Tuesday, June 18, 2013

आज इथं तर उद्या तिथं !...(४)

अमेरिकेतल्या डॅलस विमानतळावर उतरलो तेव्हा प्राध्यापक ऍलन मर्चंड आम्हाला न्यायला आले होते. आमच्या दोघांचे फोटो त्यांना स्कॅन करून पाठवले होते. त्यांच्या हातात आमच्या दोघांच्या फोटोची प्रिंट होती. आपल्याला कोणी शोधत आहे का म्हणून आम्ही इकडे तिकडे बघत होतो तितक्यात मागून आवज आला are you Dr. Gore? हो हो आम्हीच. आमच्या सर्वांचे हास्तांदोलन झाले आणि त्यांच्या कारमध्ये अवाढव्य बॅगा घेऊन बसलो.
त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या बायकोने आमचे हसतमुखाने स्वागत केले. प्रवास कसा झाला? काही त्रास तर झाला नाही ना? अशी विचारपूस दोघांनीही केली. आमच्या बॅगा त्यांच्या बंगल्याशेजारच्या छोट्या बंगल्यामध्ये हलवल्या. झोप भूक एकत्रच झाली होती. ब्रश केला आणि गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ केली. आमची कपड्यांची बॅग उघडून त्यातले कपडे काढले आणि ते घालून ते राहत असलेल्या शेजारच्या बंगल्यामध्ये जेवणासाठी गेलो. डायनिंग खूप छान सजवले होते. प्राध्यापकांची बायको चिनी होती. जेवणात फारसे असे काही नव्हते. ब्रेड, ज्युस, उकडलेली अंडी, काही फळे, चहा कॉफी, बिस्किटे. थोडेफार खाल्ले आणि परत आमच्या बंगल्यात येऊन ढाराढूर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाहेर अंगणात येऊन उभे राहिलो. स्वच्छ सुंदर हवा, सगळीकडे हिरवेगार, आणि खूप शांतता. त्यांचा बंगला पण खूपच सुंदर होता. भारत आणि अमेरिका यामधला विरोधाभास चांगलाच जाणवत होता. आमच्या घरात मी कॉफी बनवली व दूध घेऊन विनायक प्राध्यापकांबरोबर विद्यापीठात गेला. मी नॅन्सीबरोबर होते. ती खूपच बोलकी असल्याने मला कधी एकटे वाटले नाही.

आमच्या अपार्टमेंटच्या शोधात मी व नॅन्सी रोज बाहेर पडायचो. काही जागा पाहून ठेवल्या होत्या पण पसंत एकही पडत नव्हती. प्राध्यापकांकडे इतरही post doctorate होते त्यात एक भारतीय तमिळ होता. तो काही कारणाने हे विद्यापीठ सोडून दुसऱ्या शहरात जाणार होता. इथे जागेच्या ठरलेल्या करारानुसार मध्येच जागा सोडून गेले तर डिपॉझिटचे पैसे मिळत नाहीतच शिवाय उरलेल्या सर्व महिन्यांचे भाड्याचे पैसे भरावे लागतात. प्राध्यापकांनी आम्हाला असे सुचवले की तुम्ही जर त्याच्या जागेत रहायला गेलात तर त्याला उरलेले पैसे भरावे लागणार नाहीत व डिपॉझिटही त्याला परत मिळेल. संपतकुमार व त्याची बायको सत्या ह्यांची जागा पाहण्याकरता मी व नॅन्सी त्यांच्या घरी गेलो. सत्याने आमचे छान स्वागत केले. संपतकुमार व विनायकची लॅबमध्येच ओळख झाली होती व विनायकला दुपारच्या जेवणाकरता म्हणून त्याने २ / ३ वेळा नेलेही होते. दुपारचे जेवण विनायक विद्यापीठातच असलेल्या थायी उपाहारगृहात घेत होता.

ती जी सर्व अपार्टमेंट होती ती सर्व unfurnished होती. सत्याकडे जे फर्निचर होते ते ही तिचे नव्हतेच. इथल्या अपार्टमेंटमध्ये काही जण फर्निचर असेच सोडून जातात कारण फर्निचर इकडून तिकडे हलवायचे झाले तर खर्चही येतो. शिवाय इथे फर्निचर हलवायचे झाले तर हमाल नसतात ना ! आमच्या दोघांचे अपार्टमेंट घेण्याबाबत बोलणे झाले. काय करावे? कोणते अपार्टमेंट घ्यावे? मी व नॅन्सी अपार्टमेंट बघायला जायचो त्यातल्या काही जागा unfurnished होत्या आणि काही जागा furnished असल्या तरी त्या रिकाम्या नव्हत्या. सत्या ज्या जागेत राहत होती ती खूप सोयीची होती. विद्यापीठ, धुणे धुण्याचे दुकान (laundromat) भाजीपाला व इतर किराणामालाचे दुकान हे सर्व चालत जाण्याच्या अंतरावर होते. अजून एक असे की त्या जागेत जरूरीपुरते सर्व फर्निचर होते. जुने असले तरी ते होते हे महत्त्वाचे आहे. एक मोठा बेड होता, एक टेबल होते, एक फिरती खुर्ची होती आणि एक टीपॉय होता.


आमचा व्हीसा फक्त १ वर्षाचा होता त्यामुळे मुद्दामहून इतर फर्निचर घेण्याचा त्या घटकेला तरी विचार करत नव्हतो. कारही अगदी लगच्यालगेच घेऊ शकत नव्हतो. एक तर कारसाठी पैसे साठवायला अवधी तर पाहिजे. शिवाय कार आम्हाला दोघांनाही चालवता येत नव्हती. मुंबईला सर्व प्रवास लोकलमधून आणि बसमधून केल्यामुळे कार घेण्याची कधी गरज भासली नाही आणि ती भासतही नाही. इथल्या घरासाठी भाड्याचे व डिपॉझिटचे पैसे व शिवाय इतर खर्चासाठी पैसे आम्ही भारतातून आणले होते. अर्थातच रुपयांचे डॉलर्समध्ये रुपांतर करूनच आणले होते. इथे सुरवात करण्यासाठी असे पैसे आणावेच लागतात. एकूणच सगळ्याचा विचार करता त्या भारतीय कुटुंबाची जागा आम्ही घ्यायचे ठरवले. हा निर्णय त्यांना कळवल्यावर त्यांनी आमचे खूप आभार मानले. त्यांचे बरेच डॉलर्स त्यामुळे वाचले होते.

लीजिंग ऑफीसमध्ये जाऊन तिथल्या मॅनेजरला सगळा प्रकार सांगितला की आम्ही ही जागा टेक ओव्हर करत आहोत. २०६ नंबरच्या अपार्टमेंटचा नवीन करार करून पैसे व डिपॉझिट भरले. आता एक अडचण अशी होती की त्या भारतीय कुटुंबाला पूर्ण जागा खाली करून देण्यासाठी आणि आणि विद्यापीठात त्यांचे थोडे कामही बाकी होते म्हणून आठ दिवसांचा काळ जाणार होता. त्यामुळे आठ दिवसाकरता त्यांच्या शेजारची एक जागा रिकामी होती ती आम्हाला स्वच्छ करून दिली. ईगल ड्राईव्हचे नावाचे हे अपार्टमेंट कॉंप्लेक्स होते. २०५ नंबरच्या जागेत आठ दिवस राहून मग आम्ही २०६ मध्ये शिफ्ट होणार होतो. कराराच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि २०५ नंबरच्या जागेच्या किल्या ताब्यात घेतल्या. खरे तर मला कुठल्याही जागा अजिबातच आवडलेल्या नव्हत्या पण कुठेतरी सुरवात तर करायलाच पाहिजे होती. इथल्या जागेतले एक आवडले होते ते म्हणजे छताला टांगलेले पंखे. पंख्याशिवाय आमचे काही चालत नाही. तो तर अगदी हवाच हवा अगदी कुडकुडत्या थंडीमध्येही !


मी व नॅन्सी एके दिवशी एका दुकानात गेलो व अपार्टमेंटमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी मी खरेदी केल्या. टुथपेस्ट, अंगाला लावायचा साबण, टिश्यू पेपर, पेपर टॉवेल, भांडी घासायचे व कपडे धुण्याचे डिटर्जंट, कमोड साफ करायचा ब्रश, बाथरूमला लावण्यासाठी पडदा, बल्ब, इस्त्री करायला इस्त्री असे सर्व काही खरेदी केले. त्या दुकानात मला चक्क काडेपेट्या आणि कापूसही दिसला. तोही लगेच घेतला. काडेपेडी निरांजन लावण्यासाठी आणि कापूस वाती वळण्यासाठी घेतला. आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये रहायला जाण्या आधी दोन दिवस प्राध्यापक आम्हाला भारतीय उपाहारगृहात जेवायला घेऊन गेले. प्राध्यापक मर्चंड यांच्याकडे भारतीय पोस्डॉक दरवर्षी येत असल्याने त्यांना भारतीय जेवणाची बऱ्यापैकी माहीतीही होती आणि त्यांना आपले जेवणही खूप आवडत होते. नुसती माहीती नाही तर ते दोघे नवरा बायको भारतात एक दोन वेळा येऊनही गेले होते. जेवणानंतर ते आम्हाला इथे असलेल्या एका घाऊक माल मिळत असलेल्या दुकानात घेऊन गेले. त्याचे नाव कॉस्टको. त्या दुकानातून त्यांनी आम्हाला काही काही घेण्यास सुचवले तसे ते आम्ही घेतले. हवा भरून बनवतात तसा एक बेड घेतला. ऑल परपज प्लोअरचे एक पोते घेतले. लाँग ग्रेन राईसचे ५० किलोचे पोते घेतले. ते आम्हाला वर्षभर पुरून उरले. ऑल परपज पोळ्या बनवण्यासाठी घेतले. हो, सुरवातीचे काही दिवस आम्ही मैद्याच्या पोळ्या खात होतो ! अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टीची पूर्तता झाली. काही पांघरूणे आणि चादरी , काही जरूरीची भांडी आम्ही भारतातूनच घेऊन आलो होतो.


भारतातून आणलेल्या बॅगांपैकी फक्त एकच कपड्यांची बॅग उघडली होती. त्यामुळे पसारा जास्ती आवरायचा नव्हता. एके दिवशी दुपारी प्राध्यापक व त्यांची बायको आम्हाच्या अवाढव्या बॅगांसकट आम्हाला अपार्टमेंटमध्ये सोडायला आले. मोठमोठ्या बॅगा आणि बाकीची केलेली खरेदी एकेक करत वरच्या मजल्यावर आम्ही दोघांनी मिळून नेल्या. त्याकरता पण त्यांनी आम्हाला मदत केली. त्या दोघांना टाटा बाय बाय केले आणि २०५ नंबरची जागा उघडून सर्व सामान आत टाकले. त्यादिवशी सत्याने मला रात्रीचे काही करू दिले नाही. म्हणाली आज आमच्या घरीच जेवायला या. उद्यापासून तू स्वयंपाकाला सुरवात कर. आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो आणि खुर्चीवर बसलो तेव्हा तिची मुलगी पटकन माझ्या मांडीवर येऊन बसली. मला इतके काही छान वाटले. तिने छान साग्रसंगीत जेवण बनवले होते. अमेरिकेत आल्यापासून आठ दिवस प्राध्यापकांकडे राहिलो होतो त्यामुळे जेवणाचे बऱ्यापैकी हाल झाले होते. तिच्याकडचे भारतीय जेवण जेवल्यावर खूप बरे वाटले.

दुसऱ्या दिवशी आमच्या खाली राहणारी प्रवीणा तिच्या मुलाला घेऊन वर आली आणि आमची तिने ओळख करून घेतली. काही लागले तर मी खालीच राहते तेव्हा काही मागायला संकोच करू नकोस. तुम्ही आताच रहायला आला आहात असे सांगितले. हळूहळू करत आमचे अमेरिकेतले दैनंदिन जीवन सुरू झाले. सत्या व प्रविणाबरोबर जाऊन मी आठवड्याची भाजी खरेदी आणि काही किराणा माल खरेदी केला. ग्रोसरीचे दुकान चालत जाण्याच्या अंतरावरच होते. त्या अपार्टेमेंटमध्ये आम्ही तिघेच फक्त भारतीय होतो. नंतर सत्याचे तिच्या खोलीचे आवरणे सुरू झाले. मी त्या भारतीय कुटुंबाला जेवायला बोलावले. तिने आवरा आवरीमध्ये रिकाम्या झालेल्या काही काचेच्या बरण्या आणि काही प्लॅस्टीकचे डबे दिले. म्हणाली की तुला चहा साखर किंवा डाळी ठेवायला उपयोगी पडतील. एके दिवशी सत्या व तिचे कुटुंब दुसऱ्या शहरात निघून गेले. जाताना त्यांनी आमच्या सर्वांचे काही ग्रुप फोटोज काढले. २०६ नंबरच्या चाव्या आमच्या कडे सुपूर्त केल्या व आम्ही त्यांच्या घरात शिफ्ट झालो. आता मला प्रविणा आणि प्रविणाला मी उरलो.मला अजूनही आठवत आहे त्या अपार्टमेंट कॉप्लेक्सचा समोरचा रस्ता आणि त्यापलीकडचा विद्यापीठाचा परिसर. जुनची सुरवात असल्याने सर्व विद्यार्थी परीक्षा आटोपून त्यांच्या गावी सुट्टीकरता गेले होते. सगळीकडे खूप खूप शांतता होती. शरिराने मी अमेरिकेत तर मनाने संपूर्णपणे भारतात होते !

क्रमशः...

No comments: