Tuesday, June 11, 2013

आज इथं तर उद्या तिथं !... (२)

डोंबिवलीच्या जागेत रहायला आल्यावर विनायक अधुनमधून आयायटीत जात होता. एका प्रोजेक्टवर काम करत होता त्यामुळे संसाराला हातभार लागला. मी विनायकचा प्रिसिनॉपसिस टाईप करून दिला. टायपिंगच्या क्लासमध्ये जाऊन चौकशी केली आणि एक टाईपराईटर काही तासांवर भाड्याने घेतला. मी त्या क्लासमध्ये जाऊनच टाईप करायचे. टायपिंगच्या क्लासच्या मालकांना सांगून ठेवले होते की मला टायपिंग येते. स्पीडही चांगला आहे आणि ४ वर्षाच्या कंपनीतला अनुभव आहे. मला नोकरीची गरज आहे त्यामुळे कुठे असेल तर सांगा. मी रोज देवापुढे पूजा करताना मला लवकरात लवकर नोकरी मिळू देत अशी प्रार्थना करत होते. देवाने तथास्तू म्हणले आणि मला नोकरी लागली. टायपिंग क्लासमध्ये मला नोकरीची गरज आहे, कुठे असेल तर सांगा असे सांगून ठेवायला आणि त्याचवेळी एका कंपनीच्या मॅनेजरनेही सांगायला एकच गाठ पडली. त्यांनीही सांगून ठेवले होते की आमच्या कंपनीत एक जागा भरायची आहे कुणी असेल तर सांगा.

नोकरी कायमस्वरूपी नव्हती व पगारही कमी होता. जेव्हा खूप गरज असते त्या काळात लागलेल्या कोणत्याही नोकरीचा किती मोठा आधार असतो हे ज्याचे त्यालाच माहीत ! विनायकला म्हणाले आता तू निश्चिंत मनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता थिसीस लिही. थिसीस पूर्ण करून सबमिट केल्यावर काही दिवसातच विनायकला हिंदुस्तान लिव्हर मध्ये नोकरी लागली. माझी नोकरी गावतल्या गावातच होती त्यामुळे मला जाण्यायेण्याचा काही त्रास नव्हता. विनायकला नोकरीकरता डोंबिवलीवरून अंधेरीला रोजच्या रोज अगदी शनिवारीसुद्धा ये-जा करावी लागत होती. रोज जाऊन येऊन ४ तास प्रवासात जात होते. विनायक सकाळी साडेसातला घर सोडायचा ते रात्री यायला त्याला आठ वाजायचे. चार पाच वर्षांनी मी नोकरी सोडली कारण ती कायमस्वरूपी नव्हती. नंतर एका वर्षाचा एडिसिपी कंप्युटरचा कोर्स केला.

डोंबिवलीच्या जागेत दैनंदिन जीवन सुरू झाले. डोंबिवलीमध्ये काही नातेवाईक होते त्यांचे व आमचे एकमेकांकडे जाणे येणे सुरू झाले. जेवणावळी व गप्पा टप्पाही सुरू झाल्या. पावसाळ्याच्या दिवसात लोकल बंद पडल्या की एकत्र येऊन जेवणे करायचो. पत्ते खेळायचो. एखादा चित्रपट पहायचो. रोजच्या रोज नोकरीकरता ४ तासाचा गर्दीतून प्रवास असल्यामुळे आम्ही डोंबिवलीच्या बाहेर कधीच फिरायला गेलो नाही. आमच्या घरी वाजपेयी नावाचे पेंईग गेस्ट राहायचे. त्यांनी विनायकला एका मुलीची शिकवणी तुम्ही घ्याल का? असे विचारले होते. त्यावेळेला विनायक घरी थिसीस लिहीत होता. विनायक म्हणाला येऊ देत तिला.

नोकरी सुरू झाल्यावर अर्चनाच्या ओळखीने काही मुली आल्या. अर्चनाचा क्लास रोजच्या रोज विनायक घ्यायचा. शनिवार रविवार पण अर्चना शिकायला येत होती. तिच्या ओळखीच्या मुली रविवारी सकाळी येत असत. रविवारी मी सर्वांचाच नाश्ता बनवत होते. कधी पोहे, तर कधी उपमा, तर कधी ब्रेड चहा. अर्चना आमच्या घरचीच, जणू काही आमची मुलगीच होऊन गेली. सर्वांना विनायक शिकवायचा त्याचे पैसे त्याने कधी घेतले नाही. विनायकला विद्या ही दान करायला आवडते. विनायकने अर्चनाला इयत्ता १० वी पासून बीएस्सी पर्यंत शिकवले. तिला शिकवल्याचे समाधान आम्हाला दोघांनाही आहे. अर्चना पण गुणी मुलगी आहे. तिची बहीण पण आमच्याकडे यायची. ती गणितात खूप हुशार होती. आमचे डोंबिवलीचे घर जणू शिक्षणाचेच घर बनले होते. डोंबिवलीचे घर आल्यागेल्याचे होते. सासुसासरे, आईबाबा, माझी बहीण रंजना अधुनमधून आमच्या घरी दोन चार दिवसांकरता रहायला यायचे. मी पण पुण्याला पालट म्हणून दोन चार दिवस दर २ ते ३ महिन्यांनी जायचे. अर्चनाच्या घरी आम्ही गणपतीसाठी असायचो.

डोंबिवलीच्या घराचे सासऱ्यांनी बॅकेतून जे कर्ज घेतले होते ते विनायकचने शिक्षण सुरू असतानाच फेडायला सुरवात केली होती. पिएचडी करण्याच्या आधी एका कंपनीत विनायक २ वर्षे नोकरीला होता त्यातूनही कर्जफेड होत होती. हिंदुस्ताने लिव्हरची नोकरी लागल्यानंतर उरलेले सर्व हफ्ते व्याजासकट फेडले आणि घर आमच्या नावावर करून घेतले. डोंबिवलीच्या घरातले दिवस चांगले गेले.

सुमारे ७ वर्षानंतर विनायकला प्रमोशन मिळाले आणि आमच्या घराचा पत्ता परत एकदा बदलला. अंधेरीत कंपनीच्या जवळच कंपनीने आम्हाला रहायला जागा दिली. कंपनीत काम करणारे बरेच जण या कंपनीच्या जागेत राहत होते. परत एकदा सामानाची बांधाबांध झाली. यावेळी टेंपो नसून एक ट्रक होता. ट्रकवाल्याच्या ओळखीचे काही हमाल आले आणि त्यांनी सर्व सामान उचलून ट्रकमध्ये घातले. यावेळी सामानात थोडी भर होती. गोदरेज कपाट, ओनिडा टीव्ही, व्होल्टाज फ्रीज, पॅनासोनिकचा डेक आणि वॉशिंग मशीन. कोणत्याही लाकडी फर्निचरची भर पडली नव्हती. सामानाची बांधाबांध करण्याचा अनुभव होताच. आम्ही सामानाबरोबरच ट्रकमध्ये बसलो. आमच्या बरोबर आमची एक कुटुंब मैत्रिण सुषमा नेर्लेकर होती. अग्रेसर ४ सी मध्ये येऊन पोहोचलो. घरात प्रवेश केल्याकेल्या "वॉव किती छान" असेच शब्द तोंडातून फुटले. या सामानात काही केल्या रवा सापडत नव्हता. सुषमा म्हणाली की अगं कणकेचा शिराही छान होतो. तिने कणकेचा शिरा काहीतरी जेवणात गोड पाहिजे म्हणून केला व मी बाकीचा स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी तिला कामावर जायचे होते म्हणून ती लगेच संध्याकाळी निघाली. कंपनीने रहायला दिलेली जागा खूपच मोठी होती. हॉलमधून समोरच गुलमोहोराचे सुंदर झाड दिसत होते.


विनायकचा डोंबिवली अंधेरीचा रोजचा प्रवास संपला म्हणून मला खूप बरे वाटत होते. या घरात विनायक रोज दुपारी घरी जेवायला यायचा. रोज मी दुपारचे जेवण साग्रसंगीत करायचे. पोळी, भाजी. भात, आमटी, चटणी, कोशिंबीर, ताक असे सर्व काही करायचे. जेवताना काचेच्या डायनिंगवर बसायचो. असेच डायनिंग टेबलवर बसून जेवायचो आम्ही आयायटीच्या तुलसी ब्लॉक्समध्ये. ते दिवस आठवले. अंधेरीच्या भल्या मोठ्या जागेत आम्ही आमच्या दोघांच्या आवडीचे सर्व फर्निचर घेतले होते. सोफासेट, वार्डरोब, कॉफी टेबल, फोन ठेवायला कॉर्नरचे टेबल, काचेचे अंडाकृती डायनिंग टेबल, मोठा बेड, काचेच्या दारांना भलेमोठे पडदे, पडद्यांचे कापडही छान होते.


हा सारा आनंद काही दिवसच टिकला. विनायक रोजच्या रोज कंपनीच्या तळोजा फॅक्टरीत जायला लागला. परत रोज चार तासाचा प्रवास सुरू झाला. प्रवास कंपनीच्या कारमधून असला तरी प्रवास चुकलेला नव्हता. रात्रंदिवस काम ! डोंबिवलीच्या जागेत जशी मी दिवसभर एकटी असायचे तसेच परत सुरू झाले. विनायकच्या नशिबात कंपनीतून घरी आल्यावर सुखाने राहणे नव्हतेच मुळी ! या अंधेरीच्या जागेत आम्ही दीड ते दोन वर्षे होतो. हा कालावधी म्हणजे वाईट घटनांचा जणू क्रमच होता ! वाईट घटनांना पूर्णपणे विसरावे म्हणूनच की काय देवाने आमच्या पुढील आयुष्यात अमेरिका लिहिली होती !
क्रमश:....

3 comments:

Shyam said...

खूप छान !

Manasi said...

Very nice and interesting memoir! Reminded me of my own moves between different Indian cities and abroad. Waiting for next part :)

rohinivinayak said...

shyam kaka aani manasi pratisadabaddal anek dhanyavad ! manasi,, tuze moving experience vachala nakkich aavadatil mala ! lavkar lihayla ghe, :)