Thursday, June 27, 2013

आज इथं तर उद्या तिथं .... (६)

मोठाल्या बॅगा घेऊन आम्ही मोटेलच्या रूममध्ये प्रवेश केला. प्राध्यापक डीटर यांनी आमच्यासाठी एका मोटेलमध्ये रूम बुक करून ठेवली होती. त्यांनी सांगितले की इथे जवळच सब-वे आहे. त्यांनी विचारले की तुमचे मित्र आहेत तर त्यांना तुम्ही इथल्या अपार्टमेंटबद्दल काही विचारले आहे का? नसेल तर मी त्यांच्याशी बोलून बघतो. एवढे सांगून त्यांनी आम्हाला टाटा केला.


खूप दमायला झाले होते. एक तर आधी पॅकींग, घराची साफसफाई करून दमायला झाले होते आणि त्यात भर म्हणजे गोंधळात गोंधळ झाल्यामुळे आम्ही बुक केलेली आमची थेट फ्लाईट चुकली होती. त्यानंतर सव्यापसव्य करून एकदाचे आम्ही क्लेम्सनात पोहोचलो होतो. बेड वर पडलो आणि जी झोप लागली ते एकदम सकाळी उशिरानेच जाग आली. विनायक माझ्या आधीच उठला होता आणि मला म्हणाला रोहिणी, उठ, बाहेर बघ किती छान दिसत आहे, छान आहे क्लेम्सन ! मी मात्र हंऽऽऽऽ नको. जाउ देत, मला खूप झोप येत आहे, उठवतच नाहीये असे म्हणून परत डोळे मिटले. तितक्यात दारावर थाप ऐकू आली. दारावर मोटेलचे मालक उभे होते. ते म्हणाले की मी तुम्हाला आमच्या घरून गरम चहा पाठवतो. आम्ही सर्वांना देत नाही. पण तुम्ही भारतीय आहात आणि खूप दमलेलेही दिसत आहात म्हणून चहा पाठवत आहे. मोटेलचे मालक गुजराथी होते. चहा पाठवत आहे म्हणल्यावर मला उठायलाच लागले!ब्रश करून आम्ही दोघेही मोटेलच्या बाहेर आलो तर स्वच्छ सुंदर सकाळ अनुभवायला मिळाली. हवेत सुखद गारवा होता. गरमगरम चहा प्यायल्यावर जरा तरररी आली. अंघोळपांघोळ झाल्यावर विनायक म्हणाला चला, आता पुढच्या तयारीला लागले पाहिजे. प्राधापकांना विनायकने फोन लावला तर ते म्हणाले की मी तुमच्या मित्राशी बोलून ठेवले आहे आणि ते तुमची काही दिवस तुम्हाला तुमची जागा मिळेपर्यंत त्यांच्याकडे राहण्याची सोय करत आहेत तर तुम्ही मोटेल सोडा आणि विद्यापीठात या. मी तुम्हाला घ्यायला येत आहे. तासाभरात तयार रहा.


बाकीचे सर्व आवरून प्रवासात घेतलेल्या काही कूकीज व बटाटा चिप्स खाऊन घेतले आणि प्राध्यापकांची वाट पाहत उभे राहिलो. त्यांचा वेळ मोडू नये म्हणून चेक आऊट करून आमच्या सर्व बॅगा आणि इतर सामानही बाहेर काढून ठेवले होते. ठरलेल्या वेळेला प्राध्यापक आम्हाला नेण्याकरता हजर झाले आणि आम्ही आमच्या सामानासकट विद्यापीठात येऊन पोहोचलो. आम्ही दोघे त्यांच्याबरोबर लॅबमध्ये गेलो. तिथून दुसऱ्या ऑफीसमध्ये चालत गेलो आणि व्हीसा आणि इतर काही कागदपत्रांची सह्यांसकट पूर्तता केली. विद्यापीठाचा परिसर खूपच मोठा असल्याने इकडून तिकडे व तिकडून इतके चालत गेल्याने खूप दमायला झाले. भूकही खूप लागली होती. कुठेतरी एकदाचे स्थिरस्थावर झाल्याशिवाय चैन पडत नव्हते. हे मूव्हींग खूपच भारी पडले होते. विद्यापीठातली कामे संपली आणि प्राध्यापक म्हणाले इथल्या विद्यापीठाच्या परिसरातच एक चांगले कॅटीन आहे. तिथे तुम्ही जेवून घ्या. मग मी तुम्हाला तुमच्या मित्राकडे कारने सोडतो. जेवेपर्यंत दुपारचे तीन वाजत आले होते. कॅटीनमध्ये ब्रेड, सॅलड आणि कॉफी घेतली. हेच जेवण होते पण भूक इतकी काही लागलेली होती की जीव नसल्यागत झाले होते त्यामुळे ते जेवणही चविष्ट लागले. पोटभर जेवलो तेव्हा कुठे जीवात जीव आला.ज्या मित्राकडे प्राध्यापकांनी आम्हाला सोडले होते तो मित्र एका उंच डोंगरावर राहत होता. क्लेम्सन शहर हे असेच उंचसखल भागात विभागलेले आहे. काही घर डोंगरावर तर काही खाली पायथ्याला तर काही दुसऱ्या बाजूच्या पठारावर विसावलेली आहेत. येमुल सुनिताला आम्ही आधी ओळखत नव्हतो. त्यांच्या मित्रांनी आम्हाला अडीअडचणीकरता त्यांचा पत्ता दिला होता. घरी सुनिता व तिचा मुलगा प्रथमेश होता. तिने आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि विचारले काही खायला करू का? तर आम्ही म्हणालो नको. आमचे आताच खूप उशिराने जेवण झाले आहे. चहापाणी झाले व आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिचा मुलगा खेळकर असल्याने त्याच्याशी खेळण्यात पण वेळ गेला. थोड्यावेळाने येमुल आला आणि परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. येमुल तलगू आणि सुनिता मराठी आहे. तीही पुण्याचीच असल्याने अधिकच छान झाले होते.त्यांच्याकडे आम्ही साधारण एक आठवडा होतो. पोस्टाने पाठवलेली आमची खोकी त्यांच्या घरी आधीच येवून पडली होती. पोस्डॉकच्या लोकांकरता वेगळी अपार्टमेंट होती पण त्यातले एकही शिल्लक नव्हते. विनायक रोज उठून चालत चालत डोंगर उतरून व चढून लॅबमध्ये येजा करत होता. मी सुनिताला सांगितले की मी रोज पोळ्या करीन. भाजी चिरून देईन. आमची छान गट्टी जमून गेली होती. उन्हाळा चालू झाला होता पण त्यांचा कूलर बिघडल्याने रात्रभर उकाड्याने आम्हाला झोप लागायची नाही. मी दुपारी झोप काढायचे पण विनायकला रोजच्या रोज लॅबमध्ये जावे लागत असल्याने त्याला नीट विश्रांती मिळत नव्हती. शिवाय त्यांच्या घरापासून कपडे धुलाईचे दुकानही खूप लांब होते. तिथे धुणे घेऊन चालत जाणे शक्यच नव्हते. त्यांच्याकडे कार होती पण ते कार फक्त किराणामाल आणि भाजी आणण्याकरताच बाहेर काढत होते. मी रोजच्या रोज विनायकचे व माझे कपडे अंघोळ करण्याच्या टबात धूवत होते. कपडे धुण्यामुळे तर माझे कंबरडे पार मोडून गेले होते. दुपारी सुनिता चहा करायची व आम्ही दोघी प्रथमेशला घेऊन तिच्या घराजवळच असलेल्या पार्कमध्ये जायचो. त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान होता. टेकाडावरून खालचा वाहता रस्ता दिसायचा. रात्री जेवणे झाल्यावर आम्ही दोघे चक्कर मारून यायचो. काळाकुट्ट अंधार असायचा आणि खाली जायचा रस्ता उतारावर होता. परत येताना ही मोठी चढणच चढण. परत रस्ता चुकायची भीती ! पण तरीही आम्ही पाय मोकळे करण्याकरता बाहेर पडायचो. क्वचित प्रथमेशला बरोबर न्यायचो. काळ्याकुटा अंधारातही चांदणे असल्याने छान वाटायचे. एकूण त्यांच्या घरातले दिवस खूप छान गेले!क्लेम्सनला अपार्टमेंट मिळता मिळता खूपच वांदे झाले होते. एक तर सर्व अपार्टमेंट ३ ते ४ बेडरूमची होती आणि कोणतीही खाली नव्हती. शेवटी एक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करून ती जागा सोडून निघून चालला होता, तर त्याची जागा आम्हाला मिळाली आणि तीही फक्त ३ महिन्यांकरता ! जी जागा मिळाली आहे ती पदरात पाडून घ्या, पुढचे पुढे बघता येईल असा विचार करून आम्ही ती जागा घेतली. कधी एकदा आमच्या घरात रहायला जात आहोत असे आम्हाला झाले होते. असे अधांतरी लटकत किती दिवस रहायचे ना ! ही जागा ३ बेडरूमची मोठी होती. हॉल आणि किचन कॉमन होते. खाली झालेल्या एका बेडरूममध्ये आम्ही शिफ्ट झालो. दुसऱ्या २ बेडरूम होत्या पण त्यात विद्यार्थी राहत होते पण ते सर्व उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणून गावी गेले होते. जागेमध्ये बेड, सोफा, टी पाय, धुलाई मशीन, मायक्रोवेव्ह असे सर्व काही होते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टीची परत एकदा नव्याने खरेदी केली. भारतीय किराणामाल खोक्यातून आलाच होता. थोड्या भाज्याही घेतल्या.
परत एकदा आमच्या सर्व सामानाची आवरा आवर झाली आणि आम्ही येमुल सुनिताचा निरोप घेऊन निघालो. यावेळीही प्राध्यापक डीटर यांनी आमच्या सामानासकट आम्हाला आमच्या नवीन जागेत पोहोचते केले. सुनिताही त्या शहरात नवीनच होती. ती निघताना मला म्हणाली बरे झाले तुम्ही आलात ते. मला एक बोलायला मैत्रिण मिळाली. मलाही अगदी तसेच वाटत होते. आमचे घर मध्यवर्ती ठिकाणावर होते. या अपार्टमेंट कॉप्लेक्समध्ये कोणीही भारतीय राहत नव्हता. विनायक सकाळी ८ लाच लॅबमध्ये जायला निघायचा ते रात्री ८ ला घरी परतायचा. जाताना तो जेवणाचा डबा नेत होता. जेवण सकाळीच बनल्यामुळे मला दिवसभर रिकामाच असायचा. माझेही रूटीन हळू हळू बसले. हे अपाटमेंट खूप छान होते. धुलाई मशीन घरातच होते. विद्यापीठात व इतर ठिकाणी किराणामाल व भाजी आणण्याकरता आम्ही बसनेच जात होतो. बसथांबाही घराजवळच होता. ही घरे क्लेम्सनमध्ये विद्यापीठाच्या दुसऱ्या बाजुला लांबवर पठारावर वसलेली होती. मी घरी दिवसभर एकटी असल्याने मी रोज अपार्टमेंटच्या शोधात बाहेर पडायचे. हो ना, कारण की ३ महिन्यानंतर कुठेतरी कायमस्वरूपी २ वर्षाकरता रहायला जागा ही हवीच ना !आत्तापर्यंतच्या मूव्हींगच्या लेखनात मी जिथे जिथे राहिले आणि जे काही अनुभव आले त्याचे वेगळे लेखन केले आहे. ते अनुक्रमे, आयायटी - पवई, अमेरिकेत पाऊल पडल्यावर, गोंधळात गोंधळ, एक सुखद आठवण, खेड्यामधले घर कौलारू आणि ते तीन महिने ! या सर्व लेखांना मी मूव्हींग असे नव्याने लेबल चिकटवले आहे. त्या सदरात तुम्हाला ते वाचायाला सापडतील.
क्लेम्सनमधले तिसरे मुव्हींग आणि क्लेम्सन सोडतानाचे मूव्हींग, अनुभवांची शिदोरी घेऊन लवकरच येते हं !! तोपर्यंत वाचत रहा.

क्रमश : ...

5 comments:

Rajvi said...

chhan. surekh shabdat mandale aahet tumche anubhav

rohinivinayak said...

Rajvi, thank you very much for your comment !

Anonymous said...

ek athavada ch pahune aale tar ekda tari car ni dhune dhuvayla have hote tumche. shivay cooler durust karun ghyayla hava na.nahitar standing fan tari hava gharat. te kase zopat hote mag itkya ukadyat?

Anonymous said...

अनाम, खरे आहे तुमचे. ७-८ दिवस कुणी पाहुणे आले तर निदान एकदा तरी कार काढून धुणे न्यायला हवे होते तसेच फॅनचीही काही व्यवस्था तर हवीच होती...अमेरिकेतही इतकी बोंब असेल असे वाटले नाही!
असो! व्यक्ती तितक्या प्रकृती! परंतु रोहिणी ताईंना मात्र यात काहीही गैर न वाटता उलट तिथले दिवस फार छान गेले असेच त्यांनी लिहीले आहे. यात त्यांच्या मनाचा निर्मळ पणा दिसतो.
आरती

rohinivinayak said...

आरती आणि अनाम,, काही काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. अमेरिकेत साधारणपणे एकमेकांना मदत करतात. जसे आम्हाला मदतीचा हात मिळाला तसेच आम्ही पण इतरांना मदत केली आहे. विद्यापीठात जरा बरे असते पण इतर ठिकाणी नोकरीत जरा मदत मिळणे कठीणच असते. मूव्हींग मध्ये म्हणूनच सर्व गोष्टी मी सविस्तरपणे लिहिल्या आहेत. आरती, आणि अनाम तुमच्या प्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक धन्यवाद! आणि वाचत आहात याबद्दलही. पुढील लेख लवकरच लिहीन.