Monday, June 10, 2013

आज इथं तर उद्या तिथं !... (1)

अमेरिकेतल्या रेशमी नावाच्या मैत्रिणीशी माझ्या गप्पा सुरू होत्या. मी रेशमीला म्हणाले की मी अमुक अमुक वर्षात तमुक तमुक जागा बदलल्या आहेत. ती म्हणाली "हे तर काहीच नाही. माझे तर इतके पत्ते बदलून झालेत की नवीन पत्ता बदलायचा असे नवऱ्याने मला सांगितले की मला धडकीच भरते. भांडी घासता घासता
ती हातातून निसटायला लागतात." या वाक्यावर आम्ही दोघी 'खिखिखिखिखि' आम्ही दोघींनीही आमच्या बदलत्या जागेच्या स्टोऱ्या एकमेकींना ऐकवल्या. तिला म्हणाले "घर छोडते समय मै बार बार मुडमुडके देखती हुँ मेरे घरको" तुम्ही म्हणाल एकदम हिंदी का सुरू केलेत ? बंगाली मैत्रिणीशी मी मराठीतून थोडीच बोलणार होते !






दुसऱ्या शहरात गेल्यावर ज्या मैत्रिणीशी मी बोलत होते ती होती फरहाना. तिच्याशी बोलताना तिला म्हणाले "ये बार बार घर छोडना मुझे अच्छा नही लगता. वो बोली मुझे तो यही अच्छा लगता है, हाँ ! सच्ची ! पॅकींग करनेका इतना जबरदस्त अनुभव है मेरे पास, मै युंही फटाफट पॅक करती हुँ मेरा पूरा घर ! मी पण तिला सांगितले " वैसे तो मेरे पास भी बहुत अनुभव है ! एक बार डिसाईड हुवा ना तो मै पूरे घर का अंदाजा लेती हुँ और सिस्टीमॅटीकली पूरा सामान पॅक करती हुँ ! नवीन ठिकाणी गेल्यावर कोणकोणत्या वस्तुंची गरज भासणार आहे ते अगदी विचारपूर्वक ठरवून ते एकाच खोक्यामध्ये पॅक करावे लागते अन्यथा चांगलीच पंचाईत होते. ये घर छोडनेका स्टोरी बताने के लिए मुझे फ्लॅशबॅकमें जाना पडेगा.






२५ वर्षापूर्वी माझे लग्न झाले ते माझे पहिले मुव्हींग जे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात घडते. माहेराहून सासरला येताना आईचे घर सोडताना दुःख तर होतेच पण तितकीच नवीन संसाराची आणि स्वप्नांची ओढ असते. लग्नानंतर पुण्याहून आम्ही दोघे निघालो ते आयायटी पवईत जाण्याकरता! तिथल्या वसतिगृहात आमचा नवीन संसार सुरू होणार होता. माझी एक भलीमोठी सूटकेस होती. त्यात माझ्या साड्या, पंजाबी सूट, बांगड्या, गळ्यातले, कानातले असे सर्व काही होते. लग्नामध्ये आम्हाला स्टीलचा अहेर मिळाला. संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अहेर इतका काही भरगच्च आला होता की माझा पूर्ण संसार फक्त आणि फक्त स्टीलच्या भांड्यांनी भरला होता. त्यावेळेला फोडणी करता येईल अशीही स्टीलची भांडी निघाली होती. फोडणीसाठी या भांड्यांचा बेस तांब्याचा होता. काय नव्हते या अहेरामध्ये? सर्व काही होते, अगदी पाणी पिण्याच्या कळशीपासून ते अगदी गाळणे व किसणीसकट सर्वकाही !






एक जीप ठरवली होती. त्यातून सासरमाहेरची मंडळी, आम्ही दोघे, एक सूटकेस व एक स्टीलच्या भांड्यांचे पोते घेऊन निघालो ते थेट आयायटीच्या वसतिगृहात येऊन पोहोचलो. आयायटीत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना जागा दिल्या होत्या. एच ११ हे मुलींचे वसतिगृह होते. त्यातल्या बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. त्यातल्या प्रत्येकी दोन खोल्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना दिल्या होत्या. माही आई व सासुबाई नवीन घर लावण्यासाठी मदत करणार होत्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी घर सेट करून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघणार होते. मी त्यांना म्हणाले नको. मी लावीन माझे घर. मला दिवसभरात काय काम असणार आहे. माझा वेळही छान जाईल. सामान लावण्याकरता माझा उत्साह ओसंडून वाहत होता. वसतिगृहाचे जीवनही छान वाटत होते. विनायकचे बॅचलर जीवन वसतिगृह एच ९ मध्ये होते. त्यामुळे त्याचेही एक छोटे मुव्हींग झाले. बॅचलर जीवनातली एक गादी, एक सूटकेस व ट्रॉंझिस्टर आणि चहापाण्याची काही भांडी असे सर्व सामान एच ११ मध्ये आले.






६ महिन्यानंतर आम्हाला वेध लागते ते तुलसी ब्लॉक्सचे ! नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तुलसी ब्लॉक्स बांधले गेले. टेकडीवर हे ब्लॉक्स होते. या घरांची रचना छान होती. एक हॉल आणि किचन होते. सामान जास्त नव्हतेच. पुण्यावरून आणलेले सामान आणि त्यामध्ये दोन गाद्या, दोन उशा, आणि २-४ पा̱घरुणे जमा झाली होती. स्टोव्ह आणि गॅसचीही भरती झाली होती. या छोट्या मुव्हींगचा उत्साह होता. एका टेंपोमध्ये आमचे व अजून एकांचे सामान भरले आणि आम्ही तुलसी ब्लॉक्समध्ये गेलो. वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून सर्व सामान खाली आणायचे होते. त्यावेळी लिफ्ट नव्हत्या. एकेक करत सर्व सामान खाली घेऊन आलो. मदतीला विनायकचा मित्र शैलेश देसाई होता. जरूरीचे फर्निचर आयायटीने दिलेले होते त्यामुळे ते इकडून तिकडे हालवायचा प्रश्नच नव्हता. आयायटीच्याच आवारातले हे आमचे पहिले मूव्हींग होते.






तुलसी ब्लॉक्समध्येही आम्हाला आयायटीकडूनच जरूरीचे सर्व फर्निचर मिळाले होते. तुलसी ब्लॉक्सच्या बाल्कनीत उभे राहिले की आजुबाजूला दिसणारे डोंगर, खेळती हवा, बाल्कनीला लागून भले मोठे काचेचे दार, त्या दाराला लागूनच भला मोठा दोन्हीकडून सरकता पडदा, (हा पडदा मीच शिवला होता) स्वयंपाकघरातील खिडक्याही काचेच्या, काळा कुळकुळीत कडप्पा घातलेला ओटा आणि त्याला लागूनच सिंक, गुळगुळीत फरशा, भिंतीतली कपाटे, मोठा बेड, वर्णन करावे तितके थोडे आहे ! तुलसी ब्लॉक्समध्ये राहताना मला तर एखाद्या चित्रपटातच वावरल्यासारखे वाटत होते ! इतके छान नवेकोरे करकरीत व चकचकीत ब्लॉक्स होते !








दीड ते दोन वर्षानंतर आम्हाला तुलसी ब्लॉक्सचा ताबा द्यायला लागला. विनायक पिएचडी करत असल्याने शिष्यवृत्ती संपली. फक्त थिसीस लिहायचा बाकी होता. डोंबिवलीच्या आमच्या स्वःताच्या जागेतच आम्हाला आता रहायला जायचे होते. या मुव्हींगसाठी मन अजिबात तयार नव्हते. स्वतःची जागा असली तरी ती सजवायचा उत्साह अजिबात नव्हता. घराचे हफ्ते फेडण्याकरता त्या जागेत २ ते ३ पेईंग गेस्ट ठेवले होते. त्यांनी जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. त्यांना अलिकडच्या विकेंडला जाऊन सांगितले होते की "आमची जागा खाली करून ठेवा आता आम्ही आमच्या जागेत रहायला येत आहोत" त्यातल्या एकांनी आम्हाला सांगितले की "आम्ही आमचे सामान हलवतो व तोच टेंपो तुमच्याकडे तुमचे सामान आणण्याकरता पाठवतो" ठरलेल्या दिवशी तुलसी ब्लॉक्समधल्या सामानाची बांधाबांध केली व टेंपोची वाट पाहत बसलो. दुपारी ३ ला येणारा टेंपो ४ वाजले, ५ वाजले तरी टेंपोचा पत्ता नाही. उशीर झाला असेल असा विचार करता करता रात्र झाली. आशाने सांगितले की आता वाट पाहू नका. आमच्याकडे रात्री जेवायला या. त्यावेळेला सेल वाजत नव्हते "खणखणखणखण" नाहीतर असा गोंधळ झाला नसता. दुसऱ्या दिवशी उठवत नव्हते. एक प्रकारचा थकवा आला होता.







आशाला सांगितले की आता आम्हीच इथला एक टेंपो ठरवतो आणि निघतो. विनायक आयायटीच्या बाहेर निघणार तितक्यात टेंपो आला पण त्याने सांगितले की ते अजून कोणाचेतरी सामान शिफ्ट करून येत आहेत. अगदी लगेच येतो. थांबा, दुसरा टेंपो ठरवू नका. त्यादिवशी पण वाट पहायला लागली. माझा तर चांगलाच तीळपापड झाला होता, पण इलाज नव्हता. त्यादिवशी दुपारी आशाकडेच जेवलो. निघता निघता ४ वाजत आले. भैरवी तिच्या नवऱ्याबरोबर काही दिवसांनी अमेरिकेत जाणार होती म्हणून तिने माझा डोंबिवलीच्या घराचा पत्ता तिच्या डायरीत लिहून घेतला. आशा म्हणाली मी अजून इथेच आहे. तू केव्हाही आठवण आली की माझ्याकडे ये. स्वरदा बाहेर काही कामानिमित्त गेली होती त्यामुळे तिची भेट झाली नाही. निकीतानेही मला टाटा बाय बाय केले. निकीता, भैरवी, आशा, स्वरदा आमच्या सर्वजणींचा छान ग्रूप झाला होता. त्यापैकी मी, निकिता व भैरवी आयायटीत शिकत नव्हतो. स्वरदा व आशा शिकत होत्या. सगळ्या मैत्रिणींचा निरोप घेऊन निघालो तितक्यात मला आशाच्या डोळ्यात पाणी दिसले आणि मलाही हुंदका फुटला. आमच्या ५ ते ६ कुटुंबमित्रांचा छान ग्रूप झाला होता. एकमेकांकडे जाऊन गप्पा मारणे, एकत्र जेवणे, अशी बरीच धमाल सर्वांनी मिळून केली होती.







टेंपोत आमचे सामान टाकले. मी व विनायकही टेंपोत सामानासोबत बसलो. आणि आमचा टेंपो डोंबिवलीच्या दिशेने निघाला. सोबत आयायटीच्या छान आठवणी होत्या. टेंपोत मागे बसल्याने आमच्या डोळ्यासमोरून मागचा दिसणारा रस्ता भराभर पुढे सरक्त होता. अंतःकरण खूप जड झाले होते. आता पुढे काय? स्कॉलरशिप संपली होती. रहायला फक्त आमचे घर होते. थिसीस लिहून पूर्ण करायचा होता. डोंबिवलीच्या जागेत झोपण्यासाठी एक कॉट सोडली तर दुसरे काहीही सामान नव्हते. माझे मन तर डोंबिवलीच्या जागेत जायला मुळीच तयार नव्हते.



क्रमश: ....

No comments: