या प्रतिचे स्वेटर भेट म्हणून आणले. अंधेरीचे घर अस्ताव्यस्त पसरलेले होते. सर्व फर्निचर एकेक करत ट्रकमध्ये भरले जात होते. मी चार बॅगांमध्ये सामान भरत होते. आई व रंजनाने मला बॅगा भरण्यास मदत केली. घर पूर्णपणे रिकामे झाले. आम्हाला भेटून दुसऱ्या दिवशी सकाळी आईबाबा, रंजना, सुरेश व सई परतीच्या प्रवासाला निघाले. आईबाबांना नमस्कार केला आणि मला जे भरून आले ते शब्दात वर्णन करता येणार नाही. आम्हां दोघी बहिणींना अश्रू आवरत नव्हते. त्यांना टाटा केला. आमच्या घरी शुभांगी नावाची बाई कामाला होती. तिची तर मला खूप म्हणजे खूपच मदत झाली होती !! तिचा निरोप घेतला. निरोप घेताना शुभांगी मला म्हणाली की जपून जा. एकमेकांची काळजी घ्या. भारतात आलात की मला नक्की भेटायला या. मी तुमच्या घरी काम करते आहे असे मला कधीच वाटले नाही इतकी घरच्यासारखी वागणूक तुम्ही मला दिलीत.

आमच्या अवाढव्य चार बॅगा विनायकचा मित्र राम भट कडे टाकून आम्ही डोंबिवलीतल्या नातेवाईक व मित्रमंडळींना भेटायला गेलो. आम्ही ज्या साकेत बिल्डिंगमध्ये राहतो ते सर्वजण खूप चांगले आहेत. नेहमी मदतीचा हात पुढे असतो. नेर्लेकर कुटुंब तर आमच्या घरच्यांसारखेच आहेत. शैलाताईं व खाडीलकर या दोघांचे आम्हाला नेहमीच आग्रहाचे जेवणासाठी निमंत्रण असते. आम्ही जेव्हा म्हणून डोंबिवलीला जातो तेव्हा त्या आम्हाला जेवायला बोलावतात. आधी निवांतपणे गप्पा आणि नंतर साग्रसंगीत चविष्ट जेवण असते.


डोंबिवलीच्या सर्वांना भेटून आम्ही परत अंधेरीत राहत असलेल्या विनायच्या मित्राकडे म्हणजेच राम भट यांच्याकडे आलो. लुफ्तांझा एअरलाईन्सची तिकीटे होते. शकुंतला माझी मैत्रिण हिने स्वयंपाक करून आम्हाला गरम गरम जेवायला वाढले. म्हणाली व्यवस्थित पोटभर जेवा. तिकडे गेल्यावर असे जेवण मिळणार नाही. तिच्या घरी परत एकदा बॅगांमध्ये काय काय घेतले आहे, काय काय घ्यायचे आहे ते परत एकदा तपासले. मुंबईच्या हवेतल्या दमटपणामुळे घामाची सतत धार होतीच त्यातून मे महिना आणि प्रचंड झालेली दमणूक होती. त्यामुळे आम्ही दोघांनी गार पाण्याची डोक्यावरून अंघोळ केली तेव्हा खूप फ्रेश वाटले. रात्री विमानतळावर निघण्याच्या आधी पुण्यावरून व डोंबिवलीवरून टाटाबायबाय चे फोन आले. तिच्याकडच्या देवाला नमस्कार करून सर्व जय्यत तयारीनिशी निघालो. राम भट, शकुंतला व त्यांचा मुलगा दीपराज आम्हाला विमानतळावर सोडायला आले होते. दीपराजच्या हातात खाऊचे पैसे ठेवले व त्यांना फायनल टाटाबाय बाय केले व विमानात बसलो. विमानात बसताना मी आईने दिलेला शाई रंगाचा पंजाबी सूट घातला होता. हेअर कलर व हेअर कट केला होता. मला खिडकीजवळ जागा मिळाली होती. विमानाने हळूहळू करत जेव्हा आकाशात उडी घेतली तेव्हा मी एकीकडे विमानाच्या छोट्या खिडकीतून मुंबईमधले खाली दिसणारे झगमगते दिवे बघत होते. खूप छान वाटत होते. ही माझी आत्तापर्यंतच्या आयुष्यात विमानात बसण्याची पहिलीच वेळ होती. काही वेळाने झगमगते दिवे दिसेनासे झाले आणि आता फक्त आम्हीच दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांचे आधार आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली.काही वेळाने थंडगार पेये घेऊन हवाईसुंदरी आली. व नंतर काही वेळाने विमानातले सगळे लाईट ऑफ झाले. घोंघों करत विमान जात होते आणि माझ्या डोळ्यासमोर एकेक करत मागे घडलेली सर्व चित्रे उलगडत होती. आपण स्वप्न तर पाहत नाही ना? परदेशगमनाचे भाकीत खरे ठरत होते.


आमच्या दोघांचा संसार परत एकदा फक्त आणि फक्त चार बॅगांमध्ये जमा झाला होता. एकात जरूरीची भांडीकुंडी, एकात कपडे, एकात पुस्तके आणि एकात सटरफटर सामान भरले होते. व्होल्टाजचा फ्रीज आमच्या कामवाल्या बाईला दिला. गोदरेजचे कपाट आणि आमची जुनी कॉट डोंबिवलीच्या जागेत ठेवली. अंधेरीच्या जागेत साधारण एक लाखाचे कौतुकाने घेतलेले पहिलेवहिले सर्वच्या सर्व फर्निचर, टीव्ही, वॉशिंग मशीन, वॅक्युम क्लीनर, गॅसची शेगडी, आणि उरलेली सर्व जास्तीची भांडीकुंडी माझ्या सासरी दिली.


अमेरिकेतल्या टेक्साज राज्यातल्या डेंटन नावाच्या छोट्या शहरात आमचे पहिले पाऊल पडले. वाईट घटनांमुळे मनाचे खच्चीकरण झाले होते. लठ्ठ पगार आणि इतर सुखसुविधांना मागे सोडून दिले होते. आईवडील, भावंडे. नातेवाईक आणि मित्रमंडळींना सोडून खूप खूप दूर सातासमुद्रापलीकडे आलो होतो. आमच्या पुढील आयुष्याची सुरवात परत एकदा नव्याने झाली होती. अमेरिकेतले विश्व नवे होते आणि खूप वेगळे होते. अमेरिकेचा मिळालेला व्हिसा फक्त १ वर्षाचा होता. विनायकचा जे १ आणि माझा जे २ व्हिसा होता. माझा डिपेंडंट व्हिसा होता. प्रचंड आत्मविश्वास, तल्लख बुद्धी आणि मेहनतीची जबरदस्त तयारी हे गुण विनायकमध्ये आहेत. अर्थातच या सर्व गुणांना पुरेपूर साथ द्यायला मला मनापासून आवडते. १२ वर्षाच्या काळामध्ये इथे आलेले अनुभव खूप वेगळे आणि छान आहेत. इथल्या मूव्हींगचा अनुभव पण खूप वेगळाच आहे. अनुभवांची पुढची शिदोरी घेऊन लवकरच येते. पुढील लेखाची वाट पहा.


क्रमश:....

9 comments:

NJ said...

फार सुंदर शब्दा मध्ये वर्णन केले आहे .
मी अमेरिकेमध्ये २ वर्ष करता गेलो त्या वेळेची आठवण हा लेख वाचून झाली.

निलेश जोगळेकर

Anonymous said...

खूप मनोरंजक किस्से आहेत ,
… शिवा

rohinivinayak said...

Thank you !

Anonymous said...

Chan shabdat lihile ahet....

rohinivinayak said...

thanks !

Anonymous said...

khup sundar jamli ahe hi pan series. khuskhushet shailee .. matra vinayak na itke bare navte he wachun wait watle.
lagnananatr kiti varshani tumhi ikade aalat ?
-Pallavi

rohinivinayak said...

Thank you very much pallavi,,:) lagna nantar 12 varshanii aamhi ameriket aalo,, aani aata May 13 la ithe yeoonahi aamhala 12 varshe purNa jhali,, ithala moving cha anubhav lihinach lavkar,, tohi chhan aahe :) thanks once again to everyone

Anonymous said...

Rohini Taai, Kharach majhakade shabdach nahiyet saangayla ki hey 3lekh maala kitti avadlet. Agdi vachta vachta vaahat gele me...tumcha pratek sukha-dukhechya ghatana vachatana maala agdi maanapasun jaanavlya. Maala tumhi agdi aaplya javalchya vaatta mhanun tumchya kathin kaala badhaal vachun majhe maan agdi bechain jhaale. Ithe yeyla neghtana me pan aai la mithi marun khup khup radle hote, tumcha tithun neghtanache varna vaachun maala majhi ti vel athavun dolyaat paani ale. Kitti sundar lihita ho tumhi :) ashyach lihit raha. Pudhcha bhaagachi aaturteni vaat pahatye.

- Priti

rohinivinayak said...

Thank a lot priti !!! lavkarach lihin next part,, aata mi lekhmala lavkarach lihun purNa karnar aahe, thank you !